बलुचिस्तानात पकडलेला आरा मासा एवढा महाग का आहे?

आरा मछली(फाईल फोटो)

फोटो स्रोत, PETER KYNE

फोटो कॅप्शन, आरा मछली (फाईल फोटो)
    • Author, रियाझ सोहेल
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, कराची

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मच्छिमारांना इराणच्या सागरी सीमेजवळ आरा मासा सापडला आहे. माशाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानमध्ये हा मासा सहसा आढळत नाही.

आरा मासा विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्यानं आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सिंध आणि बलुचिस्तानमधील राज्य सरकारांनी 2016 पासून याच्या शिकारीवर आणि व्यापारावर पूर्णपणे बंदी लावली होती. मात्र बेकायदेशीररित्या आजही या माशाची विक्री केली जाते.

वन्यजीव संरक्षणासाठी काम करणारी संघटना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF)नुसार इराणच्या जवळ जीवनीमधील गतर परिसरात 29 ऑक्टोबरला हा आरा मासा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला होता. स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री करण्यात आली.

WWF चे सल्लागार मुअज्जम खान यांनी हा भाग खूप दूर असून पकडलेल्या माशाची लांबी आणि वजन याबाबत निश्चित माहिती नसल्याचं म्हटलं आहे. फोटोवरून अंदाज लावला तर, या माशाचं वजन 70 ते 80 किलो असू शकतं, असं ते म्हणाले.

नायलॉनचं जाळं सर्वात मोठा शत्रू

फोटो स्रोत, PETER KYNE

फोटो कॅप्शन, नायलॉनचं जाळं सर्वात मोठा शत्रू

यापूर्वी 2018 मध्ये सिंधमधील सागरी हद्दीत काझर क्रीकमधून सुमारे 15 फूट लांब आरा मासा आढळला होता. हा मासा मृतावस्थेत मिळाल्याचा दावा मच्छिमारांनी केला होता. सुमारे 1320 किलो वजनाचा हा मासा 90 हजार रुपयांत खरेदी करण्यात आला होता.

कुठे आढळतो आरा मासा?

पाकिस्तानमध्ये आरा मासा सिंध आणि बलुचिस्तानमधील समुद्रात आढळतो. हा सागरी भागात आढळणारा मासा असून, तो मोकळ्या समुद्रात आढळत नाही, असं WWF चे सल्लागार मुअज्जम खान म्हणाले.

इंडस डेल्टासह बलुचिस्तानच्या सोनमियानी, कलमत, पसनी, जीवनी आणि ग्वादर या परिसरात हा मासा प्रजनन करतो आणि त्याचठिकाणी त्यांना खाद्यही मिळतं.

"या माशाच्या लहान बाळाचा आकार दोन ते अडीच फूट असतो. या माशाची पूर्ण लांबी 13 ते 14 फूट असू शकते. त्यात पाच ते सहा फूटपर्यंत चोचीसारखा भाग असतो त्याला आरा म्हणतात. पाकिस्तानमध्ये याच्या तीन प्रजाती आढळत होत्या," असं मुअज्जम खान म्हणाले.

ब्रिटनिका इनसायक्लोपीडियानुसार सर्वांत मोठ्या आरा माशाची लांबी सात मीटर म्हणजे 23 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असते. या माशाची मादी शरीरातच अंडी देते. या प्रौढ माशाचं वय 10 वर्षं तर आयुष्यमान 25-30 वर्षे असते.

आरा माशाच्या दातांची सीमा

पाकिस्तानात 70 च्या दशकात आरा मासा मोठ्या संख्येनं आढळत होता आणि तो पकडलाही जात होता.

आरा मछली (फाईल फोटो)

फोटो स्रोत, DAVID WACKENFELT

मुअज्जम खान बलुचिस्तानातील विविध भागांमध्ये राहिलेले आहेत. त्यांनी काही काळ पसनी याठिकाणीही वास्तव्य केलं होतं. त्याठिकाणी रोज किमान एक किंवा दोन आरा मासे आढळत होते, असं ते सांगतात.

"त्या काळात हे मासे एवढ्या अधिक संख्येनं आढळायचे की, जीवनी मध्ये एक-एक हजार फुटांचे किमान दोन गोलाकार तयार झाले होते. त्याच्या सीमा या माशांच्या दातामुळं तयार झाल्या होता. त्यावर जाळं टाकण्यात आलं होतं. त्यांचे हे दात ज्याला आराही (करवत) म्हणतात ते पाच ते सहा फुटांचे असतात. इतर भागांतही काही ठिकाणी अशा सीमा तयार झालेल्या होत्या."

नायलॉनचं जाळं सर्वांत मोठा शत्रू

इंडस डेल्टापासून इराणच्या सागरी सीमेपर्यंत मच्छिमार नायलॉनच्या जाळ्याचा वापर करतात. मुअज्जम खान त्याला मुश्का जाळं म्हणतात. सागरी मासे पकडण्यासाठी त्याचा वापर होतो.

"आरा माशांची अडचण म्हणजे त्यांच्या तोंडाच्या पुढे करवतीसारखा एक भाग म्हणजेच आरा असतो. त्यामुळं इतर मासे अडकले नाही तरी, हे मासे जाळयात नक्की अडकतात. कॉटनचे जाळे होते त्यावेळी हे मासे त्यांचे दोर कापून निघून जात होते. मात्र, आता जे नायलॉनचे जाळे वापरले जातात ते मजबुतीचा विचार करून तयार केलेले असतात. आरा माशांना ते कापून पुढं जाता येत नाही. त्यामुळं हा मासा विलुप्त होण्याचं सर्वात मोठं कारण हे जाळं आहे."

नॅशनल जियोग्राफिकच्या रिपोर्टनुसार आरा मासा किमान 20 देशांमधून स्थानिक दृष्ट्या विलुप्त झाला आहे. तर 43 देशांमधून याची किमान एक प्रजाती नष्ट झाली आहे. त्यात अमेरिकेचाही समावेश आहे. त्याठिकाणी 1961 नंतर हा मासा आढळलेला नाही.

सायन्स अॅडव्हान्सेस मॅगझिनमधील माहितीनुसार चीन, इराक, हैती, जपान, तिमोर लेस्त, एल सालव्हाडोर, तैवान, जिबूती आणि ब्रूनेईमधून हा मासा पूर्णपणे विलुप्त झाला आहे.

तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरलं आहे. याठिकाणी आरा माशाच्या संवर्धनासाठी उत्तम प्रयत्न केले जात आहेत.

आरा माशाचा वापर

पाकिस्तानात आरा माशाचा फार काही वेगळा वापर केला जात नाही. केवळ इतर शार्क माशांप्रमाणे याचं मांस गुपचूप विक्री केलं जातं, असं मुअज्जम खान म्हणाले.

मात्र या माशाचे पंख आणि दात यांचा चांगला मोबदला मिळतो. कोंबड्यांच्या झुंजीसाठी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत शेकडो डॉलरमध्ये त्याची विक्री केली जाते, अशी माहिती जेम्स कुक युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियामधील सागरी जीवतज्ज्ञ कॉलिन सिम्फोंडोफर यांनी नॅशनल जियोग्राफिकशी बोलताना सांगितलं.

कोंबड्यांच्या झुंजींसाठी बक्षीस, खाद्य किंवा औषध म्हणून वापरण्यासाठी या आरा माशाचे दात आणि पंख याची खरेदी केली जाते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)