शरिया कायदा असलेल्या देशांतील महिलांचे अनुभव नेमके कसे आहेत?

अफगाणिस्तानवरील सत्तेचा तालिबानचा पहिला कार्यकाळ हा अत्यंत क्रौर्य आणि महिलांवरील दडपशाहीमुळं वाईट स्वप्नासारखा ठरला होता. या काळात महिलांना शिक्षण, काम आणि सार्वजनिक जीवनात जवळपास प्रत्येक गोष्टीपासून वंचित ठेवण्यात आलं होतं.

यावेळी मात्र महिलांना शरियाच्या किंवा मुस्लीम कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांचे हक्क बहाल केले जाणार असल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. पण ती चौकट नेमकी कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

साधारपणे विचार करता शरिया म्हणजे ईश्वराच्या इच्छेनुसार जगण्याची एक पद्धत आहे. त्यात प्रार्थना, उपवास आणि गरिबांना दान-धर्म याचा समावेश आहे.

शरिया ही इस्लामची कायदे व्यवस्थाही आहे. इस्लामिक न्यायालयांकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या तीव्रतेबाबत जगभरातील मानवाधिकार संघटनांकडून टीका केली जाते. पण जगात विविध ठिकाणी शरिया लागू करण्याच्या पद्धतीमध्येही तफावत आहे.

या अंतर्गत राजकीय स्वातंत्र्यावर काही निर्बंध असू शकतात. पण खासगी जीवनाचा विचार करता, तालिबाननं 1990 च्या सत्तेच्या कार्यकाळात ज्या अटी आणि निर्बंध लादले होते, त्या अटी शरिया लागू असलेल्या देशांमधील स्त्रिया सहन करू शकणार नाहीत.

बीबीसीनं शरिया कायद्यांतर्गत जगत असलेल्या सौदी अरेबिया, नायजेरिया, इराण, इंडोनेशिया आणि ब्रुनेई या पाच देशांतील महिलांशी चर्चा करून त्यांचे अनुभव जाणून घेतले.

'या देशात आता अधिक स्वातंत्र्य आहे'

मी मूळची टांझानियन वंशाची असून मी जीवनातील बहुतांश काळ सौदी अरेबियात घालवला आहे, असं हन्नान अबूबकर यांनी सांगितलं.

मी एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकले. त्याठिकाणी भारतीय अभ्यासक्रम शिकवला जात होता. शाळेच्या बसमध्ये मुले-मुली वेगवेगळी बसत होती. कँटीनमध्येही मुले आणि मुलींसाठी वेगवेगळ्या जागा ठरलेल्या होत्या. बहुतांश वेळा आम्ही वेगवेगळ्या वर्गांमध्ये असायचो. मात्र, आम्हाला काही विषय शिकवण्यासाठी पुरुष शिक्षक होते.

मुलींना खेळात सहभागी होण्याची परवानगी होती. पण मुलांबरोबर नाही. आम्ही क्रीडादिनही वेगवेगळ्या दिवशी साजरा करायचो. मात्र शिक्षकांनी मुलींबरोबर कधीही भेदभाव केला नाही.

सौदी अरेबिया हा आता अधिक स्वातंत्र्य असलेला देश आहे.

इथं महिला एकट्या प्रवास करू शकतात, कार चालवू शकतात. मीही लवकरच परवाना मिळवण्याच्या विचारात आहे.

काही वर्षापूर्वी आमच्यासाठी सिनेमागृहं नव्हती, पण आता आहेत आणि ते माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

मी माझा चेहरा झाकत नाही, त्याचबरोबर हेडस्कार्फ (डोक्यावरील रुमार किंवा हिजाब) परिधान करणंही अनिवार्य नाही.

यापूर्वी रेस्तरॉंमध्ये फॅमिली आणि सिंगल असे स्वतंत्र विभाग असायचे. आता अशा प्रकारचं वर्गीकरण नाही.

सार्वजनिक ठिकाणी पुरुष आणि महिला एकत्रित वावरू शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, आता मी माझ्या पुरुष सहकाऱ्याबरोबर जेवणासाठी बाहेर जाऊ शकते.

