भारत-चीन सीमावाद : आता 'LAC'चं रूपांतर 'LOC' मध्ये झालंय का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान गेल्यावर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर एलएसी (Line of actual control) म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचं वातावरण आहे.
या तणावामुळं सीमेला लागून असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी चीननं ज्या वेगानं काम केलं त्याच वेगानं भारतालाही पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील, असं मत काही संरक्षण तज्ज्ञांनी मांडलं आहे.
मात्र, भारताला लागून असलेल्या सीमेवर चीननं अचानक असं काहीही केलं नसून गेल्या दोन दशकांपासून हळूहळू चीननं इथं पायाभूत सुविधांचं जाळं तयार केलं आहे, असं काही तज्ज्ञ सांगतात.
विविध वादांमुळे भारत आणि चीन यांच्यात अजून सीमा निश्चिती होऊ शकलेली नाही. मात्र, 'जैसे थे' परिस्थिती कायम ठेवण्यासाठी 'प्रत्यक्ष नियंत्रण रेषा' म्हणजेच 'लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल' (LAC) या संज्ञेचा वापर करण्यात येतो. ही 'लाईन ऑफ अॅक्च्युल कंट्रोल'ही अजून स्पष्ट नाही. दोन्ही देश आपापल्या वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सांगतात.
LAC आणि LOC म्हणजे नेमकी कोणती रेषा? जाणून घेण्यासाठी वाचा - LAC, LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डर यामध्ये नेमका फरक काय असतो?

भारतानं चीनला लागून असलेल्या सीमेवर सैनिकांचं प्रमाण वाढवलं आहे, असा दावा ब्लूमबर्गमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, "भारतानं चीनच्या 'प्रत्यक्ष नियंत्रण रेषा' म्हणजे 'एलएसी' वर पन्नास हजार अधिक सैनिक तैनात केले आहेत.''
दोन्ही बाजूंनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात असणं ही चिंतेची बाब आहे, असं ब्लूमबर्गनं उत्तर भागातील माजी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांचा दाखला देत म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सीमेवर दोन्ही बाजूंचं सैन्य वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करू शकतं. त्यामुळं एखादी अगदी लहान घटना घडली तरी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
दर 200 किमीवर धावपट्टी
युद्धविषयकबाबींचे तज्ज्ञ असणारे जेष्ठ पत्रकार अभिजीत मित्रा अय्यर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "भारताने उशिरा का होईना, पण गेल्या दोन वर्षांपासून चीनला लागून असणाऱ्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात केली आहे. मात्र तरीही भारत आणि चीनची तुलना केली जाऊ शकत नाही."
"चीननं LAC ला लागून असलेल्या त्यांच्या ताब्यातील भागात रस्त्यांचं जाळं तयार केलं आहे. शिवाय त्याचबरोबर संपूर्ण सीमेलगत विमानांसाठीच्या धावपट्ट्या तयार केल्या आहेत."
अय्यर यांनी चीन आणि भारतादरम्याच्या युद्धविषयक मुद्द्यांचाही अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, चीननं सीमाभागामध्ये प्रत्येक 200 किमीच्या अंतरावर धावपट्टी तयार केली आहे. तिथून लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकतात.

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY/Getty Images
"एवढ्या उंचीवर हे सर्व तयार केल्यामुळं निश्चितच चीनच्या लष्करी सामर्थ्यात वाढ झाली. तिबेटच्या पठारी भागामध्येच चीननं दर 250 ते 300 किलोमीटर अंतरावर धावपट्ट्या तयार केल्या आहेत, तसंच अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीवर त्यांच्या ताब्यातील भागातही काही ठिकाणी 100 ते 150 किमी अंतरावर धावपट्ट्या आहेत," असं ते सांगतात.
भारत-चीन सीमेवर चीनच्या बाजूनं नेमके किती सैनिक तैनात आहेत, याचा स्पष्ट आकडा उपलब्ध नाही. मात्र, चीननं सैनिकांची संख्या अनेक पटींनी वाढवली असल्याचं वृत्त मात्र समोर आलं आहे.
"पठारावरील दुर्गम भागांमध्ये लढाऊ विमानं तैनात करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी बॉम्बरोधक बंकर तयार केले जातात. चीननं ते केले आहेत. त्यामुळं या लढाऊ विमानांचं संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करता येऊ शकतं. चीननं एलएसीच्या भागात अनेक ठिकाणी बोगदे तयार केले आहेत. त्याचा वापर टँक आणि क्षेपणास्त्रांच्या वाहतुकीसाठी होत असल्याची माहितीही मिळाली आहे," असं अय्यर यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"चीन आणि भारतादरम्यानची परिस्थिती अगदी सामान्य आहे. दोन्ही देशांच्या दरम्यान सीमेवरही परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं काम सुरू आहे,'' असं चीनमधील शासकीय वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेन्बिंग यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
संबंध सुधारण्याची आशा?
