Tokyo Olympics 2020 : ऑलिंपिक कधी आहे? जपानमध्ये कोव्हिड काळात ऑलिंपिक होणार?

जपान ऑलिम्पिक

फोटो स्रोत, Getty Images

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

रँकिंग

शुक्रवारी - 23 जुलैला जपानमध्ये टोकियो ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा झाला आणि स्पर्धांना सुरुवात झाली.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत ऑलिंपिक रद्द करावं, असं आवाहन केलं जात असताना स्पर्धा सुरक्षितपणे खेळवल्या जाऊ शकतात याचा पुनरुच्चार आयोजकांनी वारंवार केलाय.

पण आपण परिस्थिती आणि रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास या स्पर्धांच्या 'भवितव्याविषयी' चर्चा करण्यात येईल, असं टोकियो 2020च्या आयोजन समितीने म्हटलंय.

टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता 2021 वर्षात हे ऑलिंपिक होत असलं तरी या खेळांना 'टोकियो 2020' म्हणूनच संबोधण्यात येतंय.

ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार आहे?

2020 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. हे ऑलिंपिक मुळात 2020मध्ये होणार होते म्हणून याला 2020 Olympics म्हटलं जातंय. या स्पर्धा तेव्हा कोव्हिडमुळे पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.

पॅराऑलिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर होणार आहेत.

या ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स असतील आणि 42 ठिकाणी हे सगळं पार पडेल. कराटे, स्केटबोर्डिंग, क्लाईंबिंग, सर्फिंग या खेळांचा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आलाय.

पॅराऑलिम्पिकमध्ये एकूण 22 खेळांचे 539 इव्हेंट्स होतील आणि 21 ठिकाणी या स्पर्धा होतील.

ग्रेटर टोकियोमध्येच यातल्या बहुतेक स्पर्धा आणि कार्यक्रम पार पडतील. काही फुटबॉल मॅचेस आणि मॅरॅथॉन होक्काईडो मधल्या साप्पोरोमध्ये होतील. पण इथे देखील सध्या चिंताजनक परिस्थिती आहे.

ऑलिंपिक कसं पाहता येईल?

भारतामध्ये ऑलिंपिकच्या प्रसारणाचे हक्क सोनी स्पोर्ट्सकडे आहेत. Sony Ten 1 आणि Sony Ten 2 या चॅनल्सवर ऑलिंपिक स्पर्धांचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.

सोनीच्या अॅपचं सबस्क्रिप्शन घेऊनही OTT मार्फत हे खेळ पाहता येतील.

यासोबतच दूरदर्शनवरूनही टोकियो ऑलिंपिकचं थेट प्रक्षेपण करता येईल.

जपानमधली कोव्हिडची स्थिती काय आहे?

ऑलिंपिक स्पर्धा जवळ येत असतानाच जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच टोकियो आणि आणखी एका भागात होणाऱ्या सगळ्या स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहेत.

जपानने फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक लसीकरण मोहीम सुरू केली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जपानने फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक लसीकरण मोहीम सुरू केली.

पण एप्रिलमध्ये संसर्गाच्या नव्या लाटेला सुरुवात झाली आणि त्यामुळे काही भागांमध्ये 20 जून पर्यंत निर्बंध घालण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या आकडेवारीनुसार 1 जुलैपासून आतापर्यंत ऑलिंपिकशी संबंधित 198 कोव्हिड केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये अॅथलीट्, आयोजक समितीचे कर्मचारी, विविध देशांच्या समित्यांचे कर्मचारी, काँट्रॅक्टर्स आणि व्हॉलेंटियर्सचा समावेश आहे.

जपानमध्ये 28 जुलैला 9500 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले.

टोकियो आणि ओसाका या दोन शहरांना संसर्गाच्या नव्या लाटेचा सर्वांत मोठा तडाखा बसला. जुलैच्या अखेरपर्यंत 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचं इथल्या यंत्रणेचं उद्दिष्ट आहे.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता जपानमध्ये डॉक्टर - नर्सेससोबतच डेंटिस्ट, पॅरामेडिक्स आणि क्लिनिकल टेक्नॉलॉजिस्टनाही लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

फायझर, अॅस्ट्राझेनका आणि मॉर्डना लशींद्वारे जपानमध्ये लसीकरण केलं जातंय.

जगातल्या 159 देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर जपानने बंदी घातलेली आहे.

ऑलिम्पिकदरम्यान काय खबरदारी घेतली जाणार आहे?

जपानच्या सीमा या परदेशी प्रवाशांसाठी बंद आहेत. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पाहण्यासाठी कोणीही परदेशी पर्यटक येऊ शकणार नाहीत.

टोकियो आणि आणखी एका आयोजन स्थळी होणाऱ्या सगळ्या स्पर्धा प्रेक्षकांशिवाय पार पडतील.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

Please wait...

जपानला जाण्यासाठी निघण्यापूर्वी आणि जपानमध्ये दाखल होताना आंतरराष्ट्रीय अॅथलीट्स आणि त्यांच्यासोबतच्या पथकातल्या लोकांच्या चाचण्या केल्या जातील.

