अफगाणिस्तान : ' जेव्हा तालिबानी त्यांच्या पत्नींसाठी मेक-अपचं सामान विकत घ्यायचे'

    • Author, इक़बाल खटक
    • Role, बीबीसी

तालिबानने 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला. या पूर्वी 1990च्या दशकात तालिबानने अफगाणिस्तानवर राज्य केलेलं आहे.

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'बीबीसी उर्दू'ने 1990च्या दशकात तालिबानी राजवटीमधील (1996-2001) परिस्थिती कशी होती, याचा आढावा घेणाली लेखमाला सुरू केली आहे. या लेखमालेतील हा तिसरा लेख.

मला 1988 नंतर अनेक वेळा अफगाणिस्तानात जायची संधी मिळाली. कधी वैयक्तिक कारणामुळे, कधी पत्रकार म्हणून, कधी जिरगा (अफगाणिस्तानातील कबिल्याच्या सरदारांचा समूह) सदस्य म्हणून, तर कधी शिक्षक म्हणून मी तिथे जात राहिलो.

अवामी नॅशनल पक्षाचे नेते व खुदाई खिदमतगार आंदोलनाचे संस्थापक खान अब्दुल गफार खान यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजर राहण्यासाठी मी पहिल्यांदा 1988 साली जलालाबादला गेलो. पण माझा तेव्हाचा प्रवास खूपच वाईट झाला. त्या वेळी एका बॉम्बस्फोटात अनेक लोक मरण पावले.

मार्च 2001मध्ये अफगाणिस्तानला जाताना मात्र मी कधी नव्हे इतका विचार करून पावलं उचलत होतो. त्या वेळी मला पाश्चात्त्य पत्रकारांच्या एका चमूचा भाग म्हणून काबूलला येण्याचं निमंत्रण मिळालं होतं.

मी 1989 सालापासून पत्रकारितेच्या व्यवसायात आहे, पण तालिबानी सत्तेत आल्यापासून (1996) माझा त्यांच्याशी काहीच थेट संपर्क आला नाही.

काबूलला येण्याचं निमंत्रण स्वीकारण्यासाठी मला दोन आठवडे लागले.

'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स' या संस्थेसाठी मी 1999 सालापासून पाकिस्तानी पत्रकारांचे अधिकार व त्यांचं स्वातंत्र्य यांवर देखरेख ठेवण्याचं काम करतो आहे. तर, सप्टेंबर 2000मध्ये 'तालिबान और मीडिया' या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या माझ्या एका लेखामुळे मला तालिबान्यांकडून त्रास होऊ शकतो, याचा अंदाज 'रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स'ला होता म्हणूनच मला काबूलचं निमंत्रण स्वीकारायला वेळ लागला.

सप्टेंबर 2000 मध्ये मी लिहिलेला उपरोक्त वार्तालेख तशा प्रकारचा पहिलाच लेख होता. तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानात माध्यम-स्वातंत्र्याची स्थिती काय आहे, याचं चित्र जगासमोर मांडण्याचं काम त्या लेखात केलं होतं. तर, मी काबूलला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वाधिक अडचण व्हिसा मिळवताना आली.

मी तालिबान्यांना ओळखत नव्हतो, त्यांच्यापैकी कोणालाही माझी ओळख नव्हती. इस्लामाबादमधील एक पत्रकार तालिबानच्या जवळचे मानले जात होते, त्यांच्या सहकार्याने व्हिसा मिळवणं सोपं जाईल, असं एका मित्राने सांगितलं.

त्या वेळी जगातील बहुतांश पत्रकार आणि सर्वसामान्य लोक इस्लामाबादस्थित दूतावासातूनच अफगाणिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवत असत. कारण, केवळ तीनच देशांनी तालिबानी सरकारला मान्यता दिली होती. पाकिस्तान, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात हे ते तीन देश होते.

तालिबानच्या पहिल्या राजवटीदरम्यान पाकिस्तान व अफगाणिस्तान एकमेकांच् नागरिकांना मोफत व्हिसा देत होते. त्यामुळे मला व्हिसा काढण्यासाठी काहीच पैसे द्यावे लागले नाहीत, तर पाश्चात्त्य माध्यमचमूतील सदस्यांना व्हिसा मिळवायला पैसे भरावे लागले.

