प्रेम-सेक्स : 'मला एकाच वेळी अनेक पार्टनर पाहिजेत, कारण...'

- Author, पूजा छाब्रिया
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मुवुंबी नेडजालामा यांना एकाच वेळी अनेक पार्टनर हवे आहेत.
मुवुंबी सुरुवातीपासूनच एकाच व्यक्तीसोबत विवाह करण्याच्या प्रथेचा विरोध करत होत्या.
आयुष्यभर तुम्ही एकत्रच राहणार आहात का, असा प्रश्न त्या आपल्या आई-वडिलांनाही नेहमी विचारत असत. पण असं कशामुळे?
याविषयी बीबीसीशी बोलताना मुवुंबी म्हणाल्या, "मला वाटतं, आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती आपण ऋतुंप्रमाणेच बदलल्या पाहिजेत. माझ्या आजूबाजूच्या जगात सगळ्याच ठिकाणी एकाच व्यक्तीसोबत नातं ठेवण्याबाबत वारंवार शिकवलं जातं. चित्रपट आणि चर्चमध्येही हेच सांगितलं जातं. पण मला ही गोष्ट अद्याप समजलेली नाही."
मुवुंबी आता 33 वर्षांची झाल्या आहेत. एकापेक्षा अधिक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली महिला म्हणून त्यांची ओळख आहे.
आपल्या रिलेशनशिपमध्ये कोणत्याच प्रकारचं बंधन असू नये, असं त्यांचं मत आहे.
इतकंच नव्हे तर मुवुंबी यांच्यासारखा विचार करणाऱ्या समाजघटकांच्या हितांच्या संरक्षणासाठीही त्या आवाज उठवत राहतात.
मुवुंबी सांगतात, "माझा एक मुख्य पार्टनर आहे. सध्याच्या काळात मी त्याच्यासोबत एंगेज आहे. आमची मुलंही आहेत. माझे इतर पार्टनर आमच्यासंदर्भात खुश आहेत. माझ्या मुख्य पार्टनरला लग्न करायचं नाही. पण मी भविष्यात एका वेगळ्या प्रकारच्या लग्नाची कल्पना करत असते. एक असं लग्न ज्यामध्ये मला एकापेक्षा जास्त लोकांशी एकाच वेळी लग्न करता येईल. मी वेगवेगळ्या लिंगांच्या लोकांकडे आकर्षित होत असते."
एका महिलेचे एकापेक्षा जास्त पती?
दक्षिण आफ्रिकेचं संविधान जगभरात सर्वाधिक उदारमतवादी मानलं जातं. इथं समलैंगिक विवाह करण्यासोबतच पुरुषांना अनेक पत्नी ठेवण्याची परवानगी आहे.

देशातील विवाहसंबंधित कायदा अद्ययावत करण्याची मागणी आता केली जात आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही एकाच वेळी एकापेक्षा जास्त पती ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.
पण, देशातील परंपरावादी मंडळी (कंझर्व्हेटिव्ह) समाज या गोष्टीवर टीका करताना दिसतो.
चार पत्नींचे पती असलेले उद्योजक आणि टीव्ही सेलिब्रिटी मुसा मस्लेकेऊ सांगतात, "यामुळे आपल्या संस्कृतीचं खूप मोठं नुकसान होईल. एकापेक्षा जास्त पती असलेल्या महिलेच्या मुलांचं काय होईल? ते आपली कोणती ओळख सांगतील? महिला याबाबत पुरुषांची जागा घेऊ शकत नाहीत. याविषयी आपण कुणीच काही ऐकलेलं नाही. महिला आता पुरुषांना लोबोला (नवरीला दिली जाणारी रक्कम) देतील का? की पुरुष आता पत्नीचं अडनाव लावणं सुरू करतील?"
दक्षिण आफ्रिकेतील विरोधी पक्षानेही याचा विरोध केला आहे. ख्रिश्चियन डेमोक्रेटिक पक्षाचे नेते रेव्हरंड केनेथ मेशोए यांच्या मते, असं केल्यास समाजव्यवस्था नष्ट होईल.
मेशोए सांगतात, "एक वेळ अशी येईल की जेव्हा एक पुरुष म्हणेल, तू दुसऱ्या पुरुषासोबत जास्त वेळ घालवतेस. माझ्यासोबत राहत नाहीस. यामुळे दोन पुरुषांमध्ये संघर्ष होईल."
