You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंदुकीतून गोळी झाडण्याचा ‘अभिनय’ केला पण या महिलेचा खरंच जीव गेला
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
मारधाड चित्रपट तुम्हाला आवडतात का? कोणाला आवडणार नाहीत. दोन-तीन तास मस्त डोकं घरी ठेवून रिलॅक्स व्हायला पाहायचे. अतिरंजित कथा, कल्पोकल्पित जग, उडणाऱ्या गाड्या आणि पावसाचे थेंब जितक्या सहजतेने कोसळतात तितक्याच सहजतेने झाडल्या जाणाऱ्या गोळ्या. मज्जानी नी लाईफ!
या चित्रपटात हिरो, आसपासच्या शंभर बंदुकधारी गुंडांवर गोळ्या झाडत असतो, त्याला एकही लागत नसते, पण ते टपाटपा मरून पडत असतात. आपण टाळ्या वाजवत असतो, कारण मनातल्या मनात माहिती असतं हे खरं नाहीये, असं घडत नाही, असं कोणीच मरत नाही, या बंदुका खऱ्या नाहीत. पण... या खोट्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीने खरोखर कोणाचा जीव गेला तर?
सध्या अमेरिकेत गाजत असलेली केस. हॉलिवुडच्या 'रस्ट' या हाणामारी प्रकारात मोडणाऱ्या पिक्चरचं शुटिंग चाललं होतं.
अभिनेता अॅलेक बॉल्डविन मुख्य भूमिकेत होते. शॉटची तयारी झाली होती. कॅमेऱ्यामागे हेलेना हचिन्स होत्या, त्यांच्यामागे दिग्दर्शक जोएल सुझा होते.
चर्चचा सेट लागला होता, एका लांब बाकड्यामागे अॅलेक होते. इथे गोळीबार होतो असा काहीसा सीन होता. कोणीतरी प्रॉप कार्टमधून (सिनेमात लागणाऱ्या गोष्टी भरल्या ठेवल्या असतील ती ढकलगाडी) एक बंदूक उचलली, हिरोच्या हातात दिली आणि ओरडले 'कोल्ड गन'.
कोल्ड गनचा अर्थ होतो खोट्या गोळ्या, किंवा सुरक्षेच्या दृष्टीने बदल केलेल्या गोळ्या (ब्लँक) असलेली बंदूक. त्या क्रू मेंबरला माहितीच नव्हतं की, या बंदुकीत खऱ्या खुऱ्या गोळ्या आहेत.
"अॅलेकला सीनची प्रॅक्टिस करायची होती, त्यांनी कॅमेऱ्याच्या दिशेन बंदूक रोखली आणि गोळी झाडली. पण, हेलेना समोर होती, मी तिच्या खांद्यावरून पलीकडे पाहत होतो, तेवढ्या मला 'हवेत काठी मारल्यासारखा आवाज' ऐकू आला आणि नंतर लगेचच मोठा आवाज आला," जोएल म्हणतात.
दिग्दर्शक सुझा आणि कॅमेरा ऑपरेटर रीड रसेल यांनी त्यादिवशी काय झालं याबद्दल तपासकर्त्यांकडे शपथपत्र दाखल केली आहेत.
त्या शपथपत्रात जोएल म्हणतात, "मला अर्धवट आठवतंय की हेलेनाने तिच्या पोटाचा भाग आवळला होता, तिचा तोल जात होता, तिला कोणीतरी धरून खाली बसायला मदत केली."
रसेल हेलेनाच्या शेजारीच उभे होते, त्यांनी तपासकर्त्यांना सांगितलं, "ती म्हणाली मला माझ्या पायात संवेदना जाणवत नाहीयेत."
अॅलेक बॉल्डविन यांनी कोर्टात दाखल केलेल्या आपल्या शपथपत्रात म्हटलं की, "मला सांगितलं गेलं होतं की ती बंदूक सुरक्षित आहे."
अॅलेक बॉल्डविन यांच्या हातात बंदूक देऊन 'कोल्ड गन' असं ओरडणारे होते सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक डेव्ह हॅलस.
आर्मरने (सिनेमातले शस्त्रास्त्र आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती) टेबलवर तीन बंदुका काढून ठेवल्या होत्या, त्यातलीच एक त्यांनी उचलून हिरोच्या हातात दिली.
बीबीसीला त्या कागदपत्रांची प्रत मिळालेली आहे ज्यात अशा क्रू मेंबर्सची नावं आहेत जे अपघात झाला त्या दिवशी सेटवर उपस्थित होते. त्यात प्रमुख आर्मर म्हणून हॅना गुटिरेझ रीड या विशीतल्या एका महिलेचा उल्लेख आहे.
या पदावर हॅना पहिल्यांदाच काम करत होत्या, असंही एलए टाईम्सने म्हटलंय.
