खालीद शेख मोहम्मद: 9/11 चा मास्टरमाइंड अमेरिकेच्या हातून कसा निसटला होता?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गॉर्डन कोरेरा आणि स्टिव्ह स्वान
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेत वीस वर्षांपूर्वी झालेल्या 9/11 हल्ल्यांच्या कटातील एक मास्टरमाइंड आजही तुरुंगात असून सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पण अनेक वर्षांपूर्वीच या व्यक्तीला थांबवणं शक्य होतं का?
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीला धडकणाऱ्या विमानांचे फोटो जेव्हा टिव्हीवर दाखवले जात होते त्यावेळी फ्रँक पेलेग्रिनो हे मलेशियाच्या एका हॉटेलच्या खोलीत बसलेले होते.
"अरे देवा, हा तर खालीद शेख मोहम्मद आहे. तो माझा माणूस होता," असं पेलेग्रिनो यांच्या मनात सर्वात आधी आलं होतं.
खालीद शेख मोहम्मदचा हेतू आणि लक्ष्य दोन्ही तेच होते. फ्रँक पेलेग्रिनो यांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीमुळं खालीद शेख मोहम्मदच्या मनसुब्यांची माहिती होती.
एफबीआयचे माजी स्पेशल एजंट फ्रँक यांनी सुमारे तीन दशकांपर्यंत खालीद शेख मोहम्मदवर नजर ठेवली होती. अजूनही खालीद शेख मोहम्मद 11 सप्टेंबरच्या घटनेचे तथाकथित मास्टरमाइंड असून न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
या खटल्याचा निकाल लागायला आणखी 20 वर्षे लागू शकतात, अलं खालीद शेख मोहम्मदच्या एका वकिलानं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
खालीद शेख मोहम्मदवर अमेरिकेची नजर
अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला सप्टेंबर 11 च्या हल्ल्यांसाठी प्रामुख्यानं जबाबदार समजलं जातं.
पण या हल्ल्यांचा तपास करणाऱ्या कमिशनच्या रिपोर्टमध्ये खालीद शेख मोहम्मद किंवा केएसएमला या कटाचा 'मुख्य सूत्रधार' म्हणण्यात आलं होतं.
खालीद शेख मोहम्मद यांनाच सर्वप्रथम या हल्ल्याची कल्पना सुचली होती आणि त्यांनी अल कायदापर्यंत ती पोहोचवली होती.
कुवैतमध्ये जन्मलेल्या खालीद शेख मोहम्मदचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे. 80 च्या दशकात तो अफगाणिस्तानात लढला होता.
9/11 च्या हल्ल्याच्या अनेक वर्षांपूर्वी एफबीआय एजंट फ्रँक पेलेग्रिनो यांना जिहादी खालीद याच्यावर नजर ठेवण्यास सांगण्यात आलेलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
9/11 च्या हल्ल्याच्या खूप पूर्वी 1993 मध्ये कट्टरतावाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. फ्रँक यांना याच प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आलं होतं.
या घटनेत सहभागी असलेल्या एका व्यक्तीला पैसे पाठवल्यानंतर सर्वप्रथम खालीद शेख मोहम्मद अमेरिकेच्या नजरेत आला होता.
एफबीआय एजंट फ्रँक यांना केएसएमच्या महत्वाकांक्षांची जाणीव 1995 मध्ये झाली होती. त्यावेळी प्रशांत महासागरावर काही विमानं उडवल्याच्या कटामध्ये त्याचं नाव समोर आलं होतं.
KSMची कतारमध्ये उपस्थिती
नव्वदच्या दशकाच्या मध्यात फ्रँक या व्यक्तीला अटक करण्यात जवळपास यशस्वी झालेच होते. त्यांनी केएसएमला कतारमध्ये शोधून काढलं.
केएसएमला अटक अटक करण्यासाठी फ्रँक आणि त्यांचं पथक ओमानला पोहोचलं. तिथून ते कतारला जाणार होते. केएसएमला नेण्यासाठी एक विमान तयार ठेवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्ष ऑपरेशन राबवायला अमेरिकेचे राजदूत घाबरत होते, संकोच करत होते.
