You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओसामा बिन लादेनचा खात्मा असा करण्यात आला होता...
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
2009 सालच्या मे महिन्यात सिच्युएशन रुममधली बैठक संपताच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा काही सल्लागारांना व्हाईट हाउसच्या ओव्हल ऑफिसला घेऊन गेले आणि दार आतून लावून घेतलं. यात व्हाईट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ इमॅन्युएल, सीआयएचे संचालक लियोन पनेटा आणि उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टॉम डॅनियल यांचा समावेश होता.
ओसामा बिन लादेनचा माग काढण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन या प्रकरणातील प्रगतीचा अहवाल दर महिन्याला देण्यात यावा, अशी आपली इच्छा असल्याचं ओबामा यांनी उपस्थितांना सांगितलं.
'अ प्रॉमिस्ड लँड' या आपल्या आत्मकथेत ओबामा लिहितात, "9/11 च्या नवव्या स्मृतीदिनाच्या एक दिवसआधी सीआयएचे संचालक लियोन पनेटा आणि त्यांचे सहकारी माईक मॉरल या दोघांनी भेटीची वेळ मागितली. लियोन म्हणाले 'मिस्टर प्रेसिडेंट' ओसामा बिन लादेनविषयी सध्या प्राथमिक माहिती मिळाली आहे.'"
"आपल्या गुप्तहेरांनी अबू अहमद अल कुवैती नावाच्या इसमाला शोधून काढलं आहे. तो अल कायदासाठी संदेशवाहकाचं काम करतो आणि त्याचे ओसामा बिन लादेनशी जवळचे संबंध आहेत. आापले गुप्तहेर त्यांचे फोन आणि रोजच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत आणि ते इस्लामाबादपासून 35 किमी अंतरावर असलेल्या एबोटाबाद शहराच्या बाहेरील भागाच्या एका मोठ्या अंगणापर्यंत पोहोचले आहेत. ते अंगण ज्या परिसरात आहे तो परिसर आणि अंगणाच्या आकारावरून तिथे अल कायदाशी संबंधित कुणीतरी मोठी असामी रहात असावी, असा अंदाज आहे."
अंगणाच्या आत चालणारा 'द पेसर'
दोन महिन्यांनंतर 14 डिसेंबर 2009 रोजी लियोन आणि माईक दोघांनी पुन्हा एकदा ओबामांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सीआयएचे एक अधिकारी आणि एक तज्ज्ञही होते. हे अधिकारी सीआयएचं दहशतवादविरोधी केंद्र आणि अमेरिकेच्या बिन लादेन मोहिमेचे प्रमुख होते. या दोघांनी ओबामा यांना ती सर्व माहिती दिली ज्या आधारे ते एबोटाबादमधल्या त्या घरापर्यंत पोहोचले होते.
सीआयएचे माजी संचालक लियोन पेनेटा यांनी 'वर्दी फाईट्स' या त्यांच्या आत्मकथेत याविषयीचा उल्लेख करत लिहिलं आहे, "हे अंगण आसपासच्या प्लॉट्सपैकी सर्वांत मोठं होतं. शेजारच्या प्लॉटहून जवळपास आठ पट मोठं. इब्राहिम आणि त्यांचे बंधू या प्लॉटचे मालक होते. मात्र, 1 कोटी रुपयाच्या संपत्तीचे मालक असण्याची त्यांची ऐपत नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे प्लॉटचे मालक असूनही इब्राहिम मुख्य घरात न राहता अंगणाच्या आत असलेल्या गेस्ट हाउसमध्ये रहायचे."
"हे तीन मजली घर होतं. वरच्या मजल्याला एक बाल्कनी होती. मात्र, एक भिंत बांधून ती झाकली होती. बाल्कनीसमोर भिंत कोण बांधतं? या घरात इंटरनेट कनेक्शन नव्हतं आणि लँड लाईन फोनही नव्हता. आम्ही पाळत ठेवून होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की कधी-कधी घरातलीच एक व्यक्ती घरातून बाहेर पडून अंगणाच्या आत फेऱ्या मारायची."
"आम्ही त्याला 'द पेसर' नाव दिलं होतं. घराबाहेर कचरा उचलायला कचरावेचक यायचे. मात्र, या घरातला कचरा बाहेर देण्याऐवजी घरातच जाळला जायचा."
