Tokyo Olympic : भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का?

    • Author, दीप्ती पटवर्धन
    • Role, मुक्त पत्रकार, बीबीसीसाठी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कांस्य पदक जिंकण्याची संधी हुकली आहे. इंग्लंडनं 4-3 नं भारतीय संघाचा पराभव केला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कुठलं पदक मिळालं नसलं, तरी इथवरचा भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास सोपा नव्हता.

"हॉकी खेळून तिचं काय होणार आहे? शॉर्ट स्कर्ट घालून मैदानात धावत बसायचं नि घरच्यांचं नाव खराब करायचं, एवढंच ना!" राणी रामपालच्या आईवडिलांना असे उद्गार ऐकून घ्यावे लागत होते.

हॉकी खेळणं "पोरींना शोभत नाही" या कारणावरून वंदना कटारियाला खेळण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न झाले.

दारूच्या आहारी गेलेल्या आणि मारहाण करणाऱ्या वडिलांच्या घरात जन्मलेल्या नेहा गोयलने स्वतःच्या मनाला सावरण्यासाठी हॉकीच्या मैदानाचा आधार घेतला.

निशा वारसीच्या वडिलांना 2015 साली पक्षाघाताचा झटका आला, त्यानंतर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी निशाची आई फोम फॅक्ट्रीमध्ये काम करू लागली. झारखंडच्या आदिवासी पट्ट्यातून आलेली निक्की प्रधान भाताच्या शेतात कष्ट करत होती- त्यातच तुटलेल्या स्टिक उधारीने घेऊन तिने खडी पडलेल्या मैदानात हॉकी खेळायला सुरुवात केली.

या मुली अडथळ्यांना सामोऱ्या गेल्या, त्यांनी नकारघंटा वाजवणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि अखेरीस टीकाकारांची तोंड बंद करणारी कामगिरी करून दाखवली.

रामपाल, कटारिया, गोयल, वारसी आणि प्रधान या इतिहास घडवायला निघालेल्या 16 जणींच्या भारतीय हॉकी संघातील केवळ काही नायिका आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ ग्रेट ब्रिटनशी कांस्य पदकासाठी सामना खेळेल.

त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना झाल्या तेव्हाही त्यांना बाद फेरीपलीकडे जाता येईल, असे अंदाज कोणी वर्तवले नव्हते. पण या संघाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली.

उपांत्यपूर्व फेरीत सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला मात दिली. भारतीय हॉकीपटू जगभरात कुशलतेसाठी ओळखले जातात आणि ही कुशलता या महिला संघाच्या खेळात दिसून आली.

त्यांच्याकडून इतक्या वेगवान खेळाची अपेक्षा कोणीच ठेवली नसेल. परंतु, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भारताच्या कीर्तीला साजेशी कामगिरी

भारताच्या क्रीडा क्षेत्रातील कीर्तीशी हॉकीचा इतिहास घट्ट जोडलेला आहे, त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाची ही कामगिरी अत्यंत मोलाची आहे.

कोणे एके काळी भारतीय हॉकीपटू मैदानावर वर्चस्व गाजवत असत. विशेषतः हॉकीचा खेल नैसर्गिक मैदानावर खेळला जात होता, तेव्हा भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल होत होती. तेव्हाही पुरुषांना उच्चासनावर बसवलं जात असे आणि महिलांकडे बहुतांशाने दुर्लक्ष केलं जायचं.

हॉकीमध्ये भारताने 11 ऑलम्पिक पदकं मिळवली आहेत- त्यातील आठ सुवर्ण पदकं आहेत. पण 1980 साली पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने टोकियोसह तीनचा ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

भारतीय हॉकी संघातील बहुतांश मुली गरीब कुटुंबांमधून आल्या आहेत आणि तुटपुंज्या संसाधनांमध्ये व सरकारी अनास्थेला तोंड देत काम निभावण्याची त्यांनार सवय आहे.

काही वेळा सरकारी नोकरी व स्थिर पगार यांच्या आश्वासनावरच त्यांना समाधान मानावं लागतं. मात्र 2012 साली महिला संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

असा वाढला मुलींचा आत्मविश्वास

माजी ऑस्ट्रेलियन हॉकीपटू नील हॉगूड 2012 साली भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून आले, तेव्हा या संघातील खेळाडूंमधला आत्मविश्वासाचा अभाव त्यांना जाणवला.

