'इथे' मासेमारीसाठी घोड्यांनी समुद्र नांगरला जातो...

फोटो स्रोत, Angela Dansby
- Author, अँजेला डॅन्सबी
- Role, बीबीसी फ्युचर
जर्मनी ते इंग्लंड 'नॉर्थ सी'च्या किनारी भागांमध्ये घोड्याच्या पाठीवर बसून कोळंबी मासे पकडले जात असत. आज असे केवळ 17 मच्छिमार उरले आहेत आणि यात पहिल्यांदाच स्त्रियाही उतरल्या आहेत.
बेल्जियममध्ये वेस्ट फ्लेन्डर्सच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटरांवर एक हिरवागार गवताळ भाग आहे, तिथे नेली बेकार्ट यांनी त्यांचा अॅक्सेल हा एक टनी ब्रबान्ट ड्राफ्ट घोडा बाहेर काढला. त्याच्या पाठीवर जुन्या पद्धतीचं लाकडी खोगीर बांधून त्यांनी मागच्या बाजूला गाडी बांधली, त्यात मासेमारीचं सामान भरलेलं होतं.
त्यांच्यासोबत मी घोडागाडीत बसले आणि हळूहळू गावातल्या रस्त्यांवरून आम्ही समुद्रकिनाऱ्याजवळच्या ऊस्टडुइन्कर्क गावाकडे निघालो.
ओहोटी होती, त्यामुळे अॅक्सेल ओल्या वाळूतून एक किलोमीटर जात पाण्याच्या काठापर्यंत पोचला. तिथे पोचल्यावर बेकार्ट खाली उतरल्या, त्यांच्या पायात गुडघ्यावर येतील एवढे उंच वॉटरप्रूफ बूट होते, एकंदर पोषाखही वॉटरप्रूफ होता. मग त्यांनी घोडा गाडीपासून सोडला नि त्याच्या पाठीशी मोठं नसराळ्याच्या आकाराचं जाळं बांधलं.
मग घोड्याच्या दोन बाजूंनी वाळुंजीच्या काठ्यांच्या टोपल्या टांगल्या नि या 23 वर्षीय घोड्याच्या पाठीवर टोपल्यांच्या मधोमध मांड ठोकली. त्यानंतर बेकार्ट यांनी घोडा मांड्यांपर्यंत पाण्यात नेला. आता त्या कोळंबी मासे पकडणार होत्या. इथल्या छोट्याशा समुदायामधील फ्लेमिश मच्छिमार गेली पाचशेहून अधिक वर्षं अशा रितीने मासेमारी करत आले आहेत.

फोटो स्रोत, Angela Dansby
फ्रान्स ते जर्मनी व दक्षिण इंग्लंडला लागून असलेल्या नॉर्थ सी किनारपट्टी भागातील कुटुंबं पूर्वी अशी मासेमारी करत असत. या मासेमारीच्या परंपरेला युनेस्कोच्या यादीतही स्थान मिळालं आहे. पण आता केवळ 17 हयात व्यक्तींनाच अशा रितीने मासे पकडता येतात.
बेल्जियमच्या वायव्य टोकावर असणाऱ्या ऊस्टडुइन्कर्क इथेच आता केवळ ही परंपरा जिवंत आहे. पंधराव्या शतकाच्या अखेरपासून वडिलांकडून मुलांकडे वारसा म्हणून सुपूर्द केली जाणारी मासेमारीची ही पद्धत इतकी वर्षं कोणत्याही बदलाविना टिकून आहे.
पण 'पूर्व डंकर्क घोडेस्वार मच्छिमार संघटना' (d'Oostduinkerkse Paardenvissers), 'रॉयल ऑर्डर ऑफ हॉर्स फिशर्स' (Orde van de Paardenvisser), 'नेव्हिगो राष्ट्रीय मासेमारी संग्रहालय' व 'कोक्सिज्दे शहर निगम' यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाने पाच वर्षांपूर्वी एक अभूतपूर्व पाऊल उचललं. या प्रतिनिधी-मंडळाने मासेमारी करणाऱ्या महिलांनाही ही परंपरा पुढे चालवायला परवानगी दिली. आता 37 वर्षीय बेकार्ट या जगातील पहिल्या अधिकृत मान्यता मिळालेल्या 'घोडेस्वार मच्छिमार' (paardenvisser) आहेत.
