दिल्लीत रोहिणी कोर्टात गोळीबार, 1 गँगस्टर आणि 2 हल्लेखोरांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
नवी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या एका गँगस्टरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावेळी हल्लेखोर आणि पोलीसांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना विशेष न्यायाधीश NDPS (Narcotics Drugs and Psychotropic Substances Act) गगनदीप सिंग यांच्या कोर्टरूम क्रमांक 207 मध्ये घडली.
या घटनेमध्ये गँगस्टर जितेंदर गोगी याच्यासह इतर दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
गोगी म्हणजेच जितेंदर मान यांना पोलिसांनी सुनावणीसाठी रोहिणी येथील न्यायालयात आणलं त्याचवेळी त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलं.
प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले असून गोगी यांना रुग्णालयात हलवण्यात आलं असं, रोहिणीच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
"गँगस्टर गोगी उर्फ जितेंद्र मानला रोहिणी कोर्टात सुनावणीसाठी नेत असताना दोन गुन्हेगांरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात दोन्ही गुन्हेगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकावर 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं," असं दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी स्पष्ट केलंय.
"अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बार काऊन्सिलनं वकिलांना खास ओळखपत्र द्यायला हवे. त्या ओळखपत्रांचं बनावट ओळखपत्र तयार करता येऊ नये म्हणून त्यात चीपसारखी काहीतरी व्यवस्था असावी. प्रत्येक कोर्टात प्रवेशापूर्वी त्याची तपासणी केली जावी. तसंच देशातील सर्व कोर्टात ते वैध असावे," असं मत कोर्टातील कर्मचारी अतुल यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केलं.
एक-दोन वर्षांपूर्वी न्यायालयात वकिलांनी आंदोलन केलं होतं. तेव्हापासून कोर्टाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची तपासणी करणं बंद करण्यात आलं होतं. त्या सर्वाचा परिणाम म्हणून ही घटना घडली असावी अशी शक्यता वकील अमित कुमार यांनी व्यक्त केली.
"याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची, मग तो वकील असो किंवा इतर कुणीही याचा विचार न करता अत्यंत कडक तपासणी केली जाणं गरजेचं आहे," असं कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, कोर्टाच्या परिसरात घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी काम करणार नसल्याचं दिल्ली बार असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नासियार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलंय.
"ही अत्यंत दुःखद घटना आहे. उद्या एका दिवसासाठी रोहणी, पटियाला, तीस हजारी, साकेत, कडकडडूमा, रोऊस अॅव्हेन्यू आणि द्वारका या सातही जिल्हा न्यायालयांमध्ये कामकाज होणार नाही. या माध्यमातून घटनेचा निषेध केला जाईल," असं नासियार म्हणाले.
दिल्लीतील सर्व सत्र न्यायालयांमध्ये प्रत्येकाची तपासणी आणि सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बाब असल्याचंही, ते म्हणाले.
"आरोपी हे नक्कीच जामीनावर सुटलेले असावेत आणि बदला घेण्यासाठी म्हणून ते वकिलाच्या वेशात आले असावेत. वकिलाच्या वेशात आल्यास कडकपणे तपासणी केली जाणार नाही, हे कदाचित त्यांना माहिती असावं," असं एका वकिलांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हटलं.
हेही वाचलंत का?
- हाजी मस्ताननं गुजराती नेत्यांना शिकवलं जातीचं राजकारण
- दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या मागे इतकं का धावतं बॉलिवुड?
- विकास दुबे एन्काऊंटरवर प्रश्न कशाला? हा पोलिसांच्या हौताम्याचा अपमान - सामना
- आलिया भट्ट साकारत असलेली गंगुबाई काठियावाडी कोण होती?
- त्याने जमिनीत कोट्यवधी डॉलर आणि दागिने पुरून ठेवले होते
- 'अब तक छप्पन': मुंबई एन्काउंटर्सचा इतिहास - मन्या सुर्वे ते लखन भैय्या
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