अपयशाचं खापर या खेळाडूंवर न फोडता त्यांना विजयासाठी मदत करण्यासाठी आपण आलो आहोत, हे हॉगूड यांनी संघातील मुलींना पटवून दिलं.

"त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक होतं. पुढे जाण्यासाठी हा मुद्दा सर्वांत कळीचा होता," असं हॉगूड बीबीसीशी बोलताना म्हणाले.

"दीप ग्रेस एक्का आणि सुनीता लाक्रा यांना माझ्या नजरेला नजर भिडवण्यासाठी जवळपास दोन वर्षं लागली... 2014 साली आमच्यात थोडं विश्वासाचं नातं निर्माण झालं आणि संघाची प्रगती सुरू झाली. (भारतीय खेळाडू भिडस्त आहेत,) असं परदेशी परिक्षक म्हणू शकतात, पण मुळात असं का घडतं हे समजून घ्यायला हवं. सुरुवातीच्या वर्षांत आम्ही हे समजून घेतल्यामुळे बराच फायदा झाला."

हॉगूड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघ 36 वर्षांत पहिल्यांदाच ऑलम्पिकसाठी पात्र झाला.

रिओ ऑलम्पिकमधील त्यांची कामगिरी नियोजनानुसार पार पडली नसली, तरी त्यांना अनुभव मिळाला आणि काही प्रमाणात आत्मविश्वास आला.

हे पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरलं. योग्य संसाधनं व सामग्री दिली तर हा संघ विस्मयकारक कामगिरी करू शकेल, हे यातून सिद्ध झालं.

त्यानंतर प्रशिक्षक सोर्ड मारजेन यांनी भारतीय हॉकी संघाच्या मार्गदर्शनाची धुरा हाती घेतली आणि वायन लोम्बार्ड यांनी प्रशिक्षणाच्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल घडवला, त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने चांगलाच वेग पकडला.

खेळाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन

1980 साली भारतीय हॉकी संघ मॉस्को ऑलिम्पिकला गेला होता, तेव्हा त्यांच्यासोबत केवळ एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक होता. पण टोकियोला जाताना या संघासोबत सात सहायकांचा चमू आहे.

खेळाकडे पाहण्याच्या वैज्ञानिक व प्रगत दृष्टिकोनाचा गेल्या पाच वर्षांमध्ये या संघाला चांगलाच लाभ झाला.

भारतीय महिला हॉकी संघातून टोकियोला गेलेल्या 16 खेळाडूंपैकी आठ जणी 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळल्या होत्या, त्यामुळे संघाचा गाभा सक्षम आहे.

त्या अनुभवातून शिकल्या, आपला अनुभव त्यांनी तर जणींसोबत वाटून घेतला आणि यातून संघाची क्षमता वाढत गेली. कोरोनाच्या जागतिक साथीने त्यांच्या मार्गात मोठाच अडथळा निर्माण केला असता, पण या संघातील खेळाडू स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बंगळुरूमधील परिसरात जास्तीचं वर्षभर राहिल्या आणि त्यांनी आपल्या मैदानावरील डावपेचांना धार आणली.

ग्रुप राऊंडच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर नमतं घेण्यास नकार देणारा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियासमोर न दडपणारा हा संघ नव्या आत्मविश्वासासह मैदानावर उतरल्याचं स्पष्ट झालं.

आधी गावातील ज्येष्ठ मंडळींकडून ओरडा पडू नये यासाठी लपतछपत प्रशिक्षण घेणारी वंदना कटारिया आता एकदम प्रकाशझोतात आली आहे.

तिने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात हॅट्रिक करून भारताच्या 4-3 अशा विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकीपटू आहे.

कटारियाने करून दाखवली तशी व्यक्तिगत कामगिरी या संघातील इतरही काही खेळाडूंनी केली, पण या 16 जणींची सांघिक कामगिरी आणि परस्परांबद्दलची बांधिलकी या गोष्टी ठळकपणे स्मरणात राहतील.

या सर्वच मुलींनी आपापला खडतर प्रवास करून इथवर मजल मारली आहे, यातल्या प्रत्येकीची एकेक संघर्षगाथा आहे. पण सामायिक ध्येयाने त्यांच्यात सामर्थ्य निर्माण केलं.

यातील बहुतेक मुलींनी स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं जगणं शून्यातून पुन्हा उभं केलं आहे. आता त्या भारतीय हॉकीला नवीन शिखरं सर करण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत.

(दीप्ती पटवर्धन या मुंबईस्थित मुक्त पत्रकार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)