You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेफ्टाली बेनेट : 7 खासदारांच्या बळावर इस्रायलचे पंतप्रधान बनणारे नेफ्टाली आहेत तरी कोण?
नेफ्टाली बेनेट यांची नजर दीर्घकाळापासून इस्रायलच्या पंतप्रधान पदावर होती आणि आता ते यात यशस्वी झाले आहेत. गेल्यावेळेस सार्वत्रिक निवडणुकीत नेफ्टाली यांच्या यामीना पक्षाने मोजक्याच जागा जिंकल्या होत्या. पण आताच्या राजकीय परिस्थितीत ते किंगमेकर ठरले आहेत.
यासोबतच आता बेंजामिन नेतन्याहू यांना इस्रायलचे पंतप्रधानपद गमवावे लागले आहे. 12 वर्षांपासून ते इस्रायलचे पंतप्रधान होते. इस्रायलच्या संसदेत नव्या आघाडीच्या बाजूने बहुमत सिद्ध झाल्याने बेंजामिन नेतन्याहू यांना पायउतार व्हावे लागले.
नेतन्याहू यांनी शेवटपर्यंत आशा सोडली नसल्याचं चित्र दिसलं. कारण विरोधी आघाडीला 60 प्रतिनिधिंचे समर्थन मिळाले तर बेंजामिन नेतन्याहू यांना 59 प्रतिनिधिंचा पाठिंबा मिळाला.
नेतन्याहू सरकारमध्ये नसले तरी ते लिकुड पक्षाचे प्रमुख आहेत. तसंच इस्रायल संसदेत नेते आणि विरोधी पक्षनेते असणार आहेत.
नेफ्टाली बेनेट यांचा पक्ष सात खासदारांसह पाचव्या क्रमांकावर आहे, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते किंगमेकरच्या भूमिकेत होते आणि म्हणूनच त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामिना पक्षासह आणखी तीन पक्ष आहेत ज्यांचे प्रत्येकी सात खासदार आहेत.
इस्रायलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नेफ्टाली यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. कारण कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. नव्या आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास ते नेफ्टाली बेनेट यांच्याशिवाय स्थापन होणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते.
नेफ्टाली बेनेट यांना पंतप्रधानपदाची वाटणी बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते येर लेपिड यांच्यासोबत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण त्यांनी शेवटी मध्यमार्गी येर लेपिडबरोबर जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा की दोघांची विचारधारेच्या भिन्न आहे.
49 वर्षीय नेफ्टाली एकेकाळी बेंजामिन नेतन्याहू यांचे विश्वासू मानले जात होते. नेतन्याहू यांच्याशी फारकत घेण्यापूर्वी नेफ्ताली 2006 ते 2008 या काळात इस्रायलचे चीफ ऑफ स्टाफ होते.
नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षातून बाहेर पडल्यानंतर नेफ्टाली उजव्या विचारसरणीच्या धार्मिक यहूदी होम पार्टीत गेले. 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेफ्ताली यांचा विजय झाला आणि ते इस्रायली संसदेचे सदस्य बनले.
नेफ्टाली बेनेट यांचे आई-वडील अमेरिकेतल्या सान फ्रान्सिस्को इथून इस्रायलला आलेले स्थलांतरीत आहेत. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात त्यांनी अब्जावधींची कमाई केली.
ते एका इस्रायली सेटलर गटाचे प्रमुख होते. सेटलर म्हणजे इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी भूभागावर राहणारे इस्रायली नागरीक.
2019 पर्यंत आघाडीच्या प्रत्येक सरकारमध्ये नेफ्टाली मंत्री बनले. 2019 मध्ये नेफ्ताली यांच्या नव्या आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. 11 महिन्यांनंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि यामिना पक्षाचे प्रमुख म्हणून नेफ्टाली बेनेट संसदेत पोहोचले.
नेतन्याहू बेंजामिन यांच्यापेक्षा नेफ्ताली बेनेट अधिक राष्ट्रवादी आणि उजव्या विचारसरणीचे मानले जातात. नेफ्टाली बेनेट हे इस्रायल ज्यू राष्ट्र असल्याची बाजू घेतात. त्याचबरोबर त्यांनी वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि सीरियन गोलान हाइट्स यांनाही ज्यू इतिहासाचा एक भाग असल्याचे ही वर्णन केले आहे.
1967 च्या मध्यपूर्वेतील युद्धानंतर या भागांवर इस्रायलचे नियंत्रण आहे. नेफ्टाली पश्चिम किनाऱ्याजवळ ज्यूंच्या वास्तव्याचे समर्थन करतात आणि त्याबद्दल त्यांची भूमिका कायम आक्रमक राहिली आहे.
पण ते गाझावर कोणताही दावा करत नाहीत. 2005 मध्ये इस्रायलने येथून सैन्य मागे घेतले होते. पश्चिम किनारा आणि पूर्व जेरुसलेममधील 140 वस्त्यांमध्ये सहा लाखाहून जास्त ज्यू राहतात. या वस्त्यांना जवळपास संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय बेकायदेशीर मानतो. पण इस्रायलचा याला नकार आहे.
