टकील : इथे बायको मिळविण्यासाठी पुरूषांना विणून दाखवाव्या लागतात टोप्या

    • Author, एरिन ऱ्होन
    • Role, बीबीसी कल्चर

गेली सुमारे पाचशे वर्षं पेरूमधील या छोट्याशा बेटावरील पुरुष नक्षीदार अँडियन प्रकारच्या टोप्या विणून जोडीदार महिलेचं लक्ष आकर्षून घ्यायचा प्रयत्न करतात.

पेरूमधील टकील (Taquile) या छोट्याशा बेटावर पुरुषाची पत त्याच्या शिकारीच्या किंवा मासेमारीच्या क्षमतेवर मोजली जात नाही, तर त्याच्या विणकामाच्या क्षमतेवरून ठरवली जाते.

टिटिकासा सरोवरामध्ये पेरूच्या बाजूला टकील हे 1,300 लोकवस्तीचं बेट आहे. प्युनो शहरापासून तिथे बोटीतून जाण्यासाठी तीन तास लागतात.

या बेटावर अलेजान्द्रो फ्लोरेस हुएत्ता यांचा जन्म झाला. बालपणीच ते वैशिष्ट्यपूर्ण 'चुल्लो' टोप्या विणायला शिकले. निवडुंगाचे काटे सुया म्हणून वापरून या टोप्या कशा विणायच्या हे त्यांना त्यांच्या मोठ्या भावाने व आजोबांनी शिकवलं.

"बहुतांश लोक पाहून पाहून शिकतात. मला वडील नव्हते, त्यामुळे मोठ्या भावाने (आणि आजोबांनी) मला विणकाम शिकवलं. त्याचं काम पाहून मी हळूहळू शिकत गेलो," असं अलेजान्द्रो सांगतात. त्यांचं म्हणणं केचवू दुभाषा भाषांतरित करून सांगतो.

टकील तिथल्या कापडोद्योगासाठी व पेहरावांसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या महिला विणकाम करतात आणि लोकर पुरवणाऱ्या मेंढ्यांची निगा राखतात, तर इथल्या विख्यात विणलेल्या टोप्यांचं उत्पादन केवळ पुरुषच करतात. इथल्या संस्कृतीमध्ये चुल्लो टोप्यांना अर्थपूर्ण स्थान आहे, शिवाय या बेटावरील सामाजिक रचनेमध्येसुद्धा या टोप्यांची कळीची भूमिका असते.

या टोप्या विणून पुरुषांना त्यांची सर्जनशीलता दाखवता येतेच, शिवाय त्यांचं वैवाहिक स्थान, त्यांची स्वप्नं व आकांक्षा यासोबत काही पुरुष तर स्वतःची मनस्थिती दाखवण्यासाठीही या कृतीचा उपयोग करतात. ही परंपरा जतन करण्यासाठी या बेटावरील रहिवासी प्रयत्नशील आहेत.

पारंपरिक समाजव्यवस्था

1550 च्या दशकापर्यंत या बेटावरील रहिवासी पेरूच्या मुख्य भूमीपासून बहुतांशाने तुटलेले होते. या अलगपणामुळे इथला वारसा व जीवनरीत टिकून राहायला मदत झाली. 'चोरी करू नका, खोटं बोलू नका, आळशी होऊ नका' हा इन्का संस्कृतीमधला नियम इथले स्थानिक लोक पाळतात.

टकीलवासीय पारंपरिकरित्या शेतकरी आहेत. डोंगरउतारावर बटाटा, मका, द्विदल धान्य, सातू यांची सोपानशेती केली जाते. इथल्या सहा समुदायांमध्ये आळीपाळीने एकेका मोसमात एकेक पीक घेतलं जातं. शिवाय, इथले रहिवासी मेंढ्या, गिनी पिग, कोंबड्या व डुकरं पाळतात. त्याचप्रमाणे सरोवरात मत्स्यशेतीही केली जाते. १९७०च्या दशकात इथे पर्यटनाला सुरुवात झाली.

