लैला खालिद : पॅलेस्टाईन संघर्षाची पोस्टरगर्ल, जिनं इस्रायली विमानाचं अपहरण केलं होतं

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

29 ऑगस्ट, 1969 चा दिवस. रोमच्या विमानतळावर पांढऱ्या रंगाचे कपडे आणि तीव्र उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून मोठा गॉगल घातलेली 25 वर्षीय युवती TWA 840 या विमानाची वाट पाहत होती.

ती मनातून घाबरलेली होती. हॉलिवूड अभिनेत्री ऑडरी हेपबर्नप्रमाणे ती युवती दिसत होती. विमानतळावरच्या सुरक्षायंत्रणांना गुंगारा देत तिने एक पिस्तूल आणि दोन हँडग्रेनेड आणले होते. त्या युवतीचं नाव होतं लैला खालिद. लैला एकटीच बैरुतहून रोमला आली होती.

वेटिंग लाऊंजमध्येच बसलेल्या सलीम इसावीला ओळखत नाही, असं भासवण्याचा तिचा प्रयत्न होता. हा माणूस पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या ग्वारा कमांडो युनिटचा महत्त्वाचा भाग होता.

लैला आणि तिचा साथीदार इसावी यांनी मुद्दामहून बिझनेस क्लासची तिकीटं बुक केली होती, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर कॉकपीटपर्यंत पोहोचता येईल.

लैला खालिद यांनी त्यांच्या 'माय पीपल शाल लिव' या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "मी आणि इसावी दूर बसलो होतो. यामुळे शिकागोत राहणारा ग्रीक अमेरिकन माणूस माझी अधिकच आस्थेने विचारपूस करू लागला.

त्याने मला सांगितलं की पंधरा वर्षं अमेरिकेत राहिल्यानंतर आईला भेटायला तो ग्रीसला जात होता. एकाक्षणी माझ्या मनात आलं त्याला सांगावं हे विमान सोडून दुसरं कोणतं तरी विमान पकड. पण मी तसं करण्यापासून स्वत:ला रोखलं."

लैला खालिद आणि इसावी कॉकपीटमध्ये

विमानात लैला आणि इसावी यांच्या जागा आसपासच होत्या. एअरहोस्टेसने लैला यांनी कॉफी आणि इसावी यांना बीअर दिली. यानंतर एअरहोस्टेसने खूप आग्रह केल्यानंतरही लैला यांनी काहीही खाल्लं नाही.

लैला एअरहोस्टेला म्हणाली, "मला थंडी वाजते आहे, पोटात दुखतं आहे. मला अतिरिक्त पांघरुण द्या." ते पांघरुण मिळताच लैलाने हँड ग्रेनेड आणि पिस्तूल त्याखाली लपवलं. पटकन या वस्तू हाताशी राहाव्यात म्हणून असं केलं.

'शूट द वूमन फर्स्ट' या पुस्तकाच्या लेखिका एलीन मॅक्डोनल्ड यांना दिलेल्या मुलाखतीत लैला म्हणाली, "जसं विमानात एअरहोस्टेस मंडळींनी खानपान सेवा सुरू केली तसं इसावी घाईघाईत कॉकपीटपर्यंत पोहोचला. त्यापाठोपाठ मीही हँडग्रेनेड हातात घेतलं. या गडबडीत एअरहोस्टेसच्या हातून ट्रे निसटला आणि ती जोरात ओरडली. त्याचवेळी माझ्या कमरेला लटकावलेलं पिस्तूल पँटमधून निघून विमानातल्या फ्लोअरवर जाऊन पडलं. मी आणि इसावी जोरात ओरडलो की फर्स्ट क्लास वर्गाच्या प्रवाशांनी इकॉनॉमी वर्गात जावं."

लैलाने विमान इस्रायलला नेण्याचा आदेश दिला

विमान ओलीस ठेवण्याच्या प्रक्रियेत लैला खालिदवर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलण्याचं काम होतं. सुरुवातीला लैलाने पायलटला विमान इस्रायलच्या लोद विमानतळावर न्यायला सांगितलं. आता याचं नाव डेव्हिड बेन गुरियो विमानतळ असं आहे.

जसं विमानाने इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश केला तसं विमानाच्या दोन्ही बाजूंनी इस्रायलची तीन मिराज विमानं बाजूला दिसू लागली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. इस्रायली विमानं आपल्या विमानाला पाडतील अशी भीती त्यांना वाटू लागली.

लैला यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं की या विमानाचा उल्लेख फ्लाईट TWA 840 न करता 'फ्लाइट PFLP फ्री अरब पॅलेस्टाईन' असा करा. विमानाच्या पायलटने तसा उल्लेख करण्यास नकार दिला. लैला हँडग्रेनेड दाखवल्यानंतर वैमानिकासमोर दुसरा पर्यायच उरला नाही.

