टोकियो ऑलिंपिक 2021: भारतीय बॉक्सर्सकडून पदकांची अपेक्षा का केली जातेय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनोज चतुर्वेदी,
- Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीकरिता
भारतात बॉक्सिंगला मोठा इतिहास आहे. पण ऑलिंपिकबाबत विचार केल्यास बॉक्सिंगमध्ये भारताला फारसं यश मिळालेलं नाही.
विजेंदर सिंह यांनी 2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग खेळात भारताचं पदकाचं खातं उघडलं होतं. त्यानंतर चार वर्षांनी मेरी कोम हिने लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं.
त्यानंतर आता टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचा 9 सदस्यीय संघ लक्षवेधी कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतासाठी ऑलिंपिक इतिहासातील पहिलं पदक पटकावणारे विजेंदर सिंह आता व्यावसायिक बॉक्सर बनले आहेत. त्यांनी याबाबत म्हटलं, "सध्या मी या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. पण बातम्या आणि इतर माहितीनुसार यंदाच्या वर्षी भारताकडे बॉक्सिंगमध्ये एकापेक्षा जास्त पदकं येतील, असा अंदाज आहे. अमित पंघल तुफान फॉर्मात आहे. तसंच आपल्याकडे मेरी कोमसुद्धा आहे.
विजेंदरनी आणलं भारतीय बॉक्सिंगमध्ये परिवर्तन
भारतीय बॉक्सर्स गेल्या कित्येक वर्षांपासून ऑलिंपिक खेळांमध्ये सहभाग नोंदवत होते. पण त्यामध्ये विजेंदर सिंह यांनी बिजिंग ऑलिंपिकमध्ये पदकाची कमाई केली. त्यांनी भारतीय बॉक्सिंगला एक वेगळी वाट दर्शवली. यानंतर तरुणांनी या खेळाकडे गांभीर्याने पाहत हिरीरीने सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली.
विजेंदर सिंह आता व्यावसायिक बॉक्सर बनल्यामुळे त्याचा भारतीय बॉक्सिंग विश्वाला धक्का बसला. पण तरूण या खेळात पुढे येत आहेत. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत भारतीय बॉक्सर्सनी आशियाई स्पर्धांव्यतिरिक्त जागतिक चॅम्पियनशीप आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये आपली छाप पाडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या वर्षी भारताच्या एकूण 9 बॉक्सर्सनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश मिळवला. अमित पंघल, मनीष कौशिक, विकास कृष्ण, आशिष कुमार, सतीश, मेरी कोम, सिमरनजीत कौर, लौवलिना आणि पूजा राणी ही या खेळाडूंची नावं आहेत.
बॉक्सिंग संघटनेच्या गोंधळात अडकले खेळाडू
विजेंदर सिंहने लंडन ऑलिंपिकनंतर व्यावसायिक बॉक्सर बनण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशात व्यावसायिक बॉक्सर बनण्याची लाटच आली. त्यामुळे 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारत मजबूत संघ पाठवू शकला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर भरतीय बॉक्सर्सना एका अत्यंत कठीण काळातून जावं लागलं. पुढे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनमधून भारतीय बॉक्सिंग असोसिएशनचं निलंबनही झालं.
भारतीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला हे 12 वर्षांनंतरही पदावरून गेले नाहीत. त्यांना पदावर कायम ठेवण्यासाठी संघटनेच्या कायद्यातही बदल करण्यात आला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून संघटनेचं निलंबन झालं.
नव्या निवडणुका न झाल्याने भारतीय बॉक्सर्सच्या ऑलिंपिक सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. पण नंतर हे प्रकरण मिटलं.
यादरम्यान, अनेक भारतीय खेळाडूंना भारतीय झेंड्याविना स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं लागलं. अशा स्थितीत सर्वोत्तम कामगिरी करणं अत्यंत अवघड असतं.
पण नंतर परिस्थिती सुधारली. आता भारतीय बॉक्सर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इटलीत अंतिम तयारी
भारतीय बॉक्सिंग संघ सध्या इटलीत आपल्या ऑलिंपिक तयारीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. कोरोनामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या. त्याचा फटका बॉक्सिंगलाही बसला. त्यामुळे भारतीय बॉक्सर्सना युरोपीय बॉक्सर्ससोबत सराव आणि स्पर्धेच्या तयारीसाठी 15 जून रोजी इटलीला पाठवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
सराव आटोपून बॉक्सर्स 10 जुलैला भारतात दाखल होणार होते. त्यानंतर इथून जपानच्या दिशेने रवाना होणार होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिंपिक समितीने भारतासह इतर 10 देशांवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे भारतातून ऑलिंपिककरिता जात असलेल्या खेळाडूंना सक्तीच्या आणि कठोर क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. त्यामुळे भारताचा बॉक्सिंग संघ आता इटलीवरून थेट जपानला जाईल.