"मी एखादी गोष्ट करू शकत नाही, असं कोणी म्हणत असेल, तर मी म्हणते की मी करून दाखवेनच," असं त्या म्हणतात. "आता युनेस्कोची मान्यता मिळाल्यामुळे पुरुषांचा गट मला नाकारूही शकत नाही."
पूर्वी नॉर्थ सीच्या किनारपट्टी भागात स्त्रिया हाताने ढकलायच्या छोट्या होड्या घेऊन कोळंबी पकडत असत, पण घोडेस्वारी करत मासेमारी करायला त्यांना परवानगी नव्हती, कारण हे 'पुरुषांचं काम' मानलं जात होतं. पण 2013साली घोडेस्वार मासेमारीला युनेस्कोने मान्यता दिल्यानंतर, ही प्रथा टिकवून ठेवण्यासाठी संरक्षक उपाययोजना करणं आवश्यक ठरलं आहे.
युनेस्कोच्या मान्यतेमुळे 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' यादीमध्ये स्थान मिळणाऱ्या कोणत्याही कृतीसंदर्भात सर्व लिंगांच्या व्यक्तींना समान संधी असावी लागते, त्यामुळेच या घोडेस्वार मच्छिमार महिलांचा मार्ग मोकळा झाला.

फोटो स्रोत, Angela Dansby
बेकार्ट यांनी 2015 साली दोन वर्षांची उमेदवारी पूर्ण केली, त्यात त्यांना थिअरॉटिकल शिक्षण देण्यात आलं, मग एक प्रॅक्टिकल परिक्षा झाली. त्यानंतर तीन मुलांची ही आई पहिली महिला घोडेस्वार मच्छिमार म्हणून रुजू झाली.
आता त्या पुरुषांच्या जोडीने वर्षाचे तीन हंगाम कोळंबी पकडतात. या विशेष कसब लागणाऱ्या मासेमारीचं प्रदर्शन उन्हाळ्यात पर्यटकांसाठी भरवलं जातं, त्यातही त्या सहभागी होतात.
बेकार्ट अॅक्सेलला किनारपट्टीला समांतरपणे फिरवत होत्या, जाळ्याच्या दुतर्फा असणाऱ्या धातूच्या नि लाकडाच्या पट्ट्या समुद्रतळाला घसटून पुढे मागे होत होत्या. जाळ्याची पुढची बाजू एका साखळीने वाळूला खेचून 'धक्क्याने लाटा' निर्माण करत होती, त्यामुळे लहान, करडे कोळंबी मासे उड्या मारून जाळ्यात अडकत होते, आणि पाण्याच्या दबावामुळे ते जाळ्यात मागेपर्यंत जाऊन पडत होते.
सुमारे अर्धा तास झाल्यावर बेकार्ट घोडा घेऊन किनाऱ्यावर परतल्या. त्यांना जाळ्यातले मासे बाहेर काढून सुकवायचे होते. लहानसहान मासोळ्या नि खेकडे त्यांनी समुद्रपक्ष्यांना खाण्यासाठी बाजूला ठेवले, रोवळी असणारे छोटे कोळंबी मासेही त्यांनी बाजूला काढले आणि फक्त पूर्ण वाढ झालेले व खाण्याइतके मोठे मासे निवडले.
सर्वसाधारणतः त्या पकडलेले कोळंबी मासे किनाऱ्यावरच उकळवून घेतात, पण त्या दिवशी कोव्हिड-19 च्या निर्बंधांमुळे त्यांना हे घेऊन लगेच घरी जायचं होतं. उन्हाळ्यातला, फारसा वर्दळीचा नसलेला काळ असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला खाण्यासाठी पुरेल इतकेच (सुमारे एक किलो) मासे पकडले. कोळंबीचा ताजेपणा टिकवायचा असेल, तर ते जिवंत असतानाच शिजवणं हा सर्वोत्तम पर्याय आहे, असं त्या म्हणाल्या.
