Tokyo Olympics : भारतीय हॉकी टीमचा बेल्जियमकडून उपांत्य फेरीत पराभव, आता 'कांस्य'साठी लढाई

    • Author, मनोज चतुर्वेदी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

भारतीय हॉकी संघाचा टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत बेल्जियमच्या संघाकडून पराभव झाला आहे. बेल्जियमनं भारतावर 3 गुणांनी मात केली.

सामानाअखेरीस भारत आणि बेल्जियमची गुणसंख्या 2-5 अशी होती. या पराभवामुळे भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदकाचं स्वप्न भंगलं आहे.

उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कांस्य पदकाची आशा कायम आहे. कांस्य पदकासाठी भारताला आणखी एक सामना खेळण्याची संधी आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणही भारत विरूद्ध बेल्जियममधील उपांत्य फेरीतील हॉकीचा सामना पाहत असल्याचे ट्विटरवरून सांगितले होते.

भारतीय संघाचा अभिमान व्यक्त करत मोदींनी शुभेच्छाही दिल्या होत्या.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला गेल्या 41 वर्षांमध्ये पदकांनी हुलकावणीच दिलेली आहे. उपांत्य फेरीत बेल्जियमचं आव्हान भारताला पेलता आलं नाही. त्यामुळे आता कांस्य पदकासाठी भारताला लढावं लागेल.

टोकियोमध्ये भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडविरोधात 3-2 असा विजय मिळवून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. पण पुढच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7-1 असा भारताचा धुव्वा उडवला आणि भारतीय संघाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता भारताची गाडी रुळावरून उतरेल, असंही वाटायला लागलं होतं. पण मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या पराभवातून धडा घेत स्वतःची कामगिरी सुधारत नेली आणि आपली क्षमता सिद्ध केली.

यानंतर भारताने स्पेनला 3-0 अशा फरकाने, मागच्या ऑलम्पिकमधील विजेत्या अर्जेन्टिनाला 3-1 ने,

जपानला 5-3 अशा फरकाने हरवत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. भागताने गट फेरीतील सामन्यांमध्ये इतकी चांगली कामगिरी केल्याचं गेल्या चार दशकांमध्ये माझ्या पाहण्यात आलेलं नाही. यानंतर भारताने उप-उपांत्य सामन्यात ब्रिनटाल 3-1 अशी मात देऊन उपांत्य सामन्यात स्थान मिळवलं.

भारतीय बचाव-फळीची खरी परीक्षा

भारतीय संघाला या स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आपली बचावाची फळी सक्षम नसल्याचं दिसत होतं. पण त्यानंतर भारतीय बचाव फळीने इतक्या जोरकसपणे खेळ केला की, त्यांची ताकद आता स्पष्ट झाली आहे.

भारताची 'भिंत' श्रीजेश भारतीय हॉकी संघाला 1980 सालानंतर कधीच ऑलम्पिकमध्ये पदक कमावता आलेलं नाही. भारतीय संघाकडे चांगला गोलकीपर नसणं, हे याचं सर्वांत मोठं कारण आहे. पण आता आपल्याकडे श्रीजेशच्या रूपात जागतिक दर्जाचा गोलकीपर आहे. उप-उपांत्य फेरीतील सामन्यात ग्रेट ब्रिटनचे खेळाडू वेगाने हल्ले करत भारताच्या गोलसंख्येची बरोबरी करू पाहत होते, तेव्हा श्रीजेशने सक्षमपणे प्रतिस्पर्धी संघाचे हल्ले एकेक करून परतवून लावले आणि भारताला उपांत्य फेरीच्या दिशेने जाणारी वाट मोकळी करून दिली.

ड्रेग फ्लिकर त्रिकूट ही भारताची ताकद सध्या हॉकमध्ये पेनल्टी कॉर्नरवरून केल्या जाणाऱ्या गोलमुळे बरेचदा सामन्याचा निकाल निश्चित होतो.

भारताच्या सुदैवाने रूपिंदर पाल, हरमनप्रीत सिंह व अमित रोहिदास यांच्या रूपाने भारतीय संघाला चांगले ड्रेग फ्लिकर लाभले आहेत. हे तिघेही बचाव-फळीत हुशारीने खेळणारे खेळाडू आहे, हीसुद्धा संघाच्या दृष्टीने इष्टकारक बाब आहे.

मॉस्को ऑलिम्पिकहून चांगली कामगिरी होईल का?

भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत जी कामगिरी केली आहे, ती 1980 मधील मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघापेक्षाही चांगली झाल्याचं म्हणता येईल. मॉस्कोत त्या वेळी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर पाश्चात्त्य देशांनी बहिष्कार टाकला होता, त्यामुळे अनेक दिग्गज संघ या स्पर्धेत उतरले नव्हते. परंतु, आत्ताच्या ऑलम्पिकमध्ये भारताने दिग्गज संघांचाही पराभव करत इथपर्यंत मजल मारली आहे. या वेळी भारताला पदक मिळवण्यात यश मिळालं, तर भारतीय हॉकीसाठी ही सुवर्ण युगाची सुरुवात असेल.

भारतीय हॉकी संघाच्या दृष्टीने 1928 ते 1964 हा कालखंड सुवर्ण युग मानता येतो. या काळात भारताने सात सुवर्ण पदकं मिळवली होती, त्यातील सहा तर सलग मिळवलेली होती. परंतु, मॉस्कोतील ऑलिम्पिक स्पर्धेनंतरच्या काळात भारतीय हॉकी संघाची कामगिरी ढासळत गेली. खेळासाठी गवताच्या मैदानाऐवजी कृत्रिम टर्फचा वापर होऊ लागला, हे याचं सर्वांत मोठं कारण होतं.

भारतीय हॉकी संघ 2008 साली बिजिंग ऑलम्पिकमध्ये पात्र ठरू शकला नाही, आणि 2012 साली लंडन ऑलम्पिकमध्ये शेवटच्या स्थानावर होता. रिओ ऑलम्पिकमध्ये ही स्थिती थोडी सुधारली आणि भारतीय संघ आठव्या स्थानावर आला.

इथे पोचल्यानंतर अनेक परदेशी प्रशिक्षकांचा उपयोग

2008 साली बिजिंग ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ पात्र ठरला नाही, त्यानंतर परदेशी प्रशिक्षकांना भारतात बोलावलं जाऊ लागलं. जोस ब्रासा, मायकल नोब्स, टॅरी वॉल्श, पॉल वान ऐस, रोलँट ओल्टमेन्स यांच्यासारखे प्रशिक्षक भारतात आले, पण हॉकीच्या संचालकांशी न जमल्यामुळे त्यातील अनेक जण कार्यकाळ पूर्ण न करताच निघून गेले.

या परदेशी प्रशिक्षकांनी भारतीय संघाच्या फिटनेसवरही भर दिला. अखेरीस ग्रॅहम रीड यांनी भारतीय हॉकी संघाची कामगिरी उंचावण्यात मोलाची भूमिका निभावली. भारतीय खेळाडूंच्या खेळण्याच्या शैलीत सुधारणा करणं आणि संघ म्हणून ऐक्य राखणं, हे त्यांच्या यशाचे दोन प्रमुख पैलू आहेत.

आता त्यांच्या डावपेचांना यश मिळतं का, हे पाहावं लागेल. भारतातील हॉकीचे चाहते गेली चार दशकं या यशाची वाट पाहत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)