'तालिबानला सर्व माहीत आहे'

आम्ही लोक 5 एप्रिल 2001 रोजी तोरखममार्गे काबूलला रवाना झालो. तोरखम सीमेवर एका छोट्या खोलीत बसलेल्या तरुण इमिग्रेशन अधिकाऱ्याने मला काबूलला का जायचं आहे याबद्दल विचारणा केली. मी उत्तर दिल्यावर त्याने माझ्या आणि पाश्चात्त्य माध्यमचमूतल्या इतर सदस्यांच्या पासपोर्टवर 'प्रवेशा'चा शिक्का मारला.

तोरखमवरून काबूलला जाईपर्यंतचा प्रवास थकवणारा होता. आमच्यातले बहुतेक जण प्रवासादरम्यान काहीच बोलत नव्हतो. कदाचित आम्ही सगळेच आतून घाबरलेले असल्यामुळे असं झालं असेल. काबूलमधील कॉन्टिनेन्टल हॉटेलात रात्रभर झोप काढल्यानंतर प्रवासातला थकवा निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला अफगाणिस्तानातील परराष्ट्र मंत्रालात नोंदणी करायची होती. सर्व परदेशी पत्रकारांना ही नोंदणी करणं अनिवार्य होतं.

आम्हाला एका मोठ्या खोलीत बसवण्यात आलं. थोड्या वेळाने पगडी घातलेला एक तरुण आला आणि चहाच्या टेबलावर 'ल माँद' हे फ्रेंच वृत्तपत्र ठेवून गेला.

मला फ्रेंच अजिबात येत नसली, तरी 'ल माँद'मधल्या मुख्य बातमीतला एक शब्द मात्र मला कळला- 'तालिबान' असा तो शब्द होता. बातमी कशाबद्दल आहे, असं मी माझ्या सोबत असणाऱ्या फ्रेंच पत्रकाराला विचारलं.

तो म्हणाला, "त्याबद्दल काही विचारू नका. ही तालिबानविरोधातली इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी आहे."

आधीचा तरुण चहा घेऊन पुन्हा खोलीत आला. आमच्यासाठी फ्रेंच वृत्तपत्र का आणलं, असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला, "हे तुमच्यासाठी नव्हतं. कोण कुठे काय लिहितं, हे तालिबानला माहीत आहे. आम्हाला सगळं माहीत आहे."

पुश्तू भाषेत हे सगळं बोलताना त्या तरुणाने आम्हाला चहाबाबत विचारणा केली आणि लवकरच आमची नोंदणीप्रक्रिया पूर्ण होईल असंही सांगितलं.

तालिबानी माध्यमांमवर इतकं बारीक लक्ष ठेवून होते, हे कळल्यावर आम्ही अचंबित झालो. तालिबानचे दूतावास केवळ तीनच देशांमध्ये सक्रिय होते, त्या काळातली ही गोष्ट आहे.

माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी तालिबानला कोण-कोण कशी मदत करत असतील, असा प्रश्न माझ्या मनात उमटला. पाश्चात्त्य पत्रकारांच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि माझ्याकडे वळलेल्या त्यांच्या नजरा यावरून बहुधा याबाबतीत माझ्या देशाकडे (पाकिस्तान) शंकेच्या दृष्टीने पाहिलं जात असावं हे मला जाणवलं.

नोंदणी झाल्यावर एक इंग्रजी दुभाषा आमच्या सोबत आला. पण त्याचं खरं काम बहुधा आमच्यावर लक्ष ठेवणं हेच असावं. अशा रितीने अनेक देश आणि सरकारं पत्रकारांवर लक्ष ठेवतात.

तालिबान आणि 'मेक-अप'

काही बातम्या करण्याविषयी आम्ही आधीच नियोजन केलं होतं. तालिबान स्त्रियांशी कथितरित्या कठोरपणे वागत असल्याबद्दल बातमी करायची, हा या नियोजनाचा एक भाग होता.

