You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सॅफो : ख्रिस्तपूर्व काळात लेस्बियन संबंध खुलेपणाने जगासमोर मांडणारी कवियत्री
ग्रीसमधील लेस्बॉस इथली सॅफो (इसवीसनपूर्व 620-570) ही प्राचीन काळातील एक विख्यात ग्रीक कवयित्री होती.
तिच्या मृत्यूनंतर तिच्या सन्मानार्थ पुतळे उभारले गेले, नाण्यांवर तिचं चित्र कोरण्यात आलं आणि भांड्यांवरही तिची प्रतिमा दिसू लागली होती. आजही ती जागतिक इतिहासातील पहिली समलैंगिक मानली जाते.
तिने तिच्या काव्यातून समलैंगिक भावनांचं अतिशय सुंदर चित्रण केलं आहे. समलैंगिकतेची सौंदर्यदृष्टी तत्कालीन मुख्यप्रवाही समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न तिने केला. 'Lesbian' या शब्दाचा उगम तिच्या मायभूमीच्या- लेस्बॉस या बेटाच्या- नावावरून झाला, असंही एक गृहितप्रमेय आहे.
सॅफोला मरणोत्तर मान्यता मिळाली. तिच्या कवितांची संख्या तुलनेने कमी आहे. परंतु, तिने कवितांचे नऊ खंड लिहिल्याचं मानलं जातं, त्यातील केवळ 650 ओळी आत्तापर्यंत शोधण्यात यश आलेलं आहे.
तिची आज ज्ञात असलेली जीवितकहाणी तीन मुख्य स्त्रोतांमधून आलेली आहे: इसवीसनाच्या दहाव्या शतकातील सउदा हा ग्रंथ, प्राचीन ऐतिहासिक नोंदी आणि स्वतः सॅफोच्या कविता.
प्राचीन समाजांमध्ये समलैंगिक संबंध हा गुन्हा मानला जात असल्यामुळे सॅफोच्या प्रेमकविता मध्ययुगीन चर्चने नष्ट केल्या, असाही दावा नंतरच्या काही दंतकथांमधून केल्याचं दिसतं.
पोप ग्रेगरी सातवे यांनी इसवीसन1073मध्ये तिच्या कविता जाळण्याचे आदेश दिले होते, असं पुरातत्त्वज्ञ म्हणतात.
सॅफोन अॅओलिक या ग्रीक बोलीमध्ये लिहिल्यामुळे त्या लुप्त झाल्याचेही दावे करण्यात आले आहेत. या कविता भाषांतरित करणं अॅटिक आणि होमरिक ग्रीक भाषांतरकारांना आणि लॅटिन भाषांतरकारांना अवघड होतं, त्यामुळे त्यांचं भाषांतर झालं नाही किंवा त्यांच्या प्रतीही करण्यात आल्या नाही, परिणामी काळाच्या ओघात या कविता लुप्त झाल्या.
काही कवितांच्या प्रती तयार करण्यात आल्या होत्या. अशा कविता काळाच्या कसोटीवर टिकून राहिल्या आणि त्यातून सॅफोचा लौकिक स्पष्ट झाला. पुरातत्त्वज्ञ या ओळींचा वापर करून तिच्या जीवनकहाणीची पुनर्बांधणी करू पाहतात. तिच्या चरित्रात्मक नोंदी तिच्या आयुष्यकाळात किंवा तिच्या निधनानंतर लिहिल्या गेल्या असतील, कारण नंतरच्या लेखक-व्यक्तींना तिच्याबद्दल
बरीच माहिती असल्याचं दिसतं. पॅरिअन मार्बलवरील (इसवीसनपूर्व 1582 ते 299 या कालखंडातील ग्रीसमधल्या काही घटनांचा इतिहास) कोरीव लेखांव्यतिरिक्त तिच्या कामाचं स्वरूप अस्पष्ट आहे.
प्लेटो (इसवीसनपूर्व 428/427 ते 348/347) सॅफोबद्दल प्रचंड आदर राखून होता आणि त्यानेसुद्धा समलैंगिकतेबद्दल बरंच काही लिहिलं. आज सॅफो ही एक थोर समलैंगिक कवियित्री म्हणून नावाजली जाते आणि एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांसाठी आणि इतरांसाठीसुद्धा ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली आहे.
सॅफोचं जीवन
प्राचीन ग्रीसमध्ये लेस्बॉस बेटावरील एका उमराव कुटुंबात सॅफोचा जन्म झाला. तिच्या कौटुंबिक संपत्तीमुळे तिला तिचा जीवनमार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, असा दावा संशोधक करतात. पण काहींनी ही बाब नाकारली आहे.
"प्राचीन ग्रीसमधील बहुतांश महिलांना त्यांच्या प्रांतातील/शहरातील परंपरा अनुसराव्या लागत होत्या. त्यांना परंपरेनुसार लग्न करावं लागत होतं. संपत्ती आणि उमराव घराणं यांमुळे सॅफोला सामाजिक अपेक्षांपासून काही संरक्षण मिळालं नाही. लेस्बॉसमध्ये महिलांना आदर दिला जात असल्यामुळे आणि सॅफोचं व्यक्तिमत्व अनन्यसाधारण स्वरूपाचं असल्यामुळे तिने स्वतःचा मार्ग निवडला," असं इतिहासकार वेन्डी स्लॉट्किन म्हणतात.