दमास्कसच्या दिशेने नेण्याचा आदेश

लोद विमानतळाकडे जाण्याचा आदेश तिने इस्रायलला फसवण्यासाठी दिला होता. विमान लोदच्या वरून गेलं. खाली शेकडो इस्रायली सैनिक आणि रणगाडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी लैला खालिद यांनी पायलटला विमान दमास्कसला न्यायला सांगितलं.

वाटेत त्यांनी हेही सांगितलं की विमान त्यांचं जन्मस्थळ हायफावरूनही न्यावं.

लैला खालिद यांनी आत्मचरित्रात याविषयी लिहिलंय. जेव्हा मी आकाशातून पॅलेस्टाईन पाहिलं तेव्हा क्षणभर मी मोहिमेचा भाग आहे हे विसरून गेले. माझ्या मनात आलं की आजी, आत्या, मावशी यांना ओरडून सांगावं की आम्ही परत आलोय. पायलटने नंतर मला सांगितलं की विमान हायफावरून जात असताना त्याने माझ्या अंगावरचे रोमांच अनुभवले होते.

विमान स्फोटकांनी दिलं उडवून

दमास्कसच्या विमानतळावर हे विमान उतरलं आणि इसावीने विमानाच्या कॉकपीटमध्ये स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. पॅलेस्टाईनच्या मागण्यांकडे जगाचं लक्ष जावं यासाठी त्याने असं केलं.

लैला खालिदला पहिली महिला विमान हायजॅकर म्हटलं जातं. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की त्याआधी तीन वर्षांपूर्वी 1966 मध्ये कॉनडोर्स संघटनेच्या वतीने विमान हायजॅक करून फॉकलंड बेटावर घेऊन जाणारी महिला हायजॅकर होती.

एलीन मॅक्डोनल्ड पुस्तकात लिहितात, 'PFLPचं नेतृत्व या ओलीस प्रकरणामुळे मिळालेल्या प्रसिद्धीवर खूश होतं. त्यांनी स्टार कॉम्रेड लैला खलिदला मध्यपूर्वेतील देशांमध्ये पाठवलं. त्यांना माहिती होतं की इस्रायल लैला खलिद यांचं अपहरण करू शकतात. त्यांना मारुही शकतात. त्यावेळी त्यांना अरबस्तानात पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्याभोवती सुरक्षारक्षकांची फौज असे. लैला खलिद अरब दुनियेची नायिका झाली होती.'

चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी

लैलाने त्यानंतर नाक, गाल, डोळे आणि चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केली. जेणेकरून त्यांचा चेहरा ओळखू येणार नाही आणि नव्या मोहिमेसाठी त्यांना तयारी करता येईल.

सप्टेंबर 1970 मध्ये लैला लेबनॉनहून युरोपला रवाना झाली. 4 सप्टेंबरला स्टुटगार्टमध्ये त्यांची पॅट्रिक आरग्यूलो याच्याशी भेट झाली. पुढच्या ओलीस मोहिमेत लैलाचा तो साथीदार असणार होता. ते दोघं याआधी एकमेकांना कधीच भेटले नव्हते. 6 सप्टेंबरला न्यूयॉर्कचं तिकीट घेऊन ते स्टुटगार्टहून अमस्टरडॅमला गेले.

अमेरिकेत जन्मलेल्या आरग्यूलो मूळचा निकाराग्वा देशाचा होता. एमस्टरडॅमला न्यूयॉर्कला जाणाऱ्या इस्रायल एअरलाईन्सच्या ELAI 219 च्या बोइंग 707 ते दोघं बसले. सारा इरर्विंग या त्यांच्या 'लैला खालिद आयकॉन ऑफ पॅलेस्टाईन लिबरेशन'मध्ये लिहितात की, जेव्हा हे दोघं विमानात चढले तेव्हा त्यांना हे माहिती नव्हतं की ओलीस मोहिमेत त्यांना साहाय्य करतील यासाठी नेमलेल्या दोघांना ELAI ने जागा देण्यास नकार दिला आहे.

ओलीस प्रक्रिया आखताना हे ठरलेलं की ELAI चं विमान ओलीस ठेवायचं असेल तर आणखी दोन जणांची आवश्यकता भासेल. कारण त्यांच्या विमानात शस्त्रास्त्रंधारी जवान असतात. विमानात प्रवेश करण्याआधी तीनवेळा प्रवाशांची कसून तपासणी केली जाते.