अशा वेळी काबुलमधील 'शहर-ए-नौ' बाजारात एक सौंदर्यप्रसाधनांचं दुकान उघडं असल्याचं पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्या दुकानात मेक-अपचं सामान होतं.

आम्ही आश्चर्यचकित झाल्याचं पाहून दुकानदार मंद हसला आणि म्हणाला, "होय, इथून खरेदी होते."

त्याच्या उत्तराने आमचं कुतूहल वाढलं आणि आम्ही 'खरेदी कशी होते' हे विचारलं"?

दुकानदार तत्काळ उद्गरला, "तालिबानी लोक स्वतः येतात आणि त्यांच्या पत्नींसाठी मेक-अपचं वेगवेगळं सामान विकत घेतात. तालिबान्यांना त्यांच्या पत्नी सुंदर दिसलेलं आवडतं. पण महिलांनी बाजारात जाण्याला त्यांचा कडक विरोध आहे."

टीव्हीवरील वार्तांकनासाठी फुटेज अत्यंत गरजेचं असतं आणि या दौऱ्यावेळी फुटेज मिळवणं हे आमच्या समोरचं सर्वांत मोठं आव्हान होतं, कारण कोणताही दुकानदार कॅमेऱ्यासमोर बोलायला अजिबातच तयार नव्हता. कॅमेऱ्याच्या वापराबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका तालिबानी राजवटीने घेतली होती. त्यांच्या पहिल्या राजवटीच्या काळात रेडिओ व टीव्ही प्रसारणांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती.

दाढीच्या बाबतीत सूट देणारं प्रमाणपत्र

परराष्ट्र मंत्रालयाने आमच्या सोबत दिलेला दुभाषा पुश्तू होता आणि काबूल विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून काम करत होता. आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो सकाळी लवकरच हॉटेलात येत असे. कधी-कधी तो इतक्या लवकर यायचा की आम्हाला नाश्ताही पूर्ण करता यायचा नाही.

आम्ही त्याला 'मिस्टर प्रोफेसर' म्हणायचो. तो आधी पुश्तूमध्ये माझ्या तब्येतीची चौकशी करायचा आणि मग 'कोई तकलीफ तो नहीं है?' असं विचारायचा.

दिवसभरात अनेकदा तो हे विचारायचा आणि असं रोज व्हायचं. सारखा हा प्रश्न विचारण्यात आल्यावर, 'तालिबान और मीडिया' या वार्तालेखामुळे मी अडचणीत तर येणार नाही, अशी चिंता मला वाटू लागली होती.

प्राध्यापक महाशयांना मनोविज्ञानाबद्दल थोडीबहुत माहिती होती, त्यामुळेच बहुधा एके दिवशी माझ्या भीतीचा अंदाज बांधत तो मला म्हणाला, "चिंता करू नका. तुम्ही तो लेख लिहिलात तरी काय झालं? तुम्ही आमचे पाहुणे आहात."

एक क्षणभर माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. पण अल्ला जे काही करेल ते भल्यासाठीच असेल, असं मी लगेच स्वतःला समजावलं.

दरम्यान, आम्ही फारसा विचार न केलेल्या एका गोष्टीकडे त्याने आमचं लक्ष वेधलं. बाजारातून फिरताना नमाजची वेळ कधी आहे याकडे लक्ष ठेवावं, असं त्याने आम्हाला सांगितलं. नमाज न पढणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत होते.

एके दिवशी 'शहर-ए-नौ' बाजारात आम्हाला विशेष पोलीस दलाचे जवान भेटले. एका अधिकाऱ्याने मला विचारलं, "तुम्ही दाढी का ठेवली नाहीत?" मी स्वतःची परदेशी नागरिक म्हणून ओळख करून देत विचारलं, "परदेशी लोकांनाही हे पाळणं आवश्यक आहे का?"

त्या अधिकाऱ्याने रागाने उत्तर दिलं, "तुम्ही मुसलमान नाहीयेत का?"

