अफगाणिस्तानात तालिबान आल्यानंतर 'या' महिलांचं आयुष्य कसं बदललं?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर महिलांचा विरोध कायम आहे.
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यानंतर महिलांचा विरोध कायम आहे.
    • Author, सुशिला सिंह
    • Role, बीबीसी हिंदी

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाऊन आता एक महिना उलटला. या महिनाभरात हजारो अफगाण नागरिकांना आपला मायदेश सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला. जे लोक देश सोडू शकले नाहीत, त्यांना आता तालिबानने जी आश्वासनं दिलीत त्यासोबतच जगावं लागणार नाही.

याच लोकांमध्ये त्या महिला आहेत ज्यांनी नवे कायदे आणि नव्या निर्बंधानुसार जगायला सुरुवात केलीये. आता घराचा उंबरा ओलांडताना त्या स्वतःला हिजाबने झाकून टाकतात, आणि सोबत पती किंवा कोणी महरम (स्त्री-पुरुषातलं असं नातं ज्यात लग्न करण्याची परवानगी नाही उदाहरणार्थ - आई-मुलगा, भाऊ-बहीण, वडील-मुलगी) असल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.

आता या महिलांचं स्वातंत्र्य आणि भविष्य यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

पण इथे काही अशाही महिला आहेत ज्या तालिबानच्या गोळ्यांना घाबरत नाहीत. त्यांना चाबकाच्या फटक्यांची भीती नाही, किंवा आपल्या जवळच्यांची चिंता नाहीये. या महिला आपल्यावर लादलेले निर्बंध काही न बोलता मान खाली घालून मान्य करायला तयार नाहीयेत.

फराह मुस्तफवी

फराह मुस्तफवी 29 वर्षांच्या आहेत आणि दोन मुलांची आई आहेत.

फराह मुस्तफवी

फोटो स्रोत, Farah Mustafawi

फोटो कॅप्शन, फराह मुस्तफवी

वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्या मानवी हक्कांसाठी काम करत आहेत आणि तालिबानच्या विरोधातही आता आवाज उठवत आहेत.

त्या म्हणतात, "गेल्या 21 वर्षांत आम्ही जे कमवलं होतं ते तालिबानने फक्त एका तासात संपवलं."

बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "महिला निदर्शनं करत असतात तेव्हा तालिबानची लोक येतात आणि विचारतात तुम्ही हे काय करताय? तेव्हा या महिला त्यांना खंबीर राहून तर्कसंगत उत्तर देतात."

"आम्ही म्हणतो की पैंगबर हजरत मोहम्मद यांची पत्नी खदीजा यांचा स्वतःचा खूप मोठा व्यवसाय होता आणि त्यांना आपलं काम करण्यापासून कोणी थांबवलं नाही. त्यांचा व्यवसाय त्यांनी स्वतः निवडला होता. तसंच हाही आमच्या मानवी हक्कांचा प्रश्न आहे. आम्ही तुमच्या विरोधात नाही आहोत."

तालिबानची भीती नाही?

तालिबानला विरोध करण्याऱ्या आंदोलकांवर गोळीबार झाल्याच्या बातम्या येत आहेत, अशात या महिला आंदोलकांना भीती नाही वाटत का?

फराह मुस्तफवी

फोटो स्रोत, Farah Mustafawi

फोटो कॅप्शन, फराह मुस्तफवी

यावर फराह हसतात आणि मला फोनवर सांगतात, "मी आणि माझी मैत्रिण जोलिया इथून कुठेही जाणार नाही आहोत. आमच्या घरच्यांना फार भीती वाटते की तुम्ही त्यांच्या समोर जाता, त्यांच्या समोर निदर्शनं करता, ते तुम्हाला मारून टाकतील. पण मला भीती वाटत नाही."

त्या म्हणतात, "हा माझा देश आहे, इथे माझं घर आहे. मला देशाबाहेर जाण्याची संधीही मिळाली होती पण मी इथून कुठेही जाणार नाही."

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यामुळे फराह खूप नाराज आहेत. त्या म्हणतात, "आम्ही एका अंधारमय शतकातून बाहेर पडलो होतो. इथे नागरी सुविधा होता. महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी होती. जीम, सलून, पार्लर, कॅफे होते. आम्ही अर्ध्या रात्री बाहेर कुठेही जाऊ शकत होतो. आता फक्त काही ठराविक कॅफे उघडे दिसून येतात."