लोकांना अपेक्षा
मुवुंबी यांच्या मते, बहुपत्नी संबंधांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.
त्या सांगतात, "सध्या स्थिती तणावपूर्ण आहे. अनेक लोकांच्या मान्यतांना यामुळे धक्का बसला आहे. पुरुष गेल्या कित्येक पिढींपासून उघडपणे आणि आनंदाने अनेक विवाह करताना दिसतात. पण महिलांना यासाठी लज्जित व्हावं लागतं. आपल्याला या गोष्टी दुरुस्त कराव्या लागतील."

फोटो स्रोत, Getty Images
मुवुंबी गेल्या दहा वर्षांपासून एकाच वेळी अनेक रिलेशनशीपमध्ये राहिल्या आहेत. अशा लोकांना सामुदायिक पद्धतीने 'पॉली' असं संबोधलं जातं.
पॉली होण्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक व्यक्तींसोबत रिलेशनमध्ये असता. तुम्ही ज्या व्यक्तींसोबत अशा नात्यात असता, त्यांचं या गोष्टीला पूर्ण समर्थन असतो. त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो."
सध्या मुवुंबी यांचे दोन पार्टनर आहेत. एक मुख्य (अँकर) पार्टनर म्हणजे ज्यांच्यासोबत त्या राहतात. एकमेकांच्या संसाधनांचा वापर करतात. त्याशिवाय त्यांचा आणखी एक पार्टनर आहे. त्याच्याशी मुवुंबी यांचे फक्त रोमँटिक संबंध आहेत. पण त्यांची भेट खूप कमी वेळा होते."
त्या सांगतात, "आम्ही टेबल पॉलीमोरी पद्धतीचा अभ्यास करत आहोत. यामध्ये लोकांना एकमेकांच्या पार्टनरबाबत माहिती असते. पण यादरम्यान हे सगळे व्यक्ती एकमेकांना भेटायलाच हवेत, ही गोष्ट महत्त्वाची नाही. मला वाटतं असा मोकळेपणा नात्यात असला पाहिजे. आदिवासी समाजात हे पाहायला मिळतं."
ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना सांगावी की नाही, याबाबत मुवुंबी यांना सुरुवातीला याबाबत शंका होती.
पण पाच वर्षांपूर्वी त्यांचा मुख्य पार्टनर मजू म्यामेेकेला न्हलाबत्सी यांच्याशी मुवुंबी यांचं नातं मजबूत बनलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट सर्वांना सांगण्याचा निर्णय घेतला.
त्या म्हणतात, "माझा अँकरसुद्धा पॉली आहे. आम्ही गोष्टी लपवल्यामुळे त्याचा आमच्या कुटुंबातील नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. समजा तो एखाद्या सार्वजनिक ठिकाणी इतर कोणत्या तरी पार्टनरसोबत आहे, आमच्या कुटुंबाने ते पाहिलं, तर त्यांना कोणताच संभ्रम व्हायला नको."
त्या म्हणाल्या, "तेव्हा तशी वेळच आली होती. मुलगी पाच वर्षांची होऊ लागली होती. मी या क्षेत्रात प्रचंड सक्रिय होते. बहुविवाहाचा प्रचार करताना मी स्थानिक टीव्ही चॅनेलवर आले. त्यामुळे कुटुंबीयांना इतर कुणाकडून कळण्यापेक्षा मीच सांगितलेलं बरं, असं मला वाटलं."

फोटो स्रोत, Getty Images
मुवुंबी यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारलं आहे. पण त्यांना अजून बराच लांब रस्ता पार करायचा आहे.
मुवुंबी यांनी त्यांच्या साखरपुड्याची आठवण सांगितली. त्यांच्या पार्टनरने लोबोला प्रथा पाळत त्यांना काही रक्कम दिली होती.
मुवुंबी म्हणाल्या, "माझ्या कुटुंबीयांनी मला त्यावेळी विचारलं, जर दुसरा कुणी पुरुष लोबोला देत असल्यास तेही आम्ही घ्यावं का? मी म्हणाले हो, तसं होऊ शकतं. मला माझं सत्य सर्वांसमोर ठेवणं गरजेचं होतं. त्यांना ते चांगलं वाटलं असेल किंवा नाही, मी सांगू शकत नाही."