हिरोने प्रॉप गनने गोळी झाडली खरी, पण ती लागली सिनेमाच्या दिग्दर्शकाला आणि सिनेमॅटोग्राफरला. यात सिनेमॅटेग्राफर हेलेना हचिन्स यांचा मृत्यू झाला. त्यांच्याच मागे उभे असणाऱ्या जोएल सुझा यांच्या खांद्याला दुखापत झाली.
पण नक्की काय झालं होतं त्या दिवशी? खोट्या बंदुकीतून झाडलेल्या गोळीने खऱ्याखुऱ्या जिवंत बाईचा मृत्यू कसा झाला?
त्याआधी हे जाणून घ्यावं लागेल की सिनेमात वापरल्या जाणाऱ्या बंदुका खोट्या असतीलच असं नाही. त्यांना 'प्रॉप गन्स' असं म्हटलं जातं. या बंदुका खऱ्या असतात पण यातल्या गोळ्या एकतर खोट्या असतात किंवा त्यात ब्लँक्स (गोळ्यांचं आवरण) असतात.
अॅलेक बॉल्डविन यांनी ज्या प्रॉप गनमधून झाडलेल्या गोळीमुळे हेलेना यांचा मृत्यू झाला त्या बंदुकीत 'एकच खरी गोळी' होती असं इंटरनॅशनल अलायन्स ऑफ थिएट्रीकल स्टेज एम्प्लॉईज या संस्थेने आपल्या सदस्यांना पाठवेलल्या मेलमध्ये म्हटलंय.
सिनेमात धोका असूनही खऱ्या बंदूका का वापरतात? खऱ्या बंदुकीने गोळी झाडल्यानंतर हाताला जो झटका बसतो, जसा इफेक्ट येतो त्याची नक्कल करणं अवघड असतं.
आणि म्हणूनच चित्रपटांच्या शुटिंगच्या वेळी या बंदुका, शस्त्रास्त्र वापरण्याचे कडक नियम आहेत. अशा प्रकारचे अपघात दुर्मिळ गोष्ट आहे. पण तरीही अपघात झाल्यानंतर एखाद्याचा जीव गेला तर तो भरून येत नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदुका वापरताना कोणते नियम पाळावे लागतात?
- आर्मरने बंदुकांच्या वापरांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवं.
- बंदुका हाताळणारे अभिनेते, अभिनेत्रींना बंदुक सुरक्षितपणे कशी हाताळायची याचं ट्रेनिंग दिलेलं असावं.
- बंदुका कधीच कोणावर रोखलेल्या नकोत, तालमीच्या वेळी नाही आणि प्रत्यक्ष शुटिंगच्या वेळी नाही. कॅमेऱ्यात ट्रीक करून बंदुक कोणावर रोखलेली नसतानाही तसं दाखवता येतं.
- ब्लँक्स जरी बंदुकीत भरलेल्या असल्या तरी त्या एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. बंदुका कायम लोडेड आहेत असंच समजून काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत.
- जोपर्यंत शूट सुरू होत नाही तोवर ट्रीगरवर बोट ठेवता कामा नये.
- प्रशिक्षित व्यक्तीनेच बंदूक लोड करावी.
- बंदुकीने गोळी झाडल्यानंतर ती ज्या दिशेला जाईल तिथे जवळ असणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची व्यवस्था केलेली असावी, त्यांना गरज असेल कर पिक्सी ग्लासचं कवच असावं, गॉगल, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजापासून संरक्षण करण्यासाठी एअर मफ्स द्यावेत.
- लाईन ऑफ फायरमध्ये जे अभिनेते/अभिनेत्री असतील त्यांना गन लोड होत असताना पाहू द्यावं.
- आणि कधीही, कधीही खऱ्या गोळ्या वापरू नयेत.
प्रॉप गन आणि खरी बंदूक यात फरक काय?
म्हटला तर काहीच नाही आणि म्हटला तर जीवन-मरणाचा.
सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी ब्लँक्स वापरल्या जातात. पण या गोळ्या अगदी खऱ्या गोळ्यांसारखाच इफेक्ट देतात. ब्लँक गोळी म्हणजे काय? एक प्रकारची खरी गोळीच, फक्त त्यात काही बदल केलेले असतात.
बुलेट किंवा बंदुकीची खरी गोळी म्हणजे काय तर एक अशी वस्तू जी बंदुकीत भरली जाते. हिचं जे बाहेरचं आवरण असतं तिच्यात एक प्रकारची फटाक्याची दारू भरलेली असते आणि तिच्या टोकाला रॉकेटसारखी आणखी एक छोटी आकृती असते.
जेव्हा ही खरी गोळी झाडली जाते तेव्हा आतल्या दारूचा स्फोट होतो आणि त्या धक्याने ती रॉकेटसारखी गोष्ट बाहेर अतिवेगाने फेकली जाते, हीच ती गोळी. तिचा अतिप्रचंड वेग माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो.
