Propose Day : ही 7 कारणं देऊन तुमच्या प्रेमाला नकार मिळतो

ये जवानी है दीवानी

फोटो स्रोत, YouTube / T Series

फोटो कॅप्शन, या जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या प्रेमाचा गुलाब नकाराने कोमेजून गेला आहे (आणि त्याचा गुलकंद झाला आहे).
    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(आज प्रपोज डे. प्रेम करायला कारण लागत नसलं तरी प्रेम नाकारायला हजारो कारणं असतात. तुम्हालाही कधी नकार मिळाला असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.)

प्रेमाची कबुली दिल्यावर ते नाकारलं गेलं असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

हा लेख वाचणारी प्रत्येक व्यक्ती एकदा तरी प्रेमात पडली असेलच, याची मला खात्री आहे. (चेहऱ्यावर हसू उमटलं ना?) ज्यांचं प्रेम स्वीकारलं गेलं, ज्यांना त्यांचं प्रेम येनकेन प्रकारेन मिळालं, त्यांच्यासारखे नशीबवान तेच.

आपण अगदी थरथरत्या हाताने, मनाने कबुली द्यायची आणि समोरच्या व्यक्तीने लाजून 'हो' म्हणत ते स्वीकारलं की जो आनंद वाटतो तो स्वर्गात मावणारा नसतो.

मात्र या जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या प्रेमाचा गुलाब नकाराने कोमेजून गेला आहे (आणि त्याचा गुलकंद झाला आहे.)

प्रेम करायला कारण लागत नसलं तरी प्रेम नाकारायला हजारो कारणं असतात. आज अशाच काही कारणांवर एक नजर टाकूया -

1. 'मी तुला त्या नजरेनं पाहिलंच नाही!'

या वाक्याने हजारो हृदयांचा पालापाचोळा झाला आहे. या वाक्यामागे काय दडलंय, याचा धांडोळा घेण्याचा बराच प्रयत्न झाला आहे. पण उत्तर मिळालेलं नाही.

बरं मग त्या नजरेनं पाहण्याच्या काही शक्यता आहे का, या प्रश्नाचं उत्तर 'माहिती नाही' असं मिळतं. जेव्हा काही उत्तर नसतं तेव्हा हे एक अत्यंत सुरक्षित उत्तर असतं.

"माहिती नाही. मी तुला..." असं वाक्य सुरू होताच प्रेम स्वीकारण्याच्या शक्यतेचा चक्काचूर होतो. आता अशा नजरेनं पाहिलंच नाही म्हटल्यावर तुम्ही बळजबरी करू शकत नाही. कारण बळजबरीने केलं तर ते प्रेम कसलं?

प्रपोज

फोटो स्रोत, Getty Images

2. 'आपण फक्त चांगले मित्र आहोत'

झाल्या ना उघड्या जखमा? सतत एकत्र रहायचं, फोनवर बोलायचं, एकत्र कॉफी वगैरे प्यायची. रात्री उशिरा घरी सोडायला यायचं. जर्नल पूर्ण करायला मदत करायची. 'डिप्रेस्ड' वाटत असेल तेव्हा समजूत काढायची, पण गुलाब पुढे केला की शुद्ध मैत्री आठवणार...

ही वेदना अनेकांच्या वाट्याला आली असेल, पण करता काय? तरी इथे आशा जिवंत असते, कारण थोडीफार समजूत घालता येते आणि प्रयत्न चालू ठेवता येतात.

एकदा प्रेमाची कबुली दिली की ती मैत्री शुद्ध राहत नाही. पण 'आपण फक्त चांगले मित्र आहोत' हे कारण चिरकाल टिकून राहतं.

3. 'माझे बाबा खूप कडक आहेत'

मुलीसाठी तिचे बाबा आणि भाऊ हे जगातील सगळ्यांत महत्त्वाचे लोक असतात. त्यांच्या परीक्षेत पास झालं की पुढची वाट तशी सोपी असते, कारण 'काकू' म्हणजे मुलीची आई ही जगातली सगळ्यांत गोड बाई असते. ती अगदी आपल्याला चिवडा, चहा देते. आपण सोबत आहोत म्हटल्यावर ती निर्धास्त असते. दसरा, दिवाळीला त्यांना शुभेच्छा वगैरे दिल्या की बऱ्याच गोष्टी सोप्या असतात.

पण बाबा हा मुलीचा हळवा कोपरा असतो. त्यांनी नाही म्हणणं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. लहानपणापासून प्रेम हे काहीतरी भयानक असतं आणि त्यात पडू नये, असं सतत मनात बिंबवलं जातं. त्यातून हे कारण पुढे येतं.

