You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानची 'तुगरिल' युद्धनौका भारतीय नौदलासमोरची आव्हानं वाढवणार?
- Author, उमर फारुकी
- Role, रक्षा तज्ज्ञ
चीनमध्ये तयार झालेल्या तुगरिल युद्धनौकेचा पाकिस्तान नौदलात समावेश झाला या बातमीची भारतीय माध्यमांनी मोठ्या प्रमाणात दखल घेतल्याचं दिसलं. हे 'फ्रिगेट' (युद्धनौका) चीन आणि पाकिस्तान यांच्यात सहयोग वाढवण्याचं आणखी एक साधन असून यामुळे भारतासाठी आव्हान तर उभं राहणार नाही ना? असाही प्रश्न संरक्षण विश्लेषकांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने चीन निर्मित 054एपी युद्धनौका खरेदी केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांनुसार, या युद्धनौकेला 'पीएनएस तुगरिल' असं नाव दिलं आहे.
'तुगरिल' युद्धनौका 'सादरीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण'
पाकिस्तान नौदलाचे मीडिया विंगचे महासंचालक कॅप्टन राशिद यांनी सांगितलं, "तुगरिल वर्गाची पहिली युद्धनौका 'एचझेड' शिपयार्ड, शांघाय (चीन) येथे बनली आहे. याच प्रकारातील आणखी तीन युद्धनौका वर्षअखेरपर्यंत पाकिस्तानी नौदलात दाखल होतील. या जहाजांचा समावेश नौसेनेत झाल्याने ताकद वाढेल असं त्यांना वाटतं.
ते पुढे सांगतात, या युद्धनौकेवर असलेली शस्त्रात्र आणि सेन्सर यामुळे ही एक "सादरीकरणाचं उत्कृष्ट उदाहरण स्थापित करू शकेल." समुद्रात अनेक प्रकारची ऑपरेशन करण्यासाठी ही युद्धनौका सक्षम आहे. जमिनीवर, हवेत आणि पाण्याखालीही पाणबुडींना लक्ष्य करण्याची क्षमता यात आहे.
4 हजार टन वजन असलेली युद्धनौका मिळाल्याने संरक्षण क्षमता वाढेल असंही ते सांगतात. यामुळे सागरी सीमा आणि तटरक्षक क्षेत्रात संभाव्य धोके कमी करता येतील तसंच समुद्रातील परिवहन साधनंही सुरक्षित करण्यासाठी मदत होईल असंही ते म्हणाले.
कॅप्टन राशिद पुढे सांगतात, पीएनएस तुगरिल बुधवारी (24 नोव्हेंबर) चीनहून आपला प्रवास सुरू करेल आणि इमनीला, मलेशिया आणि श्रीलंका यामार्गे एका महिन्यात पाकिस्तानात पोहचेल.
ते असंही म्हणाले, की 054 एपी प्रकारात मोडणारी आणखी एक युद्धनौका पुढील सहा महिन्यात पाकिस्तानला पोहचणार आहे आणि त्यापुढच्या सहा महिन्यात तिसरी युद्धनौकाही आमच्या नौदलात दाखल होईल. अशाप्रकारे वर्ष संपेपर्यंत पाकिस्तान नौदलाला तीन युद्धनौका प्राप्त होतील आणि ही प्रक्रिया संपेल.
पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, क्षेत्राच्या सुरक्षेच्यादृष्टीने तुगरिल कॅटेगरीच्या या युद्धनौका पाकिस्तानी नौदल आणि सागरी सुरक्षेला बळ देतील. तसंच सागरी सुरक्षा निश्चित करण्यासाठी आणि आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करतील.
या युद्धनौका हिंदी महासागरातील क्षेत्रातील ताकदींमध्ये समतोल साधतील तसंच शांती आणि स्थैर्य प्रस्थापित करतील असा विश्वास काही अधिकाऱ्यांना वाटतो.
पाकिस्तान नौदल विषयाच्या तज्ज्ञांनुसार, तुगरिल श्रेणीच्या या युद्धनौकांचा पाकिस्तानी नौदलाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक आधुनिक युद्धनौकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
बीबीसीशी बोलताना पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक शाहिद रझा सांगतात, आतापर्यंत पाकिस्तानी नौसेनेत जेवढ्या मोठ्या युद्धनौकांचा समावेश झाला त्यात 054 एपी या प्रकारातील युद्धनौका मोठी कारवाई करण्याची क्षमता असलेली सर्वात आधुनिक युद्धनौका आहे.
यांचा समावेश पाकिस्तानी नौदलात झाल्याने त्यांची ताकद कित्येक पटींनी वाढली आहे तसंच त्यांचा आवाकाही वाढला आहे असाही दावा त्यांनी केला. ही युद्धनौका चिनी नौदल सध्या वापरत असलेल्या युद्धनौकांपैकी एक आहे.
नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात या युद्धनौका सामील झाल्याने आणि चीन निर्मित एफ-22 पी फ्रिगेट मिळाल्याने पाकिस्तानी नौसेनेचे चिनी नौसेनेसोबतचा सहयोग अनेक पटींनी वाढेल. पाकिस्तानी नौदल ही चिनी नौदलाचा एक प्रमुख भागीदार बनेल. अलीकडच्या काळात पाकिस्तानी नौदल आपल्या ताफ्यात आधुनिकीकरणावर विशेष लक्ष देत आहे. यासंबंधी मोठ्या स्तरावर काम केलं जात आहे."
भारत आणि पाकिस्तान नौदल क्षमतांची तुलना
भारतीय माध्यमांनी हल्ली केलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, भारताकडे सध्या 17 पाणबुड्या आहेत. (16 डिझेल आणि एक परमाणू ऊर्जाद्वारा संचालन करणाऱ्या)
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनुसार, त्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या 9 पाणबुड्या आहेत. फ्रिगेटची तुलना करायचं झाल्यास भारताचं पारडं जड आहे. पण चीनचा संदर्भ घेतल्यास परिस्थिती वेगळी आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका वक्तव्यानुसार पाण्यातील जहाजांच्यादृष्टीने चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल आहे.
2020 वर्षअखेरपर्यंत, चिनी नौदलाकडे 70 हून अधिक पाणबुड्या (एसएसबीएन) होत्या, यात सात परमाणू-संचलित आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. 12 न्यूक्लिअर अटॅक सबमरीन (एसएसएन) आहेत आणि 50 डिझेलवर चालणाऱ्या अटॅकिंग सबमरीन सुद्धा चिनी नौदलात दाखल आहेत.
पाकिस्तानी नौदल विषयाच्या जाणकारांचं म्हणणं आहे की, 054ए/पी प्रकाराच्या युद्धनौकांना एक मोठं यश मानलं जाऊ शकतं. 1970 सालचे ब्रिटिश फ्रिगेट्स जे पाकिस्तानला 1990 मध्ये मिळाले, याच्या तुलनेत या युद्धनौका विशेषत: पाणबुड्यांचा सामना युद्धात करण्यासाठीची त्यांच्यात क्षमता आहे.
ते पुढे सांगतात, नौदलाची क्षमता आणि संख्येचं बळ यादृष्टीने भारताचं पाकिस्तानपेक्षा एक पाऊल पुढे आहे. शस्त्रात्रांच्या जागतिक बाजारात भारताला आधुनिक शस्त्रांत्रांसाठी सर्वात आकर्षक ग्राहक मानलं जातं. यामुळे यूरोप, अमेरिका आणि रूसच्या शस्त्रात्र निर्माते भारताकडे आकर्षित आहेत.
भारतीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकारने पुढील दहा वर्षांत 56 युद्धनौका खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
संरक्षण विषयक तज्ज्ञ सांगतात, दुसऱ्याबाजूला पाकिस्तानची अर्थव्यवस्था फारशी बरी नसल्याने फ्रिगेट आणि पाणबुड्या यांच्यासह आधुनिक शस्त्रात्र मिळवण्यासाठी पाकिस्तानने आपला सहयोगी चीनच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. चिनी शस्त्रात्र कंपन्या पाकिस्तानला विशेष किमतीत शस्त्रात्रांची विक्री करतं असं मानलं जातं.
पाकिस्तानी नौदलात सज्ज असलेल्या काही युद्धनौका आधुनिक क्षेपणास्त्रद्वारा निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी असक्षम आहेत. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पाकिस्तानी नौदलात तुगरिल युद्धनौका सामील केल्याने परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
'तुगरिल'चं आगमन आणि धोक्याची घंटा
पाकिस्तानी नौदलामध्ये तुगरिलचा समावेश होण्याला भारतीय माध्यमांमध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. पाकिस्तानी नौदलाची क्षमता वाढण्यापेक्षाही भारतासाठी चिनी सैन्याची हिंदी महासागरातील उपस्थिती अधिक धोकादायक आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या मते, पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या निमित्तानी हिंदी महासागर तसंच अरबी समुद्रात चिनी नौदलाचा वावर वाढू शकतो. पाकिस्तान अत्याधुनिक युद्धनौकांशिवाय चीनकडून आठ पाणबुड्याही खरेदी करणार आहे. ही खरेदी म्हणजे पाकिस्तानच्या नौदलाच्या आधुनिकीकरणाचाच एक भाग आहे.