त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. पण त्यांना बायो-बबलमध्ये रहावं लागेल आणि स्थानिकांमध्ये मिसळता येणार नाही.

अॅथलीट्सचं लसीकरण पूर्ण झालेलं हवं, अशी अट घालणयात आलेली नाही. पण जवळपास 80 टक्के अॅथलीट्सचं लसीकरण झालेलं असेल, असा ऑलिम्पिक कमिटीच्या अधिकाऱ्यांचा कयास आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्यांची रोज कोव्हिड चाचणी करण्यात येईल.

चिली देशाच्या तायक्वांडो खेळाडूची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना व्हायरसमुळे स्पर्धेतून बाद होणारा हा पहिला अॅथलीट ठरलाय.

खेळांशी संबंधित असणारे जवळपास 70 जण आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत.

जपानमधल्या लोकांना ऑलिम्पिक हवंय का?

असाही शिमबुन या जपानमधल्या आघाडीच्या वर्तमानपत्राने नुकतीच एक पाहणी केली. या स्पर्धा रद्द करण्यात याव्या वा पुढे ढकलण्यात याव्यात असं आपल्यला वाटत असल्याचं यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त जणांनी सांगितलंय.

ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी करणारा नागरिक

फोटो स्रोत, Reuters

या स्पर्धांमुळे कोव्हिड पसरेल आणि आरोग्य यंत्रणेवर ताण येईल, अशी भीती वाटल्याने स्पर्धेच्या आयोजनाच्या मूळ आराखडयात सहभाग असणाऱ्या अनेक शहरांनी नंतर माघार घेतल्याचं समजतंय.

सध्याची जागतिक साथीची परिस्थिती पाहता या स्पर्धांचं आयोजन करणं अशक्य असल्याचं डॉक्टर्सच्या संघटनेने मे महिन्यात जपान सरकारला सांगितलं होतं.

अॅथलीट्सचे प्रतिनिधी काय म्हणाले?

अनेक संघटना आणि तज्ज्ञांनी काळजी व्यक्त केलीय.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अॅथलीट्सना सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी, सोशल डिस्टंन्सिंग आणि चाचण्यांची कठोर अंमलबजावणी करावी असं 60 देशांतल्या 85,000 अॅथलीट्सचं प्रतिनिधित्वं करणाऱ्या द वर्ल्ड प्लेयर्स असोसिएशनने सांगितलंय.

ऑलिम्पिक रद्द होईल का?

युद्ध किंवा अंतर्गत यादवी युद्ध अशा परिस्थितीमध्येच पूर्वी ऑलिम्पिक रद्द केलं जाई.

पण IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आणि आयोजक टोकियो शहर यांच्यात झालेल्या करारानुसार ऑलिम्पिक रद्द करण्याचा अधिकार फक्त आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीलाच आहे.

ऑलिम्पिक स्पर्धांच्या प्रक्षेपणाच्या हक्कांमधून IOC ला जवळपास 70% उत्पन्न मिळतं, तर स्पॉन्सरशिपद्वारे 18% उत्पन्न् मिळतं. जर या स्पर्धा झाल्या नाहीत, तर त्याचा थेट परिणाम ऑलिम्पिक कमिटीच्या आर्थिक क्षमेतवर होईल आणि पुढच्या ऑलिम्पिक्सवरही याचा परिणाम होईल.

जपानच्या शहरांत आणीबाणी असली तरी या स्पर्धा सुरक्षितपणे खेळवल्या जाऊ शकतात, असं ऑलिम्पिक समितीने वारंवार म्हटलंय.

WHOचे प्रमुख टेड्रोस अॅडनहॉम गिब्रायसुस यांनीही स्पर्धा खेळवण्याला पाठिंबा दिलाय. कोव्हिडबाबतची सगळी काळजी घेतली, तर काय करता येऊ शकतं, याचं उदाहरण या स्पर्धा ठरतील, असं त्यांनी म्हटलंय.

पण अगदी या टप्प्यावर आल्यानंतरही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता फेटाळता येणार नसल्याचं टोकियो 2020च्या आयोजक समितीचे अध्यक्ष तोशिरो मोटो यांनी म्हटलंय.

आपण परिस्थिती आणि रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास या स्पर्धांच्या 'भवितव्याविषयी' चर्चा करण्यात येईल, असं टोकियो 2020च्या आयोजन समितीने म्हटलंय.

करार मोडत जर टोकियोने ऑलिम्पिक रद्द करण्याचं ठरवलं तर त्यामुळे होणारं सगळं नुकसान जपानला सोसावं लागेल.

टोकियो 2020 ऑलिम्पिकसाठी 12.6 अब्ज डॉलर्सचं बजेट ठरवण्यात आलं होतं. पण याचा प्रत्यक्ष खर्च दुप्पट झाल्याचं सांगण्यात येतंय.

जरी ऑलिम्पिकसाठी मोठं विमा संरक्षण घेण्यात येत असलं तरी त्यानंतरही जपानला मोठा तोटा होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)