आता बाबांना समजावणं ही शक्यता आहेच. पण ते त्या मुलाच्या हिमतीवर आणि मुलीच्या समजूतदारीवर अवलंबून असतं.

4. 'मी कमिटेड आहे'

प्रपोज

फोटो स्रोत, iStock

इथे तर विषयच संपतो. अनेकदा प्रपोजलची चाहूल लागल्याने हे कारण बरेचदा दिलं जातं. अनेकदा ते खरंही असतं, पण हे कारण ऐकलं की मनाला असह्य वेदना होतात.

ज्या व्यक्तीशी हा 'नियतीचा करार' झालेला असतो, त्या व्यक्तीविषयी प्रचंड असुया किंवा जळफळ वाटते. पण काहीच करू शकत नाही. लक्ष मात्र बारीक ठेवलं जातं.

काही कारणामुळे हा करार मोडला तर काही काळ तिचा किंवा त्याचा खांदा होऊन जबाबदारी घ्यायला आपण तयार असतोच. शेवटी 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे', नाही का? (द्या टाळी)

5. 'माझा प्रेम या संकल्पनेवरच विश्वास नाही'

आली का आफत? आता प्रेमावरच विश्वास नाही म्हटलं की अगदी पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल, या विचारानेच धडकी भरते.

बरेचदा या कारणासाठी भूतकाळातल्या काही जखमा जबाबदार असतात. त्यामुळे प्रेमबिम या जगात नाही, अशी समजूत करून घेतली जाते.

त्यांचा विश्वास अगदीच नसतो, असं नाही. तो काही काळापुरता गमावलेला असतो. ज्याने प्रेमाची कबुली दिली आहे, त्याने अपार कष्ट घेतले तर विश्वास पुन्हा मिळवता येऊ शकतो. शेवटी "ये आग का दरिया है और डुब के जाना है..."

6. 'तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळेल...'

किती तो विनम्रपणा... बापरे! पण हे अत्यंत तकलादू कारण आहे.

असं सांगणारी व्यक्ती एकतर अतिशय हळव्या मनाची असते किंवा काहीच कारण सापडलं नाही म्हणून हे कारण सांगितलं जातं.

आपण चांगले नाही हा न्यूनगंड कुणी का बाळगेल? कुणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, ही भावनाच किती सुंदर असते. ते प्रेम आपल्याकडे चालून येतंय तर का नाकारावं?

खरं सांगायचं झाल्यास, 'मला तुझ्यापेक्षा चांगलं कुणीतरी मिळेल,' हे सांगायचं असतं. पण समोरच्याला न दुखावता नकार देण्यासाठी हे वाक्य हिट आहे.

7. 'नकाराचीच भीती'

'त्याने किंवा तिने नाही म्हटलं तर...?' या यक्षप्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने प्रेमाचे कितीतरी प्रस्ताव बासनात गेले आहेत. नकार दिला तर मैत्रीही शाबूत राहणार नाही, ही भीती मनाला कुरतडून टाकते आणि कितीतरी 'व्हॅलेंटाईन डे' येतात आणि जातात, पण भावनेला वाटच मिळत नाही.

अनेक जण ते अव्यक्त प्रेम घेऊनच आयुष्य जगतात. कधीतरी आठवणींचे उमाळे येतात, ते सोनेरी दिवस आठवतात आणि खपल्या बाहेर येतात. पण वेळ निघून गेलेली असते. अशा वेळी पश्चात्तापाशिवाय हातात काहीच उरत नाही.

अनेकदा संपूर्ण आयुष्य अव्यक्तच निघून जातं.

फोटो स्रोत, YouTube / Zee Music Marathi

फोटो कॅप्शन, अनेकदा संपूर्ण आयुष्य अव्यक्तच निघून जातं.

ही फक्त काही प्रातिनिधिक कारणं आहेत. खरंतर व्यक्तिपरत्वे ही कारणं बदलत असतात. कधी कधी नकार द्यायचा नसूनही काही अपरिहार्य कारणांमुळे होकारही देता येत नाही. ही अवस्था फारच वाईट असते.

नकार कितीही प्रेमाने दिला तरी तो पचवायला जडच असतो. या नकाराचा सामना ज्याला करावा लागलाय, ती व्यक्ती आयुष्यात कोणत्याही गोष्टीला नकार देताना दहा वेळा विचार करते.

साहीर लुधिनायवी म्हणतात की "वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खुबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा..."

त्याप्रमाणे हे नकार पचवून पुढे वाटचाल करावी. आयुष्य खूप मोठं आहे. एका नकाराने ते व्यर्थ जायला नको.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)