"स्त्रियांवर अनेक निर्बंध होते, त्यांना समाजामध्ये मुक्तपणे फिरता येत नव्हतं. त्यांना व्यापार करायची परवानगी नव्हती, आणि स्थानिक क्षेत्राव्यतिरिक्त त्यांना इतर कौशल्यं विकसित करायचीही परवानगी नव्हती. या सर्व निर्बंधांमुळे त्या काळातील सर्वांत महत्त्वाच्या महिला सर्जकांची नावंही आपल्याला माहीत नाहीत. हे आश्चर्यकारक नाही.
सर्व थोर ग्रीक लोकांपैकी केवळ प्लेटोने सॅफोची गुणवत्ता ओळखली. शिवाय, प्लेटो अॅथेन्स किंवा स्पार्टा इथला नव्हता, तर लेस्बॉसमधला होता- जिथे महिलांना आदराचं स्थान होतं, त्यामुळे हे घडलं," असं वेन्डी सांगतात.
प्लेटो खरंच सॅफोला आदरस्थानी मानत होता का, यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण अजून यासंबंधीचा ठोस पुरावा समोर आलेला नाही. प्लेटोच्या काळानंतर आलेल्या सर्जकांनी हे लेखन केलं असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरीही, ऐकीव गोष्टींच्या पातळीवर का होईना
नंतरच्या पिढ्यांमध्ये तिच्याबद्दल प्रशंसा पसरत असल्याचं दिसतं, हा तिच्या गुणवत्तेचा पुरावा आहे.
तिने लेस्बॉसमध्ये मुलींसाठी शाळा चालवली, असं सांगितलं जातं. पण तिची विद्यार्थिनी डॅम्फिला हिने पॅम्फिलिआ इथे मुलींची शाळा चालवली, पण ही शाळा सॅफोची होती असा एकोणिसाव्या शतकातील संशोधकांचा गैरसमज झाला, असा दावा काही इतिहासकारांनी केला आहे. उमराव मंडळी त्यांच्या मुलींना लग्नापूर्वीच्या प्रशिक्षणासाठी या शाळेत पाठवत असत आणि सॅफोच्या शिकवणुकींद्वारे मुलींना सौंदर्यदृष्टी आणि भावनिक खोली यांचा परिचय करून दिला जात असे, असंही म्हटलं जातं.
इतिहासकारांना सॅफोच्या जीवनाचा सर्व तपशील शोधता आलेला नाही, पण तिला तिच्या वातावरणातून संगीत शिकता आलं होतं. ती विधवा असावी आणि बहुधा तिला क्लेइस नावाची मुलगी होती, असंही म्हटलं जातं. काहींच्या दाव्यानुसार सॅफोच्या आईचंसुद्धा तेच नाव होतं.
एलिग्यीस, चॅराक्सस आणि लॅरिचस या सॅफोच्या तीन बहिणी होत्या, असं म्हटलं जातं. इतर दोघींचे उल्लेख सॅफोच्या कवितांमध्ये येतात. राजकीय मतांमुळे सॅफोला दोनदा सिसिलीमधून हद्दपार करण्यात आलं होतं, असं इतिहासकार विकी लिऑन म्हणतात.
प्राचीन संहितांमधील उल्लेखांनुसार तिची देहयष्टी ठेंगणी होती आणि तिचा रंग सावळा होता. तिच्या कवितांमध्ये समलैंगिक प्रेमाचा उल्लेख असला, तरी तिच्या काव्याकडे आत्मचरित्रात्मक कबुलीच्या रूपात पाहू नये, असा इशारा इतिहासकार देतात. सॅफोने या कविता तिच्या व्यक्तिमत्वाबाहेर येऊन तिच्या पूर्वीच्या अनेक कवींच्या पावलांवर पाऊल टाकत केल्या असतील, असा दावा हे इतिहासकार करतात.
काही इतिहासकारांनी तिच्या कवितांच्या आधारे तिच्या लैंगिकतेबद्दल निष्कर्ष काढले आहेत. तिच्या लैंगिकतेवर चर्चा न करणं वाजवी होणार नाही, असा दावा इतिहासकार रिचर्ड लिव्हिंगस्टोन करतात. सॅफो इतर अनेक मुद्द्यांवरही बोलली असावी, असंही ते म्हणतात.
"तिच्या लेखनावरून ती समलैंगिक असल्याचं वाटत असलं, तरी सॅफोने प्रत्यक्षात हजारो कविता लिहिल्या होत्या. त्यातील आपण शोधलेल्या कविता लैंगिकतेबद्दल आणि समलैंगिक प्रेमाबद्दल जास्त बोलतात, म्हणून केवळ त्या आधारे ती समलैंगिक होती असा निष्कर्ष आपल्याला काढता येणार नाही," असं लिव्हिंगस्टोन म्हणतात.
