Tokyo Olympic 2020 : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images
टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?
रँकिंग
कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेली ऑलिम्पिक ही क्रीडाविश्वातली सर्वोच्च स्पर्धा 23 जुलैपासून होणार आहे. कोरोना नियमावलीचं कठोर पालन करून जपानमधल्या टोकिया शहरात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी किती भारतीय खेळाडू पात्र ठरले आहेत ते जाणून घेऊया.
कोरोना संदर्भात नियमावली
खेळाडूंच्या यादीकडे जाण्याआधी कोरोना साथीच्या संदर्भात बनवलेल्या नियमावलीकडे एक नजर टाकू.
ऑलिम्पिक संघटनेने कोरोना साथीचा विचार करता स्पर्धेसाठी एक 33 पानी नियमावली बनवली आहे.
यामधील माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय चाहत्यांसाठी टोकियो ऑलिम्पिक फक्त टीव्हीपर्यंत मर्यादित असेल. कोरोना संसर्ग वाढल्याने टोकियो आणि आणखीन एका आयोजन स्थळी होणाऱ्या स्पर्धा या प्रेक्षकांशिवाय होतीय.
आंतरराष्ट्रीय स्वयंसेवकही या ऑलिम्पिकला येऊ शकणार नाहीत. म्हणजेच भारताला ऑलिम्पिकसाठी पाठवण्यात येणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या कमी करावी लागेल.
खेळाडूंना जपानला आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन होण्याची गरज नाही. त्यांना थेट सराव करण्यास जाता येऊ शकेल. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे कोव्हिड निगेटिव्ह अहवाल असणं बंधनकारक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दर चौथ्या दिवशी खेळाडूंना कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला स्पर्धेत भाग घेऊ दिला जाणार नाही. चाचणी किती वेळा होईल, याचे नियम बदलूही शकतात. खेळाडूंनी पर्यटनस्थळ, रेस्टॉरंट, बार अशा ठिकाणी जाण्यास बंदी असेल. खेळाडूंनी कमीत कमी लोकांच्या संपर्कात यावं, अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, खेळाडूंमध्ये दीड लाख कंडोमचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले भारतीय खेळाडू
भारताच्या आतापर्यंत 77 खेळाडूंनी ऑलिम्पिसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे.
तिरंदाजी
तरुणदीप राय, अतानू दास, प्रवीण जाधव, दीपिका कुमारी हे तिरंदाज भारताचं प्रतिनिधित्व करतील. तीन पुरुष खेळाडू संघ म्हणून ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसतील.

फोटो स्रोत, Getty Images
अॅथलेटिक्स
युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंह पदकाचे दावेदार आहेत. या दोघांसह अकरा अथलिट ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होतील.
मार्च 2019 मध्ये के.टी. इरफानने 20 मीटर रेसवॉकमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.
के.टी. इरफान, संदीप कुमार, राहुल रोहिल्ला, अविनाश साबळे, मुरली श्री शंकर, नीरज चोपडा, शिवपाल सिंह, कमलप्रीत कौर, भावना जाट, प्रियंका गोस्वामी,
बॉक्सिंग
प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगपटू भारतासाठी पदकाच्या शर्यतीत असतात. अनुभवी बॉक्सर मेरी कोम टोकियात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मेरी कोमसह विकास किशन, लोवलिना बोरगोहैन, आशिष कुमार, पूजा राणी, सिमरनजीत कौर, सतीश कुमार, अमित पंघल, मनीष कौशिक हे आपापल्या वजनी गटातून सहभागी होतील.
तलवारबाजी
तलवारबाजीत ऑलिम्पिक स्तरावर पहिल्यांदा भारताचं प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे. भवानी देवीने मार्चमध्ये हंगेरी इथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत टोकियाचं तिकीट पक्कं केलं.
हॉकी
भारताच्या पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. नोव्हेंबर 2019मध्ये प्रत्येकी 16सदस्यीय संघांनी टोकियावारी पक्की केली. भारताचा पुरुष संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे तर महिला संघ तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
शूटिंग
नेमबाज हे भारतासाठी पदकाचं आशास्थान असतं. टोकिया स्पर्धेतही मोठ्या प्रमाणावर भारतीय नेमबाज खेळताना दिसतील. दिल्लीत तुघलकाबाद इथल्या कर्णी सिंग रेज इथं सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय नेमबाजांनी दमदार प्रदर्शन केलं. आहे.
टोकियो स्पर्धेत अंजुम मोदगिल, अपूर्वी चंडेला, दिव्यांश सिंह पनवर, दीपक कुमार, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत, ऐश्वर्या सिंह तोमर, मनू भाकेर, यशस्विनी सिंह देसवाल, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, राही सरनोबत, चिंकी यादव, अंगद वीर सिंह बाजवा, मैराज अहमद खान.
टेबल टेनिस
अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने चौथ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. शरथच्या बरोबरीने जी.साथियन, सुतीर्थ मुखर्जी आणि मनिका बात्रा टोकियात भारताचं प्रतिनिधित्व करतील. शरथ आणि मनिका मिक्स डबल्स प्रकारातही खेळतील.
कुस्ती
आतापर्यंत चार कुस्तीगीरांनी टोकियाचं तिकीट पक्कं केलं आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया, दीपक पुनिया हे चौघं टोकियासाठी कसून तयारी करत आहेत.
बॅडमिंटन
मार्च महिन्यापासून ऑलिम्पिक क्वालिफायर्स सुरू झाले आहेत. तूर्तास एकही भारतीय बॅडमिंटन खेळाडूने टोकियावारी पक्की केलेली नाही. पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी पदकासाठी शर्यतीत असतील. किदंबी श्रीकांत, चिराग शेट्टी, सात्विकसैराज रणकीरेड्डी यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. विविध पात्रता स्पर्धांनंतर 15 जूनला जाहीर होणाऱ्या क्रमवारीनुसार टोकियोला कोण खेळणार हे स्पष्ट होईल.
अश्वशर्यती
दोन दशकांनंतर अश्वशर्यतींमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व असणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता फवाद मिर्झाने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. आशियाई क्रीडा स्पर्धेत याप्रकारात पदकांचा दुष्काळ त्याने संपवला.
कोणते खेळाडू रिंगणात आहेत?
वेटलिफ्टिर मीराबाई चानू ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी शर्यतीत आहे. आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेनंतर काही भारतीय खेळाडूंचं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
तिरंदाजी, रोइंगच्या स्पर्धाही बाकी आहेत. जिम्नॅस्ट दीपा कर्माकर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी दिसते आहे कारण कोरोनामुळे दोन वर्ल्डकप रद्द करण्यात आले तर मार्च महिन्यात होणारी एक स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. जिम्नॅस्टकरता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची शेवटची तारीख 29 जून आहे.
भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..
Please wait...
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