'द पेसर' ओसामा बिन लादेन असल्याचं सीआयएच्या गुप्तहेरांना वाटायचं.
हवाई हल्ल्याने घर उडवण्याचा पर्याय
पाकिस्तान अमेरिकेची साथ देत असला आणि अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या मोहिमेतही पाकिस्तान सोबत असला तरी पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या गुप्तहेर संस्थेतली काही तत्त्वं तालीबान आणि कदाचित अल-कायदा यांच्याप्रतीही सहानुभूती ठेवायचे, हे लपून नसल्याचं ओबामा यांचं मत होतं.
शिवाय, एबोटाबादमधलं ते घर पाकिस्तानी मिलिट्री अकॅडमीच्या अगदी जवळ होतं. त्यामुळे पाकिस्तानला या मोहिमेविषयी जराही कल्पना दिली तर ही माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाऊ शकत होती ज्याला अमेरिकेला लक्ष्य करायचं होतं, असंही ओबामा यांना वाटत होतं.
आत्मचरित्रात ओबामा लिहितात, "आमच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला घरावर हवाई हल्ला करायचा. याचा पहिला फायदा हा होता की पाकिस्तानच्या भूमीवर अमेरिकी व्यक्ती ठार होण्याची जोखीम अजिबात नव्हती. या हल्ल्यात आमचा हात नाही, असं सार्वजनिकरित्या सांगता आलं असतं."
"मात्र, या पर्यायात नुकसान हे होतं की एबोटाबादमधलं ते घर उडवण्यात यश आलं असतं तरी त्या घरात लादेन होता, हे कसं कळणार? आणि अल-कायदाने खंडन केलं असतं तर लादेनच ठार झाला, हे आम्ही सिद्ध कसं करणार? दुसरं म्हणजे घर उडवताना आसपास राहणारे लोकही मारले जाण्याची भीती होती. त्यामुळे ओसामा बिन लादेन ठार झाला की नाही, याची खात्री नसणारा आणि इतरही 30-40 लोक ठार होण्याची शक्यता असणाऱ्या मोहिमेला मी परवानगी देऊ शकत नाही, असं मी ज्वाईंट चीफ ऑफ स्टाफचे व्हाईस चेअरमन हॉस कार्टराईट यांना स्पष्ट केलं."
अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेशाची योजना
ओबामा पुढे लिहितात, "दुसरा पर्याय स्पेशल ऑप्स-मिशनचा होता. निवडक सैनिकांना हेलिकॉप्टरने पाकिस्तानात प्रवेश देऊन या घरावर इतक्या वेगाने कारवाई करावी की पाकिस्तानी पोलीस किंवा सैन्याला प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळू नये, अशी ही मोहीम होती. हा हल्ला कसा करता येईल, याची माहिती घेण्यासाठी मी व्हॉईस अॅडमिरल विलियम मॅकरेवन यांना पाचारण केलं."
वरून घेण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीने सीआयएने त्या घराचं थ्रीडी मॉडेल तयार केलं आणि व्हाईस अॅडमिरल मॅकरेवन यांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना या हल्ल्याविषयी ब्रिफ केलं. त्यानंतर अमेरिकेच्या सील्सचे निवडक जवान अफगाणिस्तानातील जलालाबाद इथून एक किंवा दोन हेलिकॉप्टर्समधून रात्रीच्या अंधारात निघून एबोटाबादमधल्या त्या घरात लँड करतील, असं ठरलं.
यानंतर 29 मार्च रोजी एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत ओबामा यांनी मॅकरेवन यांना पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या हेलिकॉप्टर्सना प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना ट्रेस केलं तर आपली भूमिका काय असेल, याविषयी विचारलं.
बिन लादेन घरातल्या एखाद्या सुरक्षित खोलीत लपून असेल आणि अमेरिकेच्या जवानांना लादेनला शोधण्यात निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला तर काय करायचं? आणि समजा हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलांनी घराला चहूबाजूंनी घेरलं तर तिथून सुखरूप सुटका कशी करायची? हेदेखील प्रश्न होतेच.
