भारत-चीन सीमावाद : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर वर्षभरात काय काय घडलं?

भारत, चीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत-चीन संघर्ष
    • Author, जुगल पुरोहित
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

2017 च्या उन्हाळ्यात सिक्किमजवळील डोकलाम पठारावर भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. त्यानंतर एक अनौपचारिक संमेलन झालं, जे दोन्ही देशांमध्ये सौहार्दाचं नातं निर्माण करण्यास महत्त्वाचं ठरलं होतं.

त्यानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर असताना भारतातील ऐतिहासिक स्थळांच्या भेटीदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास हातात हात घालून फिरले. भारत आणि चीनमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद असतानाही हे घडलं.

आणि मग गलवान खोऱ्यातल्या झटापटीची घटना घडली.

आजपासून बरोबर एका वर्षापूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. गेल्या चार दशकात पाहायला न मिळालेली हिंसा या दिवशी घडली होती.

10 मे, 2020

याच दिवशी झटापट झाल्याची काही संकेत मिळाले. जागा तीच होती, जी दोन्ही देशात निर्धारित नसलेली आणि निराकरण न केलेली सीमा.

द ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, भारत आणि चीन या दोन अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. या घटनेचा पूर्व लडाखमध्ये मोठा परिणाम झाला.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, उत्तर सिक्किममध्ये शनिवारी झालेल्या झटापटीत अनेक भारतीय आणि चिनी सैनिक भिडले. काही सैनिक जखमी झाले.

भारत, चीन

फोटो स्रोत, SOPA Images

फोटो कॅप्शन, सैनिक पहारा देत असताना

अशी काही घटना घडल्याचा अंशत: स्वीकार, मग पँगाँग त्सो तलावाजवळ झटापट झाल्याचं नाकारणं ते अगदी पत्रकारांना 'अफवा आणि प्रचार' टाळण्याचा सल्ला देण्यापर्यंत.. या घटनेबाबत पत्रकारांना माहिती देताना भारतीय लष्कराचे प्रवक्ते वेगवेगळ्या भूमिका मांडल्या.

14 मे, 2020

भारताचे लष्करप्रमुख एम एम नरवणे यांनी एक पत्रक जारी केलं.

या पत्रकात म्हटलं होतं की, "या दोन्ही घटनांचा एकमेकांशी ना संबंध आहे, ना जागतिक किंवा स्थानिक कारवायांशी त्यांचा संबंध आहे. मी विश्वासानं सांगू शकतो की, उत्तरेकडील सीमेवरील पायाभूत सुविधांचा विकास प्रगतीपथावर आहे."

21 मे, 2020

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं भारताच्या हालचालींना 'अतिक्रमण आणि उल्लंघन करणाऱ्या' संबोधलं.

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीचं द्श्यं. चीनने फेब्रुवारी 2021 मध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीचं द्श्यं. चीनने फेब्रुवारी 2021 मध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

दिल्लीत भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं की, चीनच्या बाजूने भारताच्या गस्त घालण्याच्या पद्धतीत बाधा आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

6 जून, 2020

या दिवशी लडाखमध्ये भारत आणि चीनचे राजनैतिक अधिकारी आणि लष्करी कमांडर समोरासमोर चर्चेसाठी आले. अनेक बैठकांमधील ही पहिली बैठक होती.

भारताकडून सांगण्यात आलेली माहिती त्यावेळची परिस्थिती समजवत होती : "दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहे आणि नुकत्याच झालेल्या ठरावानुसार हे संबंध आणखी विकसित करण्यास हातभार लावला जाईल हे मान्य केले."

त्यावेळी चीननं म्हटलं की, "वाटाघाटी आणि सल्लामसलत करून संबंधित गोष्टी योग्यरित्या सोडवण्याची इच्छा आणि क्षमता दोन्ही देशांमध्ये आहे."

भारत-चीन तणाव

फोटो स्रोत, Getty Images

उत्तरी कमांडचे प्रमुख राहिलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी म्हटलं, "पूर्वीप्रमाणेच हेही शांततेनं सोडवलं जाईल, असं वाटत होतं. त्यामुळे कदाचित या घटनेला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला."