पण हा एक मुस्लीम देश आहे. त्यामुळं याठिकाणी नाईट क्लब, बार नाहीत. मद्याची परवानगी नाही.

मी जेद्दाहमध्ये खासगी कंपनीत काम करते. आमच्या कंपनीत काम करणाऱ्यांना पुरुष आहे की स्त्री यानुसार नव्हे तर कामानुसार पगार दिला जातो.

मी 30 वर्षांची आहे आणि मला माझा स्वप्नातला राजकुमार भेटेल तेव्हा मी लग्न करेल. माझे आई-वडील अत्यंत समंजस आहेत, त्यांनी माझ्यावर कधीही लग्नासाठी दबाव आणला नाही.

काही जण म्हणत आहेत की, सुधारणा फार हळूहळू होत आहेत. पण माझी आई माझ्या जन्माच्या पूर्वीपासून सौदीमध्ये आहे. तिच्यामते, आता फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत.

'मद्य अवैध असलं तरी लोक पार्ट्यांमध्ये मद्यपान करतात'

इराणमध्ये महिलांवर कशाप्रकारचे निर्बंध असतील हे त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं, असं महसा यांनी सांगितलं. (महसा यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून पूर्ण नाव किंवा चेहरा दाखवू नये असं सांगितलं आहे.)

इराणची समाजव्यवस्था तीन प्रकारच्या गटांत विभागलेली आहे. यात पहिल्या गटात काही अत्यंत धार्मिक, कठोर, संकुचित विचाररणी असलेले किंवा पूर्वग्रहदूषित लोक यांचा समावेश आहे.

अगदी बॉयफ्रेंडबरोबरच्या नात्याच्या साध्या कारणावरुनही ते मुलीची किंवा बहिणीची हत्या करू शकतात.

दुसऱ्या गटात माझ्या कुटुंबासारखे लोक असतात, ते म्हणजे शहरी मध्यमवर्गीय. यांचा मुख्य उद्देश शिक्षण घेणं आणि रोजगार मिळवणं हा असतो.

तिसरा गट उच्चभ्रू लोकांचा एक छोटासा गट असतो. त्यांना कायद्याची बंधनं नसतात.

माझा जन्म तेहरानचा. मी लहानाची मोठीही तिथंच झाले. शाळेत आणि विद्यापीठात मी मुलांबरोबर शिक्षण घेतलं.

इराणमधील बहुतांश पालकांना त्यांच्या मुलांनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यावं असं वाटतं. पण मला दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यात यश आलं नाही त्यामुळं मी इंग्रजी शिकत आहे. मी बालवाडीच्या मुलांना शिकवण्याचं कामही करते.

इराणमधील महिला वेगवेगळ्या शहरांत प्रवास करू शकतात. एकट्या महिलेला घर भाड्यानं मिळतं आणि त्या एकट्या राहूही शकतात. त्या एकट्या हॉटेलातही राहू शकतात.

माझी स्वतःची कार आहे आणि मी शहरात फिरू शकते. त्यासाठी मला पुरुष सोबत असण्याची गरज नाही, पण हिजाब अनिवार्य आहे.

धार्मिक पोलिसांनी तरुण जोडप्याला गैरवर्तन करताना पकडलं किंवा महिलेनं आखूड कपडे परिधान केलेले असतील तर त्यांच्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. पण अधिकारी शक्यतो लाच घेऊन अशांना सोडून देतात.

काही वेळा अशा लोकांना पोलिस ठाण्यात नेलं जातं आणि त्यांच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावलं जातं.

विवाह करण्यापूर्वी चार वर्ष मी बॉयफ्रेंडबरोबर डेट केलं. मी त्याच्याबरोबर सिनेमा पाहायला, बागेमध्ये आणि इतर सगळीकडं जात होते. पण मी नशिबवान होते. कारण कोणीही आम्हाला विवाहित आहोत की नाही, हे तपासण्यासाठी अडवलं नाही.

माझे पालक खूप कडक होते. मी रात्री नऊ वाजेच्या आत घरी यायला हवं असा त्यांचा नियम होता. ते मला मित्रांबरोबर सहलीला जाऊ देत नव्हते. मला विवाहानंतर अधिक स्वातंत्र्य मिळालं.