वर्षाकाठी हजारो पर्यटक इथे भेट द्यायला लागले, त्यामुळे गावकऱ्यांना उत्पन्नाचा एक स्त्रोत मिळाला. पर्यटक सर्वसाधारणतः इथल्या स्थानिक साध्या, कुटुंबांकडून चालवल्या जाणाऱ्या निवासव्यवस्थेचा उपयोग करतात, स्थानिक अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य देतात आणि इथल्या हातमागावर केलेल्या प्रसिद्ध कपड्यांची खरेदी करतात.

टकीलमधील विणलेली कापडं इतकी मूल्यवान ठरली की युनेस्कोने 2005 साली या कलेला 'मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा' असा दर्जा दिला. अलेजान्द्रो व या बेटाचे अध्यक्ष जुआन क्विस्प हुएट्टा यांच्यासह बेटावरील सात पुरुषांना 'मास्टर ऑफ टेक्सटाइल्स' म्हणून मान्यता मिळाली आहे.

ही परंपरा पाचशे वर्षं सुरू असून तिची मुळं इन्का, पुकारा व कोल्ला या प्राचीन सभ्यतांमध्ये रुजलेली आहेत. विशेषतः इन्का संस्कृतीमधील लोक टकीलमधील चुल्लोप्रमाणेच त्यांच्या टोप्यांचा वापर करून विशिष्ट प्रांतातील खुणा दाखवत असत. पण हे साधर्म्य इथेच थांबतं.

लहानपणापासूनच शिकवलं जातं विणकाम

टकीलमधील चुल्लो टोप्या आणि इन्का संस्कृतीमधील मुकुटासारख्या टोप्या यांच्यात बराच फरक होता. स्पॅनिश आक्रमकांनी 1535 साली या बेटावर विजय मिळवला तेव्हा चुल्लो टोपीचं डिझाइन वापरात आल्याचं या बेटावरील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

सुरुवातीला आलेले विजेते स्पॅनिश लोक अशाच प्रकारच्या पांढऱ्या टोप्या घालत असत आणि त्यांना बाजूने कान झाकणारी आवरणं असायची, यासंबंधीच्या कहाणाऱ्या अलेजान्द्रोच्या आजोबांनीही त्यांच्यापर्यंत पोचवल्या.

टकीलमध्ये पाच ते सहा वर्षांच्या मुलांना विणकाम शिकवलं जातं. एका पुरुषाकडून पुढच्या पिढीतील पुरुषाकडे हे कौशल्य हस्तांतरित केलं जातं. कोणताही लहान मुलगा पहिल्यांदा पांढऱ्या रंगाची चुल्लो विणतो. नंतर तो स्थानिक वनस्पती व खनिजं यांपासून बनवलेल्या रंगांनी रंगवलेल्या लोकरीचा वापर करतो.

घट्ट बांधणीची नेटकी टोपी विणता येईपर्यंत त्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा केली जाते. ही अत्यंत संथ प्रक्रिया असते- या टोपीतील सूक्ष्म आकृतिबंध व विशिष्ट शेतकी, मोसमी व कुलचिन्हं यांची चिन्हं यांमुळे अगदी अनुभवी विणकरांनाही महिन्याचा बराचसा काळ एक चुल्लो विणण्यामध्ये घालवावा लागतो.

जोडीदार शोधण्यासाठी टोपी महत्त्वाची

तरुण-तरुणींना एकमेकांच्या जवळ आणण्यामध्येही चुल्लो टोप्यांची कळीची भूमिका असते. बारीक सुयांनी चुल्लो विणण्याची एखाद्या पुरुषाची क्षमता कशी आहे, या आधारे स्त्रिया जोडीदाराची निवड करतात. काही पुरुष सायकलींच्या स्पोक्सचा सुया म्हणून वापर करतात.

अलेजान्द्रो यांच्या मते, घट्ट बांधणीची चुल्लो विणू शकणारा पुरुष चांगला जोडीदार होऊ शकतो. अशी टोपी उलटी केली आणि त्यात पाणी ठेवलं तरी बराच अंतरापर्यंत ते पाणी आत टिकून राहातं. अनेकदा सासरेमंडळी त्यांच्या संभाव्य जावयाने विणलेल्या चुल्लो टोप्यांची तपासणी करतात.

