अहमद शाह मसूद : तालिबान समोर कधीही हार न मानलेला नेता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानच्या लोकांच्या मनात एक दृश्य ठसलंय. एप्रिल 1992 ला, रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली, त्यानंतर तीन वर्षांनी अहमद शाह मसूद एका जीपमध्ये बसून काबूलच्या दिशेने निघाले होते.
काबूलमध्ये शिरल्या शिरल्या त्यांनी एका रिकाम्या रस्त्यावर नमाज अदा केली. मसूद काबूलमध्ये शिरताना एकही गोळी चालली नव्हती.
त्याआधी काही दिवस नॉर्दन अलायन्स आणि गुलाबुद्दीन हिकमत्यार आणि कम्युनिस्ट सरकारच्या सैनिकांमध्ये जोरदार लढाई चालली होती.
अदबशीर लढवय्या
परराष्ट्र मंत्रालयात सचिव आणि अफगाणिस्तानात भारताचे माजी राजदूत विवेक काटजू अहमद शाह मसूद यांना अनेकदा भेटले होते.
त्यांची आठवण सांगताना काटजू म्हणतात, "त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं. ते जनतेचे नेते होते. खूप हुशार होते. फार कमी जणांना माहितेय की ते उच्चशिक्षित होते. कुशल प्रशासक होते आणि थोर लढवय्ये. गनिमी काव्यात त्यांचा कोणी हात धरू शकणारं नव्हतं. खूप धाडसी होते मसूद."
"लोकांनी मला सांगितलं की जेव्हा तालिबाने 1997 साली उत्तर अफगाणिस्तानात आपलं सैन्य पाठवून विजय मिळवला आणि मझार-ए-शरीफ ताब्यात घेतलं तेव्हा एक वेळ अशी आली की अहमद शाह मसूद पंजशीरही सांभाळू शकणार नाहीत असं वाटलं."
"त्यांचे सगळे सहकारी तो भाग सोडून जात होते. त्यांनी मसूद यांनाही सल्ला दिला की तुम्हीही आमच्यासोबत चला. पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणाले माझ्यासोबत लढायला दोन माणसं शिल्लक असली तरी मी माझी मातृभूमी सोडून जाणार नाही."
पंजशीर खोऱ्यात अजिंक्य
मसूद जेव्हा रशियाच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानातून अफगाणिस्तानात शिरले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 27 सहकारी, 2 कॅलिश्निकोव्ह, 7 रॉकेट, 2 आरपीजी, 5 बंदुका आणि 9 ब्रिटिश काळातल्या 0.303 गोळ्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
पेशावरमध्ये राहाणारे पत्रकार रहीमउल्ला यूसुफजाई सांगतात की, "त्यांचा भाग, पंजशीर खोरं, काबूलच्या उत्तरेला स्थित आहे. हा भागाचं भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वं आहे.
या भागाजवळ दालांग टनेल आहे, जो रशियाने बांधला होता. या बोगद्यामुळे उत्तर आणि दक्षिण अफगाणिस्तान एकमेकांना जोडलं गेलं आहे. हा बोगदा म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे असं म्हटलं जायचं."
"इथे खूप बर्फ पडतो. इथेच अहमद शाह मसूद यांनी रशियन आणि अफगाण फौजांचा अनेकदा रस्ता रोखला होता. त्यांची रसद तोडली होती. पंजशीर खोरं कधीही जिंकलं जाऊ शकत नाही असंही लोक म्हणायचे. तालिबाननेही तिथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी ठरले नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानला तेव्हा पाकिस्तानचं पुरेपूर समर्थन होतं. मसूदच्या फौजेपेक्षा तालिबानची फौज संख्येने तिप्पट होती, तरीही तालिबान अहमद शाह मसूद यांना हरवू शकलं नाही.
1999 साली जेव्हा बगाराम विमानतळाजवळ तालिबानने त्यांना माघार घ्यायला लावली तेव्हा त्यांच्यासोबत 5 लाख नागरिक रात्रभर चालत राहिले म्हणजे ते पंजशीर खोऱ्यात पोहचण्याआधी तालिबानचे रणगाडे तिथे पोहचू नयेत.
मसूद यांनी खोऱ्याच्या तोंडावर असलेला दालांग बोगदा सुरूंगाने उडवून दिला आणि एकप्रकारे आपलं क्षेत्र इतरांपासून तोडून टाकलं. यानंतर गावोगावी जाऊन ते आपल्या भागातल्या लोकांना स्वसंरक्षणासाठी सगळं काही पणाला लावण्यासाठी प्रेरित करत राहिले.
भारतासोबत संबंध
अफगाणिस्तानात जेव्हा मुजाहिदीनांचं सरकार बनलं तेव्हा अहमद शाह मसूद संरक्षण मंत्री झाले. भारताचे अफगाणिस्तानाशी पूर्वापारपासून संबंध असल्यामुळे त्यांनी भारताशी पुन्हा बोलणी सुरू केली.

