टोकियो ऑलिंपिक 2020 : कोव्हिडच्या सावटाखाली ऑलिम्पिकची आजपासून सुरुवात

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरू झालाय. ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा प्रेक्षकांविना, रिकाम्या स्टेडियममध्ये होतोय.

या स्पर्धांवर कोव्हिडचं सावट आहे आणि आतापर्यंत स्पर्धेशी संबंधित 80 पेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

उद्घाटन सोहळ्याची सुरुवात कोव्हिडच्या जागतिक साथीबद्दलच्या एका परफॉर्मन्सने झाली. गेल्या वर्षभरातल्या घटनांचं चित्रण यात होतं. 2020 ची सुरुवात दाखवून नंतर जगभरातले ओसाड पडलेले रस्ते, लॉकडाऊन, घरी सराव करणारे खेळाडू यांचं चित्रण या परफॉर्मन्समध्ये होतं. त्यानंतर काऊंटडाऊनला सुरुवात झाली.

या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पथकाचं नेतृत्त्वं बॉक्सर मेरी कोमने केलं. भारताचं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पथक असणार आहे, पण उद्घाटन सोहळ्यात मात्र मोजकेच अॅथलीट्स सहभागी झाले.

जपानचे सम्राट नरुहितो, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत. WHO ते प्रमुख ट्रेड्रॉस अॅडनहॉम गिब्रायसुसदेखील या सोहळ्याला उपस्थित आहेत.

या ऑलिंपिकमध्ये एक 'रेफ्युजी टीम' म्हणजे जगभरातल्या निवार्सितांमधल्या खेळाडूंचं पथक सहभागी झालंय. असं रेफ्युजी पथक ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची ही दुसरीच वेळ आहे.

टोकियो ऑलिंपिकचं वार्तांकन करण्यासाठी आता जपानमध्ये असलेल्या बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे सांगतात, "उदघाटन सोहळ्याची सुरुवात भावनांना हात घालणारी ठरली. कोव्हिडच्या साथीमुळे जग गेल्या वर्षभरात ज्या दुःखातून गेलं, त्याचं प्रतिबिंब या सोहळ्यावरही पडलेलं दिसलं. स्टेडियममध्ये हळुहळू ऑलिंपिकचं प्रतिक असलेल्या रिंग्स आकार घेत होत्या, तसं आसपास काहींच्या डोळ्यांत पाणी आल्याचं दिसलं इतकी ताकद त्या संगीतात होती."

भारताच्या कोणत्या खेळाडूंच्या स्पर्धा कधी आहेत? पाहाण्यासाठी क्लिक करा

कोव्हिडच्या सावटाखाली जपानने स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे केलं आहे, कोरोना प्रतिबंधक उपाय काय काय आहेत, ते आपण जाणून घेऊ

ऑलिम्पिक स्पर्धेत किती जणांना संसर्ग?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) जमा केलेल्या आकडेवारीनुसार, 21 जुलैपर्यंत स्पर्धेशी संबंधित 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

यामध्ये केवळ खेळाडू/अॅथलीट्सचाच समावेश आहे असं नाही. तर ऑलिम्पिक आयोजन समितीतील कर्मचारी, राष्ट्रीय समितींचे सदस्य, कंत्राटदार आणि इतर कर्मचारी, तसंच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. यामध्ये काही माध्यम कर्मचारीही आहेत.

कोरोना संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण हे जपानी कंत्राटदारांमध्ये आहे. शिवाय, काही खेळाडूंचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

स्पर्धक आणि अधिकारी या दोघांसाठी ऑलिम्पिक क्रीडांगणाच्या आत अत्यंत कठोर नियम आहेत. तसंच अॅथलीट आणि इतरांची दररोज कोव्हिड चाचणी करण्यात येत आहे.

जपानमध्ये संसर्गात वाढ?

मे महिन्यात जपानमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

21 जुलै रोजी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने 4 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद केली. परवाच्या तुलनेत ही संख्या 1190 ने जास्त आहे. नवे रुग्ण आढळून येण्याची सरासरीही या आठवड्यात वाढल्याचं दिसून येतं.