फ्रँक कतारला पोहोचले आणि त्यांनी अमेरिकेचे राजदूत आणि दुतावासातील इतर अधिकाऱ्यांना केएसएमला पकडण्याच्या मोहिमेबाबत सांगितलं. पण अमेरिकेच्या राजदुतांना कतारमध्ये काहीही गोंधळ होऊ द्यायचा नव्हता, असं फ्रँक सांगतात.
"मला वाटतं की, त्या ठिकाणी फार मोठा काही तरी गोंधळ होईल, असं त्यांना वाटलं असेल," असं फ्रँक म्हणाले.
अखेर अमेरिकेच्या राजदुतांनी कतारच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं केएसएम हातून निसल्याची बातमी फ्रँक यांना दिली. "त्यावेळी प्रचंड राग आला होता. अत्यंत निराश झालो. संधी गमावली आहे, हे आम्हाला त्यावेळी माहिती होतं."
मात्र, नव्वदच्या दशकाच्या मध्यामध्ये केएसएमला जास्त महत्त्व देण्यात आलं नव्हतं, हेही फ्रँक मान्य करतात.
खालीद शेख मोहम्मदचे संबंध आणि सक्रियता
फ्रँग पेलेग्रिनो यांना तर केएसएमचं नाव अमेरिकेच्या टॉप टेन मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट करण्यातही यश आलं नव्हतं. "त्या यादीत आधीचेच अनेक दहशतवादी आहेत, असं मला सांगण्यात आलं," असं फ्रँक म्हणाले.
अमेरिकेची आपल्यावर नजर असल्याचा अंदाज कदाचित खालीदला आला असावा. त्यामुळं तो कतारला पळाला आणि तिथून अफगाणिस्तानला पोहोचला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतरची काही वर्षे केएसएमचं नाव राहून-राहून समोर येत होतं. जगभरातील विविध कोपऱ्यांतून अटक होणाऱ्या संशयित कट्टरतावाद्यांच्या फोनबूकमध्ये त्याचं नाव आढळायचं. त्यावरून केएसएमचे संबंध आणि सक्रियता कायम असल्याचं लक्षात येत होतं.
त्याच काळात खालीद शेख मोहम्मद म्हणजे केएसएम 9/11 च्या हल्ल्याची कल्पना घेऊन ओसामा बिन लादेनकडे पोहोचला.
कट्टरतावाद्यांना विमान उडवण्याचं प्रशिक्षण मिळावं आणि त्यांनी विमान उडवत अमेरिकेत इमारतींवर हल्ला करावा, अशी केएसएमची इच्छा होती. आणि 11 सप्टेंबरला हा हल्ला करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्या अल कायदाच्या एका मोठ्या कट्टरतावाद्यानं खालीद शेख मोहम्मदची माहिती दिली, त्यावेळी हल्ल्यात केएसएमचा हात असल्याचा फ्रँक यांचा संशय खरा ठरला.
केएसएमकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानच्या सीमेवर ओसामा बिन लादेनच्या शोधाला वेग आला होता.
CIAची ब्लॅक साइट
"प्रत्येकाच्या लक्षात आलं होतं की, ज्यानं हे घडवलं तो फ्रँकचा माणूस आहे. हा तोच असल्याचं आमच्या लक्षात आलं, त्यावेळी आमची अवस्था सर्वात वाईट झाली होती," असं पेलेग्रिनो सांगतात.
2003 मध्ये पाकिस्तानात केएसएमचा सुगावा लागला आणि त्याना अटक करण्यात आली. केएसएमच्या विरोधात गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्यावर खटला चालवला जाईल, अशी अपेक्षा फ्रँक यांना होती. पण केएसएम परत बेपत्ता झाला.