सॅफोचे लैंगिक संबंध
सॅफो ही समलैंगिक कवयित्री होती, हे मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलं आहे. तिच्या काळानंतर ग्रीक कवी अॅनाक्रेऑन (इसवीसनपूर्व 582 ते 485) याने लेस्बॉस बेटांवरील महिलांचा उल्लेख 'लेस्बियन' असा करायला सुरुवात केला. सॅफोची लैंगिकता कशीही असली, तरी तिच्या कविता स्वच्छंदतावादी प्रेम सुंदरपणे व्यक्त करतात आणि स्त्रीसौंदर्याचं विलक्षण वर्णन करतात.
"सॅफोच्या बहुतांश कविता पुरुषांनी कधीच न पाहिलेल्या जगाचं वर्णन करतात. ज्या समाजात विविध लिंगांच्या व्यक्तींना जाणीवपूर्वक वेगवेळं ठेवलं जातं, अशा समाजामध्ये तिच्या कविता महिलांना परस्परांविषयी वाटू शकणाऱ्या सखोल प्रेमाविषयी बोलतात," असा दावा मेरी आर. लेफ्कोवित्झ आणि मॉरीन बी. फॅन्ट या अभ्यासकांनी केला आहे.
समलैंगिक प्रेम व्यक्त करण्यासंदर्भातील तिची परिपूर्ण शैली पाहता तिचा कलही समलैंगिकतेकडे होता का, असा प्रश्न वाचणाऱ्याच्या मनात येतो. पण हे ठोसपणे सिद्ध करता येणं शक्य नाही.
प्रेमात पडण्याच्या आनंदाविषयी सॅफो तिच्या कवितांमधून बोलते. 'ओड टू अफ्रोडाइट'चा अपवाद वगळता तिच्या सर्व कविता नष्ट झाल्या आहेत. तिच्या उर्वरित लेखनातील तुटक-तुटक ओळींमधून इतिहासकार तिच्या स्वच्छंदतावादी सौंदर्यदृष्टीची पुनर्मांडणी करतात.
तिच्या बहुतांश कविता निकटच्या प्रेमाचे दाखले देणाऱ्या आहेत. 'ओड टू अफ्रोडाइट' या कवितेमध्ये ती एका स्त्रीचं प्रेम जिंकण्यासाठी प्रेमाच्या देवतेची प्रार्थना करते. पण प्रत्येक वेळी ती भावूकपणाच दाखवते असं नाही. एका कवितेमध्ये ती म्हणते, "इराना, तुझ्याइतकी कटकटी बाई मी आयुष्यात पाहिलेली नाही."
अलीकडचे शोध
आपल्याला मिळालेल्या पपायरसच्या गुंडाळ्यांपैकी एका गुंडाळीत सॅफोच्या कविता आहेत, असा दावा काही वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक तज्ज्ञाने केला. "त्या गुंडाळीमध्ये सॅफोच्या पहिल्या पुस्तकातील काही भाग होता," असं अमेरिकी पपायॉलॉजिस्ट डॉ. डर्क ऑबिन्क म्हणतात. प्राचीन ग्रीसमधील सोलोन या प्रतिभावंताला त्याच्या समकालीनांकडून बराच आदर दिला जात होता.
ग्रीसमधील सात सुज्ञ माणसांमध्ये त्याची गणना होत होती. प्रत्येक गोष्टीमधील नेमस्तपणा राखण्याची त्याची शिकवण प्रसिद्ध होती. सॅफोच्या कविता भावनांची उंची गाठतात, असं त्याने म्हटलं होतं.
सॅफोच्या जीवनाविषयी आणि मृत्यूविषयी पुरेसा तपशील ज्ञात नाही. ग्रीक विनोदी नाट्यकार मेनान्डर (इसवीसनपूर्व 341 ते 329) याने असं म्हटलं आहे की, सॅफोचा प्रेमाचा प्रस्ताव फेऑन या नाविकाने नाकारला, त्यामुळे तिने ल्यूकाडिअन कड्यावरून उडी मारली. नंतरचे इतिहासकार मात्र हे कथन नाकारतात.
सॅफोची समलैंगिक ही ओळख पुसण्यासाठी मेनान्डरने गंमतीने ही कथा रचल्याचं इतिहासकार म्हणतात. या संदर्भात अनेक कल्पना वाङ्मयीन वर्तुळांमध्ये चर्चल्या जातात. पण सॅफो वृद्ध होऊन मरण पावली, असं अनेक इतिहासकार मानतात.
सॅफोच्या कविता प्रसिद्ध होत्या आणि लेस्बॉसमधील लोक तिला आदर देत होते, असा दावा ग्रीक तत्त्वज्ञ लिऑन याने केला आहे. तिच्या कविता नंतरच्या काळातही गायल्या जात होत्या. तिने स्वतःच्या कवितांना 'अमर कन्या' असं संबोधलं होतं. दोन हजार वर्षांनंतरही तिच्या कवितेतील ओळी वाचल्या जातात आणि तिला आधुनिक जगानेही नावाजलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)