पण, तरीही जपानमधील सध्याचं कोरोना संसर्गाचं प्रमाण मे महिन्यातील पातळीपेक्षा खूपच कमी आहे.

कोव्हिड-19 ने ऑलिम्पिक स्पर्धेचं स्वरुप कसं बदललं?

ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद टोकियो शहराकडे आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑलिम्पिक स्पर्धा सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी दररोजची रुग्णसंख्या 100 पेक्षा खाली राहणं गरजेचं आहे.

मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यानंतर कोव्हिड रुग्णसंख्येत घट दिसून आली. सध्या दररोज 400 पेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. पण संसर्गाचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं आहे.

टोकियोमध्ये सध्या आणीबाणी लागू आहे. टोकियो आणि फुकूशिमा येथे ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांशिवायच होईल.

मियागी आणि शिजुओका प्रांतात मर्यादित संख्येत प्रेक्षकांना स्पर्धेला उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

टोकियोमध्ये बार आणि रेस्टॉरंट उघडे राहण्यासाठीचा कालावधी मर्यादित असेल. तसंच तिथं जाऊन सेवा घेण्याबाबत नियम कठोर असतील.

राजधानी टोकियोतील नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळणे, मास्क वापरणे, घरातून काम करणे सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

जपानमध्ये किती जणांचं लसीकरण?

दरम्यान, 19 जुलैपर्यंत जपानमधील 35 टक्के नागरिकांना कोरोना लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 23 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीतील एकूण लोकसंख्येच्या 40 ते 50 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. ब्रिटनमध्ये 53 टक्के नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे.

जपानने इतर विकसित देशांच्या तुलनेत थोडं उशीरा म्हणजेच फेब्रुवारी 2021 मध्ये लसीकरण सुरू केलं होतं.

काही महिने तर इथं फक्त फायजर लशीलाच परवानगी होती.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील चाचण्यांसह जपानने स्थानिक पातळीवरही काही चाचण्या घेतल्यामुळे याठिकाणी लसीकरणाला उशीर झाल्याचं दिसून आलं.

जपानकडून कोणकोणते उपाय?

गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून बहुतांश देशांत कोरोनाचा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली होती. पण जपानने त्यावेळी देशात लॉकडाऊन केलं नाही. किंवा देशाच्या सीमाही बंद केल्या नाहीत.

एप्रिल महिन्यात जपान सरकारने आणीबाणीच्या स्थितीची घोषणा केली. पण घरातून काम करण्याबाबतची सूचना ही स्वैच्छिक होती. अनावश्यक कामकाज बंद करण्याची सूचना देण्यात आली. पण ते न पाळणाऱ्या लोकांना दंड किंवा इतर कोणतीही शिक्षा झाली नाही.

काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर जरूर निर्बंध लावण्यात आले. तसंच नंतर इतर काही देशांवरही प्रतिबंध लावण्यात आले. सद्यस्थितीत जगभरातील 159 देशांतील नागरिकांच्या जपान प्रवेशाला (विशिष्ट परिस्थिती वगळून) बंदी आहे.

जपानमध्ये वयोवृद्ध नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. अनेक शहरं दाट लोकसंख्येची आहेत. पण तरीही कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात, मृत्यूदर कमी राखण्यात जपानला यश आलं.

त्यासाठी खालील मुद्दे महत्त्वाचे ठरल्याचं सांगितलं जातं.

  • मास्क वापरण्यासारख्या नियमांचं सक्तीने पालन.
  • गळाभेट, चुंबन किंवा शारीरिक संपर्क टाळण्यासाठीची नियमावली.
  • हृदयरोग, स्थूलपणा आणि मधुमेह यांसारख्या व्याधींचं कमी प्रमाण

संपूर्ण 2020 वर्षात जपानमध्ये कोरोनाचा कहर सुरूच होता. दरम्यान सरकारने अर्थव्यवस्थेलाचालना देण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवला. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)