घरी आल्यावर त्यांनी गॅरेजबाहेर एका कढईतून मीठ घातलेलं पाणी आणलं. त्या आणि त्यांचे मच्छिमार पती ख्रिस व्हर्मोते, दोघांनी मिळून कोळंबी गरम पाण्यात टाकली. साधारण 10 मिनिटांनी करड्या कोळंबीचा रंग गुलाबी नि पांढरा झाला. मोठा दांडा असलेल्या एका पळीने बेकार्ट यांनी मासे बाजूला काढले आणि त्यांचं आवरण सोलण्याचं कष्टप्रद काम सुरू झालं.
मी आत्तापर्यंत खाल्लेले सर्वांत ताजे व सर्वांत रुचकर कोळंबी मासे इथलेच होते. या माश्यांचे पदार्थ बनवण्याचे विविध प्रकार आहे. त्यातला बेकार्ट यांचा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे- croquette crevette: मऊ झालेली कोळंबी पिठात घालून तळल्यावर हा पदार्थ तयार होता, अनेकदा वाढीव चवीसाठी यासोबत सालीही घेतल्या जातात.
कोळंबीची मासेमारी करणं हा कौटुंबिक पेशा आहे. बेकार्ट व्हर्मोते यांच्याकडून ही कला शिकल्या. व्हर्मोते यांचे पणजोबा घोडेस्वार मच्छिमार होते. बेकार्ट यांना पहिल्यापासूनच घोडेस्वारीची आवड होती आणि हे नवीन कौशल्य शिकायची त्यांची इच्छाही होती. सुरुवातीला इतर मच्छिमारांनी बेकार्ट यांना व त्यांच्या प्रशिक्षक पतीला विरोध केला, पण त्या दोघांनीही आपली क्षमता दाखवून दिली आणि बेकार्ट कुशलपणे घोडेस्वारी करू लागल्या.

फोटो स्रोत, Getty Images
"पुरुष जे काही करतो, ते बाईदेखील करू शकते," असं बेकार्ट म्हणतात. आता त्यांना 'रॉयल ऑर्डर ऑफ हॉर्स फिशर्स' या संस्थेने मान्यताही दिली आहे. शिवाय, येत्या शरदामध्ये वार्षिक शॅम्पेन लेबलवर त्यांचं छायाचित्र लावून त्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. ही कला जोपासणारी पहिली घोडेस्वार मच्छिमार महिला म्हणून त्यांना हा सन्मान प्राप्त होणार आहे.
"नवऱ्याकडूनच प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो, कारण समुद्रात एकमेकांवर विसंबून राहावंच लागतं. विशेषतः घोडा पळून गेला, तर साथीदाराची मदत लागतेच," असं बेकार्ट सांगतात. त्या व व्हर्मोते आता त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाला या मासेमारीचं प्रशिक्षण देत आहेत आणि तीन सदस्य असलेलं पहिलं घोडेस्वार मच्छिमार कुटुंब होण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या नऊ वर्षांच्या जुळ्या मुली मोठ्या होतील, तेव्हा त्यांनादेखील हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
परंपरा अशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्याने टिकून राहते. शिवाय, ऊस्तडुइन्कर्कमधील व आसपासच्या प्रत्येक मच्छिमार घरामध्ये इतरही कौशल्यांची जोपासना होते. उदाहरणार्थ- जाळी विणणं, लाटांचा अंदाज बांधणं व घोड्यांची काळजी घेणं, हे कामही इथे निगुतीने होतं. इथल्या 13 कुटुंबांमध्ये 15 मच्छिमार पुरुष आहेत, तर दोन मच्छिमार महिला आहेत (बेकार्ट यांच्या व्यतिरिक्त कॅट्रिएन टेरीन 29 जून 2020 रोजी प्रॅक्टिकल परीक्षा पास झाल्या)- आणि हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत.