इथं दारुबंदी आहे. आमच्या इथे बार नाही. पण लोकं गुपचूप मद्यपान करतात. पार्ट्यांमध्ये बहुतांश लोक दारु पितात. मला दारुची कडू चव आवडत नाही, म्हणून मी मद्यपान करत नाही.

मला मुलं नको आहेत. आमचा पगार अत्यंत कमी आहेत. त्यामुळं मुलांना सांभाळणारी आया आम्हाला परवडणार नाही. घराची काळजी घेणं, मुलांकडे लक्ष देणं तसंच नवऱ्याचं सर्वकाही पाहणं हे काम माझ्यासाठी खूप जास्त होईल.

माझा देवावर विश्वास आहे पण मी अगदीच धार्मिक व्यक्ती नाही. मी रोज प्रार्थना करत नाही.

'शरिया इतर कायद्यांपेक्षा उत्तम'

मी शरियाची वकील आहे. कानो, अबुजा आणि लागोजमध्ये मी 18 वर्षांपासून वकिली करत आहे, असं नायजेरियाच्या हुवैला इब्राहीम मोहम्मद यांनी म्हटलं.

शरियाच्या कायदा-व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. नायजेरियाच्या 12 राज्यांमध्ये कौटुंबिक आणि गुन्हेगारी प्रकरणांसाठी शरिया कायदा वापरला जातो. मी शरियाच्या न्यायालयांत आणि इतर सामान्य कायदे असलेल्या कोर्टात अशा दोन्हीठिकाणी वकिली करते. शरियाच्या न्यायालयांत न्यायाधीश हे पुरुषच असतात पण महिला याठिकाणी न घाबरता युक्तीवाद करू शकतात.

यात गुन्हेगाराला क्षमा करण्यास भरपूर वाव आहे. न्यायाधीशानं जास्तीत जास्त शिक्षा देण्यापूर्वी ती कमी करण्यासाठीच्या घटकांचा विचार करण्याची गरज आहे.

काही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला थेट खुल्या न्यायालयात शिक्षा सुनावून तिथंच त्याची अंमलबजावणी केली जाते. पण मी अद्याप कोणत्याही महिलेबरोबर तसं झालेलं पाहिलेलं नाही.

दोषींना दगडाने ठेचून ठार करण्याच्या निर्णयानं आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण त्याची अंमलबजावणी कधीही झाली नाही. इस्लाममध्ये व्यभिचारासाठी ही शिक्षा आहे.

वारसाहक्काचा विचार करता पुरुषांना महिलांपेक्षा दुप्पट अधिकार मिळतो. तसे पाहता हे अन्यायकारक वाटू शकते, पण त्यामागे कारण आहे.

महिलांवर कोणतीही आर्थिक जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. त्यांचं संरक्षण करणं हे वडील, भाऊ आणि पती यांचं कर्तव्य आहे.

पती पत्नीला मारू शकतो, असं सांगणारी एक ओळ आहे हे खरं आहे. पण त्याचा योग्य अर्थ म्हणजे पती पत्नीला मारण्याचं नाटक करू शकतो किंवा अगदी हळूवार मारू शकतो. पत्नीला इजा पोहोचवणं किंवा जखमी करणं याची परवनगी दिलेली नाही.

काही महिलांनी अपमान किंवा शिवीगाळ करणाऱ्या पतींना न्यायालयात खेचलं आहे. मी स्वतः ते खटले लढले असून जिंकले आहे. इथे पुरुष किंवा स्त्री असा लिंगाचा विचार न करता न्याय मिळतो, असं मी म्हणेन.

नायजेरियामध्ये चेहरा झाकण्याची गरज नाही. याठिकाणच्या महिलांना पूर्ण शरिरावर कपडे परिधान करण्याची सवय आहे. एखाद्यानं शॉर्ट स्कर्ट परिधान केल्यास ते विचित्र वाटू शकतं. पण हिजाब किंवा पूर्ण कपडे परिधान न केल्यामुळं महिलांना शिक्षा देणं योग्य नाही. कपडे निवडण्याचा अधिकार महिलांना असायला हवा.