फोटो स्रोत, Getty Images
काटजू म्हणतात की, "काबुलच्या लढाईनंतर तिथे झालेल्या विध्वंसाने तिथे लढणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांना ही जाणीव झाली की भारत या उपखंडातल्या मोठा देशा आहे आणि अफगाणिस्तानचे भारतासोबत चांगले संबंध असणं गरजेचं आहे."
"भारताचं कायम एक तत्व होतं की अफगाणिस्तानात जे सरकार वैध आणि अधिकृत असेल त्या सरकारसोबत भारत संबंध प्रस्थापित करणार. या लोकांनी भारताशी बोलणी करण्यात पुढाकार घेतला त्याला आम्ही योग्य तो प्रतिसाद दिला."
ओसामा बिन लादेनसोबत मतभेद
ओसामा बिन लादेनही आधी रशियाच्या विरोधात मसूद यांच्यासोबत लढला पण नंतर दोघांमध्ये वितुष्ट आलं. दोघांमधले संबंध इतके बिघडले की नंतर मसूद यांच्या खूनात ओसामचा सहभाग होता.

फोटो स्रोत, Getty Images
रहीमउल्ला यूसुफ सांगतात की, "जेव्हा मुजाहिदीन आपआपसात लढत होते तेव्हा ओसामा बिन लादेनचा प्रयत्न होता की या वेगवेगळ्या गटांमध्ये समझोता व्हावा. पण असं होऊ शकलं नाही. यानंतर युद्धात ओसामा बिन लादेनने तालिबानची साथ दिली. मसूद तालिबानच्या विरोधात लढत होते त्यामुळे ओसामा त्यांच्या विरोधात गेला.
मित्राची आठवण
9 सप्टेंबर 2001 ला अहमदशाह मसूद अमू नदीजवळचा त्यांचा ठिकाणा खोजे बहाऊद्दीनमध्ये होते. मसूद खलीली आणि अहमद शाहा यांची जुनी मैत्री होती. सप्टेंबर 2001 ला त्यांनी खलीलींना विनंती केली की भेटायला अफगाणिस्तानात या. खलीली तेव्हा भारतात राहात होते.

फोटो स्रोत, Getty Images
खलीली म्हणतात, "त्यांनी मला संदेश पाठवला की येऊन भेटा. मी लगेच गेलो. मी विचारलं काही विशेष? ते म्हणाले काहीच नाही. पण काही दिवस तू इथे राहा, मी पण माणूस आहे, आणि मलाही वाटतं की माझ्या आसपास माझे मित्र असावेत."
8 सप्टेंबर रात्री साडेतीन वाजेपर्यंत दोन्ही मित्र गप्पा मारत बसले. राजकारण, अलकायदा, हार-जीत अशा कितीतरी विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या.
खलीली त्या दिवसाची आठवण काढून सांगतात, "त्या दिवशी सकाळी आम्ही दोघं फार आनंदात होतो. माझा नवानवा पासपोर्ट आला होता. त्याला चामडी कव्हर होतं. मला कमांडरांनी सांगितलं की तो मी वरच्या खिशात ठेवावा कारण मला त्याची गरज पडेल. मी म्हटलं नको-नको याला बॅगमध्येच राहू द्या. पण त्यांनी तो बॅगेतून काढून माझ्या डाव्या खिशात ठेवला. त्यादिवशी कमांडर फार छान दिसत होते."
अरब 'कट्टरवादी' पत्रकारांना मुलाखत
दोन अरब पत्रकार त्याआधी दोन आठवडे अहमद शाह मसूद यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते. मसूद फार व्यग्र होते पण तरीही त्यांना भेटायला तयार झाले. या लोकांची झडती घेतली गेली नाही कारण असं केल्याने आपल्या पाहुण्यांचा अपमान होतो असं मसूद यांना वाटायचं आणि दुसरं म्हणजे या पत्रकारांची जोरदार शिफारस केली गेली होती.
नंतर कळालं की या पत्रकारांचे बेल्जियममध्ये बनलेले पासपोर्ट खोटे होते. आणि ते ज्या इस्लामिक ऑब्जर्व्हेशन सेंटरचे सदस्य असल्याची बतावणी करत होते त्या संस्थेचा संबंध अलकायदाशी होता. काही लोकांना नंतर हेही आठवलं की ते आपल्या टेलिव्हिजन कॅमेऱ्याची जास्तच काळजी घेत होते.

