विकास दुबे एन्काऊंटर वर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे पोलिसांच्या हौताम्याचा अपमान - सामना

विकास दुबे,
फोटो कॅप्शन, विकास दुबे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. एन्काऊंटरवर प्रश्न कशाला? - सामना

"विकास दुबे हा गँगस्टर आणि दहशतवादी होता. तो पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. या एन्काऊंटरवर प्रश्न कशाला? त्यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे दुबेने घडवलेल्या हत्याकांडातील आठ पोलिसांच्या हौतात्म्याचा अपमान आहे," असं सामनाच्या 'सामना'च्या अग्रलेखात आज म्हणण्यात आलं आहे.

"गुन्हेगारांचे कंबरडे मोडून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांना कधीकधी कठोर व्हावे लागते. मध्यंतरी तेलंगण पोलिसांनी केलेले एन्काऊंटर गाजले होते. तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे स्वागत केलं होतं. विकास दुबेच्या एन्काऊंटरवर प्रश्न करणाऱ्यांनी विकास दुबेसारखे गँगस्टर निर्माण करणाऱ्या यंत्रणेचे एन्काऊंटर कधी होणार का याचा जाब विचारायला हवा," असं पुढे लिहिलंय.

"एका गुन्हेगाराचा, गँगस्टरचा, माफियाचा जसा अंत व्हायला हवा तसाच विकास दुबेचा झाला. याला कोणी कथा म्हणो, पटकथा म्हणो, पण सत्य हेच की विकास दुबे नावाचा कर्दनकाळ संपला, त्यावर इतका शोक कशासाठी?

"विकास दुबेच्या एन्काऊंटरबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात तथ्य असेलही. पण त्याच्या मृत्यूनंतर मानवतावाद्यांनी गळे काढत आक्रोश सुरू केला आहे, तो अनालकलनीय आहे. विकास दुबे हा कोणी संतमहात्मा किंवा समाजसेवक नव्हता. कोणाच्याही सुपाऱ्या घेऊन किड्या मुंग्यांप्रमाणे वि निर्दयीपणे माणसे मारणारा तो गुन्हेगार होता. त्यामुळे दुबेचा चकमकीतील मृत्यू कोणी एवढा मनाला लावून घेण्याचे कारणच काय?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

2. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार? मनसैनिकांनी स्टुडिओ फोडला

एका स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवस्मारकाबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी मनसैनिकांनी एका स्टुडिओची तोडफोड केली आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अग्रिमा जोशुआ हिने मुंबईजवळील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल विनोदातून टीका केली. ही टीका करताना तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली.

छत्रपती शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून, त्यांच्याबद्दल थट्टा अजिबात सहन केली जाणार नाही, असाही एक सूर सोशल मीडियावर व्यक्त होतोय. ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला होता.

दरम्यान, अग्रिमाने याबद्दल लेखी माफी मागितल्याचं मनसे कार्यकर्ते यश रानडे यांनी म्हटलं आहे.

3. तुकाराम मुंढेंकडून नागपूर स्मार्ट सिटीचे CEOपद काढले

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी CEOपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना नागपूर स्मार्ट सिटीचे प्रभारी सीईओपद देण्यात आलं आहे. नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिली आहे.

तुकाराम मुंढे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, तुकाराम मुंढे

तीन तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या बैठकीत आयुक्त मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाची धुरा अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर भाजपने मुंढेंविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती.

आयुक्त मुंढे यांनी स्मार्ट सिटीचं संचालकपद आणि CEOपद बेकायदा बळकावल्याचं आजच्या बैठकीत सिद्ध झालं, असं नागपूरचे महापौर संदीप जोशी बैठकीनंतर म्हणाले.

4. मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी - अशोक चव्हाण

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.

बैठकीला एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 'टीव्ही9' यासंदर्भात बातमी दिली आहे.

5. मुंबईत नऊ पोलीस आयुक्तांच्या पुन्हा बदल्या

बदल्यांवरून राजकारण घडल्यानंतर आठवड्याच्या आत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शुक्रवारी नऊ उपायुक्तांच्या पुनश्च बदल्या केल्या. ज्या दहा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या राज्य सरकारने रद्द केल्या होत्या, त्यातील नऊजणांचा या नव्या बदली आदेशात समावेश असून सहा जणांच्या बदलीचे ठिकाण जैसे थे ठेवण्यात आले आहे. 'लोकसत्ता'ने याबाबत बातमी दिली आहे.

सिंग यांच्यावतीने प्रशासकीय विभागाने उपायुक्त निशाणदार वगळून उर्वरित नऊजणांच्या बदलीचे आदेश काढले. बदलीच्या नव्या आदेशांबाबत आयुक्त सिंग यांनी बोलणं टाळलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)