पायलटने कॉकपीटचा दरवाजा बंद केला

लैला खालिद आणि तिचा साथीदार इकॉनॉमी क्लासमध्ये बसले होते. लैलाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आरग्यूलोला माहिती होतं की काय करायचं आहे आणि मलाही. आमच्याकडे शस्त्रास्त्रं होती. माझ्याकडे दोन हँडग्रेनेड होती. पॅट्रिककडेही एक हँडग्रेनेड होतं. मी अतिशय छोटा स्कर्ट घातला होता. त्याच्याआड सगळे नकाशे लपवले होते.

खालिदने कॉकपीटच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पायलटने दरवाजा आतून लॉक केला. डेव्हिड राब टेरर इन ब्लॅक सप्टेंबरमध्ये लिहितात की लैलाने खास तयार करण्यात आलेल्या ब्रा मधून दोन हँडग्रेनेड काढले. मात्र त्याचवेळी विमानातल्या मार्शल्सनी गोळीबार सुरू केला. पॅट्रिकने प्रत्युत्तर दिलं.

पॅट्रिकची गोळी मार्शल श्लोमो वाइडरच्या पायाला जाऊन लागली. यादरम्यान पॅट्रिकलाही गोळी लागली होती. खालिदवर दोन गार्ड आणि प्रवाशांनी हल्ला केला. लोकांनी लैलाला मारहाण करायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांच्या अनेक बरगड्या तुटल्या.

मार्शल्सनी गोळीबाराला सुरुवात केली

यादरम्यान हुशार वैमानिकाने विमानाची छोटी गिरकी घेतली. यामुळे तोल जाऊन लैला पडली. प्रवाशांवर याचा परिणाम झाला नाही. कारण त्यांचे सीटबेल्ट बांधलेले होते. विमान खूप खाली होतं. जेणेकरून विमानात ग्रेनेडचा स्फोट झाला असता तर केबिनमध्ये डिप्रेशराईज्ड होणार नाही आणि कमीत कमी नुकसान होईल.

त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत लैलाने बीबीसीला सांगितलं "अर्ध्या तासानंतर आम्ही उठून उभे राहिलो. दाताने हँडग्रेनेडची पिन काढायचा प्रयत्न करू लागलो. जसं आम्ही उभं राहून ओरडलो तसं मार्शल्सनी गोळीबाराला सुरुवात केली. मी पाहिलं की कॉकपीटच्या मॅजिक आयमधून कोणीतरी आम्हाला पाहत होतं.

मी त्यांना इशारा दिला की मी तीनचा पुकारा करेन. तुम्ही कॉकपीटचा दरवाजा उघडला नाही तर मी विमान उडवून देईन. पण मला विमान उडवून द्यायचं नव्हतं. त्यांनी दरवाजा उघडला नाही. काही मिनिटात कोणीतरी माझ्या डोक्यावर मागून वार केला आणि मी बेशुद्ध झाले."

लंडनमध्ये आपात्कालीन लँडिंग

लैला लिहिते, "मार्शल रक्ताने माखलेल्या ऑरग्यूलोच्या शरीरावर उभा होता. त्याने त्याच्या पाठीत चार गोळ्या घातल्या.

घायाळ मार्शल श्लोमो वाइडर यांची प्रकृती लक्षात घेऊन वैमानिकांनी लंडनमध्ये आपात्कालीन लँडिंग केलं. काही क्षणात ELAIचं दुसरं विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून उड्डाण करणार होतं.

डेव्हिर राब टेरर इन ब्लॅक सप्टेंबरमध्ये लिहितात, ऑरग्यूलोवर गोळीबार करणारे मार्शल बार लेवाव यांना विमानातून उतरवून दुसऱ्या ELAIच्या विमानात नेण्यात आलं. जेणेकरून ते ब्रिटिश अधिकारक्षेत्राच्या बाहेर जातील आणि ऑरग्यूलोच्या मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरलं जाणार नाही.

लैलाला काही प्रवाशांच्या टायच्या साह्याने बांधून जबरदस्तीने विमानातल्या फ्लोअरवर झोपवण्यात आलं. लैलाचं नशीब चांगलं की इस्रायलच्या सुरक्षायंत्रणांनी तिला अटक केली नाही. ब्रिटिश पोलिसांनी तिला अटक केली.

विमान लँड होताच ऑरग्युलोचा मृतदेह एका शववाहिकेत नेण्यात येणार होता. लैलाने आपल्या आत्मचरित्रात याविषयी लिहिलं आहे. तिने लिहिलं, 'मी सुरक्षायंत्रणेला विनंती केली की माझे हात थोडा वेळ मोकळे सोडा. मी ऑरग्युलोच्या मृतदेहाभोवती जाऊन उभी राहिले. मी त्याच्या जखमांचा अंदाज घेतला. मैत्रीच्या नात्याने मी त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं. त्यानंतर मी रडू लागले. माझ्यासाठी तो क्षण अतिशय दु:खद होता कारण त्याच्या जागी मला मरायचं होतं. कारण ही आमची लढाई होती. तो केवळ मदत करण्यासाठी आला होता.'