शरियाचा जर अपेक्षेप्रमाणं वापर करण्यात आला तर तो इतर कोणत्याही कायद्यापेक्षा उत्तम कायदा आहे.

'काय बरोबर आणि काय चूक ते मला माहिती आहे'

माझा जन्म आणि मी लहानाची मोठीही ब्रुनेईमध्ये झाले. 2007 मध्ये मला सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि मी ब्रिटनला गेले. त्यावेळी मी 17 वर्षांची होते, असं इझ्झाती मोहम्मद नूर यांनी सांगितलं.

मी लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केलं. पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी देखील पूर्ण केली. त्यानंतर मी एका बँकेसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केलं.

काही आठवड्यांपूर्वीच मी माझ्या देशात परतले आहे. याठिकाणचे बहुतांश लोक हे इस्लामचं पालन करतात. याठिकाणी विवाह, घटस्फोट आणि वारसा हक्काच्या प्रकरणांसाठी दीर्घकाळापासून शरिया कायद्याचं पालन केलं जाते.

2014 मध्ये गुन्हेगारी प्रकरणासाठीही त्याचा वापर सुरू झाला. पण अद्याप कोणतीही कठोर किंवा टीका करण्यासारखी शिक्षा देण्यात आलेली नाही.

महिला त्यांना हवे ते कपडे परिधान करू शकतात. जर तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्हाला एखादी महिला हिजाब परिधान केलेली दिसेल तर दुसरी महिला स्पोर्ट्स ब्रा परिधान केलेली दिसेल. लोकांना शिक्षा देण्यासाठी याठिकाणी धार्मिक पोलीस नाहीत.

शाळेत शिकत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्हाला इस्लाम, इस्लामिक अर्थशास्त्र आणि शरिया कायदा या संदर्भातील पाच स्तंभांबाबत शिकवण्यात आलं होतं.

सकाळच्या वेळी मी विज्ञान आणि गणितासारखे विषय शिकायचे. तर दुपारच्या वेळी मी धार्मिक शाळेत जायचे. त्याठिकाणी पुरुष आणि महिला शिक्षक होते.

वारसा हक्काचा विचार करता शरियानुसार बहिणींना मिळणाऱ्या हिश्शापेक्षा भावांना मिळणारा हिस्सा अधिक असतो. पण आमच्या देशात माझ्या आजी आजोबांसारखे बहुतांश लोक हे मृत्यूपत्र तयार करून ठेवतात. इस्लामिक कायद्याचा त्यावर परिणाम होत नाही.

धर्मानं ठरवून दिल्याप्रमाणं मी दिवसातून पाच वेळा प्रार्थना करत नाही. पण मला शक्य तेवढं मी करते.

मी लहान असताना माझे आई-वडील प्रार्थनेबाबत कडक असायचे. एक काळ असाही आला जेव्हा मी प्रार्थना करणं सोडलं. त्यानंतर मला माझा मार्ग सापडला.

मी विमान उडवायला शिकले आणि मला पायलटचा परवाना मिळाला. प्रशिक्षणादरम्यान मी बॉयफ्रेंडला भेटले. तो जर्मनीचा होता.

मी एक धार्मिक व्यक्ती असून मला माझ्या कुटुंबाची सुरुवात मुस्लीम वातावरणात करायची असल्याचं, मी त्याला आमचं नातं सुरू झालं तेव्हाच स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानं माझ्या इच्छेचा मान ठेवला आणि इस्लामचा स्वीकार केला. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.

काही मुस्लीम विद्वानांच्या मते, पुरुष आणि स्त्री हे विवाह केल्याशिवाय एकत्रित राहू शकत नाहीत. पण ज्या लोकांना विवाहानंतर संपूर्ण आयुष्य एकत्रित घालवायचं असेल, त्यांनी त्यापूर्वी एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायलाच हवं, असं माझं ठाम मत आहे.

धर्मानुसार बरोबर काय आणि चूक काय हे मला माहिती आहे. तसंच माझ्यासाठी बरोबर काय आणि चूक काय हेही मला माहिती आहे. या दोन स्वतंत्र आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

मी हिजाब परिधान करत नाही. त्यामुळं मी परिपूर्ण मुस्लीम नाही, असंही काही म्हणतील. पण माझ्यासाठी ती माझ्या आणि ईश्वरामधील गोष्ट आहे. जर ईश्वरालाही मी चुकीची वागत आहे असं वाटलं, तर मी ईश्वराची माफी मागेल.