16 जून 2020

हा पूर्ण दिवस अफवांचा होता असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. बऱ्या ठिकाणी झटापटी झाल्यात, सीमेवर अशांतता आहे, अशा अफवा दिवसभर सुरू होत्या.

मग दुपारी 1 वाजता भारतीय लष्करानं म्हटलं की, "गलवान खोऱ्यात डिएस्कलेशनची प्रक्रिया सुरू असताना, काल रात्री हिंसक झटापट झाली आणि दोन्हीकडील सैन्यांना दुखापत झालीय. भारताच्या एका अधिकाऱ्याचा आणि दोन सैनिकांचा या मृत्यू झाला."

रात्री 10 वाजल्यानंतर भारतीय लष्करानं आपलं पत्रक बदललं.

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात डिसएंगेजमेंटची घोषणा करतानाच भारतीय लष्करानं म्हटलं की, "लाईन ऑफ ड्युटीवरील 17 भारतीय सैनिकांना गंभीर दुखापत झाली होती आणि तिथं शून्याच्या खाली तापमान असल्यानं त्यांचं निधन झालं. एकूण 220 जणांचा मृत्यू झाला."

दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 17 जून 2020 रोजी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, "15 जून रोजी भारतीय सैन्यानं अवैध कारवायांसाठी LAC पार केली आणि चिनी सैन्याला उकसवलं, तसंच हल्ला केला. यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली आणि त्यातून जीवितहानी झाली."

विशेष म्हणजे, भारतासारखं चीननं त्यांच्या सैनिकांना झालेली दुखापत किंवा जीवितहानी जाहीर केली नाही.

लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्यानं भारताच्या सरकारी प्रसारमाध्यमाने ट्वीट केलं की, "चीनच्या 45 हून अधिक सैनिकांची हानी झालीय. मेजर जनरलच्या स्तरावर गलवानची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चर्चा होत आहे. भारताचा कुठलाच सैनिक बेपत्ता नाहीय."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"हे स्पष्ट आहे की, आपण चीनचे संकेत चुकीच्या पद्धतीने वाचले. केवळ लष्करानेच नव्हे, तर राजकीय नेतृत्त्वानेही. जेव्हा गलवान घडलं, तेव्हा कळलं की हे सर्वसामान्य नाहीय. मात्र हे कौतुकास्पद आहे की, लष्कर किती तातडीने एकत्र झालं," असं जनरल हुडा म्हणाले.

मग गलवान खोऱ्यातील झटापट कशामुळे झाली?

सिम टॅक हे भूराजकीय विश्लेषक म्हणून काम करतात. त्यांनी मला सांगितलं, "चीन काय करतंय यावर लक्ष ठेवताना आम्ही वेगवेगळ्या सॅटेलाईट इमॅजेरी प्रोव्हायडर्सवरून सॅटेलाईट इमेज पाहत होतो. चीननं गलवान खोऱ्यात घुसखोरी केल्याचं पाहू शकत होतो. गलवान खोऱ्याच्या हद्दीत पेट्रोल पॉईंट 14 पर्यंत तात्पुरती सुविधा उभारण्या सुरुवात केली होती. चीनच्या स्थितीबद्दल आणि तिथल्या संघर्षाबद्दल आमच्याकडे सर्व अहवाल होते. त्यानंतर आम्ही पाहिलं की चीननं पीपी 14 सोडलं आहे."

"मात्र, चिनी सैन्यानं गलवान खोऱ्यातून माघार घ्यायला सुरुवात केली, आणि त्याचवेळी आम्ही पाहिलं की, अक्साई चीनमध्ये विस्तार सुरू ठेवलं," असं ते सांगतात.

19 जून, 2020

चीनला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वपक्षीय बैठकीसमोर सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आपल्या भूभागात कुणीही प्रवेश केला नाही, कुणीही घुसखोरी केलेली नाहीये आणि आपल्या कुठल्याच चौक्यांवर कुणी नियंत्रण मिळवलं नाही."

याचवेळी चीननं दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, "भारत एप्रिल 2020 पासून LAC जवळ सुविधांचं बांधकाम करत होता आणि आम्ही त्यावर आक्षेप घेतला होता."