औपचारिकदृष्ट्या ते 'पूर्व डंकर्क घोडेस्वार मच्छिमार संघटने'च्या छत्राखाली एकत्र आले आहेत. शिवाय, आपल्या कलेला चालना मिळावी यासाठी ते इतर देशांमध्येही जातात आणि बेल्जियमचे राजे फिलिप लिओपाल्ड लुई मेरी यांना त्या-त्या हंगामातील पहिल्या शिकारीचे मासे भेट म्हणून दिले जातात. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात 'लाइकन महाला'त हा समारंभ पार पडतो.

फोटो स्रोत, Alamy
बेल्जियममधील नेव्हिगो राष्ट्रीय मत्स्यसंग्रहालयातील संशोधक रूथ पिर्लेट यांच्या म्हणण्यानुसार, ही कला येण्यासाठी केवळ उत्तम घोडेस्वारी पुरेशी नाही, तर किनारपट्टी, वाळूचे बंधारे, जलप्रवाह, लाटांच्या रचना व अगदी कोळंबी शिजवणं इथपर्यंतचं ज्ञान असावं लागतं. या संग्रहालयात दोन मजले भरून कोळंबी मासेमारीचा इतिहास संगृहित केलेला आहे आणि एका घोडेस्वार मच्छिमाराने व त्याच्या पत्नीने चालवलेलं एक उपहारगृहदेखील तिथे आहे. "यात बरंच कौशल्यं पणाला लावावं लागतं आणि हे वेगळ्या तऱ्हेचं कौशल्य असतं," असं त्या सांगतात.
पिर्लेट म्हणाल्या, सोळाव्या शतकापासून दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापर्यंत नॉर्थ सी भागात घोडेस्वारीद्वारे कोळंबी मासेमारी केली जात होती. पण अर्थव्यवस्था सुधारल्या, किनारपट्टीवरील मच्छिमार लुप्त झाले. उदाहरणार्थ- बेल्जियममध्ये किनारपट्टीच्या भागात लहान शेतं होती व अधिकच्या अन्नाचा व उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून कोळंबी पकडली जात असे. पण किनारपट्टीचा विकास झाला आणि शेतं संपत जाऊ लागली, घोडेही दुसऱ्या भागांमध्ये निघून गेले.
आता ही जुनी पद्धत जाऊन तिथे बहुतांश ठिकाणी व्यापारी मासेमारी आली आहे. पोलादी तुळईने उघडली जाणारी अवजड जाळी वापरून मोठमोठ्या जहाजातून समुद्री तळ ओरबाडला जातो आहे.
घोडेस्वारी मच्छिमारी इतकी कार्यक्षम नसली, तरी अधिक शाश्वत स्वरूपाची होती. या पद्धतीमध्ये वापरलं जाणारं उपकरण हलकं असतं त्यामुळे समुद्रीतळाची हानी होण्याची शक्यता कमी होते. परंतु, आर्थिकदृष्ट्या यात फारसा लाभ नाही. बेकार्ट यांच्या मते, बहुतांश घोडेस्वार मच्छिमार उपजीविकेसाठी कोणतीतरी 'खरी' नोकरी करतात. "हा खूप महागडा छंद आहे, पण आस्थेपोटी करावंसं वाटतं," असं त्या म्हणाल्या.
(सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे) अशा कोळंबीच्या हंगामात दर दिवशी सरासरी सात किलो कोळंबी जमा होते आणि प्रति किलो 10 युरो दराने विकली जाते. यासाठी तीन तास मासेमारी करावी लागते- दर अर्धा तासाने किनाऱ्यावर येऊन जाळं रिकामं करावं लागतं, आणि उपयुक्त मासे टोपल्यांमध्ये ठेवावे वाटतात. एकूण मिळून नऊ तास बाहेर कामामध्ये जातात. सर्वसाधारणतः मच्छिमार त्यांच्या शिकारीमधील मासे खातात, गोठवतात किंवा स्थानिकांना मागणीनुसार मासे विकतात.
