व्हीडिओ गेम कट्टरतावाद्यांसाठी कसे ठरताहेत नवी शस्त्रं?

- Author, कार्ल मिलर आणि शिरोमा सिल्व्हा
- Role, बीबीसी क्लिक
ज्यू विरोधी विचारसरणी, वर्णद्वेष आणि समलैंगिकांच्या विरोधात द्वेष पसरवण्यासाठी व्हीडिओ गेमचा वापर होत असल्याचं, गेल्या तीन महिन्यांत करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळलं आहे.
डिलाइव्ह आणि ओडिसी अशा लाइव्ह स्ट्रिमिंग सर्व्हीसेसवर याबाबत चॅटिंग होतं. याठिकाणी कॉल ऑफ ड्यूटी आणि माइनक्राफ्ट अशा व्हीडिओ गेमबाबत चर्चा होते.
नंतर ही चर्चा टेलिग्रामसारख्या प्रायव्हेट मॅसेजिंग अॅपवर शिफ्ट होते.
रोजच्या चर्चांमध्ये कट्टरतावादाशी संबंधित गोष्टींचा समावेश केल्यामुळं लोकांचा कट्टरतावादाकडं कल निर्माण होऊ शकतो, असं या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
रोबलॉक्स आणि माइनक्राफ्टसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर
ज्या गेममध्ये खेळणाऱ्याला स्वतःची भूमिका निवडणं किंवा परिस्थितीनुसार बदलणं शक्य असतं, त्यांचा वापर अशा कामांसाठी होत असल्याचंही अभ्यासकांच्या लक्षात आलं आहे.
त्यात रोबलॉक्स आणि माइनक्राफ्टसारख्या प्लॅटफॉर्म तसंच गेम क्रिएशन सिस्टीमचा समावेश आहे. याठिकाणी नाझींच्या छळ छावण्या आणि चीनमध्ये वीगर मुस्लीमांसाठी तयार केलेल्या छावण्यांचा समावेश असतो.

रोबलॉक्सच्या एक गेममध्ये तर खेळणाऱ्याला वर्णद्वेषी व्यक्तीची भूमिका बजावण्यास सांगितलं जातं. त्यात तो अल्पसंख्याकांना गाडीनं चिरडू शकतो.
''याचा वापर फार जास्त लोक करत नाही. मात्र याबाबत जास्त टोकाची मतं असणाऱ्याला एखाद्या भूमिकेच्या माध्यमातून त्याची कट्टरतावादी कल्पना (फँटसी) ऑनलाईन का होईना, पण पूर्ण करता येऊ शकते,'' असं इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक डायलॉगमधील जेकब डेव्ही म्हणाले.
दुरुपयोग रोखण्यास सज्ज असल्याचा कंपन्यांचा दावा
"आमच्याकडे दोन हजार मॉडरेटर आणि तंत्रज्ञ आहेत. ते प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी 24 तास काम करत असतात. चर्चा सभ्य आणि विनम्रपणे व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. यात आम्हाला अशाप्रकारचा कंटेट दिसला तर आम्ही लगेचच त्यावर कारवाईही करतो," असं याबाबत रोबलॉक्सनं म्हटलं.
तर, "आमच्याकडे दहशतवाद आणि हिंसेशी संबंधित कंटेटंवर पूर्णपणे बंदी आहे. ते आमच्या धोरण आणि मानकांच्या विरोधी आहे. आमच्या सिस्टीममध्ये असा कंटेंट आला तरी, आम्ही लगेचच त्याला हटवण्यासाठी पावलं उचलतो," असं माइनक्राफ्टनं स्पष्ट केलं.
मात्र, सोशल मीडियावर नियम कठोरपणे लागू केल्यामुळं कट्टरतावाद्यांनी गेमिंग साईट्सकडे मोर्चा वळवला असल्याचं, अभ्यासकांचं म्हणणं आहे.
"टोकाची विचारसरणी असलेल्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी हे सुरक्षित ठिकाण मिळालं आहे. किंवा याठिकाणी ते जुन्या पद्धतीनं प्रॉपगंडा वापरू शकतात," असं डेव्ही म्हणाले.

"ऑनलाइन गेमिंगच्या माध्यातून सारखा छंद असलेल्या लोकांना भेटता येतं. त्यात कट्टरतावादी विचारसरणी असलेल्यांचाही समावेश आहे. या माध्यमातून ते समविचारी लोकांशी जोडले जाऊ शकतात. त्यांच्याशी सामाजिक संबंध निर्माण करून ते पुढं अधिक दृढ करू शकतात. या माध्यमातून जगभरात कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार केला जाऊ शकतो, म्हणून ते महत्त्वाचं ठरतं," असे ते म्हणाले.
गेमच्या आडून राजकारण
''एकदा तुम्ही या विश्वामध्ये प्रवेश केला की, कट्टरता निर्माण व्हायला लागते. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या चर्चा, लहान लहान गटांमध्ये सहभागी व्हायला लागतात. त्यात गेमच खेळत असतील असं नाही, ते राजकारणावरही बोलत असू शकतात," असं फॅसिझम विरोधी संघटना 'होप नॉट हेट' चे जो मुल्हाल म्हणाले.
या प्रकरणावर सक्रियपणे लक्ष ठेवून अशा प्रकारचा कंटेंट हटवत असल्याचं, बीबीसीच्या प्रश्नावर टेलिग्रामनं सांगितलं. तर डिलाइव्ह आणि ओडिसीनं काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

त्यांची धोरणं द्वेष आणि हिंसक कट्टरतावादाच्या विरोधात कठोर भूमिका घेत असून, नियमांचं उल्लंघन करणारा कंटेंट हटवण्यात ते स्वतः पुढाकार घेतात, असं या दोघांचं म्हणणं आहे.
शाळेनंतर किंवा कामानंतर जेव्हा तुम्ही घरी बसून गेम खेळता तेव्हा खेळामध्ये हे सर्वकाही अगदी सर्वसामान्य वाटतं. पण ते किती धोकादायक असू शकतं, याची तुम्हाला जाणीवच होत नाही, असं जो मुल्हाल म्हणाले.
कमी लक्ष असलेल्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर
रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट हा दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या तज्ज्ञांच्या गटाचा एक भाग आहे. त्यांनी कट्टरतावादाचा सामना करण्याच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन गेमिंगची चौकशी सुरू केली आहे.

"ऑनलाइन आणि चॅट स्पेस अशा कमी लक्ष असलेल्या ठिकाणांवर कट्टरतावादी हळू हळू जम बसवू लागले आहेत. मात्र या प्रकरणी पुरावे गोळा करण्याची गरज असल्याचं, डॉ. जेसिका व्हाइट म्हणाल्या.
कट्टरतावाद्यांकडून गेमिंग स्पेसचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारही गेमिंग इंडस्ट्रीची सल्ला मसलत करत आहे.
याला आळा घालण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर करत असल्याचं ब्रिटनच्या गेमिंग इंडस्ट्रीशी संलग्न संस्थेचं म्हणणं आहे. तसंच सरकारी संस्था एकमेकांशी संपर्कात राहून, गेम खेळणारे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करत असल्याचंही, त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