फोटो स्रोत, FRANK PELLEGRINO
केएसएमला सीआयएनं ताब्यात घेतलं होतं आणि चौकशीसाठी एजन्सीच्या ब्लॅक साइटवर ठेवण्यात आलं होतं. "त्याला जे काही माहिती होतं, ते सर्व मला लवकरात लवकर जाणून घ्यायचं होतं," असं सीआयएच्या एका अधिकाऱ्यानं तेव्हा म्हटलं होतं.
सीआयएच्या ताब्यात असताना केएसएमला किमाल 183 वेळा पाण्यात बुडवून ठेवण्यात आलं होतं. त्यात व्यक्तीला जवळपास बुडाल्याची जाणीव होत असते.
सीआयएच्या टॉर्चरच्या पद्धतींमध्ये रेक्टल रिहायड्रेशन (गुद्द्वारामार्गे 'खाऊ' घालणं), झोपू न देणं, बळजबरी नग्न ठेवणं आणि मुलांना मारण्याची धमकी देणं, याचा समावेश आहे.
केएसएमला या सर्वाचा सामना करावा लागला. त्यांनी त्यावेळी कट्टरतावादी कट, कारस्थानांमध्ये भूमिका असल्याचं मान्य केलं. पण बहुतांश माहिती ताब्यात ठेवण्यात आलेल्यांकडून मिळवण्यात आली होती, असं सीनेटच्या एका रिपोर्टमध्ये समोर आलं.
KSMला भेटण्याची संधी
सीआयएच्या या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर केएसएमला 2006 मध्ये ग्वांतानामो बे इथं पाठवण्यात आलं. त्यानंतर एफबीआयला केएमएसची चौकशी करण्याची परवानगी मिळाली.
फ्रँक पेलेग्रिनोनं ज्या व्यक्तीवर अनेकवर्षे नजर ठेवली होती, अखेर जानेवारी 2007 मध्ये त्यांना त्यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली.
"मला त्याला ही जाणीव करून द्यायची होती की, नव्वदच्या दशकात तो माझ्या रडारवर होता. मला सप्टेंबर 11 च्या हल्ल्यांबाबत त्याच्याकडून माहिती मिळवायची होती," असं फ्रँक सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
फ्रँक यांनी त्यावेळी झालेल्या चर्चेबाबत फार माहिती दिली नाही, पण "तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही, त्याचा 'सेंस ऑफ ह्युमर' खूप चांगला होता आणि त्यानं मोकळेपणानं चर्चा केली," असं फ्रँक म्हणाले.
ग्वांतानामो बे मध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान केएसएम अनेकदा दिसून आला. पण जगातील सर्वात बदनाम दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या केएसएमला, त्यानं जे केलं त्याबद्दल काहीही पश्चात्ताप नव्हता, असं फ्रँक यांनी सांगितलं.
त्यानं गुन्हा मान्य केला की, संपूर्ण सुनावणीला सामोरं जायचं आहे? असा प्रश्न फ्रँक यांना विचारण्यात आला. त्यावर "त्यानं जे काही केलं, ते त्याच्या दृष्टीनं योग्य होतं असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो. पण त्याला सुनावणीची प्रक्रिया आवडायला लागली होती," असं फ्रँक म्हणाले.
9/11 ची 20 वर्षे
"सहा दिवस माझ्याशी बोलल्यानंतर अखेर केएसएमनं आणखी बोलण्यास नकार दिला होता," असं फ्रँक सांगतात.
9/11 च्या दोषींना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सारखे अपयशी ठरत होते. न्यूयॉर्कमध्ये याचा खटला चालवण्याच्या प्रयत्नाला राजकीय विरोधक आणि सामान्य लोकांनी विरोध केला. "प्रत्येक जण ओरडून सांगत होता की, आम्हाला हा व्यक्ती इथे नको आहे. त्याला ग्वांतानामोमध्येच ठेवा," असं न्यूयॉर्कचेच राहणारे फ्रँक यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर ग्वांतानामोच्या लष्करी लवादात खटला सुरू झाला. पण प्रक्रियेतील अडचणी आणि कोरोनाच्या संकटामुळं सुनावणी रद्द होत राहिली. या आठवड्यात केएसएमच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. पण अंतिम निर्णयासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार आहे.
