तालिबानने मारहाण केलेल्या पत्रकाराची कहाणी- 'हातात जे काही असेल त्याने मला मारलं'

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

अफगाणिस्तानात तालिबानने गेल्या आठवड्यात 2 पत्रकारांना अमानुष मारहाण केली. बीबीसीसोबत बोलताना त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

काबुलमध्ये महिला करत असलेल्या निदर्शनांचं वार्तांकन केलं म्हणून ताकी दरयाबी आणि नीमत नकदी या दोन पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं आणि तुरुंगात त्यांना मारझोड करण्यात आली.

'एतिलातरोज़' नावाच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या या पत्रकारांचे, मारझोडीमुळे अंगावर वळ उमटलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आपल्याला तुरुंगात नेण्यात आलं. तिथे तालिबानमधल्या अनेकांनी दंडुके आणि इतर गोष्टींनी आपल्याला भरपूर मारहाण केली आणि काही तासांनी सोडून दिलं, असं या पत्रकारांचं म्हणणं आहे.

कोणत्याही पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्यात येणार असल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने तालिबानच्या एका नेत्याचा दाखल देत दिलं आहे. पण या दोन पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा तपास करण्यात आला का, हे अद्याप स्पष्ट नाही.

तालिबानने पत्रकारांना ताब्यात घेणं आणि मारहाण करणं थांबवावं असं 'कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट' (CPJ) नावाच्या संस्थेने 8 सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानच्या विरोधात होणाऱ्या निदर्शनांचं वार्तांकन करणाऱ्या किमान 14 पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर सोडून देण्यात आल्याचं CPJने बातम्यांचा दाखला देत म्हटलंय.

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तालिबान त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांविषयी सतत सकारात्मक बोलत आलंय. पण त्यांचं बोलणं आणि प्रत्यक्ष कृती यात फरक असल्याचा आरोप केला जातोय.

त्या दिवशी काय घडलं?

बीबीसीसोबत बोलताना या दोन्ही पत्रकारांनी संपूर्ण घटना तर सांगितलीच पण सोबतच अफगाणिस्तानातल्या पत्रकारितेच्या भविष्याबद्दलचं त्यांचं मतही सांगितलं.

काबुलमध्ये बुधवारी ( 6 सप्टेंबर) ला काही महिला निदर्शनं करणार होत्या आणि सहकारी नीमतसोबत याचं वार्तांकन करण्याचं आपण ठरवल्याचं 22 वर्षांचे ताकी दरयाबी सांगतात.

निदर्शनं 10 वाजता सुरू होणार होती म्हणून हे दोघेही पत्रकार वेळेत त्या ठिकाणी दाखल झाले.

निदर्शनं जिथे होणार होती, तिथे महिलांची संख्या कमी होती. म्हणून त्यांनी जवळपास 20 मिनिटं आणखी वाट पाहिली.

निदर्शनं सुरू झाल्यावर आपण फोटो क्लिक करायला, व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केल्याचं ताकी सांगतात.

आंदोलन करणाऱ्या महिलांच्या हातात बॅनर्स होते आणि आजूबाजूला सशस्त्र तालिबानी होते.

एका महिलेच्या हातातल्या पोस्टरवर लिहीलं होतं, "तालिबानला मान्यता देऊ नका, तालिबानचा महिला हक्कांवर विश्वास नाही."

तुरुंगात काय घडलं?

हे आंदोलन सुरू असतानाच तालिबानच्या एका योद्ध्याने पोलिस स्टेशनला नेण्यासाठी आपला हात पकडल्याचं ताकी सांगतात. पण निदर्शनं करणाऱ्या महिलांनी तालिबानला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

ताकी सांगतात, "पोलिस स्टेशनमध्ये एक माणून मला एका खोलीत घेऊन गेला. तिथे आणखी काहीजण आले आणि त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. 8-10 जण होते आणि हातात जे काही असेल, त्याने ते मला मारत होते."

"10-12 मिनिटं त्यांनी मला मारलं, त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. मला दुसऱ्या खोलीत नेण्यात आलं. तिथे इतरही गुन्हेगार होते. त्यांचा गुन्हा काय होता, मला माहित नाही. मला त्या खोलीत सोडून दरवाजाला कुलुप लावून ते निघून गेले."

