You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ऐकायला विचित्र वाटेल पण आम्ही ममी गाडलेल्या दफनभूमीत राहतो'
- Author, जेन चेंबर्स
- Role, अरिका, चिली
"काही लोकांना हे ऐकायला विचित्र वाटेल की आम्ही एका ममी गाडलेल्या दफनभूमीत राहातो. पण आम्हाला त्याची सवय झालीये," अॅना मारिया निएतो म्हणतात. त्या चिली देशातल्या अरिका नावाच्या किनारपट्टीवरच्या शहरात राहातात.
अरिका पेरू चिली आणि पेरू देशाच्या सीमेवर आहे. जगातल्या सगळ्यात कोरड्या वाळवंटातल्या, अॅटाकामा वाळवंटातल्या वाळूंनी बनलेल्या टेकड्यांवर हे शहर वसलेलं आहे.
हे किनारपट्टीचं शहर 16 व्या शतकात वसवलं गेलं, त्याआधी या भागात चिंचोरो लोकांची वस्ती होती.
चिंचोरो लोकांची संस्कृती पुन्हा चर्चेत यायचं कारण म्हणजे जुलै महिन्यात युनेस्कोने या भागातल्या चिंचोरो लोकांनी जतन केलेल्या शेकडो ममींना जागतिक वारसास्थळ हा दर्जा दिला.
1971 साली पहिल्यांदा चिंचोरो ममींची नोंद झाली. जर्मन पुरातत्त्व शास्त्रज्ञ मॅक्स उल्हे यांना इथल्या समुद्रकिनाऱ्यावर काही ममी सापडल्या पण त्या नक्की किती जुन्या आहेत हे कळायला काही दशकांचा काळ जावा लागला.
चिंचोरो संस्कृती
इसवीसन पुर्व 7000 ते 1500 या काळात ही संस्कृती अस्तित्वात होती. हे लोक मासेमारी, शिकार आणि कंदमुळं गोळा करायचे.
चिलीचा उत्तर भाग आणि पेरूचा दक्षिण भागात इथे हे लोक राहायचे. ते आपल्या मृत नातेवाईकांच्या शरीराची ममी बनवायचे. त्यांची ममी बनवायची पद्धतही शास्त्रशुद्ध होती. आपल्या जवळच्यांच्या आठवणी कायम जिवंत राहाव्यात म्हणून हे ममी करण्याची पद्धत होती.
कार्बन डेटिंगवरून समजलं की यातल्या काही ममी 7000 वर्षं जुन्या आहेत म्हणजे सध्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या इजिप्तच्या ममीपेक्षा तब्बल 2000 वर्षं जुन्या आहेत.
मानववंशशास्त्रज्ञ बर्नेंडो अरिआझा चिंचोरो संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांच्यामते हे लोक आपल्या मृत लोकांची ममी बनवायचे. काळाच्या ओघात कोणत्या रासायनिक किंवा नैसर्गिक गोष्टीमुळे दफन केलेल्या लोकांचे ममी झाले नाहीयेत तर या ममी मानवनिर्मित आहेत.
म्हणजे या लोकांना मृतदेहाचं लेपन करून त्यांचं जतन करण्याची पद्धत ठाऊक होती. तसं या भागात प्रचंड कोरडेपणा असल्याने त्यांच्या नैसर्गिकरित्याही ममी तयार झाल्या असत्या. अशा काही ममीही सापडल्या आहेत.
मानवनिर्मित ममींमध्ये मृतदेहावर एक लहानशी चिर देऊन आतले अवयव काढून घेतले गेले. शरीरावरची कातडी सोलून काढली आणि मृतदेह सुकवला, अरिआझा सांगतात.
चिंचोरो लोक मग या मृतदेहात नैसर्गिक धागे आणि काटक्या भरायचे म्हणजे तो देह सरळ राहील. मग शरीरावर आधी काढलेली कातडी पुन्हा शिवली जायची.
मग ते घनदाट काळे केस ममीच्या डोक्यावर चिटकवायचे, संपूर्ण चेहरा मातीने आणि आवरणाने झाकून टाकायचे फक्त डोळे आणि तोंड उघडं असायचं.
सरतेशेवटी तो मृतदेह लाल आणि काळ्या रंगात रंगवला जायचा. यासाठी ते वेगवेगळे क्षार, खनिजं, मँगनिज आणि आर्यन ऑक्साईडचा वापर करायचे.
चिंचोरो लोकांची मृतदेहाची ममी करण्याची पद्धत इजिप्शियन लोकांपेक्षा फारच वेगळी होती, असं अरिआझा यांना वाटतं. इजिप्शियन लोक तेल आणि पट्ट्यांचा वापर करायचे. ममीही त्याच लोकांची बनायची जे उच्चवर्गातले होते.
चिंचोरो लोकांचं तसं नव्हतं. त्यांनी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, बाळं, अगदी भ्रुणाचीही ममी बनवली आहे. सामाजिक दर्जा ममी बनवण्यातला अडसर नव्हता.