गलवान, लद्दाख

फोटो स्रोत, Getty Images

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे माजी अधिकारी आणि स्वतंत्र भाष्यकार सन शी यांनी बीबीसी चायनिजशी बोलताना म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मान्य केलंय की सैनिक सीमेच्या पलिकडे गेले नाहीत. मात्र, या संघर्षानं भारताला पाश्चिमात्य देशांच्या गटात ढकललं आहे. चीनचा हा हेतू नव्हता. खरंतर या संघर्षानंतर चीननं आपल्या सैन्याची जीवितहानी तातडीने जाहीर केली नव्हती. कारण चीनला हे प्रकरण मोठी बातमी होऊ द्यायची नव्हती."

3 जुलै, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमध्ये जाऊन सैनिकांना भेटले. त्यांनी हा संघर्ष मानवतावाद आणि विस्तारीकरणवाद्यांमधील असल्याचं म्हटलं. पण त्यांनी चीनचं नाव घेतलं नाही.

31 ऑगस्ट 2020

… भारताने आपली स्थिती बळकट करण्यासाठी उपाययोजना आखल्या. भारताने नंतर हे मान्य केलं की ही नियोजनबद्ध, विचारपूर्वक केलेली कार्यवाही होती. प्रतिस्पर्ध्याला चकित करत आक्रमण केल्याने भारताला वरचष्मा मिळवता आला.

पुढच्याच दिवशी चीन सरकारने सांगितलं की भारताने पँगाँग त्सो तलाव आणि रेक्विन पर्वतराजी परिसरात बेकायदेशीरपणे नियंत्रणरेषा ओलांडली. भारत-चीन सीमारेषेच्या पश्चिम भागात हा परिसर मोडतो.

5 सप्टेंबर 2020

सगळ्या घडामोडींचा रोख रशियाच्या दिशेने वळला. कारण पाचच दिवसात दोन्ही देशांचे संरक्षण तसंच परराष्ट्र मंत्री यांची मॉस्कोत भेट झाली.

परिस्थिती चिघळली कारण दोन्ही देशांनी एकमेकांवर इशारा धुडकावून गोळीबार केल्याचा आरोप केला.

भारत-चीन तणाव

फोटो स्रोत, Getty Images

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले, परिस्थिती फारच धोकादायक वळणावर आहे. चीन आणि भारत या दोन्ही देशांशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

कोणत्याही स्वरुपाचा विदेशी हस्तक्षेप झाला नाही मात्र दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारउदिमाने आशा जागवली.

22 सप्टेंबर 2020

भारत आणि चीनच्या लष्कराने पहिल्यांदाच संयुक्त निवेदन जारी केलं. दोन्ही बाजूंनी लष्कराची कुमक उभी करण्याचं थांबवणं मान्य केलं.

15 जानेवारी 2021

आर्मी डे च्या पूर्वसंध्येला बोलताना जनरल नरवणे म्हणाले की, आपल्या क्षमतांची पुनर्उभारणी करून वाढवण्याची आवश्यकता असल्याचं या सगळ्या परिस्थितीतून हे स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये लडाख क्षेत्रात जे सुरू आहे त्याव्यतिरिक्त मध्य आणि पूर्व भागातही तणाव असल्याचं त्यांनी उघड केलं.

10 फेब्रुवारी 2021

पँगाँग लेक या ठिकाणहून दहा महिन्यांनंतर दोन्ही लष्करांनी आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली.

त्याचदिवशी रशियाची सरकारप्रणित वृत्तसंस्था टासने भारताविरुद्ध मे आणि जून महिन्यात झालेल्या संघर्षात चीनच्या 45 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं.

हे लक्षात घ्यायला हवं की गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीनने किती सैनिक गमावले याचा आकडा जाहीर केला नव्हता. मात्र आता त्यांना तो आकडा जाहीर करावा लागला. चार सैनिक गमावल्याचं चीनने सांगितलं.

29 एप्रिल 2021

चीनच्या वाणिज्या मंत्रालयाने जाहीर केलं की, गेल्या वर्षभरात भारताशी व्यापारी संबंध दृढ झाले आहेत. योगायोग म्हणजे याच काळात भारताने चीनच्या अॅपवर बंदी आणली. चीनच्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणं अवघड झालं.

याचा नेमका अर्थ काय?

