तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह देश सोडून पळाले - तालिबानचा दावा

अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्राध्यक्ष अमरूल्लाह सालेह यांनी आता देशातून पलायन केल्याचा दावा तालिबानने केला आहे.

अमरूल्लाह सालेह अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तानकडे पळून गेल्याच तालिबानने आज (6 सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

अमरूल्लाह सालेह हे पंजशीरच्या लढाईदरम्यान त्याठिकाणी उपस्थित होते. ते नॅशनल रेझिस्टन्स फोर्ससोबत होते.

गेल्या आठवड्यात सालेह यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करून आपण पंजशीर घाटीतच असल्याचं सांगितलं होतं.

पण आज तालिबानने पंजशीरमध्येही नियंत्रण मिळवल्याचा दावा त्यांच्या प्रवक्त्यांनी केला.

पंजशीर ज्या लोकांच्या नियंत्रणाखाली होता, ते आता गायब आहेत, असं तालिबानने म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान हे त्यांचंही घर आहे. त्यांना हवं तेव्हा ते देशात परतू शकता, असंही तालिबानने यावेळी म्हटलं.

पंजशीर येथून हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा तालिबानच्या साठ्यात जमा करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

रक्तपात रोखण्यासाठी देश सोडला - राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांनी काल (15 ऑगस्ट) देश सोडला. तालिबाननं अफगाणिस्तानातील बहुतांश महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला होता. त्यामुळे अशरफ घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता.

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली.

"राजधानी काबुल सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, रक्तपात रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला," असं अशरफ घनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

त्यांनी पुढे लिहिलंय की, "मी काबुलमध्ये थांबलो असतो तर झटापट झाली असती आणि त्यामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता."

"आज मला एक कठीण निर्णय घ्यायचा होता की, एकतर राष्ट्रपती भवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांच्या समोर उभं राहावं किंवा ज्या देशाच्या सुरक्षेसाठी गेली 20 वर्षे आयुष्य घालवलं त्यांना सोडावं. जर यावेळी असंख्य लोक मारले गेले असते आणि काबुल शहराला उद्ध्वस्त होताना पाहावं लागलं असतं, तर 60 लाख लोकसंख्येच्या काबुल शहरात मोठं मानवी संकट उभं राहिलं असतं."

"तालिबाननं तलवार आणि बंदुकीच्या जोरावर विजय मिळवला आहे. आता देशातील लोकांचा जीवाची जबाबदारी तालिबानवर आहे," असं पुढे घनी म्हणतात.

"मात्र, ते लोकांची मनं जिंकू शकत नाहीत. इतिहासात कुणालाही ताकदीच्या जोरावर हा हक्का मिळाला नाही आणि मिळणारही नाही. आता त्यांना एका ऐतिहासिक परीक्षेचा तोंड द्यावं लागेल. एकतर ते अफगाणिस्तानचं नाव आणि स्वाभिमान वाचवतील किंवा इतर क्षेत्र आणि नेटवर्क," असंही घनी म्हणाले.

'लूटमार रोखण्यासाठी' काबुल शहरात प्रवेश - तालिबान

काबुलमध्ये होणारी संभाव्य लूटमार रोखण्यासाठी आपण शहरात प्रवेश करत आहोत, असं म्हणत तालिबान काबुल शहरात प्रवेश करत आहे.

तालिबानने आपल्या कार्यकर्त्यांना शहरात प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तालिबान संघटनेचे प्रवक्ते झबीनुल्लाह मुजाहिद यांनी दिली, असं टोलो टीव्हीने म्हटलं आहे.

काबुल शहरातून सुरक्षा बलांनी काढता पाय घेतल्यामुळे शहरात गोंधळ माजून लूटमारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये यासाठी तालिबानी बंडखोर कार्यकर्ते शहरात प्रवेश करतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, नागरिकांनी तालिबानच्या बंडखोर कार्यकर्त्यांची भीती बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही, असंही तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबान संघटनेने पुन्हा डोकं वर काढलं होतं. तालिबान एकामागून एक मोठी शहरं ताब्यात घेत असल्याने अशरफ घनी यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला होता.

गेल्या दहा दिवसांपासून अफगाणिस्तान प्रशासनाने तालिबानसमोर सपशेल गुडघे टेकल्याचं येथील परिस्थितीवरून दिसून येत आहे.

आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत - तालिबान

"अफगाणिस्तानात तालिबान संघटनेचा कोणाचाही बदला घेण्याच्या हेतू नाही. देशातील नागरिकांचा जीव आणि त्यांची संपत्ती सुरक्षित आहे, याची मी सर्वांना खात्री देतो. आम्ही अफगाणिस्तानच्या जनतेचे सेवक आहोत," असं वक्तव्य तालिबान संघटनेचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी केलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी यालदा हकीम यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. यादरम्यान शाहीन म्हणाले, "काबुलबाहेर राहून शांततापूर्ण पद्धतीने सत्तांतर होण्याची प्रतीक्षा करा, असं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने सत्ता मिळवणार आहोत."