सीमेबाबत सुरू असलेला वाद संपावा आणि आपसांतील संबंधांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी दोन्ही देशांनी कमांडर स्तरावरील 12 व्या फेरीच्या चर्चेसाठी चांगली तयारी करायला हवी,'' असं मत शांघायच्या 'इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीज'चे संचालक जाओ गेन्चेंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना व्यक्त केलं.
दोन्ही देशांदरम्यान असलेला चर्चेचा मार्ग अद्याप खुला आहे ही चांगली बाब आहे. दोन्ही देशांनी याचा फायदा घ्यावा, असंही ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
मात्र, ''चर्चा म्हणजे चीनकडून केली जाणारी सर्वात मोठी फसवणूक आहे,'' असं युद्धनीती तज्ज्ञ हर्ष व्ही पंत म्हणतात.
त्यांच्या मते, 'हिंदी-चीनी भाई-भाई' ची घोषणा देत चीननं 1962 मध्ये युद्ध पुकारलं होतं. त्यानंतर गेल्या पाच दशकांमध्ये भारताला असं वाटत राहिलं की, पाकिस्तानला लागून असलेली सीमा हीच सर्वाधिक संवेदनशील आहे.
"भारताने संपूर्ण लष्करी शक्ती पाकिस्तानकडून असलेल्या संभाव्य धोक्यांचा विचार करून तैनात केली. मात्र चीनने भारताबरोबर चांगले संबंधही कायम ठेवले, शिवाय सोबतच सीमेवर लष्करी सामर्थ्यातही वाढ करणं सुरुच ठेवलं. चीनबरोबरचे संबंध चांगले असून त्यांच्याकडून धोका नाही, असंच भारताला वाटत राहिलं. मात्र हीच सर्वात मोठी चूक ठरली आणि चीनचं भारतीय सीमेमध्ये अतिक्रमण सुरू राहिलं,'' असंही ते म्हणाले.
चीनवरचा दबाव कसा वाढवणार?
चीननं भारताबाबत 1959 मध्ये जे मत तयार केलं होतं आणि जी रणनिती आखली होती, आजही चीन त्यावरच ठाम आहे. लष्कराच्या कमांडर स्तरावरील चर्चा सुरू असली, तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, हेही त्यांना माहिती आहे. पण जर भारतानं सीमेवर लष्करी सामर्थ्य वाढवणं सुरुच ठेवलं, तर त्याचा नक्कीच परिणाम होईल, अशा चर्चाही आता सुरू झाल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नुकताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारताचे लष्करप्रमुख यांनीही लडाखमधील काही भागांचा दौरा केला होता. त्यांनी या दौऱ्यात तैनात असलेल्या भारतीय सैन्याचा आढावा घेतला.
चीन ज्याप्रकारचं धोरण अवलंबत आहे, त्याच प्रकारच्या धोरणाचा अवलंब करून चीनशी दोन हात करता येणं शक्य असल्याची जाणीव भारताला आता होऊ लागल्याचं, अय्यर सांगतात.
चीननं जर पुन्हा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्यानंही 'एलएसी' ओलांडून त्यांच्या नवीन भागावर ताबा मिळवण्याचं धोरण अवलंबण्यासाठी तयार राहावं, असंही ते म्हणतात.
'ग्लोबल टाइम्स'मधील वृत्तानुसार या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनच्या लष्करानं म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या 'शिन्जियांग मिलिट्री कमांड' नं 'टाईप 15 श्रेणीतील लाइट टँक, हाउविटझर, लांबच्या पल्ल्याची क्षमता असलेले रॉकेट लाँचर आणि एअर डिफेन्स सिस्टिम, भारताच्या सीमेवर तैनात करण्यास सुरुवात केली होती.
ही सर्व परिस्थिती पाहता भारतानं आता 'एलएसी'लाच 'एलओसी' म्हणजे पाकच्या सीमेप्रमाणं समजायला हवं आणि त्याच पद्धतीनं लष्करही सज्ज ठेवायला हवं. कारण आता 'एलएसी' हीच नवी 'एलओसी' बनली आहे, असं पंत म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








