बलुचिस्तानमध्ये पकडण्यात आलेल्या 'या' एका माशावर 7.80 लाखांची बोली का लागली?

फोटो स्रोत, AHMED ALI
- Author, मोहम्मद काझिम
- Role, बीबीसी उर्दू
बलुचिस्तानच्या समुद्र किनाऱ्यावरील ग्वादर जिल्ह्यातील मच्छिमार अब्दुल हक आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या जाळ्यात एक मासा अडकला ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
खरं तर वजन आणि उंचीनं हा मासा मोठा नव्हता, तरीही तो मौल्यवान असल्याकारणानं हक यांनी ताबडतोब त्याला बाजारात नेलं.
अब्दुल हक यांच्या काकाचा मुलगा राशिद करीम बलोच यांनी सांगितलं की, 26 किलो वजनाचा हा मासा 7 लाख 80 रुपयांना विकण्यात आला.
"या माशाला पकडण्यासाठी 2 महिने मेहनत करावी लागते आणि इतक्या प्रयत्नांनी जर तो तुमच्या हातात लागत असेल तर आनंद होणारच," असंही ते म्हणाले.
कुठे पकडला हा मासा?
या मौल्यवान माशाला इंग्रजीत क्रोकर, उर्दूत सवा आणि बलुची भाषेत कूर म्हटलं जातं.
जीवानी भागातल्या समुद्र परिसरातून हा मासा पकडण्यात आल्याचं ते सांगतात.
हा भाग ग्वादर जिल्ह्यात येतो आणि इराणच्या सीमेपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे.

फोटो स्रोत, Reuters
राशिद करीम यांनी सांगितलं, "या माशाची शिकार करण्यासाठी केवळ 2 महिने असतात. त्यामुळे मग त्याला पकडण्यासाठी मच्छिमारांना खूप मेहनत करावी लागते."
अब्दुल हक आणि त्यांचे सहकारी इतर साधारण मासे पकडत होते. पण जेव्हा त्यांनी जाळं पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा त्यांना त्यात क्रोकर मासा अडकल्याचं दिसून आल्याचं ते पुढे सांगतात.
या माशाची बोली 30 हजार रुपये प्रती किलो या भावाने लागली.
राशिद करीम सांगतात, या माशाचं वजन बऱ्यापैकी जास्त असतं आणि ते मोठेही असतात.
"काही वर्षांपूर्वी एका माणसानं खूप जास्त वजनाचा क्रोकर मासा पकडला होता आणि तो 17 लाख रुपयांना विकला होता. पण अब्दुल हक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पडकलेल्या माशाचं वजन केवळ 26 किलो इतकं होतं," असं ते पुढे सांगतात.
बाजारात या माशाची बोली सुरू झाली तेव्हा शेवटची बोली ही 30 हजार रुपये प्रती किलो इतकी होती आणि यामुळे मग हा मासा 7 लाख 80 हजार रुपयांना विकला गेला.
हा मासा मौल्यवान कसा काय?
ग्वादर विकास प्राधिकरणाचे सहसंचालक आणि वैज्ञानिक अब्दुल रहीम बलोच सांगतात की, मांसाचं वजन अधिक असल्यामुळे बहुतेक माशांची किंमत जास्त असते. पण क्रोकरच्या बाबतीत वेगळं आहे.
या माशाच्या एअर ब्लॅडरमुळे (यात हवा भरल्यामुळे मासा पोहतो) याची किंमत अधिक असते.

फोटो स्रोत, PA Media
या माशाचा एअर ब्लॅडर वैद्यकीय कामांमध्ये उपयोगात येतो आणि चीन, जपान, यूरोपमध्ये याला मागणी आहे.
"या एयर ब्लेडरचा वापर करून माणसाच्या शरीरात शस्त्रक्रियेदरम्यान जे टाके लावले जातात ते बनवतात. विशेष करून हृदयासंबंधी शस्त्रक्रिया करताना टाके लावण्यासाठी याचा उपयोग केला जातो," असं ते पुढे सांगतात.
हा मासा कसा पकडतात?
बलुचिस्तानमध्ये या माशाचं कूर हे नाव त्याच्या आवाजामुळे तसं ठेवण्यात आलं असावं असा अंदाज आहे.
अब्दुल रहीम बलोच यांनी सांगितलं की, "हा मासा कूर,कूर असा आवाज काढतो."
हा माशाची मादी समुद्रकिनारी असलेल्या वृक्षाच्या कडेकपाऱ्यांमध्ये अंडी द्यायला येते.

फोटो स्रोत, RASHID KARIM
जे अनुभवी मच्छिमार असतात ते त्याचा आवाज ऐकतात आणि तिथं जाळं टाकून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात.
तास किंवा दोन तासानंतर जेव्हा त्यांचा आवाज बंद होतो तेव्हा जाळं वरती ओढलं जातं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