ऊस्टडुइन्कर्कमध्ये घोडेस्वार मच्छिमारांचे पुतळे किनारपट्टीला लागून व रस्त्यांच्याकडेला मोठ्या संख्येने बसवलेले आहेत. पाचशे वर्षं जुन्या परंपरेच्या सन्मानार्थ हे पुतळे लावण्यात आले. चित्रं, नक्षीकाम, कार्यक्रमस्थळं, रस्त्यांची नावं इथपासून ते अगदी Peerdevisscher या स्थानिक बीअरमध्येही घोडेस्वार मच्छिमारांच्या सन्मानार्थ काही खुणा ठेवलेल्या असतात. "इथले रहिवाशांना त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो," असं पिर्लेट म्हणतात.
या समुदायाच्या अस्मितेमध्ये कोळंबी मच्छिमारांचा अंतःस्थ धागा आहे आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनाही त्यांची प्रेरणा उपयोगी पडते.दर वर्षी जून महिन्यात इथे दोन दिवसांचा कोळंबी महोत्सव होतो. हा इथला सर्वांत महत्त्वाचा स्थानिक सुट्टीचा दिवस आहे. स्थानिक लोक अनेक महिने तराफे, पोशाख, इत्यादी तयार करण्यात घालवतात. या प्रदर्शनासाठी सुमारे 10 हजार आंतरराष्ट्रीय प्रेक्षक उपस्थित राहतात. पहिल्या दिवशी घोडेस्वार मच्छिमारांमध्ये कोळंबी पकडण्याची स्पर्धा असते. जिंकणारा स्पर्धक दुसऱ्या दिवशीच्या परेडमध्ये प्रथम स्थानी असतो.
या महोत्सवाची सुरुवात 1950 साली झाली. ऊस्टुइन्कर्कच्या शेजारी असणाऱ्या कोक्सिज्द या शहराचे तत्कालीन महापौर होनोरे लुनेस यांनी ही सुरुवात केली. घोडेस्वारी करत कोळंबी पकडण्याच्या या प्रथेला पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनवून त्यांनी ही परंपरा वाचवली. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात प्रदर्शनांचंही आयोजन केलं जातं. पूर्वीपासूनच याला नगरपालिकेचं पाठबळ आहे आणि या उपक्रमासाठी अंशदानही मिळतं. कोक्सिज्देचे सध्याचे महापौर मार्क व्हेन्देन बुशे म्हणाले की, या परंपरेमुळे आधुनिक किनारी समुदाय तग धरून आहे. "ही आमची अस्मिता आहे."
शिवाय, छोट्या कोळंबीची बेल्जियन आहारातील भूमिका मोठी आहे. नॉर्थ सीमध्ये पकडण्यात येणाऱ्या एकूण कोळंबींपैकी अर्धे मासे बेल्जियममध्ये विकले जातात. सार करण्यासाठी किंवा croquette crevette व tomate-crevette (मोठा टॉमेटो आतून पोकळ केला जातो आणि त्यात कोळंबी व मेयॉनिज भरलं जातं) अशा खास बेल्जियन पदार्थांसाठी कोळंबीचा वापर होतो. काहींना नुसती शिजवलेली करडी कोळंबी आणि ब्रेड कॉफीसोबत खायला आवडतं, किंवा स्थानिक बीअर अथवा व्हाइट वाइनसोबतही याचा स्वाद घेतला जातो.
आहारविषयक उपयोगासोबतच घोडेस्वार मच्छिमारीची ही परंपरा आंतरिक स्वास्थ्यासाठीही उपयुक्त आहे. "यातून मला शांतचित्त वाटतं, कारण तिथे फक्त मी, माझा घोडा नि समुद्र, एवढंच असतं," असे बेकार्ट म्हणतात. "काळ लोपल्यासारखं वाटतं, एकात्म होऊन जातो आपण. डोक्यात इतर कशाचाच विचार येत नाही."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