त्या म्हणतात की, "तालिबान सरकारला मान्यता मिळू नये अशी आम्ही विनंती करतो. पण अशरफ गनी आणि हमीद करजाई यांचं सरकार परत येऊ नये यासाठीही आम्ही आंदोलन करणार नाही, कारण त्या काळातला भ्रष्टाचार, घराणेशाही, जातीयवाद आणि काही ठराविक लोकांनाच कसे सत्तेचे लाभ होतात हे आम्ही पाहिलं आहे. तालिबान जर सगळ्यांना सत्तेत समान वाटा देत असेल आणि सगळ्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची हमी देत असेल, भ्रष्टाचाराला आळा घालत असेल तर आम्हाला ते सरकारही मान्य आहे."

आंदोलनकर्त्या महिला

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, आंदोलनकर्त्या महिला

"पण तालिबानचं आताचं स्वरूप पाहाता भारत, फ्रान्स, इंग्लंड आणि जर्मनीसारख्या देशांनी अफगाणिस्तान आणि इथल्या महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांनी हे समजून घ्यायला हवं की हा फक्त आमच्या देशाचा प्रश्न नाहीये तर तालिबानची कट्टरवादी विचाकसरणी इतर धर्मनिरपेक्ष देशांसाठीही आव्हान उभं करू शकते," त्या उत्तरतात.

1996-2001 या काळात अफगाणिस्तानात तालिबानचं शासन होतं. महिलांविषयी त्यांच्या पुराणमतवादी दुष्टीकोनामुळे महिलांना त्याकाळात अफगाणिस्तानात शिक्षणाचं किंवा नोकरी करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. तोच काळ आता परतेल अशी भिती महिलांना सतावते आहे.

दरख्शां शादान

दरख्शां शादान एक मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यामते जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानत ताब्यात घेतला आहे तेव्हापासून इथल्या महिलांची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

दरख्शां शादान

फोटो स्रोत, Dorukhshan Shadan

फोटो कॅप्शन, दरख्शां शादान

तालिबानने नुकत्याच आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली. पण त्यांच्या मंत्रिमंडळात सध्या एकाही महिलेचा समावेश नाही. दरख्शां विचारतात की, "हे असलं कसलं सरकार? आधी महिलांसाठी मंत्रालयाचं वेगळं खातं होतं पण आता तेही नाहीये. महिलांचं भविष्य काय असेल याबदद्ल अनिश्चितता आहे."

त्या म्हणतात, "आम्ही बातम्यांमध्ये पाहिलंय. तालिबान म्हणतं की महिलांनी घरातच राहिलं पाहिजे. फक्त आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या महिलाच नोकरी करू शकतात. पण त्या महिलांचं काय ज्यांच्या घरात कोणी पुरुष सदस्य नाहीये आणि त्यांनाच घराचा खर्च चालवावा लागतो? त्यांनी नोकरी केली नाही तर त्यांच्या घराचा खर्च कसा चालेल?"

"अनेक महिलांनी वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये आपले भाऊ, वडील किंवा नवऱ्याला गमावलं आहे. त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये नोकरी करत होत्या. पण आता तालिबानच्या या आदेशानंतर अशा एकट्या महिलांचं काय होईल?"

दरख्शां म्हणतात की त्या शांत बसणार नाहीत आणि महिलांच्या हक्कांसाठी लढत राहातील.

यावेळी तालिबानने म्हटलंय की महिलांना शरियाच्या अंतर्गत अधिकार दिले जातील. पण हे अधिकार नक्की कोणते असतील हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

शकेबा तमकीन

नॅशनल फोर्सच्या प्रशासकीय विभागात काम करणाऱ्या शकेबा तमकीन बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांचं आयुष्य 80 टक्के बदललं आहे.

शकेबा तमकीन

फोटो स्रोत, Shakiba Tamkin

फोटो कॅप्शन, शकेबा तमकीन

त्या 25 वर्षांच्या आहेत आणि बदक्शां प्रांतातून नोकरीसाठी काबूलमध्ये आल्या होत्या. त्यांच्या घरी आई आणि लहान भाऊ-बहीण आहेत.

त्या काही पैसे वाचवून आपल्या घरी पाठवायच्या पण आता त्यांनाच आर्थिक तंगीचा सामना करावा लागतोय.

शकेबा तमकीन

फोटो स्रोत, Shakiba Tamkin

फोटो कॅप्शन, शकेबा तमकीन

त्या म्हणतात, "मागच्या सरकारने अजून माझा पगार दिलेला नाही. मी घरभाडंही देऊ शकत नाहीये. खायला-प्यायला, कपडे घ्यायला पैसे नाहीये माझ्याकडे. महिनाभर काबुलमध्ये राहून इथली परिस्थिती पाहीन आणि मग माझ्या प्रांतात परत जायचं की नाही हा निर्णय घेईन."

