ऑलिंपिकमध्ये अजूनही का आहे गांजावर बंदी?

शा कॅरी रिचर्डसन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेची धावपटू शा कॅरी रिचर्डसन
    • Author, रॉबिन लेविन्सन-किंग
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेची धावपटू शा कॅरी रिचर्डसन ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती. पण तिला ऑलिंपिकला जाता आलं नाही.

त्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या ट्रॅक अँड फिल्ड ट्रायल दरम्यान तिनं गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं होतं.

अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये गांजाला परवानगी आहे. पण क्रीडा स्पर्धांत अद्याप त्यावर बंदी आहे. पण त्यामागचं कारण काय?

हवेत उडणारे केशरी रंगाचे केस, हसरा चेहरा आणि विजेच्या वेगानं धावणाऱ्या रिचर्डसन ऑलिंपिकची तयारी करत होती, तेव्हा तिच्याकडं दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं.

ती आजवरच्या इतिहासातील सहाव्या क्रमांकाची सर्वात वेगवान धावपटू आहे. तिला टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदकाची दावेदार समजलं जात होतं. पण आता ती अमेरिकेच्या पथकात नाही.

रिचर्डसननं पात्रता फेरीदरम्यान गांजाचं सेवन केलं होतं, त्यामुळं तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं, असं जुलैच्या पहिल्या आठवड्यात सांगण्यात आलं.

शिक्षा म्हणून अमेरिकेच्या अँटी डोपिंग एजन्सीनं तिच्यावर एका महिन्याची बंदी घालत तिचा विजयही अमान्य ठरवला होता.

तिच्यावरील बंदी तांत्रिकदृष्ट्या ऑलिंपिकमधील तिच्या शर्यतीपूर्वीच संपली. पण तरीही तिला धावपटूंच्या संघात स्थान मिळू शकलं नाही.

त्यामुळं तिच्यावर लागलेल्या बंदीमुळं पुन्हा एकदा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये गांजाच्या बंदीवर चर्चा सुरू झाली आहे.

गांजा अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये वैध आहे. तसंच त्यामुळं धावपटूच्या क्षमतेत वाढ होते किंवा नाही, याबाबतही अद्याप शंका आहे. मग ऑलिंपिकमध्ये गांजांवर बंदी का अशी विचारणा अनेकजण करत आहेत.

गांजामुळं शारीरिक क्षमता वाढते का?

वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा) नं साल 2004 मध्ये जेव्हा बंदी असलेल्या पदार्थांची पहिली यादी जाहीर केली होती, तेव्हा त्यात गांजाचा समावेश होता.

रिचर्ड्सनला पाठिंबा देणारे कोलोरॅडोमधले समर्थक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रिचर्ड्सनला पाठिंबा देणारे कोलोरॅडोमधले समर्थक

खालील तीनपैकी दोन वैशिष्ट्य असलेल्या पदार्थांना बंदी असलेल्या यादीत समाविष्ट केलं जातं.

  • यामुळं खेळाडूच्या आरोग्याला हानी पोहोचते
  • यामुळं खेळाडूची कामगिरी किंवा क्षमता सुधारते
  • ते खिलाडूवृत्तीच्या विरोधात असेल तर.

गांजाचा विचार करता लोकांना सर्वाधिक आक्षेप दुसऱ्या मुद्द्यावर आहे.

2011 मध्ये स्पोर्ट्स मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखात वाडानं गांजावर बंदी घालण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.

त्यात गांजाच्या तणाव कमी करण्याच्या क्षमतेचा उल्लेख वाडानं केला होता. यामुळं खेळाडूंना दबावात चांगली कामगिरी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. स्पर्धेच्यापूर्वी आणि दरम्यानचा तणाव गांजाद्वारे कमी केला जाऊ शकतो.

पण केवळ याआधारे गांजाला क्षमता वाढवणारं औषध म्हणता येणार नाही, असं मॉन्ट्रियलमधील युनिव्हर्सिटी ऑफ क्युबेकमध्ये स्पोर्ट्स सायन्स विभागाचे प्रमुख अॅलेन स्टिव्ह कोमटॉयस म्हणाले.

