You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्हाला पण पिरियड्स असतात!' : 'पॅडमॅन'वर बंदीविरोधात पाकिस्तानी महिला
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानल्या जाणाऱ्या मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्ससारख्या मुद्द्यांवर बनलेल्या 'पॅडमॅन' सिनेमाला पाकिस्तानात प्रदर्शनास परवानगी मिळालेली नाही. सेंसॉर बोर्डाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातल्या महिलांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानाच्या फेडरेल सेंसॉर बोर्डाला या सिनेमाच्या केंद्रस्थानी असलेला मासिक पाळीचा विषय इतका तिटकाऱ्याचा होता की त्यांनी सिनेमा रिलीज करण्यास परवानगी देणं तर दूरचं, हा सिनेमा बघण्याचे कष्टसुद्धा घेतले नाही.
"यासारख्या विषयांवरच्या सिनेमांना आम्ही स्क्रीनिंगची परवानगी देऊ शकत नाही. हा आमच्या सिनेमा, धर्म, समाज आणि संस्कृतीचा भाग नाही," असं पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाचे सदस्य म्हणाले.
सेंसॉर बोर्डाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील जनता, विशेषतः महिला, फारच नाराज झाल्या आहेत. फेसबुक आणि ट्विटरवर त्या आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत. या निर्णयाला विरोध म्हणून त्या महिलांना सोशल मीडियावर पिरियड्सविषयी लिहावं, असं आवाहन करत आहेत.
व्यवसायाने वकील असलेल्या शुमाइला हुसेन या नाराज महिलांपैकीच एक आहेत.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "सिनेमावर बंदी आणणं चुकीचंच आहे, पण त्याहीपेक्षा सर्वांत चुकीचं म्हणजे सेंसॉर बोर्डानं हा सिनेमा बघितलासुद्धा नाही."
त्या म्हणाल्या, "सिनेमावर बंदी आणून ते जगाला कदाचित हे सांगू इच्छित असणार की पाकिस्तानमधील महिला इतक्या पवित्र आहेत की त्यांना पिरियड्ससुद्धा येत नाही."
शुमाइला हसून सांगतात, "जर पुरुषांना पीरियड्स असते तर त्यांनी याला पौरुषत्वाचं प्रतीक मानलं असतं. लोक यावर अभिमानाने बोलले असते. पण हे फक्त महिलांशीच निगडीत असल्यानं हा विषय 'टॅबू सब्जेक्ट' झाला आहे."
पाकिस्तानच्याच 'गर्ल्स अॅट ढाबाज' नावाच्या एका फेसबुक ग्रुपनेही एका पोस्टद्वारे सेंसॉर बोर्डाच्या निर्णयाचे धिंडवडे काढले आहेत. त्यांनी हातात पॅड घेतलेल्या एका मुलीचं छायाचित्र प्रसिद्ध केलं असून त्यासोबत लिहिलं आहेः
"हॅलो सेंसॉर बोर्ड! मुस्लीम महिलांना पण पिरियड्स असतात. ज्या मुस्लीम नाहीत, त्या महिलांना पण पिरियड्स होत असतात. पॅडमॅनमध्ये असं काहीही नाही जे आमच्या इस्लामिक पंरपरांच्या विरोधात जाईल. सिनेमावर बंदी आणून तुम्ही महिलांना सांगू इच्छिता की त्यांच्या मासिक पाळीचं रक्त हे लज्जास्पद आहे."
"आपल्या पिरियड्सशी संबधित गोष्टी तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. कधीतुम्हाला पिरियड्ससाठी वाईटसाईट बोललं गेलं, केव्हा-केव्हा तुम्ही पुराणमतवादी समजुतींनातोंड दिलं आणि त्यांवर विजय मिळवला."
या पोस्टमध्ये पुढं हेही विचारण्यात आलं आहे की, "पिरियड्समध्ये होणाऱ्या त्रासाला तुम्ही कसं सामोरं जाता, आणि जीवनात होणाऱ्या घालमेलीसाठी पिरियड्सला कितपत जबाबदार ठरवता, हे सर्वं सांगा. आम्ही तुमचे अनुभव ऐकायचे आहेत."
माहिरा खान आणि सना इकबाल यांसारखे पाकिस्तानचे नामांकित लोकसुद्धा सेंसॉर बोर्डाच्या या निर्णयाच्या विरोधात समोर आले आहेत. पाकिस्तानची प्रसिद्ध पत्रकार मेहर तरार यांनीसुद्धा ट्वीट करत पाकिस्तानमध्ये 'पॅडमॅन'ला पाठिंबा दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्यांनी ट्वीट केलं, "पॅडमॅनवर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात पाकिस्तानी अभिनेत्री, पत्रकार आणि कार्यकर्त्या आवाज उठवत आहेत, हे एक चांगलं पाऊल आहे. कोणताही चित्रपट जो मागासलेल्या विचारांना तडा देण्याचं काम करतो, भलेही तो मग कुठेही का बनला असेना, त्याला आपला पाठिंबा मिळणं आवश्यक आहे."
पॅडमॅन सिनमा हा गरीब महिलांकरिता स्वस्त सॅनिटरी नॅपकिन तयार करणारे सामाजिक कार्यकर्ते अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांची प्रमुख भूमिका आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)