आपण विणलेल्या चुल्लोमध्ये 30 मीटरपर्यंत पाणी राहू शकतं, त्यातून एक थेंबही खाली पडत नाही, असं अलेजान्द्रो अभिमानाने सांगता. त्यांच्या पत्नी तेओडोसिआ मार्सा विली यांना 44 वर्षांपूर्वी आकर्षून घेण्यासाठी अलेजान्द्रो यांचं हे कौशल्य उपयुक्त ठरलं.

"तिला माझ्या चुल्लोमध्ये चांगलं कौशल्य दिसलं असावं. मी खरोखरच खूप चांगल्या टोप्या तयार करायचो," असं ते सांगतात.

"मुली सर्वोत्तम चुल्लोचा शोध घेतात. त्यामुळे कोणी चांगली टोपी घातली असेल, तर त्याला लवकर मैत्रीण मिळण्याची शक्यता असते," असं जुआन सांगतात.

"कोणी सासरा त्याच्या संभाव्य जावयाच्या चुल्लोमध्ये पाणी ओततो, तेव्हा तिथे जमलेल्या सर्वांना ते पाणी दाखवण्याची क्षमता जावयाकडे असावी लागते. उपस्थित सर्व कुटुंबियांना टोपीतील पाणी दिसणं आवश्यक असतं," असं ते सांगतात.

प्रत्येक चुल्लोवर विणकरांचा विशेष प्रभाव

प्रत्येक चुल्लोमध्ये संबंधित विणकर पुरुषाचा वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव दिसतो, पण त्यातील चिन्हांकन व रंग यांची मात्र बहुतेकदा पुनरावृत्ती होत असते. सहा पाकळ्यांचा गुलाब (बेटावरील सहा समुदायांचं प्रतीक म्हणून); बगळा व कोंडोर यांरखे पक्षी; मेंढ्यासारखे प्राणी अशा चिन्हांचा यात वापर केला जातो. शेतीविषयीच्या चिन्हांचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो.

लाल लोकर प्राचीन रक्तरंजित घटनांचं प्रतिनिधित्व करते, तर निळी लोकर मामा सोचाला मानवंदना देण्यासाठी वापरली जाते- या समुदायाला जगवणाऱ्या सभोवतालच्या सरोवराला मामा सोचा असं संबोधलं जातं.

वरमंडळी स्वतःच टोप्या विणत असले, तरी त्यांना लग्नावेळच्या रंगीबेरंगी लाल चुल्लो टोप्या मात्र भेट दिल्या जातात.

"खूप चांगली चुल्लो विणणाऱ्या पुरुषालाच पुरुष म्हणता येतं," असं अलेजान्द्रो सांगतात.

पुरुषाच्या आयुष्यातील बदलत्या स्थानानुसार चुल्लो टोप्यांमध्येही बदल होत जातो. एखाद्या पुरुषाचं लग्न झालं किंवा त्याचा घटस्फोट झाला किंवा बेटावरील उतरंडीमधील त्याचं स्थान बदललं, की नवीन चुल्लो टोप्या केल्या जातात.

"नंतर ही व्यक्ती महत्त्वाची झाली, नेता किंवा अधिकारीपदावर गेली, आणि त्याला ज्येष्ठ गणलं जायला लागलं की त्याची चुल्लो बदलावी लागते," असं जुआन म्हणाले.

पुरुष विणण्याचं काम करतात, तर लग्नाच्या दिवशी वरमुलाला दिला जाणारा चुम्पी हा रंगीबेरंगी पट्टा स्त्रिया विणतात. ही प्रक्रिया अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची असते, त्यात संबंधित स्त्रिचे केसही पट्ट्यामध्ये आतल्या बाजूला विणले जातात. एखादा तरुण पुरुष अविवाहित असेल, तर त्याच्या चुम्पीमधील केस त्याच्या आईचे असतात. त्या पुरुषाचं लग्न झालं की त्याच्या पत्नीचे केस त्यासाठी वापरले जातात.

या पट्ट्यांवरील चित्रं अनेकदा चुल्लोंसारखी असतात आणि त्या-त्या कुटुंबानुसार व बेटावरील प्रदेशानुसार त्यात वैशिष्ट्यांची भर पडते. टकीलमधील भिन्न समुदाय बहुतेकदा फुलाच्या रूपात त्यावर येतात, तर कुटुंबातील मृत्यूचं पूर्वानुमान बांधणारा दोन मस्तकांचा साप आणि पेरणीची वेळ दर्शवणारी पिवळी करिवा, यांचाही त्यात समावेश असतो.