तालिबान राजवटीत अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांनाही सरकारमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. तालिबान संघटनेत नसलेले लोकही सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात."

तालिबानकडून काबुलचा घेराव

काबुल शहराला आम्ही चारही बाजूंनी घेरलं आहे, असा दावा तालिबाननं केला आहे. काबुल अफगाणिस्तानची राजधानी आहे.

अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर आज (15 ऑगस्ट) सकाळपासून तालिबाननं काबुलला घेरण्यास सुरुवात केली होती. तालिबान आता काबुलच्या सीमेजवळ पोहोचलं आहे.

तालिबानच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या समर्थकांना गोळीबार करण्यास सांगितलं जाणार नाही. अफगाण सैनिकांना त्यांच्या घरी जाऊ दिलं जाईल."

तसंच, हॉस्पिटल आणि विमानतळ सुरू राहतील आणि आपत्कालीन गोष्टीही सुरू राहतील, असंही तालिबाननं म्हटलंय.

तर त्याचवेळी, "तात्पुरत्या सरकारकडे शांततापूर्ण सत्तांतर होईल," असं अफगाणिस्तानच्या प्रभारी गृहमंत्र्यांनी म्हटलंय. टोलो टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ते असं म्हणाले.

काबुलवर हल्ला होणार नाही, असाही दावा प्रभारी गृहमंत्र्यांनी केला आहे.

असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, तालिबानचे नेते 'हस्तांतरणाच्या' तयारीसाठी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी जात आहेत.

तर तालिबानसाठी लढणाऱ्यांना यापूर्वीच काबुलच्या प्रवेशद्वारावर थांबण्याची सूचना केली आहे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची तातडीची बैठक

तालिबान आता काबूलच्या दरवाजापर्यंत पोहोचलं असतानाच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी, अमेरिकेचे तिथले राजदूत झालमे खालिलजाद आणि 'नाटो'च्या अन्य अधिकारी यांच्यात तातडीची बैठक सुरू आहे.

घनी यांनी काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अफगाण सैन्यदलाची ताकद वाढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं होतं.

पण तालिबानी हल्लेखोर काबूलमध्ये शिरले, तेव्हा त्यांना फारसा विरोध झालेला दिसला नाही. काही तासांपूर्वीच पूर्वेकडील जलालाबादमध्येही कोणत्याही विरोधाशिवाय तालिबानला नियंत्रण मिळवता आलं.

तालिबानसमोर अफगाण सरकारच्या या पडझडीमुळे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय.

बगराम विमानतळ आणि कारागृहावर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा

अफगाणिस्तानातील बगराम विमानतळ आणि कारागृहावर कब्जा केल्याचा दावा तालिबानी बंडखोरांनी केला आहे. हा परिसर काबुलच्या बाह्य भागात आहे.

बगराम विमानतळ गेल्या महिन्यापर्यंत अल-कायदा आणि तालिबानविरुद्धच्या लढाईचं केंद्र होतं. अमेरिकेनंही गेली 20 वर्षे याच ठिकाणावरून लढाईचं संचलन केलं होतं.

पण गेल्या महिन्यात अमेरिकेचे सैनिक एका रात्रीतून हे विमानतळ सोडून निघून गेले होते.

डिसेंबर 2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैनिक काबुलमध्ये दाखल झाले होते. त्यावेळ बगराम येथे त्यांनी विशालकाय विमानतळ विकसित करायला घेतलं. याठिकाणी एका वेळी 10 हजार सैनिक राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

जॉर्ज डब्ल्यू बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रंप यांनी आपापल्या कार्यकाळात याठिकाणचा दौरा केला होता.

बगराम तळावर अमेरिकेने एक कारागृहसुद्धा बनवलं होतं. कैद्यांवरील अत्याचारासाठी ते कुप्रसिद्ध बनलं. हे कारागृह अमेरिकेने बनवलं पण 2013 मध्ये त्याचा ताबा अफगाणिस्तान प्रशासनाकडे देण्यात आला होता.

'तालिबान चहूबाजूंनी काबुलमध्ये घुसलं'

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये चहूबाजूंनी तालिबाननं प्रवेश केल्याचं वृत्त AFP वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

तर "तालिबानचे सैनिक काबूल शहराच्या सीमेवर येऊन थांबले आहेत. अद्याप ते शहरात आले नाहीत," अशी माहिती तालिबानने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

कालच (14 ऑगस्ट) तालिबाननं अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील महत्त्वाचं शहर असलेल्या जलालाबादवर कुठल्याही संघर्षाविना कब्जा केला. जलालाबाद हे शहर काबुलपासून अगदीच काही तासांच्या अंतरावर आहे.

बीबीसीच्या रिपोर्टर याल्दा हकीम यांनी तालिबानचं प्रसिद्धी पत्रक सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. तालिबानचे नेते अफगाण सरकारशी चर्चा करत असल्याचं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.

