You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरिया : 'किम जाँग यांचं अणू बाँब, क्षेपणास्त्र बनवणं सुरूच'
उत्तर कोरियाने अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम अजूनही थांबवला नाही आहे, असं संयुक्त राष्ट्राने एका अहवालात म्हटलं आहे.
UN सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या या अहवालातून पुढे आलेली ही बाब संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांचं उल्लंघन मानलं जात आहे.
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमधून मोठ्या प्रमाणात बोटींतून तेलाची चोरटी देवाण-घेवाण सुरू आहे. तसंच, क्षेपणास्त्रांची इतर राष्ट्रांना विक्री करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.
हा गोपनीय अहवाल स्वतंत्र अभ्यासकांच्या समितीनं शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवला.
दरम्यान, या अहवालावर उत्तर कोरियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
गेल्या आठवड्यांत अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं की, प्योंगयोंगमध्ये नव्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती होत असल्याचं आढळलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करत असल्याचे संकेत सिंगापूर भेटी दरम्यान उत्तर कोरियाकडून देण्यात आले होते. तसेच, त्यांनी अण्वस्त्र नष्ट करण्यासही कबुली दिली होती.
हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या आमच्या उपग्रहानं आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती होत असल्याचे फोटो टिपले आहेत, अशी माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर द वॉश्ंगिंटन पोस्ट वृतपत्राला दिली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्यात जून महिन्यात सिंगापूरमध्ये बैठक झाली होती. दोन्ही नेत्यांचं अण्वस्त्र नष्ट करण्यावर एकमतही झालं होतं.
अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर कोरियावर अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी निर्बंध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय म्हणतो?
संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियावर लादलेल्या निर्बंधांचं पालन होत आहे की नाही हे पाहणाऱ्या समितीतील तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे. शनिवारी बऱ्याच माध्यम समूहांकडे हा अहवाल पोहोचला.
या अहवालात म्हटलं आहे की "उत्तर कोरियानं त्यांचा अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम अजूनही थांबवलेला नाही. तसंच, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून बंदी घातलेली असतानाही मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम आणि कोळशाची आयात जहाजांमार्फत केली जात आहे. तसंच, लहान आकाराची शस्त्रास्त्र आणि लष्करी वापराची यंत्र परदेशी मध्यस्थांमार्फत लिबिया, येमेन आणि सुदान या देशांपर्यंत पोहोचवली जात असल्याचंही उघड झालं."
उत्तर कोरियाच्या या कारवायांमुळे त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध प्रभावहीन ठरत आहेत, असंही मत अहवाल तयार करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी उत्तर कोरिया अण्वस्त्र कार्यक्रम थांबवून ती नष्ट करेल, असा आशावाद काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला असतानाच हा अहवाल आला आहे.
सिंगापूरमध्ये असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्सच्या (Asean) बैठकीत बोलताना ते म्हणाले की, "कामाला सुरुवात झाली आहे. कोरियन द्विपकल्पातील अण्वस्त्र नष्ट करण्याची प्रक्रिया वेळ खाऊ ठरेल."
उत्तर कोरियावर राजनयिक आणि आर्थिक दबाव कायम ठेवत त्यांच्याकडून अण्वस्त्र नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करून ती पूर्णत्वास न्यावी लागले. रशिया त्यांच्या भूमीत उत्तर कोरियन नागरिकांना काम करण्यासाठीची प्रमाणपत्र देत असल्याचं काही अहवालांवरून स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पाँपेओ पुढे म्हणतात, "या देशावर निर्बंध टाकण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशानं उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम गंभीर असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे ही गोष्ट आम्हाला मॉस्कोतील प्रमुखांच्या लक्षात आणून द्यावी लागेल. रशियासह इतर राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लादलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं आवश्यक आहे."
दरम्यान, रशिया हजारो उत्तर कोरियन कामगारांना आश्रय देत असल्याचा द वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रसिद्ध केलेलं वृत्त मात्र रशियानं धुडकावून लावला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)