पितृसत्ताक पद्धतीवर प्रश्नचिन्ह
दक्षिण आफ्रिकेत लैंगिक समानता आणि महिलांनी आपल्या आवडीचा पर्याय निवडावा, यासाठी बहुपतित्व कायदेशीर बनवण्याची मोहीम जोर पकडत आहे.
सध्याच्या व्यवस्थेत फक्त पुरुषांनाच एकाचवेळी जास्त पत्नी करण्याची परवानगी आहे.
दक्षिण आफ्रिकेत हा प्रस्ताव कायदेशीर दस्तऐवजात समाविष्ट करण्यात आला आहे. 1994 नंतर प्रथमच विवाहाशी संबंधित कायद्यात बदल करण्याची पावलं उचलली जात आहेत. लोकांनाही याबाबत मत विचारलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यामध्ये मुस्लीम, हिंदू, ज्यू आणि रस्ताफेरियन विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याचाही विचार आहे. सध्या या विवाहांना इथं मान्यता नाही.
मुवुंबी यांच्या मते, हा प्रस्ताव म्हणजे आपली प्रार्थना स्वीकार होत असल्याप्रमाणेच आहे.
बहुपतित्वावर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांमागे केवळ पितृसत्ताक पद्धतच आहे, असंही त्यांना वाटतं.
बहुपतित्वाच्या संदर्भात सुप्रसिद्ध प्राध्यापक कोलीस माचोको सांगतात, ख्रिश्चन धर्म आणि वसाहतवाद आल्यानंतर महिलांची भूमिका मागे पडली. ती एकसारखी उरली नाही. विवाहसुद्धा समाजात प्रतिष्ठा स्थापित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांपैकी एक गोष्ट बनली."
त्यांच्या मते, पूर्वी केनिया, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि नायजेरिया या देशांमध्ये बहुपतित्व प्रचलित होतं. सध्या गॅबोनमध्ये ही परंपरा चालू आहे. तिथं हे कायदेशीर मानलं जातं."
मुलांच्या संदर्भात ते म्हणाले, "मुलांचा प्रश्न सोपा आहे. या विवाहांमध्ये जी मुलं जन्मतात, ती त्या कुटुंबाची मुले असतात."
'आगळीवेगळी लढाई'
मुवुंबी यांनी आपल्या पूर्वीच्या काही नात्यांमध्ये पार्टनरकडून पितृसत्ताक विचारसरणी डोकं वर काढत असल्याचं पाहिलं. त्यामुळे तेव्हापासून त्यांनी पॉली असलेलाच पार्टनर बनवणं योग्य आहे, असा विचार केला.
त्या सांगतात, "अनेक पुरुष माझ्या पॉली असण्याबाबत काहीच हरकत नाही, असं सांगायचे. पण नंतर गोष्टी बिघडत होत्या. मी पॉली आहे याचा अर्थ मी अधिकाधिक प्रेमी करण्याचा सतत प्रयत्न करत असते, असं नाही."
मुवुंबी पॉली लोकांना एकमेकांसोबत जोडणाऱ्या ऑनलाईन कम्युनिटीतच आपल्या दोन्ही पार्टनरना भेटल्या.
सध्या त्या आपल्या पार्टनरसोबत मिळून ओपन लव्ह आफ्रिका नामक एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवत आहेत. एकापेक्षा अधिक लोकांसोबतच्या नात्याचा प्रचार करण्यासाठी हा प्रयत्न उपयोगी येईल, असं त्यांना वाटतं.
मुवुंबीच्या मते, "या समुदायात कृष्णवर्णीय लोक जास्त आहेत. पण हा समुदाय सर्वसमावेशक आहे. पुढे याचा विस्तार होत राहील. आपल्या नात्यात मोकळेपणा ठेवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा प्लॅटफॉर्म उपयोगी ठरेल. इथं त्यांना आपल्यासारखे इतर लोक भेटतील. त्यांना खोटं बोलण्याची गरज भासणार नाही."
मुवुंबी यांना ही एक लढाईच वाटते. इथं विरोध करणारे लोक भेटत राहतील.
त्या म्हणतात, "मी माझ्या आईच्या पोटात होते, तेव्हा माझी आई एका निषेध आंदोलनात सहभागी झाली होती. त्यावेळी महिलांना पुरुषांच्या परवानगीशिवाय गर्भनिरोधक गोळ्या मिळाव्यात यासाठी ते आंदोलन करण्यात येत होतं. ती लढाई वेगळी होती. आता ही माझी लढाई वेगळी आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