ओबामा लिहितात, "पाकिस्तानी जवानांशी लढायचं नाही आणि असा काही हल्ला झालाच तरीदेखील घराचा ताबा सोडायचा नाही, याच आधारावर ही योजना आखल्याचं अॅडमिरल मॅकरेवन यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात पाकिस्तानातील अमेरिकी राजनयिक पाकिस्तानी सरकारशी सील्सना सुखरूप बाहेर काढण्यासंबंधी चर्चा करतील."
याच दरम्यान हॉस कार्टराईट यांनी आणखी एक पर्याय सुचवला. ते म्हणाले, 'द पेसर' अंगणात फेऱ्या मारत असेल त्यावेळी ड्रोनच्या मदतीने अंगणात 13 पाउंडचं क्षेपणास्त्र डागता येईल.'
ओबामा यांनी कुठल्याही पर्यायासाठी अंतिम होकार कळवला नाही. मात्र, मोहिमेची आखणी करण्यासाठी माझ्याकडून होकार असल्याचं समजा, असं सांगितलं.
ओबामांच्या सल्लागारांमध्येच मतभेद
ओबामा यांच्या निकटवर्तीयांपैकी लियोन पनेटा, जॉन ब्रेनन आणि माईक मुलेन यांनी या कारवाईचं समर्थन केलं.
मात्र, या कारवाईमुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध बिघडतील, अशी चिंता हिलरी क्लिंटन यांना वाटत होती. इतकंच नाही तर अमेरिकी सील्स आणि पाकिस्तान सैन्य यांचा आमना-सामना झाला तर काय होईल, अशीही भीती त्यांना होती.
संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी या कारवाईचा विरोध केला. 1980 साली इराणमध्ये ओलीस ठेवलेल्या 53 अमेरिकी नागरिकांना सोडवण्यासाठीसुद्धा अशीच योजना आखण्यात आली होती. मात्र, ती अपयशी ठरली आणि त्यावेळी अमेरिकेची नाचक्की झाली होती.
त्या मोहिमेत अमेरिकेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात होऊन अमेरिकेचे 8 जवान मारले गेले होते आणि कदाचित याच कारणामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर पुढची अध्यक्षीय निवडणूक हरले होते.
उपाध्यक्ष जो बायडन हेदेखील या मोहिमेच्या विरोधात होते. ही मोहीम फसली तर त्याचे घातक परिणाम होतील, असं त्यांचं म्हणणं होतं. ओसामा बिन लादेन त्या घरात आहे, याची खात्री होत नाही तोवर कारवाई करू नये, असं बायडन यांचं मत होतं.
ओबामांनी दिला हिरवा कंदील
28 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या टेबलावर पत्नी मिशेल आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी ओबामा यांच्या जुन्या चपलीचा विषय काढला. ते घरात कायम ती चप्पल घालायचे. बराक ओबामा यांना गोड अजिबात आवडत नसल्यावरूनही त्यांनी थट्टा मस्करी केली.
मुलींना झोपवल्यानंतर ओबामा ट्रीटी रुममध्ये आराम करायला गेले आणि तिथे ते बास्केटबॉलची मॅच बघत होते. दुसऱ्या दिवशी ओबामा यांना अलबामा प्रांतातील टुसालुसा भागात आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करायला जायचं होतं आणि संध्याकाळी मियामीमध्ये भाषण होतं. मधल्या काळात त्यांना मिशेल आणि मुलींना 'एनडेव्हर' या स्पेस शटलचं प्रक्षेपण दाखवायला न्यायचं होतं.
जाण्यापूर्वी ओबामा यांनी टॉम डॅनिअल, डेनिस मॅकडॉनो, बिल डेली आणि जॉन ब्रेनन यांना ई-मेल पाठवून डिप्लोमॅटक स्वागत कक्षात भेटायला बोलवलं.
ओबामा लिहितात, "माझे कुटुंबीय साऊथ लॉनकडे जात होते. तिथे 'मरीन वन' हेलिकॉप्टर उड्डाणच्य तयारीत होतं. हेलिकॉप्टरच्या इंजिनाचा कर्कश्श आवाज आणि साशा आणि मालिया यांच्या आवाजाच्या कोलाहलात मी एबोटाबाद मोहिमेसाठी मंजुरी दिली. या मोहिमेची कमान अॅडमिरल मॅकरेवन सांभाळतील आणि हल्ला कधी करायचा, हेदेखील तेच ठरवतील, असं मी स्पष्ट केलं."
