अरुण गवळीच्या शूटर्सनी जेव्हा भर कोर्टात केला होता गँगस्टर अश्विन नाईकवर हल्ला...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुंबईत 1990 च्या दशकात अंडरवर्ल्ड आणि गॅंगवॉरने कळस गाठला होता. मुंबईवरील वर्चस्वासाठी सुरू गॅंगवॉरमध्ये दिवसा-ढवळ्या रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते.
मुंबईचं सेशन्स कोर्टही अंडरवर्ल्डच्या या रक्तपातातून सुटू शकलं नव्हतं.
एप्रिल 1994 मध्ये मुंबईच्या सेशन्स कोर्टात वकीलांच्या वेशात आलेल्या शूटर्सनी गॅंगस्टर अश्विन नाईकवर जीवघेणा हल्ला केला.
कट्टर दुश्मन असलेला गॅंगस्टर अरूण गवळीच्या शार्प शूटर्सने केलेल्या फायरिंगमध्ये अश्विन नाईक बचावला. पण, डोक्यात गोळी घुसल्याने कमरेपासून खाली कायमचा अपंग झाला.
त्या दिवशी कोर्टात नेमकं काय घडलं?
तो दिवस होता 19 एप्रिल 1994...
अश्विन नाईक त्याचा मोठा भाऊ कुख्यात गॅंगस्टर अमर नाईकच्या कंपनीमध्ये सहभागी झाला होता. अंडरवर्ल्ड संबंधित एका प्रकरणात पोलिसांनी अश्विन नाईकला अटक केली होती.

फोटो स्रोत, ANI
त्या दिवशी अश्विन नाईकची मुंबईच्या काळाघोडा सेशन्स कोर्टात हजेरी होती. पोलिसांची टीम त्याला घेऊन सेशन्स कोर्टात पोहोचली होती.
अश्विन नाईकला पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. कोर्टात सुनावणी संपली आणि अश्विन नाईक पोलिसांच्या टीमसोबत कोर्टाबाहेर आला.
याबाबत ज्येष्ठ क्राइम रिपोर्टर जितेंद्र दीक्षित सांगतात, "पोलीस अश्विन नाईकला कोर्टाबाहेर गाडीत बसवत होते. तेव्हाच, अचानक वकीलाच्या वेशातल्या एका व्यक्तीने अश्विन नाईकवर अंधाधुंद फायरिंग सुरू केली."
अश्विन नाईकवर फायरिंग करणाऱ्या या शार्पशूटरचं नाव होतं रविंद्र सावंत. तो गॅंगस्टर अरूण गवळीच्या टोळीचा होता. या हल्ल्यात काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले होते.
ज्येष्ठ क्राईम पत्रकार प्रभाकर पवार या घटनेची आठवण सांगतात,
"रविंद्र सावंत कोर्टाबाहेरच उभा होता. त्याने वकीलाचा काळा कोट घातला होता. हातात इंडियन पीनल कोडचं (भारतीय दंड संहिता) पुस्तक होतं. या पुस्तकात त्याने पिस्तूल लपवून ठेवलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
फायरिंगनंतर अश्विन नाईक कोमामध्ये गेला, तर पोलिसांनी फायरिंग करणाऱ्या रविंद्र सावंतला रेडहॅंड अटक केली.
जितेंद्र दीक्षित पुढे म्हणाले, "फायरिंगमध्ये अश्विन नाईकच्या डोक्यात गोळी घुसली होती. अश्विन नाईकचा जीव वाचला. पण, कमरेखालचा भाग मेंदूतील ज्या भागातून कंट्रोल केला जातो. त्याठिकाणी गोळी लागल्याने तो कमरेखाली अपंग झाला."
हल्ला झालेल्या दिवसापासून अश्विन नाईकला कायम व्हिलचेअरवरच रहावं लागलं.
मुंबई पोलिसांचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी अश्विन नाईक फायरिंग प्रकरणाची चौकशी केली. ते म्हणाले, "अश्विन नाईकवर फायरिंग करणारा रविंद्र सावंत हा अरूण गवळीचा शूटर होता. "
अश्विन नाईक फायरिंगप्रकरणी रविंद्र सावंतवर गुन्हा सिद्ध झाला. कोर्टाने रविंद्र सावंतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र सावंतला गॅंगमध्ये शामील होण्यासाठी देण्यात आलेली ही पहिली सुपारी होती. अश्विन नाईकवर हल्ला सदा पावलेने घडवून आणला होता. यासाठी सेशन्स कोर्टाबाहेर रेकी करण्यात आली होती.
अश्विन नाईक अंडरवर्ल्डमध्ये कसा आला?
परदेशातून इंजीनिअरिंगचं उच्चशिक्षण पूर्ण करून अश्विन नाईक मुंबईत परतला होता. त्याचा मोठा भाऊ गॅंगस्टर अमर नाईकची मध्यमुंबईच्या लोअर परळ भागात मोठी दहशत होती.

