फेसबुकमुळे लोकशाही कमकुवत होते- फेसबुकच्याच माजी कर्मचाऱ्याचे आरोप

फ्रान्सेस हॉगन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्रान्सेस हॉगन या फेसबुकच्या सिव्हिक इंटिग्रिटी टीममध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत.

फेसबुक कंपनीच्या मालकीच्या वेबसाईट्स आणि अॅप्समुळे "मुलांवर दुष्परिणाम होतो, दुही वाढते आणि लोकशाही कमकुवत होते," असं मत फेसबुकच्या एका माजी कर्मचाऱ्याने अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींसमोर व्यक्त केलं आहे.

एखादी कंपनी वा व्यवस्थेत राहून तिथल्या गैरकृत्यांबद्दल वा अयोग्य व्यवहारांबद्दलची माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीला 'व्हिसलब्लोअर' Whistleblower असं म्हटलं जातं.

फेसबुकविषयीची अशीच गोपनीय माहिती गेल्या काही दिवसांमध्ये उघड झालेली आहे. ही माहिती उघडकीला आणली आहे फ्रान्सेस हॉगन या फेसबुकच्या माजी कर्मचारी महिलेने.

27 वर्षांच्या फ्रान्सेस हॉगन या फेसबुकच्या सिव्हिक इंटिग्रिटी टीम (Civic Integrity Team) मध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करायच्या.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मधला कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी फेसबुक कंपनी आणि त्यांच्या धोरणांविषयी टीका केली.

फेसबुकवरचा मजकूर, त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षिततेविषयीचे प्रश्न आणि एकूणच नियमन यावरून गेले काही दिवस चर्चा होत आहे.

व्हीडिओ कॅप्शन, फेसबुकला आपल्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या नफ्याची चिंता जास्त आहे का?

तर सध्या कंपनीबद्दल छापून येत असलेल्या गोष्टी कंपनीची 'चुकीची प्रतिमा' उभी करणाऱ्या असल्याचं फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी म्हटलंय.

कंपनीविषयी करण्यात आलेल्या अनेक दाव्यांचा कोणताही अर्थ लागत नसल्याचं झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलंय. सोबतच हानीकारक मजकूर पसरू नये यासाठी कंपनी घेत असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधत आपण पारदर्शकता निर्माण करायचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप

फोटो स्रोत, Reuters

झकरबर्ग आपल्या पत्रात म्हणतात, "सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि सर्वांच हित साधण्याला आम्ही महत्त्व देतो. आमचं काम आणि आमच्या हेतूंचा चुकीचा अर्थ मांडणाऱ्या गोष्टी प्रसिद्ध होताना पाहणं आमच्यासाठी कठीण आहे."

फेसबुक ही जगातली सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साईट आहे. आपले दरमहा 2.7 अब्ज अॅक्टिव्ह युजर्स असल्याचं कंपनीने म्हटलंय. यासोबतच व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामसह इतरही अनेक सेवा फेसबुकच्या मालकीच्या आहे.

पण युजर्सच्या खासगी माहितीची जपणूक (Privacy) आणि चुकीची माहिती पसण्यापासून थांबवणं याबाबत फेसबुक पुरेशी पावलं उचलत नसल्याची टीका सातत्याने करण्यात येतेय.

आपण गेल्या काही आठवड्यांमध्ये फेसबुकची काही अंतर्गत कागदपत्रं वॉल स्ट्रीट जर्नलला दिल्याचं फ्रान्सेस हॉगन यांनी CBS न्यूजशी बोलताना सांगितलं.

या कागदपत्रांच्या आधारे वॉल स्ट्रीट जर्नलने रविवारी (3 ऑक्टोबर) बातमी प्रसिद्ध केली. इन्स्टाग्रामचा तरूण मुलींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं कंपनीने केलेल्या पाहणीत आढळून आल्याचं या बातमीत म्हटलं होतं.

इन्स्टाग्रामचा टीनएजर मुलींच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, याबाबत इन्स्टाग्रामची मालकी असणाऱ्या फेसबुकने एक पाहणी केली. यात आढळलेल्या निष्कर्षांनुसार हा प्लॅटफॉर्म अनेक तरुण युजर्ससाठी 'टॉक्सिक' (toxic) म्हणजेच अनेक प्रकारांनी त्रासदायक ठरत आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार या पाहणीतल्या 32 टक्के मुलींनी इन्स्टाग्राममुळे आपल्या मनात आपल्या शरीराविषयीचा न्यूनगंड निर्माण झाल्याचं सांगितलं.

हॉगन यांनी कॅपिटॉलमधल्या सुनावणीदरम्यान सांगितलं, "फेसबुक आणि इन्स्टाग्राम अधिक सुरक्षित कसं करता येईल हे कंपनीच्या नेतृत्त्वाला माहित आहे. पण हे बदल ते करणार नाहीत कारण लोकांपेक्षा गडगंज नफ्याला त्यांचं प्राधान्य आहे."

कंपनीतल्या अनेक गोष्टींवर मार्क झकरबर्ग यांचाच निर्णयाधिकार असून त्यांच्यावर वचक ठेवणारं कोणीही नसल्याचंही हॉगन यांनी म्हटलंय.

तर इन्स्टाग्रामबद्दलच्या संशोधनाचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असून अनेक तरुणांचा या प्लॅटफॉर्मचा चांगला अनुभव आला असल्याचं झकरबर्ग यांनी म्हटलंय. सोबतच आपण तयार करत असलेलं प्रत्येक माध्यम लहान मुलांसाठी सुरक्षित आणि चांगलं असणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही झकरबर्ग यांनी पत्रात म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)