ज्युलिया पारसी

ज्यलिया अफगाणिस्तानातल्या तखार प्रांतातल्या आहेत. सध्या त्या एका शाळेत आणि एका खाजगी विद्यापीठात पार्ट टाईम शिक्षिका म्हणून काम करतात.

सकाळी त्या शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि दुपारी पहिल्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना फारसी साहित्य शिकवतात.

ज्युलिया म्हणतात की मुलं तालिबानला घाबरून शाळेत येत नाहीयेत आणि तालिबानने म्हटलंय की सातवी ते बारावीच्या मुलांनी शाळेत येऊ नये तर मुलींना हिजाब घालायला सांगितलं आहे.

ज़ोलिया पारसी

फोटो स्रोत, Zholia parsi

फोटो कॅप्शन, ज़ुलिया पारसी

त्यांच्यामते तालिबानने हिजाब घातला नाही म्हणून मुलींना मारहाणही केलीये. अशात अनेक पालक घाबरलेले आहेत आणि आपल्या मुलींना शाळेत पाठवायला कचरत आहेत.

कॉलेजमध्येही त्यांनी मुलींना हिजाब घालायला सांगितलं आहे आणि मुलं-मुली वेगळं बसतील असं म्हटलंय.

ज्युलिया यांना तीन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांचे पति अनेक वर्षांपासून बेरोजगार आहेत.

त्या म्हणतात त्यांची मोठी मुलगी बारावीत आहे, मधली मुलगी दहावीत तर धाकटी मुलगी चौथीत आहे. पण त्यांच्या मुली आता शाळेत जात नाहीत.

"इतकी लहान मुलगी हिजाब कसाकाय घालेल? मी त्यांचं शाळेत जाणं बंद करून टाकलं. माझी मुलं तालिबानच्या भयाखाली जगताहेत. एक महिना झाला ते घरीच आहेत."

अफगाणिस्तानात महिलांचं आंदोलन

फोटो स्रोत, Farah Mustafawi

फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानात महिलांचं आंदोलन

आपल्या कॉलेजबदद्ल सांगताना त्या म्हणतात, "इथे मुलं आणि मुलींचे येण्याजाण्याचे रस्ते वेगवेगळे केलेत. वर्गात पडद्याची भिंत उभी केलीये. मुलं वर्गात आले आणि आपल्या जागेवर बसले की मगच मुलींना येण्याची परवानगी आहे.

युनस्कोच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं की अफगाणिस्तान तालिबानचं राज्य संपल्यानंतर गेल्या 17 वर्षांत इथल्या प्राथमिक शाळांमधली मुलींची संख्या वाढून शून्यावरून 25 लाखावर पोचली होती.

पण आता हा आकडा परत खाली जाताना दिसतोय.

तालिबानने म्हटलंय की देशातल्या विद्यापीठांचा स्त्री-पुरुषांसाठी कोणते असा वेगळा हिशोब केला जाईल तसंच नवा ड्रेसकोडही लागू केला जाईल.

हिजाब घातलेल्या विद्यार्थिनी

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, हिजाब घातलेल्या विद्यार्थिनी

उच्चशिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी संकेत दिलेत की महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी मिळेल पण त्या पुरुषांसोबत शिकू शकणार नाहीत.

हमसा बदख्शां

हमसा बदख्शां 27 वर्षांच्या आहेत आणि अफगाणिस्तानातल्या मागच्या सरकारमध्ये योजना आणि नीती विभागात काम करायच्या.

त्या म्हणतात, "तालिबान आल्यानंतर आपल्या ऑफिसला जाणारी मी पहिली महिला होते. पण जेव्हा मी तिथे पोहचले तेव्हा मला तिथून जायला सांगितलं आणि म्हटलं की इथे आमचा स्टाफ आहे. आता आम्ही भविष्यासाठी योजना आणि धोरणं ठरवू."

त्या सांगतात की, "माझ्या विभागात आधीही मुल्ला आणि मौलवी होते पण स्त्रियांनाही स्थान दिलं होतं. तालिबान आता काय धोरणं ठरवतील माहिती नाही. माझ्या विभागाने जी काही धोरणं आखली होती ती आता संपल्यात जमा आहेत."

हमसा बदख्शां

फोटो स्रोत, Hamasa Badakhsh

फोटो कॅप्शन, हमसा बदख्शां

त्या म्हणतात, "मी एकदम प्रामाणिकपणे सांगते की मला नव्या तालिबान सरकारकडून काहीही अपेक्षा नाही. आमच्या भविष्यात आता अंधकार दाटला आहे."

हमसा म्हणतात की त्यांचे वडील शिक्षण विभागात काम करायचे आणि तालिबानने त्याचा खून केला. त्यांच्या घरी आता त्यांची आई आणि पाच लहान भावंडं आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)