फोटो स्रोत, Getty Images
जितेंद्र दीक्षित पुढे सांगतात, "अमर नाईकला मुंबईत 'रावण' म्हणून ओळखलं जायचं."
शिक्षण घेऊन नुकताच मुंबईत परतलेला अश्विन नाईक, गॅंगस्टर अमर नाईक गॅंगमध्ये सहभागी झाला.
त्याकाळी मुंबईत अंडरवर्ल्डच्या चार गॅंग होत्या. अमर नाईकची रावण कंपनी, दाऊद कंपनी, छोटा राजन गॅंग आणि अरूण गवळीची भायखळा कंपनी.
गवळी-नाईक गॅंगवॉर केव्हा सुरू झालं?
वरिष्ठ पत्रकार प्रभाकर पवार सांगतात, "अरूण गवळी आणि अमर नाईक यांच्यात दुश्मनी होती. अश्विन नाईकच्या सासऱ्याला अरूण गवळीने मारलं होतं. तेव्हापासून गवळी-नाईक वॉर सुरू झालं."
गॅंगस्टर अरूण गवळीचं भायखळ्यात वर्चस्व होतं. तर जवळच्याच लोअरपरळ भागात अमर नाईक टोळी सक्रीय होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
जितेंद्र दीक्षित म्हणतात, "या भागातील मिल मालक, व्यापारी आणि बिल्डरांकडून खंडणी वसूल करण्याच्या मुद्यावर या दोन्ही गॅंगमध्ये गॅंगवॉर सुरू असायचं."
प्रभाकर पवार सांगतात, "अश्विन नाईकवर हल्ल्याचा बदला अमर नाईकने काही महिन्यातच घेतला. अरूण गवलीचा खासमखास तान्या कोळीची रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये हत्या करून नाईक कंपनीने अश्विनवर झालेल्या फायरिंगचा बदला घेतला."
आमीरजादावर झाली कोर्टात फायरिंग
मुंबईच्या सेशन्स कोर्टात आरोपींवर झालेली ही पहिली फायरिंगची घटना नव्हती.
माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान सेशन्स कोर्टात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमने केलेल्या फायरिंगच्या घटनेची माहिती देतात.
ते म्हणतात, "आमीरजादा आणि आलमजेब नावाच्या दोघांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ साबिर कासकरची हत्या केली होती. या प्रकरणी आरोपींवर कोर्टात खटला सुरू होता."

फोटो स्रोत, Getty Images
इसाक बागवान कोर्टातील फायरिंगचे साक्षीदार आहेत. ते पुढे सांगतात, "कोर्टात खटला सुरू होता. कोर्ट वकील आणि आरोपीच्या नातेवाईकांनी भरलं होतं. काही वेळातच कोर्टात एक अनोळखी व्यक्ती आला. त्यावेळी कोर्टाला खिडकी होती पण ग्रील नव्हती."
"कोर्टात आलेल्या या व्यक्तीने न्यायाधीशांकडे पाहिलं आणि अचानक आमीरजादावर चार राउंड फायर केले. आमीरजादाच्या तोंडात एक आणि पोटात तीन गोळ्या लागल्या होत्या."
कोर्टात अचानक मोठा आवाज झाल्यामुळे कोर्टात सर्व हादरून गेले होते.
सरकारी वकीलांना केसची माहिती देत असलेल्या बागवान यांनी आरोपी डेव्हिड परदेशीवर दोन गोळ्या झाडल्याचं ते सांगतात. पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीला अटक केली.
ते पुढे सांगतात, "चौकशीत समोर आलं की या हल्ल्यामागे दाऊद इब्राहीम होता. बडा राजनने यासाठी डेव्हीड परदेशीला सांगितलं होतं. यासाठी सेशन्स कोर्टात येऊन बऱ्याचवेळा त्याने रेकी केली होती."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