ब्रोकिंग्स इन्स्टिट्यूटनं जून 2020 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार 'गेल्या तीन दशकांमध्ये चीनने हिंदी महासागराच्या प्रदेशात आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत. चिनी नौदलाची वाढलेली ताकद आणि 'कर्ज देऊन अडचणीत आणण्याच्या' कथित धोरणाविषयी अमेरिकन आणि भारतीय युद्ध नीतीतज्ज्ञांमध्ये शंकेचं वातावरण वाढलं आहे. हिंदी महासागराच्या क्षेत्रात पीएलए नौदलाची वाढती उपस्थिती आणि पाकिस्तानी नौदलासोबतच्या सहकार्यानं भारताची चिंता वाढली आहे.
भारतीय माध्यमांमधील वृत्तांनुसार पाकिस्तानी आणि भारतीय नौदलांमध्ये खूप जास्त तफावत आहे. भारतीय माध्यमांनी ग्लोबर फायर इंडेक्स नावाच्या एका वेबसाइटच्या हवाल्याने हे म्हटलं आहे. ही वेबसाइट जगभरातील देशांच्या लष्करी सामर्थ्याचं विश्लेषण करते. त्यांच्या मते, भारताकडे सध्या 285 युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे 100 युद्धनौका आहेत.
ब्रोकिंग इन्स्टिट्यूशनच्या एका रिपोर्टनुसार इंडियन ओशन रिम असोसिएशनने (आयओआर) गेल्या काही वर्षांत पीएवएएननं सर्वांत जास्त प्रवास पाकिस्तानमध्येच केला आहे. चिनी युद्धनौका या कराची शिपयार्डमधील सर्व सुविधांचा पुरेपूर उपयोग करत आहेत. पाकिस्तानी नौदल हे आता चीनच्या हिंदी महासागरातील रणनीतीचाच एक भाग बनलं आहे.
या युद्धनौका आणि अन्य लष्करी सामुग्री मिळाली तरी पाकिस्तान आणि भारताच्या नौदलाच्या सामर्थ्यातील संतुलन फारसं बदलणार नाही, असं बीबीसीशी बोलताना भारतातील एक प्रसिद्ध नौसैनिक आणि सामरिक तज्ज्ञ राजा मोहन यांनी म्हटलं.
त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानी नौदलाचा चीन हिंदी महासागरात वापर करत आहे, हा भारतासाठी चिंतेचा विषय असायला हवा.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटलं की, पीएनएस तुगरिलच्या आगमनानं पीपल्स लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी नौदलांमधील माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त सरावामुळे आमची क्षमता कित्येक पटीने वृद्धिंगत होईल. दोन्ही देशांनी संयुक्त सरावही केला आहे.
पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या मते 54 एपी प्रकाराच्या पीएनएस तुगरिल युद्धनौका वेगवेगळ्या प्रकारची कार्यं करायला सक्षम आहे.
"पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात या युद्धनौका महत्त्वाच्या ठरतील आणि पाकिस्तानी नौदलाची संरक्षणाची क्षमता अधिक वाढेल."
पाकिस्तानी नौदलानं 1993 आणि 1994 च्या दरम्यान ब्रिटीश रॉयल नेव्हीकडून चार युद्धनौका खरेदी केल्या होत्या. पीएनएस बद्र, पीएनएस टीपू सुलतान, पीएनएस बाबर आणि पीएनएस शाहजहाँ या चारही युद्धनौकांना त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर ताफ्यातून हटविण्यात आलं.
पाकिस्तानच्या नौदलाने चीनकडून 054 एपी प्रकाराच्या युद्धनौका खरेदी केल्या आणि त्यांचा वापर ब्रिटनकडून खरेदी करण्यात आलेल्या 21 फ्रिगेटऐवजी करायला सुरूवात केली. कारण या जहाजांचा कार्यकाळही पूर्ण झाला होता. जून 2017 मध्ये पाकिस्ताननं चिनी नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या 054एपी प्रकाराच्या फ्रिगेटची ऑर्डर दिली.
ब्रोकिंग इन्स्टिट्यूटकडून जून 2020 मध्ये 'हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या महत्त्वाकांक्षा' या नावाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, पीपल्स लिबरेशन आर्मी ही हिंदी महासागर प्रदेशातील देशांच्या नौदलांसोबत सहकार्य करत क्षमता वाढविण्याच्या दृष्टिने काम करत आहे. याचा मुख्य भर हा हिंदी महासागरातील दहशतवादविरोधी कारवाईवर आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानच्या नौदलाने पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली सलग आठ वेळा सराव केला. या सरावाचा मुख्य उद्देश हा पाकिस्तानी नौसेनेची क्षमता आणि सामर्थ्य वाढवणे हा होता.
फेब्रुवारी 2021 मध्ये अंतिम सरावादरम्यान अमेरिका आणि नाटोच्या सैन्यानातील काही देशांच्या नौदलांनीही यामध्ये भाग घेतला होता. पाकिस्तान आणि चीनच्या नौदलांदरम्यानच सराव होत आहे, अशी धारणा होऊ नये हा यामागचा उद्देश होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)