माझ्या मते ब्रुनेईमध्ये अगदी जुन्या रुढी परंपरा मानणाऱ्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. येथील बहुतांश लोक हे सहिष्णू आहेत.

शिक्षण घेणं आणि नवी कौशल्य आत्मसात करणं हे इस्लामचं प्रमुख मूल्य आहे. महिला शिक्षण घेऊ शकत नाही, ही कल्पना कुठून आली, हेच मला माहिती नाही. माझ्यासाठी ते इस्लामविरोधी आहे.

मी दररोज अधिक चांगली मुस्लीम बनण्याचा प्रयत्न करते.

'आपल्या विश्वासाचा भाग'

मी अर्थशास्त्राची 19 वर्षीय विद्यार्थिनी आहे. पुरुष अधिकाऱ्यांची सचिव म्हणून मी पार्ट टाईम कामही करते. तसंच मी लहान मुलांना शिकवून माझा वेळ घालवते, असं इंडोनेशियाची नसिरतुदिना म्हणाली.

मी इंडोनेशियाच्या आकेह बेसारमध्ये जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली आहे. इंडोनेशियात जगतील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. पण केवळ आकेह प्रांतामध्येच शरिया कायदा लागू करण्यात आलेला आहे.

मी दिवसातून पाच वेळा प्रार्थना करते. शरिया हा माझ्यासाठी विश्वासाचा भाग आहे. कठोर शिक्षा देण्याच्या निर्णयाशी मी सहमत आहे : गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्या ठरवण्यात आल्या आहेत.

मी लांब कपडे आणि हिजाबही परिधान करते, पण चेहरा झाकत नाही. याठिकाणी महिला मिनिस्कर्ट किंवा शॉर्ट्स परिधान करत नाही.

मला हवं तेवढं स्वातंत्र्य मी घेऊ शकते. विद्यापीठात मुले आणि मुली एकाच वर्गात एकत्र शिक्षण घेतात, पण वेगवेगळे बसतात. मुलांशी चर्चा करण्यावर याठिकाणी बंदी नाही. मी त्यांच्याशी बोलते पण फार जास्त नाही.

माझे काही मित्र प्रेमात पडलेले आहेत. प्रेमात असणं ही अत्यंत सुंदर अशी भावना आहे. अविवाहित मुले आणि मुली एकत्र बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकत नाही.

बहुतांश महिलांना लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते कारण आमच्या धर्मात ते निषिद्ध आहे.

मुले आणि मुली ग्रुपमध्ये एकत्र बाहेर फिरायला जाऊ शकतात. आम्ही शॉपिंग मॉल, रेस्तरॉं आणि धार्मिक ठिकाणी मजा करतो. आमच्या इथे सिनेमागृह नाही, हे मात्र वाईट आहे.

मी टीव्हीवर चित्रपट पाहते आणि सोशल मीडियावरही मी सक्रिय आहे. मला गायला आवडतं आणि गायन स्पर्धेत सहभाग घेऊन मी जिंकलेही आहे.

इस्लाममध्ये पुरुष चार महिलांशी विवाह करू शकतो. पण मी कोणाचीही दुसरी, तिसरी किंवा चौथी पत्नी बनणार नाही. मी तशी बनू शकणार नाही. प्रत्येक पत्नीसाठी तिचा वेगळा पती असायला हवा.

मला बिझनेस लीडर व्हायचं आहे आणि लहान मुलांसाठी शाळा सुरू करायची आहे.

अफगाणिस्तानच्या महिलांसाठी मला फार वाईट वाटतं. मात्र पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान, सीरिया आणि इराण याठिकाणच्या महिला आणि लहान मुलं तसंच इस्लामधील सर्व नागरिकांनी बॉम्ब स्फोटाच्या आवाजानं नव्हे तर पक्ष्यांच्या किलकिलाटानं झोपेतून उठलेलं पाहण्यासाठी मी जीवंत असेल, अशी मला आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)