You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिराजुद्दीन हक्कानी : अमेरिकेचा मोस्ट वाँटेड अफगाणिस्तानचा गृहमंत्री
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली आहे. त्यांनी अफगाणिस्तानला 'इस्लामिक अमिरात' म्हणून घोषित केलं आहे.
अफगाणिस्तानच्या नवीन सरकारमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे पंतप्रधान असतील, तर मुल्ला गनी बरादर हे उपपंतप्रधान आहेत. मुल्ला अब्दुल सलाम हनफी यांनाही उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे.
या नव्या सरकारमधील अजून एका व्यक्तिची खूपच चर्चा होत आहे. ही व्यक्ती म्हणजे हक्कानी समूहाचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी. अखुंद सरकारने त्यांना गृहमंत्री बनविलं आहे.
अमेरिकेमध्ये वाँटेड हक्कानी
हक्कानी समूहाने गेल्या 20 वर्षांत अनेक घातक हल्ल्यांची अंमलबजावणी केली आहे. सिराजुद्दीन हक्कानी हे हक्कानी नेटवर्क या कुख्यात कट्टरपंथी समूहाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा संबंध तालिबानसोबतही आहे.
2017 मध्ये हक्कानी नेटवर्कने एक बॉम्ब हल्ला केला होता, ज्यामध्ये 150हून अधिक लोक ठार झाले होते.
अल-कायदासोबतही हक्कानी नेटवर्कचा संबंध आहेत. अमेरिकेनं हक्कानी नेटवर्कचा समावेश दहतवादी संघटनांमध्ये केला आहे.
FBI कडे हक्कानी यांची जी माहिती आहे, त्यानुसार सिराजुद्दीन हक्कानी तिथे वाँटेड आहेत. जानेवारी 2008 मध्ये काबुलमधील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी हक्कांनीना वाँटेड यादीत ठेवण्यात आलं आहे. त्या हल्ल्यात एका अमेरिकन नागरिकांसह 6 लोकांचा मृत्यू झाला होता.
हक्कानी यांच्या प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या लष्करावर झालेला हल्ला हक्कानी नेटवर्कने केला आहे. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामागेही हक्कानी नेटवर्कचा हात असल्याचा संशय आहे.
2 सप्टेंबर 2011ला काबुलमधील अमेरिकन दूतावासाजवळ नाटोच्या छावण्यांवर झालेल्या हल्ल्यांसाठीही हक्कानी नेटवर्कला जबाबदार धरण्यात आलं होतं. त्या हल्ल्यात चार पोलीस अधिकाऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
हक्कानींवर 37 कोटींचं बक्षीस
अमेरिकन गुप्तचर यंत्रणा एफबीआयच्या प्रोफाइलमध्ये हक्कानी यांची उंची 5 फूट 7 इंच असल्याचं सांगण्यात आलं आहे. हक्कानी पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं म्हटलं गेलंय आणि त्यांचं नेटवर्क हे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा भागात सक्रीय असल्याचंही सांगण्यात आलंय.
हक्कानी यांचं वय 45च्या आसपास असल्याचं एफबीआयनं म्हटलंय. त्यांच्यावर 37 कोटींचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी हक्कानी यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेश लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं- 'चार दशकांहून अधिक काळ दरदिवशी अफगाण नागरिकांचे प्राण जात आहेत. प्रत्येकानं आपली जवळची व्यक्ती गमावली आहे. सर्वच जण आता युद्धाला कंटाळले आहेत. या हत्या थांबायला हव्यात असं मला वाटतं.'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)