फोटो स्रोत, Getty Images
हे दोघं पत्रकार नव्हते तर अल-कायदाचे सदस्य होते आणि ओसामा बिन लादेनच्या सांगण्यावरून अहमद शाह मसूदचा खून करायला आले होते. खलीली प्रश्नांचा अनुवाद करायला मसूद यांच्या शेजारी बसले होते, त्यांनाही लक्षात आलं काहीतरी गडबड आहे.
ते सांगतात, "कमांडर म्हणाले तुम्ही आधी तुमचे प्रश्न सांगा. ते आपले प्रश्न सांगायला लागले. एकूण 14-15 प्रश्न होते त्यातले जवळपास 8 प्रश्न ओसामा बिन लादेनबदद्ल होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या माध्यमसंस्थेचं प्रतिनिधित्व करता तेव्हा त्यांनी उसळून उत्तर दिलं की मी पत्रकार नाहीये, आम्ही इस्लामिक संघटनेचे सदस्य आहोत. ही संस्था जगभरात पसरली आहे. मी कमांडरांना आमच्या भाषेत सांगितलं की हे दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत."
आत्मघाती जॅकेट आणि कॅमेरा
मसूद यांनी खलीली यांच्या म्हणण्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. खलीली सांगतात, "ते म्हणाले आधी यांचं होऊ द्या. त्या लोकांनी पहिला प्रश्न अगदीच वाईट इंग्रजीत विचारला... काय परिस्थिती आहे सध्या? मी कमांडरांच्या कानात या प्रश्नाचं भाषांतर कुजबूजत सांगतच होतो की मला 'व्हूप' असा आवाज आला."

फोटो स्रोत, Getty Images
"मला दिसलं की भलीमोठी निळ्या रंगाची आग माझ्याकडे झेपावतेय. मला माझ्या छातीवर कोणीतरी हात ठेवला आहे हे जाणवलं. तो कमांडरांचा हात होता. खोलीला आग लागली होती. त्या मुलाच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या. दुसरा मुलगा पळून गेला. तेव्हा माझ्याकडून चूक झाली होती. मला वाटलं कॅमेऱ्यात बाँब आहे पण त्या मुलाच्या शरीरावर काहीतरी बांधलेलं होतं. आत्मघाती जॅकेट किंवा काही."
हेलिकॉप्टरमध्ये मृत्यू
त्या स्फोटात अहमद शाह मसूद गंभीर जखमी झाले. त्यांचा एक सहकारी मारला गेला. मसूद खलीलीही गंभीर जखमी झाले. त्यांना हेलिकॉप्टरमधून उपचारासाठी ताजिकिस्तानला नेलं जात असताना ते क्षणभर शुद्धीवर आले.

फोटो स्रोत, Getty Images
खलीली सांगतात, "मला सेकंदभरासाठी शुद्ध आली. मला दिसलं की कमांडर माझ्या शेजारी पडलेत. कदाचित मी त्यांना शेवटचं पाहात होतो. त्यांचा रक्ताने माखलेला चेहरा मला दिसला. मी स्वतःला त्यांच्या बाजूने ढकलायचा प्रयत्न केला. तेव्हा मला जाणवलं की कमांडर शेवटचे श्वास घेत आहेत."
अहमद शाह मसूद यांचा त्याच हेलिकॉप्टरमध्ये मृत्यू झाला. मसूद खलीली यांच्यावर अनेक दिवस जर्मनीत उपचार चालले. ते अहमद शाह मसूद यांच्या मृत्यूचा दिवस आजही विसलेले नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








