प्रेषित महंमद यांची निंदा केली म्हणून तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात बदलांची चर्चा थंडावली आहे.
    • Author, शुमैला जाफरी
    • Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी

पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात सुधारणा होईल? कायद्याचा उपयोग व्यक्तिगत वादांचा निपटारा करण्यासाठीच जास्त झाला, असं टीकाकारांना वाटतं.

या वर्षाच्या सुरुवातीला विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या एका समुहाने खून केला. त्यानंतर पाकिस्तानातील दिवाणी प्रशासन या कायद्यात बदलासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल, अशी अपेक्षा होती.

पण गेल्या सहा महिन्यात यात कसलीच प्रगती झालेली नाही.

यानिमित्तानं 'बीबीसी'च्या शुमैला जाफरी यांनी पाकिस्तानातील ईश्वरनिंदेच्या संदर्भातील 2 हायप्रोफाईल प्रकरणांचा घेतलेला हा धक्कादायक आढावा.

मशाल खान हत्या

मी काही दिवसांपूर्वी इक्बाल खान यांना भेटण्यासाठी इस्लामाबादच्या वायव्येस असलेल्या हरीपूर या लहान शहराला भेट दिली.

एप्रिल महिन्यात जमावानं ईश्वरनिंदेच्या आरोपातून त्यांचा मुलगा मशाल याचा खून केला होता.

मशाल शिकत असलेल्या विद्यापीठाच्या प्रांगणातच हा प्रकार घडला होता.

मशाल खान खुनाच्या निषेधातील निदर्शने

फोटो स्रोत, RIZWAN TABASSUM/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, 22 एप्रिल 2017 ला ईश्वरनिंदेच्या आरोपावरून मशाल खान या युवकाचा खून झाला. त्यानंतर या खुनाच्या निषेधात पाकिस्तानात निदर्शने झाली.

त्याच्या वडिलांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ होती.

भयंकर आणि हदरवून सोडणाऱ्या प्रकरणातून जावं लागलेल्या व्यक्तीला भेटताना मी सहवेदनांच्या हिंदोळ्यावर होते.

मला माहीत होत की इक्बाल खान कणखर व्यक्ती आहेत.

ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या मुलाला गमावलं, त्या दिवशीही त्यांचं धैर्य आणि शांतचित्त एका क्षणासाठीही ढळलं नव्हतं.

मला आजही आठवतं, ज्या दिवशी त्यांचा मुलगा गेला त्यादिवशी माध्यमांशी बोलताना, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंबही ओघळला नव्हता.

त्यांच्या या धैर्यानं मला प्रभावित केलं होतं.

इक्बाल खान
फोटो कॅप्शन, मशाल खानचे वडील इक्बाल खान यांचा एकाकी लढा सुरूच आहे.

इक्बाल खान यांना मी हरीपूर कारागृहाच्या बाहेर भेटले. त्यांच्या मुलाच्या खुनाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते इथं आले होते.

गेल्या सहा महिन्यांतील या प्रकरणातील ही पहिली कायदेशीर घाडमोड होती.

या प्रकरणात जवळपास 57 लोकांवर गुन्हा नोंद झाला आहे. पण बहुधा हा खटला बरीच वर्षं चालेल.

पण कोणत्याही किमतीवर, आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यायचाचं, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे.

"या देशाच्या इतिहासात न्याय कधीच झालेला नाही," ते म्हणाले.

"पण माझ्या मुलासारखा न्यायाचाही मुडदा पडू नये, असं मला वाटतं. हा खटला न्यायालय आणि सरकारसाठीही टेस्ट केस आहे." असं ते म्हणाले.

"या प्रकरणात जर न्याय झाला, तर हा खटला नवी वाट घालून देईल. त्यामुळं देशाची प्रतिमा उजळेल," असं ते म्हणतात.

क्लेषदायक आकडेवारी

1991 ला ईश्वरनिंदेसाठी मृत्युदंडाची तरतूद करण्यात आल्यानंतर, आतापर्यंत जवळपास 2,500 लोक मारले गेले आहेत. टीकाकारांचं मत आहे, या कायद्याचा दुरुपयोग वैयक्तिक वादातून होत आहे.

इक्बाल खान याचे नवे पीडित आहेत. त्यांनी झुकण्यास नकार दिला आहे.

या कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा त्यांचा निर्धार असून, कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाकिस्तानचा इतिहासच सांगतो की त्यांचा लढा प्रदीर्घ तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमछाक करणारा असेल.

बहुधा हा लढा मृत्यूला आमंत्रण देणाराही असेल.

अशिया बिबी खटला

न्यायालयात सुरू असलेला अजुन एक खटला म्हणजे, 9 वर्षांपूर्वीचा ख्रिश्चन महिला असिया बिबीचं प्रकरण.

पाच मुलांची आई असलेली ही महिला, गावातील एका फळबागेत सहकाऱ्यांसोबत काम करत होती.

एके दिवशी सोबत काम करणाऱ्या एका मुस्लीम कामगारासोबत एकाच ग्लासमधून पाणी पिण्यावरून तिचा वाद झाल्याचा संशय आहे.

असिया बिबी हिच्या मुक्ततेसाठी पॅरीसमध्येही निदर्शने

फोटो स्रोत, MARTIN BUREAU/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या असिया बिबी हिच्या मुक्ततेसाठी पॅरीसमध्येही निदर्शने झाली होती.

काही दिवसांनी स्थानिक मशिदीमधील धर्मगुरूंनी या महिलेवर प्रेषित महंमद यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला.

त्यानंतर या महिलेवर ईश्वरनिंदेचा गुन्हा नोंद झाला.