या क्षणी आमच्या दुभाष्याने त्या अधिकाऱ्याला दुसऱ्या काही बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि सांगितलं, "हे मुसलमान आहेत आणि पश्तूनसुद्धा आहेत. इन्शाअल्लाहा ते दाढीसुद्धा ठेवतील."

हे ऐकल्यावर अधिकारी निघून गेला आणि आम्ही जेवणासाठी शहर-ए-नौ बाजारातील प्रसिद्ध 'हेरात रेस्तराँ'मध्ये गेलो. प्राध्यापक महाशयांनी या घटनेबद्दल आमची माफी मागितली आणि आता जेवल्यावर आपण भेटू असं सांगितलं.

तालिबान सत्तेत येण्यापूर्वी या उपहारगृहात लोकांची गर्दी असायची. पण आता उपहारगृहाच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. आम्ही खाणं मागवलं आणि आपापसात बोलाला लागलो.

आमच्या गप्पा सुरू होतात इतक्यात उपहारगृहात काही गडबड सुरू असल्याचं दिसलं. उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी खिडक्यांचे पडदे खाली केले आणि ते खिडक्या व दरवाजे बंद करायला लागले.

एक कर्मचारी फार्सीत म्हणाला, "चिंता करू नका! आज शुक्रवार आहे आणि सर्वांनी शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत जावं लागतं. तुम्ही पाहुणे असल्यामुळे तुम्हाला आम्ही बाहेर काढू शकत नाही."

दुसऱ्या दिवशी आम्हाला तालिबानचे गृह मंत्री मुल्ली अब्दुल रज्जाक अखुंद यांची मुलाखत घ्यायची होती. त्यांना दाढीशी संबंधित प्रश्नाबद्दल विचारायचं मी ठरवलं.

सकाळी आम्ही त्यांच्या कार्यालयात पोचलो, तेव्हा आम्हाला एक वाईट बातमी मिळाली. 'एका महत्त्वाच्या बैठकी'त व्यस्त असल्यामुळे मंत्रीसाहेब मुलाखतीसाठी हजर नव्हते.

पण गृह उप-मंत्र व गुप्तचर विभागाचे प्रमुख मुल्ला अब्दुस्सलाम खाकसार हे आमच्याशी बोलतील असं आम्हाला सांगण्यात आलं.

कालांतराने मुल्ला खाकसर यांचा 14 जानेवारी 2006 रोजी कंदहारमधील त्यांच्या घराजवळ खून झाला.

आम्ही त्यांची मुलाखत घेण्यासाठी ठरलेल्या वेळेपूर्वी पोचलो. सगळी तजवीज झाल्यावर गृह उपमंत्री तिथे आले, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सर्वांना कॅमेरे बंद करायला सांगितले. मला सर्व कॅमेरामन आणि पत्रकार यांच्या डोळ्यांमध्ये निराशा व उदासीनता दिसली.

मुलाखत संपल्यावर मी मंत्र्यांना दाढीविषयी विचारलं. त्यांनी विचारलं, 'याबद्दल कोणी तुमची उलटतपासणी केली का?'

माझ्या सोबत घडलेल्या घटनेची सर्व माहिती मी त्यांना दिली. हे ऐकल्यावर ते एका अधिकाऱ्याशी फार्सीत बोलले आणि त्याला काही करायला सांगितलं. मग मला म्हणाले, "तुम्हाला परत अशी अडचण येणार नाही."

मंत्री निघून गेले. मुलाखतीनंतर आम्हाला तिथे थांबायला सांगितलेल्या व्यक्तीची मी वाट पाहत होतो. थोड्या वेळाने तो आला आणि माझ्या हातात एक कागद दिला. त्यावरचा मजकूर वाचल्यावर मी आश्चर्यचकित झालो.

ते 'दाढीच्या बाबतीत सूट देणारं प्रमाणपत्र' होतं. पोलीस दाढीबद्दल विचारतील तेव्हा हे प्रमाणपत्र दाखवावं, असं त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं. पुढच्या वेळी माझी पोलिसांशी गाठ पडेल तेव्हा मला सुरक्षित वाटेल, असं सांगून मला आश्वस्त करण्यात आलं. पण माझी परत पोलिसांशी गाठ पडली नाही.