मृतांसोबतचं जगणं
अरिका आणि आसपासच्या भागात गेल्या शतकभरात हजारो ममी सापडल्या आहेत. इथल्या स्थानिकांना या ममींसोबत जगण्याची सवय झालीये.
एखादी इमारत बांधण्यासाठी खणताना किंवा तुमचा कुत्रा खेळता खेळता जमीन उकरताना मानवी शरीराचे अवशेष सापडणं इथे नित्याची बाब आहे. पण अनेक वर्षं त्यांना या अवशेषांचं महत्त्व कळत नव्हतं.
"कधी कधी स्थानिक लोक आम्हाला सांगायचे की कशी त्यांची मुलं एखाद्या ममीची कवटी फुटबॉल म्हणून खेळायला घ्यायची किंवा ममीचे कपडे काढून घ्यायची पण आता त्यांना माहितेय की असं काही सापडलं की सरकारी कार्यालयात सांगायचं आणि त्याला हात लावायचा नाही," पुरातत्त्व शास्त्रज्ञ जानिना कांपोस फ्युंटेस सांगतात.
अॅना मारिया निएतो आणि पाओला पिंमेटेल यांसारख्या स्थानिकांना आता या जागेला वारसाहक्क स्थळाचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहे.
या महिला जिथे खोदकाम चालू असतं अशा दोन ठिकाणी राहाणाऱ्या स्थानिक लोकांच्या असोसिएशनचं नेतृत्त्व करतात. तारापाका या स्थानिक विद्यापीठाच्या तज्ज्ञांसोबतही त्या काम करतात. इथे राहाणाऱ्या स्थानिकांना चिंचोरो संस्कृतीविषयी कळावं यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
याच भागात एक संग्रहालय उभारावं असा त्यांचा प्रयत्न आहे. इथल्या स्थानिकांनाच गाईड म्हणून ट्रेनिंग द्यावं म्हणजे ते लोक आपल्या संस्कृतीविषयी इतरांना सांगू शकतील. सध्या अगदी थोड्या, म्हणजे 300 चिंचोरो ममी लोकांना पाहाता येतात. बाकीच्या सॅन मिगेल दे अझार्पा पुरातत्त्व संग्रहालयात ठेवल्या आहेत.
हे संग्रहालय अरिका शहरापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे चिंचोरोंच्या संपूर्ण ममीफिकेशन प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली आहे.
तारापाका विद्यापीठाच्या अंतर्गत हे संग्रहालय येतं. याहीपेक्षा मोठं संग्रहालय बनवावं अशी योजना आहे पण त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. इथे असणाऱ्या हजारो ममींचं संरक्षण व्हावं म्हणूनही निधीची आवश्यकता आहे.
जानिना कांपोस फ्युंटेस आणि बर्नेंडो अरिआझा यांना वाटतं की अरिका आणि आसपासच्या टेकड्यांमध्ये अजूनही अनेक गोष्ट दडलेल्या आहेत पण त्या शोधण्यासाठी निधी तसंच साधनसामग्रीची आवश्यकता आहे.
इथले महापौर जेरोल्डो इस्पिन्डोला रोहास यांना वाटतं की या जागेचा जागतिक वारसाहक्क स्थळात समावेश झाल्यामुळे आता इथे पर्यटकांची संख्या वाढेल आणि निधीही मिळेल.
पण इथे विकासकामं करताना इथल्या ममींना बाधा येणार नाही हे पाहिलं पाहिजे असंही त्यांना वाटतं. ते म्हणतात, "इटलीतल्या रोममध्ये त्यांची जी स्थळं आहेत तिथे लोक राहात नाहीत पण इथे आमची लोक जिथे ममी गाडलेत त्यावर राहातात. आम्हाला या ममींचं संरक्षण कराव लागेल."
शहराचा विकास कशापद्धतीने व्हावा यासाठी इथे काही नियम आहेत. नवीन बांधकाम सुरू झालं की तिथे पुरातत्त्व शास्त्रज्ञ उपस्थित असतात आणि बांधकामामुळे इथले ममी नष्ट होऊ नयेत यावर लक्ष ठेवतात.
इस्पिन्डोला रोहास असंही म्हणतात की चिलीच्या काही भागात मल्टीनॅशनल कंपन्यांनी जमिनी विकत घेऊन तिथल्या पर्यटनावर एकाधिकारशाही प्रस्थापित केलीये. त्यातून ते भरपूर नफा कमवतात. तसं अरिकात होता कामा नये. इथला वारसा इथल्या लोकांच्याच हातात राहिला पाहिजे असं ते म्हणतात.
अॅना मारिया निएतो यांच्या आशा अरिकाला नव्याने लाभलेल्या प्रसिद्धीमुळे पल्लवित झाल्यात. याचा सगळ्यांनाच फायदा होईल असं त्यांना वाटतं. "हे एक छोटसं शहर आहे पण इथले लोक चांगले आहेत. आमची इच्छा आहे की जगभरातल्या पर्यटकांनी आणि शास्त्रज्ञांनी इथे यावं आणि चिंचोरोच्या अभूतपूर्व संस्कृतीविषयी समजवून घ्यावं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)