तालिबानने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, "तालिबाननं काबुलमध्ये प्रवेश केला नाहीय. आमचे लढाऊ सैनिक शहराच्या बाहेरील भागात आहेत. सध्या ते शहरात जाणार नाहीत. सध्या सरकारसोबत सत्ता आणि सुरक्षा हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू आहे."

तालिबाननं प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय?

काबुलमध्ये सकाळपासूनच वेगाने घडामोडी घडत आहेत.

दाट लोकवस्ती असलेल्या नागरी लोकसंख्येला धोका असल्याचं कारण देत आपल्यासाठी लढणाऱ्यांना तालिबानने राजधानी काबुलच्या प्रवेशद्वारावर थांबण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात तालिबानने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.

यात म्हटलं आहे की, शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या सरकारकडेच आहे आणि शांततापूर्ण सत्तांतरासाठी चर्चा सुरू आहे.

तसंच या निवेदनात अफगाणांना देशात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि असंही सांगण्यात आलं आहे की, तालिबानचा आग्रह असेल "सर्व स्तरातील लोकांनी, भविष्यातील इस्लामी व्यवस्थेत स्वत:ला जबाबदार सरकारसह जी सेवा करते आणि सर्वमान्य असेल."

मोठी शहरं तालिबानच्या ताब्यात

याआधी, अफगाणिस्तानात आता राजधानी काबूल वगळता बाकीच्या सर्व महत्त्वाच्या शहरांवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. आतापर्यंत सरकारच्या नियंत्रणात असलेलं मजार-ए-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातलं मोठं शहर आता तालिबानच्या ताब्यात गेलं आहे.

बाल्ख प्रांताची राजधानी असलेलं हे शहर उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असून ते तालिबानविरोधी गटाचा गड मानलं जात होतं.

तालिबानला विरोध करणारे उझबेक सेनानी अब्दुल रशीद दोस्तूम आणि ताजिक नेता अट्टा मोहम्मद नूर यांनी या प्रांतातून पलायन करून सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याचं वृत्त आहे.

जलालाबाद शहर ताब्यात

रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार तालिबाननं बंदुकीची एकही गोळी न झाडता जलालाबाद शहरावर नियंत्रण मिळवलं. जलालाबादमधील एका अफगाण अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की "सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग होता."

अफगाणिस्तानला पाकिस्तानशी जोडणारा मुख्य रस्ता जलालाबादमधून जातो. आणि हा मार्ग आता तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबाननं आता अफगाणिस्तानातील 34 पैकी 23 प्रांतीय राजधान्यांवर नियंत्रण मिळवलं असून, मोठया शहरांपैकी केवळ काबूलच अफगाण सरकारच्या नियंत्रणात आहे.

मात्र तालिबानची आगेकूच सुरू असून ते काबूलच्या अगदी जवळ पोहोचले आहे. त्यामुळे काबूल शहरात तणाव वाढतोय. लाखो लोक आपापलं शहर सोडून काबूलच्या आश्रयाला आले आहेत. मात्र अनेक जण हे शहर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

मजार ए शरीफ पडले

बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानातील चौथं मोठं शहर असलेल्या मजार-ए-शरिफवरही फारसा संघर्ष न करता तालिबान्यांनी कब्जा मिळवला. त्यानंतर काही तासातच जलालाबादलही त्यांच्या ताब्यात गेलं.

सर्वप्रथम राष्ट्रीय लष्कराने आत्मसमर्पण केलं. त्यानंतर सरकार समर्थक सैन्य आणि नागरी सैन्यानेही पराभव मान्य केल्याचं बल्ख प्रांताचे लोकप्रतिनिधी अबास इब्राहिमजादा यांनी असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिकेत म्हटलं आहे.

रविवारच्या कारवाईनंतर तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानातील 34 पैकी 23 प्रांतीय राजधान्यांवर नियंत्रण मिळवलं आहे.

बॅंकांमधले पैसेही संपले

अनेक पाश्चिमात्य देशांनी आपापल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केल्यामुळे काबूल विमानतळावरही शनिवारी मोठी गर्दी उसळेली दिसली. अमेरिकेनं आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी पाच हजार सैनिकांना काबूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातही अनेकजण बँकांमधून पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी बँकांमध्येही पैसे संपल्याचं वृत्त आहे.

तालिबानसमोर अफगाण सरकारच्या या पडझडीमुळे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. घनी यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत. तालिबानला शरण जाणं किंवा मग राजधानी काबुलला वाचवण्यासाठी निकराचा लढा देणं.

राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी शनिवारी प्रसारीत झालेल्या भाषणात देशातील घडामोडींबद्दल स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करत आहेत असं स्पष्ट केलं.

गेल्या वीस वर्षांमध्ये आम्ही जे मिळवलं आहे ते आता गमावू देणार नाही, अफगाण लोकांच्या हत्या होऊ देणार नाही आणि सार्वजनिक संपत्ती नष्टही होऊ देणार नाही असं घनी म्हणाले.दरम्यान काबुलमध्ये शरणार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरात अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)