जपानमध्ये उभारली जाणार 70 मजली लाकडी इमारत!

एक जपानी कंपनी 2041 मध्ये आपला 350वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या करत आहे. आणि हे औचित्य अख्ख्या जगासमोर थाटात मांडायचं म्हणून या कंपनीने एक अनोखा बेत आखलाय - जगातली सर्वांत उंच लाकडी इमारत बांधण्याचा!

W350 टॉवर ही 70 मजली लाकडी इमारत असेल. ही इमारत 10 टक्के पोलादापासून आणि उर्वरित 1,80,000 क्युबिक मीटर लाकडा वापरून बांधली जाईल, अशी माहिती सुमिटोमो फॉरेस्ट्रीनं दिली आहे.

या इमारतीत 8,000 घरं असतील आणि प्रत्येक मजल्यावर बाल्कनीत झाडं, वृक्षवेली असतील.

इमारतीच्या मध्यभागी 350 मीटर (1150 फूट) उंच स्टीलचा आधारस्तंभ असेल. त्याच्या अवतीभवती इमारतीचा लाकडी ढाचा उभारण्यात येईल. त्यामुळे ही इमारत टोकियोमध्ये सतत येणाऱ्या भूकंपांचा सामना करण्यास सक्षम बनेल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

खर्च किती असेल?

इमारत उभारणीसाठी जवळपास 600 बिलियन येन, म्हणजे जवळजवळ 36,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च तेवढ्याच आकाराची एखादी पारंपरिक इमारत बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या जवळपास दुप्पट आहे.

असं असलं तरी आधुनिक तंत्रज्ञान बघता आणि 2041 पर्यंत इमारत पूर्ण करायची असल्यानं या प्रकल्पाचा खर्च अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकतो, असं सुमिटोमोने म्हटलं आहे.

लाकडी इमारत ही संकल्पना नवी आहे का?

ही संकल्पना नवी नाही. खरं तर जपाननं 2010मध्येच एक कायदा पास केला होता, ज्याअंतर्गत तीन मजल्यापर्यंतच्या सरकारी इमारतीमध्ये लाकडाचा वापर करण्याची विनंती बांधकाम कंपन्यांना करण्यात आली होती.

जगभरातही ही संकल्पना आता काही नवीन नाही. अमेरिकेच्या मिनीआपोलिस शहरात सागवानापासून तयार केलेली 18 मजली कार्यालयीन इमारत आहे. याशिवाय व्हॅनकुवर शहरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी 53 मीटर उंच लाकडी बिल्डिंग उभारण्यात आली आहे.

हीच इमारत सध्या जगातली सर्वांत उंच लाकडी इमारत आहे.

किती पर्यावरणपूरक आहे?

काँक्रीट आणि स्टीलच्या इमारतींमधून कार्बन उत्सर्जन होत असतं. जागतिक पातळीवर एकूण उत्सर्जनापैकी साधारण 8% उत्सर्जन काँक्रीट इमारतींमधून होतं तर 5% उत्सर्जनासाठी स्टीलपासून बनलेल्या इमारती जबाबदार असतात.

तर दुसरीकडे वातावरणात कार्बन परत पाठवण्याऐवजी हे लाकूड तो कार्बन शोषून घेतो.

जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली भागही आहे. जपानच्या एकूण भागातल्या दोन तृतीयांश वनक्षेत्र आहे.

आव्हानं काय आहेत?

अशा इमारतींमध्ये सर्वांत महत्त्वाची आहे ती आग प्रतिबंधक यंत्रणा.

अशा इमारतींमध्ये सामान्यतः अद्ययावत असं क्रॉस-लॅमिनेटेड लाकूड वापरलं जातं, जे आग प्रतिबंधकही आहे.

त्यामुळे उच्च तापमानातही ते टिकू शकतं, स्टीलवर होतो तसा तापमानबदलाचा परिणाम त्यावर होत नाही.

पण फायदे असले तरी अशा गगनचुंबी इमारती बांधण्यासाठी खर्च फार येतो. त्यामुळे तुमच्या आसपास अशा इमारती धडाधड उभारण्यात येतील, याची शक्यता सध्या कमीच आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)