पाकिस्तानातील कायद्यानुसार प्रेषित महंमद यांच्या निंदेसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे.

असिया बिबीला स्थानिक न्यायालयानं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. लाहोर उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम केली.

हा खटला सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून, तिथं 2 वर्षं तो प्रलंबित आहे.

पाकिस्तानातील न्यायव्यवस्था संथ गतीनं चालते. ती आता तुरुंगात असून, तिच्या कुटुंबाला लपून रहावं लागत आहे.

पतीचा निग्रह

जानेवारी 2015ला असियाचा नवरा अशिक मसिहला, मी भेटले होते. ते त्यांच्या शब्दांबद्दल फारच दक्ष होते.

आपल्या बोलण्यानं पत्नीच्या जीवावर काय परिणाम होईल, याची त्यांना काळजी होती.

पण आता भीतीची जागा हतबलतेनं घेतली आहे. एका अज्ञातस्थळी मी त्यांना भेटले.

आसिया बिबीचे पती अशिक मसिह

फोटो स्रोत, Arif Ali/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, ईश्वरनिंदेचा आरोप असलेल्या आसिया बिबीचे पती अशिक मसिह यांना न्यायाची प्रतीक्षा आहे.

"गेल्या नऊ वर्षांत काही तरी बदलायला हवं होतं. आता बराच काळ गेला आहे," ते सांगत होते.

"जेव्हा तुमचा आवाज कुणीच ऐकत नसतं, तेव्हा ते फारच वेदनादायी असतं." असं ते म्हणतात.

अशिक यांनी या घटनेनंतर ही आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यात यश मिळवलं आहे.

ते म्हणाले, "आम्हाला वाटतं हा विलंब जाणीवपूर्वक केला जात आहे."

"मला माहीत नाही, हा विलंब योग्य कायदेशीर कारणांमुळ आहे, की यामागे धर्मगुरूंच्या दबाव आहे," असं त्यांच मत आहे.

इक्बाल खान आणि अशिक मसिह दोन्ही एकच लढा देत आहेत, पण दोन्ही प्रकरणांत मोठा विरोधाभासही आहे.

माजी गव्हर्नरचाही खून

पंजाबचे माजी गव्हर्नर सलमान तसिर यांनी 2011 ला असियाला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांच्याच सुरक्षारक्षकाने त्यांची हत्या करून त्यांचा आवाज बंद केला.

सलमान तसिर यांच्या खुनाविरोधात निदर्शने

फोटो स्रोत, ARIF ALI/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, पंजाबचे माजी गव्हर्नर सलमान तसिर यांचा त्यांच्या सुरक्षारक्षकानंच खून केला.

7 वर्षांनंतर पाकिस्तानच्या 'सिव्हिल सोसायटी'नं मशाल खान याचं मारलं जाणं स्वीकारल नाही.

ईश्वरनिंदेचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी ते रस्त्यावर उतरले.

मर्दान युनिव्हर्सिटीतील या घटनेनं सत्तेतील लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला हदरा दिला.

संसद सदस्यांनी प्रथमच या कायद्यात सुधारणा होण्याबद्दल संसदेच्या पटलावर आवाज उठवला.

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेविरोधात तीव्र शब्दांत भूमिका व्यक्त केली होती.

अशा प्रकारच्या गर्दीच्या न्यायाच्या हा संवेदनाहीन प्रदर्शनानं मी व्यथित झालो आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

धर्मगुरूंच पाठबळ मिरवणारे विरोधी पक्षाचे नेते इम्रान खान मशाल खानच्या खुनाचा निषेध करण्यात आघाडीवर होते.

भीती सर्वत्रच

पण सहा महिन्यांनंतर हे सर्व शब्द हवेत विरले आहेत.

मानवी हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते हुसेन नकी यांना याच फारस आश्चर्य वाटत नाही.

"लोकांना त्यांच्या जीविताची भीती वाटते आणि हे खटले वर्षांनवर्षे रखडतात," असे ते म्हणाले.

"अगदी न्यायालयांनाही याची भीती वाटत असते." असं ते म्हणाले.

"प्रबळ अशा सुरक्षाव्यवस्थेतही कट्टरवादी आणि त्यांचे सहानुभूतीदार आहेत." असं ते सांगतात.

"ते उघडपणे आपलं मत व्यक्त करत असतात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही." असे ते म्हणाले.

पण ऐकतं कोण?

धार्मिक अल्पसंख्याक या विरोधात लढा देत आहेत, पण त्यांचा आवाज कुणीही ऐकत नाही.

या कायद्यानुसार अजुन कुणालाही मृत्युदंड दिला नसला, तरी डझनावारी लोक कारागृहात खितपत पडले आहेत.

पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात सुधारणेच्या मागणीसाठीची निदर्शने

फोटो स्रोत, FAROOQ NAEEM/AFP/GettyImages

फोटो कॅप्शन, ईश्वरनिंदेच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याक करत आहेत.

मशालच्या जीवनाचा निर्णय त्याच दिवशी झाला, तर असिया मरणाच्या वाटेवर उभी आहे.

मशाल खानच्या मृत्यूनंतर जे काही पडसाद उमटले त्यानंतरही पाकिस्तानच्या समजात युटर्न काही दिसत नाही.

मशालचे वडील इक्बाल खान यांना माहीत आहे, की त्यांचा मुलगा कधीही परत येणार नाही. या वृद्धाकडे साधनही तोकडी आहेत.

पण त्यांना त्यांच्या मुलाचा वारसा नष्ट होऊ द्यायचा नाही.

भविष्यातील अनेक मशालांच्या सुरक्षेसाठी, त्यांचा एकाकी लढा सुरूच राहणार आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)