चुम्पींना अनेकदा 'दिनदर्शिका पट्टे' म्हटलं जातं. त्यात वर्षाच्या 12 महिन्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 12 पट्ट्या असतात.

"आमची चिन्हं कायमच सारखी राहिलेली आहेत. जगात ती अनन्य ठरतील अशी आहेत. आमच्या पूर्वजांकडून ती आमच्यापर्यंत आली," असं जुआन सांगतात. "आम्ही एखाद्या मित्राला भेटतो त्याच्याकडच्या पट्ट्याकडे लक्ष देतो. निव्वळ त्याचा पट्टा पट्टा पाहून मला त्याचे काय मनसुबे असतील ते कळतं. त्यातील चिन्हं आणि रंग पाहून आम्हाला अर्थ लागतो."

"एखादी मुलगी खरोखरच खूप चांगली विणकाम करणारी असेल, तर चुम्पीमध्ये खूप जास्त चिन्हं व आकृतिबंध पाहायला मिळतात," असं अलेजान्द्रो सांगतात. "एका पट्टीमधून त्या पूर्ण कहाणी सांगू शकतात."

टकीलवासीय महिला हे कौशल्य त्यांच्या मुलींकडे, नातींकडे हस्तांतरित करतात, असं तिओडोसिआ सांगतात. पेरणीवेळी किंवा इतर शेतीकामामध्ये किंवा मेंढ्या राखताना आधारासाठीही हे पट्टे उपयोगी पडतात.

टकीलमधील संस्कृती चांगलीच प्रगतिशील आहे. अलेजान्द्रो व त्यांची पत्नी या दोघांनाही बेटावर अधिकारी व्यक्ती मानलं जातं, आणि निर्णयप्रक्रियेमध्ये जबाबदार घटक म्हणून त्यांचा सहभाग असतो.

"आम्ही अधिकारी आहोत, आम्ही कायम एकत्र काम करतो, आम्ही निर्णयही एकत्र घेतो," असं तिओडोसिआ सांगतात. "एकटा पुरुष नेता होऊ शकत नाही. त्याला पत्नीची गरज असतेच. प्राचीन काळातही असंच होतं."

हे बेट दीर्घ काळ बाकीच्या सभ्यतेपासून तुटलेलं असलं, तरी कोव्हिड-19 पासून त्याची सुटका झालेली नाही. बारा महिने हे बेट अभ्यागतांसाठी पूर्णतः बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत ठप्प झाला आणि त्यांना केवळ शेतीवर अवलंबून राहावं लागलं.

या जागतिक साथीचे परिणाम चुल्लो टोप्यांवर दिसू लागले आहेत. बेटावरील तरुण पिढीपैकी एका मुलाने केलेल्या टोपीवर अलीकडेच कोरोना विषाणूची प्रतिकृती काढलेली होती, असं जुआन सांगतात.

अलीकडे दिसून आलेल्या बदलांमुळे आपली संस्कृती व परंपरा जतन करणं जास्तच महत्त्वाचं असल्याचं अलेजान्द्रो, जुआन व इतर विणकर पुरुषांना जाणवलं आहे. विशेषतः त्यांची क्वेचुआ बोली लिहिली जात नाही, त्यामुळे हे जतनकार्य अधिक महत्त्वाचं ठरतं.

"आमच्याकडे पूर्वजांचं बरंच ज्ञान आहे आणि हे तरुण पिढीने स्वतःच्या मनात, जाणीवेत कायम लक्षात ठेवायला हवं. हे ज्ञान व शहाणीव विस्मृतीत जाता कामा नये," असं जुआन म्हणतात. "आधुनिक काळ येत असेल तर आपण त्याचा स्वीकार करण्याची गरज आहे, पण त्यासाठी आपली पार्श्वभूमी विसरण्याची गरज नाही."

शेवटी अलेजान्द्रो म्हणतात, 'विणकाम न करणारा पुरुष हा पुरुष नव्हेच, असं माझे आजोबा म्हणायचे.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)