You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिरोशिमा नागासाकी : 'फॅट मॅन' कोसळला आणि नागासाकीतल्या 74 हजार जणांचा जागीच जीव गेला
- Author, मोहनलाल शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा इथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये 13 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं.
एका क्षणात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. या बॉम्बहल्ल्याने झालेल्या हानीचा पूर्ण अंदाज येण्यापूर्वीच अमेरिकेने नागासाकी या दुसऱ्या एका जपानी शहरावर अणुबॉम्ब टाकला. नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला.
वास्तविक, नागासाकीवरील अणुहल्ला नियोजित नव्हता. मग हे शहर अणुबॉम्बचं लक्ष्य कसं काय ठरलं?
8 ऑगस्ट 1945 ची रात्र संपत आली होती. अमेरिकेच्या बी-29 सुपरफोर्ट्रेस बॉक्स बॉम्बर विमानात एक बॉम्ब सज्ज ठेवण्यात आला होता.
एखाद्या प्रचंड मोठ्या कलिंगडासारख्या या बॉम्बचं वजन 4,050 किलो होतं. विन्स्टन चर्चिल यांचा संदर्भ घेऊन या बॉम्बचं नाव 'फॅट मॅन' असं ठेवण्यात आलं.
कोकुरा हे औद्योगिक शहर या दुसऱ्या बॉम्बचं लक्ष्य असणार होतं. जपानमधील सर्वांत मोठे व सर्वाधिक दारूगोळ्याची निर्मिती करणारे कारखाने होते.
सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी वैमानिकाला खाली काकुरा शहर दिसू लागलं. या वेळी बी-29 विमान 31 हजार फूट उंचावरून उडत होतं.
महाकाय बॉम्ब नागासाकीवर कोसळला
बॉम्ब इतक्याच उंचावरून फेकला जाणार होता. पण काकुरा शहरावर ढगांचं सावट आलेलं होतं. बी-29 एक गिरकी घेऊन पुन्हा शहराच्या वर आलं. पण बॉम्ब फेकण्याची वेळ आली तेव्हा शहरावर धुराचं आवरण आलेलं होतं, खालच्या बाजूला विमानभेदी तोफा आग ओकत होत्या.
बी-29 मधलं इंधन भयंकर वेगाने संपत आलं होतं. परत जाता येईल इतकंच इंधन विमानात उरलं होतं.
या मोहिमेचे ग्रुप कॅप्टन लिओनार्ड चेशर यांनी नंतर सांगितल्यानुसार, "आम्ही सकाळी नऊ वाजता उड्डाण सुरू केलं. मुख्य लक्ष्यस्थळी पोचलो तेव्हा तिथे ढग होते. तेव्हाच आम्हाला बॉम्बहल्ल्याचा संदेश मिळाला, मग आम्ही दुसऱ्या लक्ष्यस्थळाकडे- म्हणजे नाकासाकीकडे निघालो."
चालकाने बॉम्ब टाकणारं स्वयंचलित उपकरण सुरू केलं आणि काहीच क्षणांत तो महाकाय बॉम्ब वेगाने खाली निघाला.
52 सेकंदांनी, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 फुटांवर असताना बॉम्बचा स्फोट झाला.
अणुबॉम्ब
त्या वेळी 11 वाजून दोन मिनिटं झाली होती. आगीचा प्रचंड मोठा लोट उठला. धुराच्या लोटाचा आकार सतत वाढत जाऊन संपूर्ण शहराला व्यापू लागला.
नागासाकीच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत असणारी जहाजं आणि बंदरावर उभ्या होड्यांना आग लागली.
नक्की काय झालंय हे आसपासच्या कोणत्याच माणसाला कळलं नाही. हे सगळं दिसण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
शहराबाहेर काही ब्रिटिश युद्धकैदी खाणींमध्ये काम करत होते, त्यातील एकाने सांगितल्यानुसार, "संपूर्ण शहर निर्जन झालं होतं. सगळीकडे नुसता सन्नाटा. चहुबाजूंना लोकांच्या प्रेतांचा खच पडलेला. काहीतरी भयंकर घडल्याचं आम्हाला कळलं. लोकांचे चेहरे उतरले, हातपाय गळाले. त्याआधी कधी अणुबॉम्बबद्दल आम्ही काही ऐकलं नव्हतं."
नागासाकी शहर डोंगरांन वेढलेलं असल्यामुळे केवळ 6.7 चौरस किलोमीटर प्रदेशातच विध्वंस पसरला.
नंतर नोंदवण्यात आलेल्या अंदाजांनुसार, अणुबॉम्बमुळे हिरोशिमात एक लाख 40 हजार लोक मरण पावले, तर नागासाकीममध्ये सुमारे 74 हजार लोकांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)