विद्यापीठ पदवी परीक्षा होणार की नाही? प्राजक्त तनपुरे बीबीसी मुलाखतीत म्हणाले...

फोटो स्रोत, Facebook/Prajakt Tanpure
महाराष्ट्रासह देशभरात विद्यापीठाच्या पदवी परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पण महाराष्ट्रात राज्य सरकारने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता पदवी परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये पदवी परीक्षेचे 8 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पदवी परीक्षा रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. पण आता केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानंतर राज्य सरकारसमोर परीक्षांबाबत नवीन पेच उभा राहिला आहे.
याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलीय.
याविषयी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुलाखत बीबीसी मराठीच्या दिपाली जगताप यांनी घेतली. पदवी परीक्षांचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार कायदेशीर लढाई लढू शकेल असे संकेत त्यांनी मुलाखतीमध्ये दिले आहेत.
पाहा ते काय म्हणाले -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
प्रश्न - पदवी परीक्षांचा विषय हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे का?
प्राजक्त तनपुरे - आम्ही परीक्षा रद्द करण्याचा जो काही निर्णय घेतला तो त्यावेळी UGC कडून ज्या गाईडलाइन्स आल्या त्यानुसार घेतला. तेव्हा UGCनं राज्य सरकारला कोव्हिडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे आमच्यामध्ये काही गोंधळ असण्याचा प्रश्नच नाही.
प्रश्न - मग असमन्वय कुणामध्ये आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आहे की राज्य सरकारमध्ये आपापसातच असमन्वय आहे?
प्राजक्त तनपुरे - आमच्यामध्ये कुठलाही असमन्वय नाही. राज्य सरकारने कोव्हिड विषयीची ग्राऊंड रिअॅलिटी पाहून निर्णय घेतला होता. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. 19-20 या वयातले विद्यार्थी असल्याने त्यांच्या मनावर फार काळ टांगती तलवार ठेवता येणार नाही.
पदवीच्या अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालं आहे. तसंच उर्वरित विद्यार्थ्यांनाही पदवी प्रमाणपत्र वेळेत मिळाली नाहीत तर त्यांच्या नोकरीच्या संधी जातील. ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील.
हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाहीय. अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत. तेव्हा आता समन्वय कुणामध्ये नाही हे तुम्हीच ठरवा.
प्रश्न - पदवी परीक्षांचा हा तिढा सोडवण्यासाठी आता राज्य सरकारसमोर कोणते पर्याय आहेत?
प्राजक्त तनपुरे - सध्यातरी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पुढील चर्चेसाठी पत्र लिहिलं आहे. शिवाय, कोर्टात एक जनहित याचिका दाखल झालीय. आम्ही कायदेशीर बाबी तपासून पाहू.
UGCकडून जी नवीन मार्गदर्शक तत्वं आली आहेत त्यानुसार कायदेशीर गोष्टींचा आढावा घेऊन पुढचं पाऊल टाकता येईल.
प्रश्न - एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय झाला आहे ?
प्राजक्त तनपुरे - एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन प्रमाणपत्र देता येईल, असा उल्लेख कुलगुरूंनी दिलेल्या अहवालात केला आहे. पण आता UGCच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार एटीकेटीच्या परीक्षा त्यांनी बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे यातही कायदेशीर बाजू पाहावी लागणार आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

प्रश्न - परीक्षा रद्द करून जर पदवी प्रमाणपत्र दिले तर विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर तसा उल्लेख केला जाईल का?
प्राजक्त तनपुरे - हा असा अपप्रचार भाजपाकडून केला जातोय. मला वाटत नाही असा काही उल्लेख केला जाईल किंवा त्या विद्यार्थ्यांना हिणवलं जाईल. भाजपकडून विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली जातेय.
विद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणपत्र त्यांच्या आधीच्या सेमिस्टरच्या गुणांवरून दिलं जात आहे. त्यामुळे त्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारेच पदवी प्रमाणपत्र दिलं जात आहे. याला विरोध असण्याचे कारण काय?
प्रश्न - भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तुमच्या निर्णयाला विरोध का केला जातोय?
प्राजक्त तनपुरे - हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. यात कुणीही राजकारण करू नये, असं आम्हाला वाटतं. पण केवळ विरोधाला विरोध केला जात असेल तर आम्ही कुणाचं तोंडं दाबू करू शकत नाही.

फोटो स्रोत, Facebook/Prajakt Tanpure
'शितावरून भाताची परीक्षा घेऊ नका'
प्रश्न - तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहात. सरकारमध्ये राज्यमंत्री आहात. नुकताच पारनेरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. सरकारमध्ये एकत्र असून तुमच्यात राजकारण सुरू आहे का?
प्राजक्त तनपुरे - हा स्थानिक विषय आहे. आमचे आमदार लंके हे लोकप्रिय नेते आहेत. 60 हजार मतांनी ते तिथे निवडून आलेत. तिथे स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आता वरिष्ठांमध्ये बोलणं झाल्यानंतर हा विषय मिटला आहे. त्यामुळे या घटनेवरून महाविकास आघाडीत काहीही समस्या नाहीत.

फोटो स्रोत, Facebook/Prajakt Tanpure
प्रश्न - ही एकमेव घटना नाही. नुकतीच गृह खात्याच्या बदल्या मागे घ्याव्या लागल्या होत्या. अशी अनेक उगाहरणं आहेत. याचे काय?
प्राजक्त तनपुरे - काही अपवादात्मक घटना घडत असतात. काही गैरसमज असतात. याचा अर्थ महाविकास आघाडीत असमन्वय आहे, असा होत नाही. तुम्ही शितावरून भाताची परीक्षा घेऊ नका. आमचं सराकर कार्यकाळ पूर्ण करेल.
प्रश्न - काही दिवसांपूर्वी निलेश राणे आणि तुमच्यामध्ये ट्विटरवर वाद रंगला. त्याचे कारण काय? निलेश राणे यांनी ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे?
प्राजक्त तनपुरे - निलेश राणे यांनी आमचे नेते रोहीत पवार यांच्याविषयी शिवराळ भाषेत ट्वूट केलम. त्यामुळे मी त्यांना ट्विटरवर उत्तर दिलम.
प्रश्न - तुम्ही म्हणालात 'टप्प्यात आलं की आम्ही पाहतो' या आशयाचे ट्वीट तुम्ही केले. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?
प्राजक्त तनपुरे - (हसत हसत) मला इतकंच म्हणायचंय की योग्य वेळ आली की आम्ही समाचार घेतो.
हे वाचलंत का?
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