'यूएन क्लब'

तालिबानच्या राजवटीपूर्वीचा काळ पाहिलेले लोक सांगतात की, या राजवटीत वातावरण 'कोरडं' होतं.

काबूल शहराची झगमग पूर्णतः संपुष्टात आली. सिनेमा, संगीत व सलून याच्याशी संबंधित सर्व दुकानं बंद करण्यात आली. शहरातील जुने रहिवासी पळून गेले. पाकिस्तानी दूतावासाचा अपवाद वगळता दुसऱ्या कुठल्याही देशाचा दूतावास सुरू नव्हता.

एकदा काबूल प्राणिसंग्रहालयामध्ये आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी आमचे कॅमेरे ताब्यात घेतले. काही तासांनी सर्व उपकरणं परत देण्यात आली, पण 'पुढच्या वेळी सामान परत मिळणार नाही,' असा इशारा देण्यात आला.

दिवसभर बाहेर राहिल्याने थकवा आला होता, त्यामुळे संध्याकाळी आम्ही यूएन क्लबमध्ये जायचो. या क्लबमध्ये केवळ 'परदेशी नागरिकां'ना जायची परवानगी होती आणि काबूलमधील शुष्क वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या क्लबमधलं वातावरण उत्साही असायचं. इथे परदेशी पुरुष व महिला एकमेकांशी गप्पागोष्टी करताना दिसायचे.

तालिबानच्या राजवटीत स्वतंत्र माध्यमांबद्दल विचार करणं हेही कल्पनेच्या भराऱ्या मारण्यासारखंच होतं.

यूएन क्लब हा अफगाणिस्तानबाबत माहिती मिळवण्याचा एकमेव स्रोत होता. विविध बिगरसरकारी संस्था आणि संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्था यांच्यासाठी काम करणारे परदेशी लोक या क्लबमध्ये येत असत. ते अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक लोकांच्या सेवेत कार्यरत होते.

परंतु, हे परदेशी लोक आराम व करमणूक यांसाठी काही वेळ काबूलमध्ये घालवायचे. आमच्यासाठी केवळ यूएन क्लबमध्येच असं काही शक्य होतं.

'वादळापूर्वीची शांतता'

'वादळापूर्वीची शांतता' असा एक वाक्प्रचार आहे.

काबूलमधील दहा दिवसांच्या प्रवासादरम्यान मला शहरात प्रचंड शांतता जाणवली. काहीतरी मोठी घटना घडली असावी आणि लोक शोकात बुडाले असावेत, किंवा काहीतरी मोठं घडण्याची शक्यता असावी, तसं वातावरण होतं.

आम्ही 14 एप्रिल 2001 रोजी तोरखममार्गे पाकिस्तानात परत आलो. माझ्या आधीच्या सर्व प्रवासांपेक्षा हा दौरा जास्त महत्त्वाचा होता. तालिबानकडून काही त्रास झाला नाही.

वास्तविक 'तालिबान और मीडिया' या लेखाने अफगाणिस्तानातील माध्यमस्वातंत्र्याचा पर्दाफाश केला होता. या लेखासंदर्भात माझ्याच देशातील- पाकिस्तानातील- गुप्तचर संस्थांनी मला जो त्रास दिला, त्याच्या दहा टक्केही त्रास काबूलमध्ये झाला नाही.

काबूलदौऱ्यावेळी मला जाणवलेली शांतता कोणत्या वादळापूर्वीची होती, हे पाच महिन्यांनी स्पष्ट झालं. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील शहरांवर विमानहल्ले झाले, आणि त्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारचा शेवट झाला.

आज जवळपास 20 वर्षांनी तालिबान पुन्हा एकदा 'विजयी' म्हणून काबूलमध्ये प्रवेश करत आहेत आणि मला तिथे जाण्याचा व्हिसा मिळवण्याकरता पुन्हा इस्लामाबादमधील अफगाणी दूतावासात जावं लागेल की काय, याची चिंता मला सतावू लागली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)