सॅटेलाईटच्या माध्यमातून मोहिमेवर नजर
2 मे 2011 च्या सकाळी व्हाईट हाउसच्या ऑपरेटरने उठवण्याआधीच ओबामांना जाग आली होती. मार्विन निकलसनसोबत गोल्फ खेळण्याची त्यांची इच्छा होती. ते दर रविवारी निकलसनसोबत गोल्फ खेळायचे.
ओबामा लिहितात, "व्हाईट हाउसला परतल्यानंतर मी ओव्हल ऑफिसमध्ये काही कागदपत्रं तपासत होतो. पण, माझं लक्ष लागत नव्हतं. थोड्या वेळाने मी माझे सहकारी रेगी लव्ह, मार्विन निकलसन आणि पीट राऊज यांना ओव्हल ऑफिसच्या डायनिंग रुममध्ये बोलावलं आणि आम्ही 'स्पेड' खेळायला सुरुवात केली. इस्टर्न स्टँडर्ड वेळेनुसार बरोबर 2 वाजता दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स जलालाबाद हवाई अड्ड्यावरून एबोटाबदमधल्या घराकडे रवाना झाले. त्यात सील दलाचे 23 जवान होते. त्यांच्यासोबत एक पाकिस्तानी अनुवादक आणि 'कायरो' नावाचा सैनिकी कुत्राही होता."
ओबामा ओव्हल ऑफिसमधून सिच्युएशन रुममध्ये गेले. तिथे लियोन पनेटा सीआयएचं मुख्यालय असलेल्या लँगलीहून व्हीडियो कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हजर होते.
अॅडमिरल मॅकरेवन जलालाबादमध्ये होते आणि सील्सच्या सतत संपर्कात होते. कॉन्फरंस टेबलावर टॉम, हिलरी, जो बायडन, डेनिस मॅक्डानो, गेट्स, मलेन आणि अँटोनी ब्लिंकेन बसले होते. मोहीम यशस्वी झाली किंवा फसली तर पाकिस्तान आणि इतर देशांना त्याबद्दलची सूचना कशी देण्यात येईल, याचं ब्रिफिंग करण्यात आलं. ओबामा थोड्या वेळासाठी वर गेले. मात्र, तेवढ्यात पनेटा यांनी ब्लॅक हॉक कमांडर थोड्याच वेळात एबोटाबादमधल्या घरात उतरणार असल्याची घोषणा केली.
लाईव्ह फीडवर खिळली ओबामांची नजर
ओबामा लिहितात, "हेलिकॉप्टर लक्ष्यावर उतरू लागताच मी माझ्या खुर्चीतून उठलो. मी म्हटलं, मला हे बघायचं आहे. मी शेजारच्या खोलीत गेलो. तिथे या मोहिमेचं लाईव्ह फीड येत होतं. तिथे निळ्या गणवेशात एअरफोर्सचे ब्रिगेडियर जनरल ब्रॅड वेब एका टेबलावर ठेवलेल्या कॉम्प्युटरसमोर बसले होते. त्यांनी मला त्यांची खुर्ची देऊ केली. पण मी त्यांचा खांदा दाबत त्यांना तिथेच बसून रहायला सांगितलं."
"वेब यांनी तात्काळ मी कॉन्फरंस रुममधून त्यांच्या खोलीत आल्याचं आणि लाईव्ह फीड बघत असल्याचं पनेटा यांना कळवलं. थोड्या वेळात माझे सहकारीही त्या छोट्या खोलीत पोहोचले."
'जेरोनिमो- एनिमी किल्ड इन अॅक्शन'
त्या खोलीत जाऊन जेमतेम एक मिनीट झाला होता आणि तेवढ्यात एक हेलिकॉप्टर डगमगलं. काय होतंय हे कळायच्या आतच हेलिकॉप्टरचा एका पंखा भिंतीला धडकल्याचं मॅकरेवन यांनी सांगितलं.
ओबामा लिहितात, "एका क्षणासाठी मी खूपच घाबरलो आणि काहीतरी अघटित घडेल, असं वाटू लागलं. तेवढ्यात मॅकरेवन यांचा आवाज मला ऐकू आला. ते म्हणत होते, 'सगळं व्यवस्थित पार पडेल.' त्यांच्या आवाजावरून वाटत होतं जणू एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये कारची शॉपिंग ट्रॉलीला किरकोळ टक्कर झाली आहे. ते म्हणाले, हे आपले सर्वोत्कृष्ट पायलट आहेत. ते हेलिकॉप्टर सुरक्षित खाली उतरवतील आणि घडलंही तसंच."