"तुम्हा एकूणच विचार करावा लागेल. यामुळं तणाव कमी होतो हे खरं आहे. पण शारीरिक स्थितीची माहिती घेतल्यास आपल्या लक्षात येतं की, यामुळं क्षमता कमी होते," असं स्टिव्ह बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

2021 जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन अँड फिजिकल फिटनेस रिव्ह्यूच्या लेखकांमध्ये अॅलन स्टिव्ह यांचाही समावेश आहे.

या शोधनिबंधात त्यांनी व्यायामापूर्वी गांजाचा वापर आणि त्यामुळं खेळाडूच्या क्षमतेवर होणारा परिणाम याचं विश्लेषण केलं आहे.

गांजाचं सेवन केल्यानं रक्तदाब वाढतो आणि शक्ती आणि संतुलनही कमी होतं, असं या शोधातून समोर आलं. त्यामुळे क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक शारीरिक क्रियांमध्ये अडथळाही येतो.

मात्र या संशोधनात गांजामुळे तणावावर काय परिणाम होतो, याचा समावेश करण्यात आलेला नाही. अॅलेन स्टिव्ह म्हणतात की, गांजामुळं जे नुकसान होतं, त्या तुलनेत त्याचे फायदे अधिक आहेत.

त्यांच्या मते, गांजामुळं खेळाडूच्या क्षमतेत वाढ होते, या दाव्यात काही तथ्य नाही, असं यावरून म्हणता येईल.

खिलाडू वृत्ती आणि ड्रग्स

वाडाच्या बंदीच्या नियमांमध्ये केवळ क्षमता हे एकच परिमाण नाही.

रिचर्ड्सन

फोटो स्रोत, Getty Images

वाडाची स्थापना 1999 च्या ऑलिंपिकमध्ये करण्यात आली होती. त्यावेळी अनेक हाय प्रोफाईल डोपिंग स्कँडल समोर आले होते.

वाडाचा उद्देश जगभरात खेळाच्या स्पर्धांत ड्रग्जचा वापर बंद करणं हा आहे.

2004 मध्ये वाडानं बंदी असलेल्या पदार्थांची पहिली यादी जारी केली होती. तेव्हा गांजावर जगभरातील बहुतांश देशांमध्ये बंदी होती.

"सामाजिक जबाबदारीशी संबंधित समस्यांमध्ये त्यांना अडकायचं नाही, हे त्याचं कारण आहे," असं युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनमध्ये डोपिंग रोखण्याच्या इतिहासाबाबत संशोधन करणारे जॉन होबरमैन यांचं म्हणणं आहे.

गांजा एक अवैध ड्रग्ज आहे, त्यामुळं ते खेळ भावनेच्या विरोधी आहे, असं 2011 मध्ये वाडानं म्हटलं होतं.

खेळाडू हे जगभरातील तरुणांसाठी आदर्श असतात. त्यामुळं त्यांनी गांजाचं सेवन करणं योग्य नाही, असंही वाडानं म्हटलं होतं.

या नियमामुळं केवळ रिचर्डसनच नव्हे तर इतरही अनेक खेळाडूंनी संधी गमावली आहे.

2009 मध्ये महान जलतरणपटू मायकल फेल्प्सचे गांजा सेवन करतानाचे फोटो समोर आले होते.

त्यानंतर त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी लावण्यात आली होती. तसंच त्याला मिळालेली केलॉगची स्पॉन्सरशिपही गमवावी लागली होती.

2006 मध्ये अमेरिकेचे धावपटू दुसऱ्यांदा गांजाचं सेवन करताना आढळले, तेव्हा त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

वाडानं बंदी असलेल्या पदार्थांची यादी प्रकाशित करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं कॅनडाच्या स्नोबोर्डर रॉस रेबागलियातीचं सुवर्णपदक परत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंही गांजाचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं होतं.

पण न्यायालयानं गांजाच्या विरोधात अधिकृत नियम नसल्याचा निर्णय दिल्यानंतर ऑलिंपिक समितीला त्यांना पदक परत करावं लागलं.