खटल्याच्या सुनावणीची नवी तारीख विचारपूर्वकपणे ठरवण्यात आली आहे. 9/11 च्या 20 व्या वर्धापदिनाला लोकांना आम्ही काहीतरी करत आहोत, हे दाखवता यावं यासाठी ही तारीख ठेवल्याचं, खालीदचे वकील डेवीड नेवीन म्हणाले.
ही प्रक्रिया पुढचे 20 वर्षही संपणार नाही, असं दिसत आहे. क्रिमिनल डिफेन्स लॉयर डेवीड नेवीन 2008 पासून या प्रकरणाशी जोडलेले आहेत. खटला सुरू करण्याचा विचार तेव्हाच होता, पण अजूनही खटला सुरू होण्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही, असं ते बीबीसी बरोबर बोलताना म्हणाले.
सर्वाधिक दीर्घकालीन आणि वादग्रस्त खटला
या खटल्यासाठी अठव्या ते नवव्या वेळी नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या न्यायाधीशांना खटल्याशी संबधित 35 हजार पानांचा अभ्यास करावा लागतो. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन आणि सर्वात वादग्रस्त गुन्हेगारी खटल्यांपैकी एक असल्याचं डेवीड म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचं मुख्य कारण म्हणजे, या प्रकरणातील पाच आरोपींनी सीआयएच्या गोपनीय तळावर ठेवण्यात आलं होतं. त्यांना टॉर्चर करून चौकशी करण्यात आली होती. अशाप्रकारे गोळा केलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही, असं कारण देण्यात आलं.
अमेरिकेत या लोकांना टॉर्चर करण्यासाठी भरपूर व्यवस्था आहे. पण एखाद्या आरोपीला दोषी ठरवल्यास, याच आधारे अपील केलं जाऊ शकतं आणि खटला वर्षानुवर्षे चालू शकतो, असंही डेव्हिड म्हणाले.
अमेरिकेच्या सर्वात बदनाम आरोपींपैकी एक असलेल्या आरोपीचा बचाव करण्याचा अनुभव कसा आहे? याबाबत त्यांनी फार काही म्हटलं नाही.
अमेरिकेचा वकील बचाव करत असल्यानं माझ्या अशिलांनाही सुरुवातीला माझ्यावर शंका होती, आम्हाला एकमेकांशी ताळमेळ बसवायला वेळ लागला, असं ते म्हणाले.
खालीद शेख मोहम्मदला जेव्हा हवाईदलाच्या एका गोपनीय तळावर ठेवण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी वकिलांनी 45 मिनिटं फिरवल्यानंतर त्याठिकाणी पोहोचवण्यात आलं होतं. त्या व्हॅनच्या बाहेर काहीही दिसत नव्हतं. मात्र आता केएसएमला तुलनेनं कमी गोपनीय असलेल्या कॅम्प 5 मध्ये ठेवण्यात आलं असल्याचे, डेवीड सांगतात.
9/11 खटल्यातील आरोपींचे नातेवाईक सुनावणीत सहभागी होण्यासाठी येत असतात. याबाबत खटल्याशी संबंधित वकील हे गांभीर्य बाळगतात. डेवीड नेविन यांनी याबाबात काही नातेवाईकांनाही प्रश्न विचारले आहेत.
"आमच्यासाठी ते अत्यंत कठीण असतं. पण त्यांच्या अडचणी अधिक वाढू नये, याची आम्ही काळजी घेत असतो," असं डेवीड सांगतात.
या खटल्यामुळं फ्रँक यांची निवृत्तीही तीन वर्ष पुढं ढकलली गेली. कारण त्यांना या प्रकरणी साक्ष द्यावी लागणार होती. "माझी नोकरी सुरू असताना मी हे सर्व घडलं असतं, तर बरं झालं असतं," असं फ्रँक म्हणतात. पण आता फ्रँक निवृत्त झाले आहेत. नुकताच त्यांनी ब्युरोदेखील सोडला आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