ताकी दरयाबींनी पुढे सांगितलं, "मी जवळपास चार तास तिथे पडून होतो. त्या लोकांनी मला तिथे टाकून दिल्यानंतर पाच मिनिटांनी मला शुद्ध आली. माझ्यासोबत नीमत नकदीही तिथेच होता. आम्हाला आमच्या पायांवर उभंही राहता येत नव्हतं. उभं राहण्याइतकं अंगात बळ नव्हतं."

नीमत नकदी सांगतात, "त्यांनी आम्हा दोघांना अमानुष मारहाण केली. पोलिसांचे दांडुके, तार, त्यांच्या हाती जे काही लागलं, त्याने मारलं. आम्हाला खूप गंभीर जखमा झाल्या."

नीमत सांगतात, "एका कागदावर त्यांनी आमच्या अंगठ्याचे ठसे घेतले (आवाज स्पष्ट नाही). पण आम्ही इतके जखमी होतो आणि इतके गुंगीमध्ये होतो की त्या कागदावर काय लिहीलंय हे वाचू शकलो नाही."

आपल्या शरीरावरच्या जखमा गंभीर नसून दोन आठवडे आराम करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं ताकी दरयाबींनी सांगितलं.

मारहाण करणारे तालिबान

तालिबानला आपल्याशी बोलायचं असेल असं आपल्याला वाटलं होतं, मारहाण होईल असा अंदाज नव्हता असं ताकी सांगतात.

त्यांना मारहाण करणाऱ्यांविषयी ते सांगतात, "त्यातले बहुतेक तरूण होते. काही तर माझ्याच वयाचे 20-22 वर्षांचे असतील. काहींचं वय जास्त होतं. 40 ते 45 दरम्यान. मी त्यांना म्हटलंही की आम्ही पत्रकार आहोत, आम्ही निदर्शनांना सुरुवात केली नाही. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही."

पत्रकार होऊन आपल्याला लोकांचा आवाज व्हायचं होतं पण अफगाणिस्तानातल्या पत्रकारितेच्या भवितव्याबद्दल आपल्याला काळजी वाटत असल्याचं ताकी सांगतात.

ते म्हणतात, "मला नोकरी करणं, माझं काम करणं सुरूच ठेवावं लागेल. मला स्वतःची काळजी आहे, पण तरीही मी माझं काम करत राहीन आणि कायमच एक पत्रकार राहीन. तालिबान पत्रकारांकडून त्यांचं बोलण्याचं स्वातंत्र्यं हिरावून घेईल, असं मला वाटतं. अफगाणिस्तानातल्या पत्रकारांची मला काळजी वाटते. कदाचित एक दिवस असा येईल जेव्हा आम्ही कामावर जाऊ शकणार नाही."

ताकी सांगतात, "मला तालिबानबद्दल फारसं माहित नाही. त्यांच्याविषयी फार काही वाचण्याची संधी मला मिळाली नाही. पण मी जे काही वाचलंय त्यावरून मला असं वाटतंय की अफगाणिस्तान चुकूच्या दिशेने जातोय. इथे लोकांना स्वातंत्र्य उरणार नाही. आणि जे काही आम्ही गेल्या 20 वर्षांत मिळवलं होतं, ते सगळं आम्ही गमावून बसू. अफगाणिस्तानाचं भविष्य मला चांगलं दिसत नाही."

भविष्याची चिंता

या दोन पत्रकारांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांचे कुटुंबीयही काळजीत आहेत.

ताकी सांगतात, "मी आता हे काम करू नये, असं त्यांनी मला सांगितलं. तालिबान मला पुन्हा मारहाण करतील असं त्यांना वाटतं. पुढच्या वेळी जास्त मारहाण होईल अशी भीती त्यांना आहे. पण त्यांनी माझी काळजी करू नये असं मी त्यांना सांगितलंय. माझ्यासोबत काहीही बरं वाईट झालं तरीही मी माझं काम करत राहीन."

आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी गप्प न राहता अफगाणिस्तानातल्या पत्रकारांना मदत करावी असं त्यांना वाटतं.

नीमत नकदी म्हणतात, "अफगाणिस्तानातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे आणि या संकटाचा सामना करावा लागेल. या देशात राहून वा बाहेरून. सामान्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आवाज उठवता आला पाहिजे, अशी आमची मागणी आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)