गेल्या काही दशकांमध्ये गांजाबाबत कायदेशीर तरतुदी आणि समाजाचा त्याकडं पाहाण्याचा दृष्टीकोन बदलत आहे.

मायकल फेल्प्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मायकल फेल्प्स

2013 मध्ये उरुग्वेनं मनोरंजनासाठी गांजाची खरेदी आणि सेवनाला कायदेशीर मान्यता दिली होती. 2018 मध्ये कॅनडानंही बंदी हटवली होती.

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि नेदरलँड्ससह इतर अनेक देशांनीही काही प्रमाणात गांजाच्या सेवनावर लावलेले निर्बंध काहीसे कमी केले आहेत.

अमेरिकेत देशाच्या पातळीवर विचार करता गांजावर बंदी आहे. पण अनेक राज्यांनी त्यावरची बंदी हटवली आहे. त्यात ओरेगॉन प्रांताचाही समावेश आहे. याचठिकाणीच रिचर्डसनला गाँजाचं सेवन करताना पकडलं होतं.

औषध म्हणून गांजाचा वापर करण्यास अजूनही मान्यता मिळत आहे. ब्रिटननं औषध म्हणून गांजाचं सेवन करण्यास मान्यता दिली आहे.

2019 मध्ये वाडानं कॅनाबीडियोल (सीबीडी) ला बंदीच्या यादीतून वगळलं होतं. हे गांजाचंच एक औषधी रुप आहे.

पण सीबीडीला जपानसह अनेक देशांमध्ये अजूनही बंदी आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धाही जपानमध्येच होत आहेत.

या बदलांमुळंच रिचर्डसनवर लावलेल्या बंदीवर टीका केली जात आहे.

एका आठवड्यापूर्वीच रिचर्डसन हिच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळं मानसिक नैराश्यामुळं गांजाचं सेवन केलं असं, तिनं एनबीसी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

"मी तुम्हा सर्वांना निराश केलं आहे, मी माफी मागते. अमेरिका 100 मीटर स्पर्धेत पदकाशिवाय परतण्याची ही अखेरची वेळ असेल," असं रिचर्डसननं म्हटलं होतं.

रिचर्डसनबाबत वाढलेल्या सहानुभुतीनं वाडासमोरही द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. "एखादी नियमानुसार चालणारी संस्था त्यांना हवे तसे नियम बदलत असेल तर ती संस्था तुम्ही चालवू शकत नाही," असं होबरमॅन म्हणाले.

गांजावर बंदी आहे, त्यामुळं रिचर्डसनला सूट देणं शक्य नव्हतं.

या नियमामुळंच तरुण धावपटूंना किंमत मोजावी लागते, असं होबरमॅन म्हणाले.

पुढे काय होणार?

वाडा गांजावरील बंदी हटवण्याबाबत कधी विचार करेल हे अद्याप स्पष्ट नाही. पण वाडावर दबाव वाढत आहे, हे मात्र नक्की.

ड्रग्स

फोटो स्रोत, Peter Dazeley

रिचर्डसनवर बंदी लावल्यानंतर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही या नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा नियम रद्द करा असं बायडन म्हणाले नाहीत. मात्र व्हाइट हाऊस यादिशेनं पावलं उचलू शकतं अशा चर्चांना सुरुवात मात्र झाली आहे.

"नियम हे नियम असतात. नेमके कोणते नियम आहेत, हे सर्वांना माहिती असतं. ते नियम तसेच कायम राहतील की नाही, हा स्वतंत्र मुद्दा आहे," असं बायडन, शनिवारी मिशिगनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेत वाडाच्या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अमेरिकन डोपिंग अथॉरिटीच्या मते, या नियमावर पुन्हा चर्चा करण्याची वेळ आता आली आहे.

मात्र, जोपर्यंत हे नियम कायम आहेत, तोपर्यंत रिचर्डसन आणि त्यांच्यासारख्या इतर खेळाडूंना गांजापासून दूर राहावं लागेल, असंच दिसतंय.

रँकिंग

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)