स्वस्थी राव या अलीगढ मुस्लीम विद्यापीठात स्ट्रॅटेजिक अँड सेक्युरिटी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी यामागचा अर्थ उलगडून सांगितला. जर 2019 मध्ये अमेरिका हा आपला सगळ्यात मोठा व्यापारी सहकारी होता. 2020-21 वर्षात भारत-चीन संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊनही चीन आपला सगळ्यात मोठा व्यापारी सहकारी होता. हा विरोधाभास आहे. पण यामागे काही कारणं आहेत.

मोदी-जिनपिंग

फोटो स्रोत, Getty Images

जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था तसेच एकमेकांसाठी मोठ्या बाजारपेठ असणाऱ्या देशांचे व्यापारी संबंध अन्य कुठल्या परिस्थितीमुळे विलग करणं निव्वळ अशक्य आहे. आपल्या सैनिकांना फटका बसल्याने आपण चीनची अॅपवर बंदी घातली. पण चीनवर बहिष्कार घालण्याची भाषा आपण कधीही केली नाही.

14 मे 2021

कोरोनाच्या जीवघेण्या दुसऱ्या लाटेमुळे भारताने महत्त्वाच्या उपकरणांसंदर्भात चीनकडे मदत मागितली. एप्रिल महिन्यात 26,000 व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, 15,000 पेशंट मॉनिटर्स तसंच 3,800 टन वैद्यकीय उपकरण निर्यात केल्याचा दावा चीनने केला. 70,000 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि लशीच्या निर्मितीसाठी 30 लाख टन कच्चा माल भारतात पाठवण्यात आला.

त्याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनकडून आलेल्या मदतीसंदर्भात म्हटलं की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपकरणं, लशीच्या निर्मितीसाठी कच्चा माल हे मिळवण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत. कोव्हिडसारख्या गंभीर आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात सहकार्य अपेक्षित आहे.

3 जून 2021

परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अरिंदम बागची म्हणाले की, डिसएंगेजमेंटची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

सध्याची परिस्थिती कायमस्वरुपी टिकेल?

जनरल हुडा म्हणाले, आपण विचार केला तर नियंत्रणरेषेजवळ लाखो सैनिकांचं दल तैनात करण्यात येईल पण ते व्यवहार्य नाही. उन्हाळा सुरू आहे. लष्करी कारवाया, पेट्रोलिंग हे सगळं दोन्ही बाजूंनी वाढेल. पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. बॉर्डर प्रोटोकॉल शिथिल होतील. दोन्ही बाजूंच्या मनात संशय आहे. नियंत्रणरेषनजीकच्या भागात तणाव वाढू शकतो. स्थानिक पातळीवर काही घडामोडी घडू शकतात.

भारत-चीन तणाव

फोटो स्रोत, ANI

सिम यांच्या मते, मे 2020 पूर्वी ज्या भागात चीनचं सैन्य नव्हतं तिथे आताही त्यांची बरीच फौज दिसते आहे. चीनचा तिथे काय उद्देश आहे? भारतीय भूमीत आपण मर्यादित पद्धतीने विकासावर भर देत आहोत.

अमेरिकेशी संबंध घट्ट करतानाच भारताने क्वॅड अर्थात जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याशीही संबंध सुधारले आहेत. चीनला काटशह देण्यासाठी भारताने अन्य देशांशी संबंध अधिक बळकट करण्याचा विडा उचलला आहे असं म्हणता येईल का?

तैवानस्थित डॉ. पिंग कुइई चेन हे नॅशनल चेंगची विद्यापीठात डिप्लोमसी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी बीबीसी चायनीज सेवेशी बोलताना सांगितलं की, अनेक निरीक्षक असं सांगतात की भारताचे पश्चिमेकडील देशांशी संबंध बळकट झाले आहेत मात्र ते खरं नाही. भारत विविध पर्याय आजमावून पाहत आहे. जितके जास्त देश सहकार्य करू शकतील तेवढं चीनला टक्कर देताना भारताला उपयोगी पडेल. गेल्या वर्षभरात भारताने यासंदर्भात चांगली आगेकूच केली आहे.

(बीबीसी न्यूज चायनीजचे बहुभाषिक प्रतिनिधी मार्टिन चिंग स्झे यिप यांचंही या लेखासाठी सहकार्य लाभलं)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)