भारतासाठी लंडन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी मेरी कोम आतापर्यंत पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटमध्ये सराव करत होती. तिच्या मते, परदेशात सराव करण्यासाठी जाऊन वेळ घालवण्याऐवजी इथंच चांगला सराव करता येऊ शकतो.
पण क्वारंटाईनचे कठोर नियम लागू झाल्यानंतर मेरी कॉमनेही इटलीत जाऊन सराव करण्याचा निर्णय घेतला. त्यासुद्धा आता इटलीला जाणार आहेत. सध्याच्या स्थितीत आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाही, असं मेरी कोमने म्हटलं आहे.
अमित आणि मेरी कोम पदकाचे दावेदार
भारतीय बॉक्सिंग संघाचे सगळेच खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण ऑलिंपिक पदक पटकावणं ही साधीसोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार, याची कल्पना सर्वांना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्याच्या भारतीय संघातील अमित पंघल आणि मेरी कोम यांना पदकांचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.
विशेष म्हणजे, दोघंही फ्लायवेट गटातील बॉक्सर आहेत. अमित पंघलने काही दिवसांपूर्वी जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यामुळे पदक मिळवण्यासाठी त्याला यातून प्रेरणा मिळू शकते. त्याने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकासह जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेलं आहे.
सध्याच्या जागतिक क्रमवारीत जगातील टॉप पाच खेळाडूंच्या यादीत असलेल्या फ्रान्सच्या बिलाल बेनामा आणि चीनच्या हू जियान गुआन यांना प्रत्येकी एकवेळ पराभूत केलं आहे.
मात्र, पाचव्या क्रमांकावरील उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन जोइरोवविरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये अमित पराभूत झाला.
अमितप्रमाणेच 6 वेळा जागतिक विश्वविजेतेपदावर नाव कोरलेल्या मेरी कोम पदकाच्या प्रमुख दावेदार आहेत. मेरी कोम यांच्या वयाचा विचार केल्यास त्यांच्यासाठी ही स्पर्धा शेवटची ऑलिंपिक स्पर्धा असू शकते.
लंडनमध्ये 2012 साली मेरी कोम यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. आता टोकियोमध्ये लंडनच्या पदकाची पुनरावृत्ती करत त्या पदकाचा रंग बदलण्याची मेरी कोम यांची इच्छा असू शकते.
रँकिंगमध्ये मेरी कोम सध्या जगात सातव्या क्रमांकावर आहेत. पण त्यांचा अनुभव आणि कौशल्य या गोष्टींची सांगड घातल्यास त्यांच्यापासून पदक दूर नाही.
पूजा राणी यांनाही पदकाची खात्री
दोन वेळच्या आशियाई चॅम्पियन पूजा राणी यांची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करण्याची खात्री असल्याचं त्यांनी रवाना होण्यापूर्वी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या तयारीवर त्यांना पूर्ण विश्वास आहे. शिवाय आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेतही अशाच प्रकारची कामगिरी करण्याबाबत खात्री त्यांना आहे.
पूजा राणी यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच त्यांचा ठामपणा दिसून येतो.
पूजा राणी यांच्या कुटुंबाचं महिला बॉक्सिंगबाबत मत चांगलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी वडिलांपासून लपवून सराव सुरू केला. भिवानीच्या हवा सिंह अकादमीत प्रवेश घेण्याची हिंमत करण्यासच त्यांना 6 महिने लागले होते.
2009 च्या राष्ट्रीय युथ चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावल्यानंतर त्यांच्या वडिलांना त्यांच्या बॉक्सिंगबाबत कळलं. त्यानंतर त्यांनी पुढच्या काळात त्यांना संपूर्ण प्रोत्साहन दिलं.
बाकीच्या खेळाडूंचीही मजबूत दावेदारी
विकास कृष्ण, मनीष कौशिक, आशीष कुमार, सतीश कुमार, सिमरनजीत कौर आणि लोवलिना या सर्वच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे कोणत्याच खेळाडूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
विकास कृष्ण तर 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये क्वार्टर फायनल फेरीत धडकला होता. याशिवाय त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मागच्यावेळी घडलेल्या चुकांची दुरुस्ती करून पदकावर नाव कोरण्याचा विकासचा प्रयत्न असेल.
तर मनीष आणि सिमरनजीत यांनी जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे सर्वच भारतीय बॉक्सिंगपटूंनी थोडा जोर लावल्यास पदक दूर नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