ब्लँक म्हणजे काय तर या गोळीत आवरण, गनपावडर असं सगळं असतं फक्त ती रॉकेटसारखी वस्तू नसते. म्हणजे ही गोळी झाडल्यावर बंदुकीतून वेगाने काही बाहेर फेकलं जात नाही, समोरच्या माणसाला, वस्तूला लागत नाही.
तरीही ब्लँक गोळीत गनपावडर असते, तिचा स्फोट होतो त्यामुळे ती धोकादायक असतेच.
प्रॉप गन म्हणजे काय तर बंदुकीचं काम न करणारी बंदूक.
ती दिसायला खऱ्या बंदुकीसारखीच असते, अनेकदा खास बनवून घेतली जाते, लहान मुलांच्या खेळण्यात असते तशी अजिबात नसते.
पण कधीकधी खरी बंदूकही प्रॉप गन म्हणून वापरली जाते.
या प्रॉप बंदुकी आणि ब्लँक गोळ्या दोन्ही मिळून अगदी खऱ्या बंदुकीतून गोळी झाडल्याचा इफेक्ट देतात, तसाच आवाज येतो, बंदुकीच्या टोकावर प्रकाश चमकतो.
आजकाल अनेकदा सेटवर खऱ्या बंदुकी प्रॉप गन म्हणून वापरल्या जातात.
का? तर खोट्या बंदुकी वापरून त्यांना कॉम्प्युटर इफेक्ट देऊन पोस्ट प्रोडक्शनमध्ये खऱ्या दाखवणं खर्चिक काम असतं आणि दुसरं म्हणजे अनेकदा अभिनय करणाऱ्या खोट्या बंदुकी हातात घेऊन खऱ्या बंदुकी हातात असल्यासारखा अभिनय करता येत नाही.
आधी म्हटल्याप्रमाणे बंदुकीचं वजन, ती झाडल्यानंतर बसणारा झटका यात फरक असतो.
याआधी कोणी सिनेमाच्या सेटवर गोळी लागून ठार झालंय?
हो. आधी असाच अपघात 1993 साली झाला होता आणि ज्याच्या जीव गेला तो दुसरा तिसरा कोणी नसून हॉलिवुडचे अभिनेते आणि मार्शल आर्टमध्ये आख्यायिका बनलेले ब्रुस ली यांचा मुलगा ब्रँडन ली होता.
ब्रँडन 'द क्रो' या चित्रपटाचं शुटिंग करत होते, त्याच वेळेस एका प्रॉपगनमधून डमी राऊंड फायर केला गेला.
डमी राऊंड म्हणजे गोळीला रॉकेटसारखा भाग असेल गनपावडर नसेल आणि पर्यायाने त्याचा स्फोट होऊन ती गोळी अतिवेगाने बाहेर फेकली जाणार नाही आणि समोरच्या घातक ठरणार नाही.
पण या केसमध्ये क्लोज शॉटचं शूटिंग चालू होतं त्यामुळे समोरच्या अभिनेत्याने ब्रँडन यांना खूप जवळून डमी गोळी मारली.
ती गोळी लागल्यानंतर ब्रँडन उठलेच नाहीत. आधी इतरांना वाटलं ते थट्टा करत आहेत पण त्यांच्या शरीरातून रक्त वाहाताना दिसल्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याआधी 1984 साली अशाच प्रॉपगनमुळे एका अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. जॉन एरिक-हेक्सम एक टीव्ही शो शूट करत होते. त्यावेळी शुटिंगसाठी खूप उशीर होत असल्याने ते वैतागले होते.
अशात त्यांनी थट्टा म्हणून एक प्रॉप गन उचलली, त्यात ब्लँक गोळी भरली. फिल्मी स्टाईलने गोळ्या असतात ते चेंबर फिरवलं. आपल्या कपाळावर बंदुक टेकवली आणि गोळी झाडली.
त्यातून रॉकेटसारखा भाग बाहेर आला नाही कारण ती ब्लँक होती, पण गनपावडरचा स्फोट त्यांच्या कपाळावर झाला. त्याचा तडाखा इतका जबरदस्त होता ती त्यांची कवटी फ्रॅक्चर झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेलेना हचिन्स यांच्या मृत्यूनंतर सेटवर वापरली जाणारी शस्त्रास्त्र, बंदुका आणि तिथे काम करणाऱ्यांची सुरक्षितता पुन्हा चर्चेत आली आहे.
हॉलिवुडमधले लेखक डेव्हिड स्लॅक यांनी ट्वीट करून म्हटलं की, "कोणत्याही शॉटचं मोल एखाद्याच्या जीवापेक्षा जास्त नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)