"20 मिनिटं तर तिथे नेमकं काय घडतंय हे मॅकरेवन यांनाही स्पष्ट दिसत नव्हतं. तेवढ्यात अचानक मॅकरेवन आणि पनेटा यांनी एकत्रच ते शब्द म्हटले ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. 'जेरोनिमा -ईकेआयए (एनिमी किल्ड इन अॅक्शन)' खोलीत उपस्थित सर्वांनीच निश्वास सोडला. माझी नजर व्हीडियो फीडवरच खिळली होती. मी हळूच म्हणालो, 'वुई गॉट हिम'."
सैनिकाला झोपवून लादेनची उंची मोजली
पुढचे 20 मिनिटं कुणीच जागचं हललं नाही.
हेलिकॉप्टरने परतीसाठी उड्डाण करताच जो बायडन ओबामा यांचा खांदा दाबत म्हणाले, 'कॉन्ग्रॅच्युलेशन्स बॉस'.
ओबामा यांनी उठून उपस्थित सर्वांशीच हस्तांदोलन केलं. मात्र, हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या सीमेत असेपर्यंत सर्वच गप्प होते. सहा वाजता हेलिकॉप्टर्स जलालाबाद हवाई तळावर पोहचल्यावर ओबामांच्या जीवात जीव आला.
मॅकरेवन व्हीडियो कॉन्फरंसिंगवर त्यांना म्हणाले, "याक्षणी तुमच्याशी बोलत असताना लादेनचा मृतदेह माझ्या समोर आहे. माझ्या टिममधल्या 6 फूट 2 इंचाच्या एका जवानाला लादेनच्या मृतदेहाशेजारी झोपवून लादेनची उंची मोजली. मृत व्यक्तीची उंची 6 फूट 4 इंच आहे."
ओबामा गंमतीत म्हणाले, "इतक्या मोठ्या मोहिमेसाठी गेलात आणि फुटपट्टी न्यायला विसरलात."
लादेन समुद्रात दफन
पूर्वीच ठरल्याप्रमाणे लादेनचा मृतदेह समुद्रात सोडण्यात आला. लादेनचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून कार्ल विन्सन या अमेरिकी युद्धनौकेवर नेण्यात आला. त्यानंतर जड काळ्या बॅगमध्ये टाकून तो समुद्रात दफन करण्यात आला.
याचा तपशील सांगताना लियोन पनेटा 'वर्दी फाईट्स' या आपल्या आत्मकथेत लिहितात, "लादेनचा मृतदेह खोल समुद्रातच जावा, यासाठी ज्या बॅगेत त्याचा मृतदेह ठेवला होता त्यात 150 किलोची लोखंडी साखळी ठेवण्यात आली. यानंतर ती बॅग युद्धनौकेच्या रेलिंगला लागून असलेल्या टेबलावर ठेवली."
"लादेनचा मृतदेह ठेवलेली बॅग इतकी जड होती की बॅग समुद्रात टाकली तेव्हा सोबत तो टेबलही समुद्रात पडला. थोड्याच वेळात मृतदेह समुद्राच्या तळाशी गेला. तो टेबल मात्र लाटांवर तरंगत राहिला."
जवानांनी ओबामांना दिली आठवण भेट
दुसऱ्या दिवशी ओबामा कँटकीमध्ये कॅम्पबेल फोर्टला गेले. तिथे मॅकरेवन यांनी ओबामा आणि बायडन यांना मोहिमेत भाग घेणाऱ्या जवानांशी भेट घालून दिली.
ओबामा यांनी त्या सर्वांशी हस्तांदोलन केलं. त्यांनी ओबामा यांना भेटवस्तूही दिली. एबोटाबादला घेऊन गेलेल्या झेंड्यावर सर्व जवानांनी हस्ताक्षर केले आणि त्याची फ्रेम करून ती फ्रेम राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना आटवण भेट म्हणून दिली. या भेटीत लादेनवर गोळी कुणी झाडली हे कुणी सांगितलंही नाही आणि ओबामांनी विचारलंही नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)