पॅलेस्टिनी आणि इस्रायल यांच्यातील वस्त्या निश्चित करणे हा सर्वात वादग्रस्त मुद्दा आहे. पॅलेस्टिनी या वस्त्यांमधून ज्यूंना काढून टाकण्याची मागणी करत आहेत आणि पश्चिम किनारा, गाझा सह स्वतंत्र देश ज्याची राजधानी पूर्वी जेरुसलेम असेल अशी त्यांची मागणी आहे.
नेफ्ताली बेनेट यांचा या मागणीला तीव्र विरोध आहे. ज्यूंच्या वस्त्या वेगाने वसवल्या जाव्यात ही त्यांची भूमिका आहे. नेफ्ताली यांना असे वाटते की ज्यूंना वास्तव्य देण्याच्या मुद्यावर नेतन्याहू यांचे धोरण विश्वासार्ह नाही.
नेफ्टाली उत्तम इंग्रजी बोलतात आणि बऱ्याचदा परदेशी टीव्ही नेटवर्कवर दिसतात. ते कायम इस्रायली कृतींचे समर्थन करतात. देशांतर्गत माध्यमांच्या डिबेटमध्ये नेफ्ताली आक्रमकपणे भूमिका मांडतात.
अरब-इस्रायलच्या एका खासदाराने म्हटलं होते की, इस्रायलला पश्चिम किनाऱ्यावर ज्यूंच्या वस्त्या वसवण्याचा कोणताही अधिकार नाही. या वक्तव्याचा निषेध करत नेफ्ताली म्हणाले, तुम्ही झाडावर पाळणा खेळत असल्यापासून येथे एक ज्यू राज्य आहे.
इस्रायलच्या लगत असलेल्या पॅलेस्टिनी देशाची मागणी नेफ्ताली फेटाळून लावतात. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय समुदाय या दोन देशांच्या सिद्धांताकडे इस्रायल आणि पॅलेस्टिनींच्या समस्येवर उपाय म्हणून पाहतात.
अमेरिकाही दोन देशांच्या सिद्धांताचा पुरस्कार करत आली आहे आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडन सुद्धा समर्थनार्थ असल्याचे दिसते.
कठोर पावलांचे समर्थन करणारे
फेब्रुवारी 2021 मध्ये नेफ्टाली यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, "जोपर्यंत मी कोणत्याही स्वरूपात सत्तेत आहे, तोपर्यंत एक सेंटीमीटर जमीन सुद्धा मिळणार नाही." पश्चिमी किनाऱ्यात इस्रायलची पकड आणखी मजबूत करण्याचे समर्थन नेफ्ताली करतात. नेफ्ताली पश्चिम किनाऱ्याच्या जागेला हिब्रूमध्ये जुडिया आणि सामरिया बोलतात.
पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी नेफ्ताली अधिक कडक पावलं उचलणार असल्याची चर्चा आहे. ते फाशीच्या शिक्षेचाही पुरस्कार करतात. ज्यूंच्या नरसंहाराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या अडॉल्फ आयशमन यांना 1961 मध्ये इस्रायलमध्ये शेवटची फाशी देण्यात आली होती. तेव्हापासून कोणालाही फाशीची शिक्षा झालेली नाही.
2018 मध्ये गाझाचे प्रशासक हमास बरोबर झालेल्या युद्धबंदी कराराला नेफ्टाली बेनेट यांनी विरोध दर्शवला होता. मे महिन्यात 11 दिवस हमासशी झालेल्या हिंसक संघर्षासाठी त्यांनी पॅलेस्टिनींना जबाबदार धरले आहे.
नेफ्टाली बेनेट यांच्या राजकारणात ज्यूंचा अभिमान आणि राष्ट्रवादाला सर्वाधिक महत्त्व आहे. ते डोक्यावर किप्पा घालतात. याने धार्मिक यहुदी आपले डोके झाकतात.
2014 मध्ये पक्षाच्या प्रचारात नेफ्ताली यांनी न्यूयॉर्क टाईम्स आणि डाव्या विचारसरणीचे वृत्तपत्र हारेट्झची नक्कल करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दोन्ही वृत्तपत्रांनी इस्रायलच्या कारवाईंवर टीका केली होती.
या व्हीडिओमध्ये नेफ्टाली बेनेट न्यूयॉर्क टाईम्स आणि हारेट्झची चेष्टा करताना आणि सॉरी बोलताना दिसत होते. व्हीडिओच्या शेवटी नेफ्टाली यांनी घोषणा केली की ते आता माफी मागणार नाहीत.
नेफ्टाली यांची पार्श्वभूमी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सुरुवातीला लष्कर आणि व्यावसायिकाची होती. लष्करात असताना त्यांनी इस्रायली विशेष दलाच्या दोन शाखांमध्ये काम केले आहे. लष्करात काम केल्यानंतर त्यांनी अनेक हायटेक कंपन्या स्थापन केल्या आणि भरपूर पैसा कमावला.
2014 मध्ये एका मुलाखतीत नेफ्टाली यांनी आपल्या मालमत्तेबद्दल म्हटलं, "मी 17 स्टिक्स खात नाही किंवा माझ्याकडे खासगी विमानही नाही. माझी ऐपत एवढीच आहे की मला जे करायचे आहे ते मी करू शकतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)