डॉ. अब्दुल कदीर खान: पाकिस्तानला अण्वस्त्र देणाऱ्या वादग्रस्त शास्त्रज्ञाचं निधन

पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कदीर खान यांचं आज (10 ऑक्टोबर) निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेज खट्टक यांनी ट्वीट करून डॉ. अब्दुल कदीर खान यांच्या निधनाची माहिती दिली आणि दु:खही व्यक्त केलं.

खट्टक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "डॉ. खान यांनी केलेल्या देशसेवेची पाकिस्तान कायम आठवण ठेवेल. पाकिस्तानच्या संरक्षण क्षमतेला वाढवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी देश त्यांचा ऋणी राहील."

रेडिओ पाकिस्तानच्या माहितीनुसार, तब्येत बिघडल्यानंतर डॉ. अब्दुल कदीर खान यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्वीट करून डॉ. अब्दुल कदीर खआन यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं.

"डॉ. अब्दुल कदीर खान यांचं निधन दु:खद आहे. पाकिस्ताचे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करत असत. कारण त्यांनी पाकिस्तानला अणुशक्ती संपन्न देश बनण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे पाकिस्तानला आक्रमक अणुशक्ती संपन्न शेजऱ्यापासून सुरक्षा मिळाली. पाकिस्तानसाठी ते प्रेरणादायी होते."

पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "डॉ. अब्दुल कदीर खान यांच्या निधानमुळे संपूर्ण देश शोकाकूळ आहे. त्यांनी देशासाठी जे केलंय ते अतुलनीय आहे."

कोण होते डॉ. अब्दुल कदीर खान?

डॉ. अब्दुल कदीर खान यांचा जन्म भारतातील भोपाळमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं.

डॉ. अब्दुल कदीर खान यांना पाकिस्तानात 'मोहसिन-ए-पाकिस्तान' म्हणजेच 'पाकिस्तानचा रक्षक' असंही म्हटलं जातं.

डॉ. खान हे गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.

डॉ. खान यांना पाकिस्तानच्या 'अणु कार्यक्रमाचे जनक'ही म्हटलं जातं. गेल्या महिन्यात त्यांनी इम्रान खान सरकारवर उपचारात उपेक्षा केल्याचा आरोप केला होता.

डॉ. अब्दुल कदीर खान 2004 मधील जागतिक अणु प्रसार स्कँडलचे केंद्र होते. अणुसाम्रगीच्या प्रसाराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यासाठी त्यांच्यावर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनीही टीका केली होती.

टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलेल्या एक संदेशात डॉ. खान यांनी इराण, उत्तर कोरिया आणि लीबिया या देशांना अणुतंत्रज्ञान विकल्याचं स्वीकारलंही होतं.

नंतर फेटाळले आरोप

2008 साली डॉ. खान यांनी 'द गार्डियन' या ब्रिटिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्यावर राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा दबाव होता. त्यामुळे अणुतंत्रज्ञान विकल्याचं मान्य केलं होतं.

याच मुलाखतीतून त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणेच्या चौकशीला सहकार्य करण्यासही नकार दिला होता. डॉ. अब्दुल कदीर खान म्हणाले होते की, "मी त्यांच्याशी का बोलू? मी त्यासाठी बांधील नाहीय. अणुप्रसार संधी करारावर आम्ही स्वाक्षरी केली नाहीय. मी कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं नाहीय."

डॉ. अब्दुल कदीर खान यांनी पाकिस्तानातील 'डॉन' वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं की, "मी नाराज आहे. पंतप्रधान इम्रान खान किंवा त्यांच्या कुठल्याच सहकारी मंत्र्यांने माझ्या तब्येतीची विचारपूस केली नाही."

असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (AAP) नुसार, 85 वर्षीय डॉ. खान यांना 26 ऑगस्ट रोजी कोरोनाचीही लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रावळपिंडीस्थित लष्करी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर आजार वाढल्यानं व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं.

त्यांना जेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, तेव्हा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, "फख्र-ए-पाकिस्तान डॉ. अब्दुल कदीर खान यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्याच्या वृत्तांनं दु:ख झालं. देशाला आवाहन करतो की, डॉ. खान यांच्यासाठी प्रार्थना करा."

मात्र, आज (10 ऑक्टोबर) डॉ. अब्दुल कदीर खान यांचं निधन झालं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)