तुरुंगात देण्यात आली चांगली वागणूक

लैलाला लंडनच्या ईलिंग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. चीफ सुपरिटेंडंटने तिची चौकशी केली. तुरुंगात तिला चांगली वागणूक देण्यात आली. काही महिला कर्मचारी लैलासह टेबल टेनिस खेळल्या.

लैलाने वाचण्यासाठी काही पुस्तकं मागवली. त्यांना वाचायला काही मजकूर देण्यास आला तेव्हा लैला नाराज झाल्या. त्यांनी ती पुस्तकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना वर्तमानपत्रं देण्यात आली. लैला यांना आंघोळीसाठी स्टेशन चीफसाठीचं बाथरुम देण्यात आलं. त्यांना साफ कपडे आणि टॉवेलही देण्यात आला.

त्यांच्या खोलीत एका गार्डला तैनात करण्यात आलं, त्यावेळी लैला यांनी नाराजी व्यक्त केली. मी स्वत:ला मारणार नाही, मला आणखी मोहिमांमध्ये सहभागी व्हायचं आहे, असं लैलांनी सांगितलं.

थोडी मोकळी हवा खायची आहे, असं लैलांनी सांगितल्यानंतर त्यांना तुरुंगाच्या वरच्या मजल्यावर नेण्यात आलं. तिथं त्यांना दररोज रॉथमन सिगारेट पिण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना दिवसाला सहा सिगारेट पुरवण्याची व्यवस्था केली.

लैलाला सोडवण्यासाठी ब्रिटिश विमान ओलीस

लैलांची चौकशी सुरू असताना डेविड प्रिऊ यांनी तिला सांगितलं की ELAI व्यतिरिक्त स्विस एअर, TWA, PANAM आणि ब्रिटिश एअर या कंपन्यांच्या विमानांचं अपहरण करण्यात आलं आहे.

हे ऐकल्यावर लैला म्हणाल्या, ब्रिटिश एअर कंपनीचं विमान ओलीस ठेवण्याची कोणतीही योजना नव्हती. प्रिऊ यांनी सांगितलं की 9 सप्टेंबरला बहरीनहून लंडनला येणाऱ्या ब्रिटिश एअरच्या विमानाला हायजॅक करून जॉर्डनमधल्या डॉसन फील्ड इथे नेण्यात आलं आहे.

त्यांच्या मागण्या काय आहेत असं लैलांनी विचारलं. प्रिऊ म्हणाले, तुझी सुटका हीच त्यांची मागणी आहे. 28 सप्टेंबरला पोलिसांनी लैलांना रडताना पाहिलं. त्यादिवशी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष जमाल अब्दुल नासेर यांच्या मृत्यूची बातमी आली होती.

लैलाची सुटका

ब्रिटिश सरकारने ओलीस ठेवण्यात आलेल्या 114 प्रवाशांच्या बदल्यात लैलांची सुटका केली. 24 दिवस ब्रिटिश तुरुंगात राहिल्यानंतर 1 ऑक्टोबर 1970 रोजी लैलांना घेऊन रॉयल एअरफोर्सच्या विमानाने उड्डाण केलं.

त्याआधी 12 सप्टेंबरला हायजॅक करण्यात आलेल्या विमानांना डॉसन फील्ड क्षेत्रात स्फोटकांनी उडवून देण्यात आलं.

तू जे केलंस त्याचं तुला दु:ख होत नाही का? असं बीबीसीतर्फे विचारण्यात आलं. तेव्हा 'अजिबातच नाही' असं लैलांनी उत्तर दिलं.

तुमच्यामुळे विमानातले शेकडो प्रवाशांना घाबरले. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. विमानाचा स्टिवर्ड गंभीररीत्या जखमी झाला. यावर लैला म्हणाली, त्या सगळ्यांना त्रास झाला त्याकरता मी त्यांची माफी मागू शकते. पण ते सगळे सुरक्षित आहेत. या कारवाईचा उद्देश त्यांना त्रास देणं हा नव्हता. मात्र तुमच्या हेही लक्षात आलं असेल की एक माणूस म्हणून मानवाधिकाऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होते आहे.

77 वर्षीय लैला सध्या अम्मानमध्ये राहतात. त्यांनी डॉक्टर फयाज रशीद हिलाल यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला बदर आणि बशर नावाची दोन मुलं आहेत.

त्यांना आता पाहून कोणाला असं वाटणार नाही की हातात एके47 बंदूक घेतलेली ही महिला पॅलेस्टाईनच्या संघर्षाची पोस्टरगर्ल होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)