भारत-चीन वाद: LAC, LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डर यामध्ये नेमका फरक काय असतो?

भारत-चीन

फोटो स्रोत, AFP

गलवान खोरं, अक्साई चीन, कालापाणी, लिपुलेख, नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हे शब्द गेल्या काही दिवसात तुमच्या कानावर सातत्याने पडत असतील. त्याविषयी सविस्तर समजून घेऊया.

भारत-चीन, भारत-नेपाळ किंवा भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सीमावादाविषयी बोलताना या शब्दांचा उल्लेख वारंवार होतो.

लिपुलेख आणि कालापाणीवरून नेपाळशी सुरू झालेला सीमावाद शांतही झाला नव्हता तोच चीन सीमेवर भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक हाणामारी झाली.

ज्या सीमेवर ही घटना घडली तिला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखलं जातं.

त्यामुळे प्रश्न पडतो की आंतरराष्ट्रीय सीमारेषा, नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहेत तरी काय?

भारताच्या सीमा

भारताची जमिनीवरची सीमा (लँड बॉर्डर) 15,106.7 किमी लांब आहे. एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहेत : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी). तर 7516.6 किमीची सागरी सीमा आहे.

भारत-चीन

फोटो स्रोत, Getty Images

भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा

सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की भारताची चीनला लागून 3488 किमी लांब सीमारेषा आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते.

ही सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागली आहे. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.

मात्र, दोन्ही देशांमध्ये अजूनही निश्चित सीमा आखण्यात आलेली नाही. याचं कारण म्हणजे अनेक भूभागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. भारत पश्चिम सेक्टरमधल्या अक्साई चीनवर आपला दावा सांगतो. हा भाग सध्या चीनच्या नियंत्रणात आहे. 1962 च्या युद्धात चीनने या संपूर्ण भागावर कब्जा केला होता.

तर पूर्व सेक्टरमधल्या अरूणाचल प्रदेशावर चीन आपला दावा सांगतो. चीनचं म्हणणं आहे की हा दक्षिण तिबेटचा भाग आहे. चीन तिबेट आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातल्या मॅकमोहन रेषेलाही मानत नाही. अक्साई चीनवर भारताच्या दाव्याचंही चीन खंडन करतो.

या सर्व वादांमुळे भारत आणि चीन यांच्यात अजून सीमा निश्चिती होऊ शकलेली नाही. मात्र, जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) या संज्ञेचा वापर करण्यात येतो. ही लाईन ऑफ अॅक्च्युल कंट्रोलही अजून स्पष्ट नाही. दोन्ही देश आपापल्या वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सांगतात.

या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक हिमनद्या, बर्फाळ वाळवंट, डोंगर आणि नद्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या अनेक भागांमधून दोन्ही देशांचे जवान समोरासमोर ठाकल्याच्या बातम्या कायम येत असतात.

भारत पाकिस्तान सीमा

फोटो स्रोत, Getty Images

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा

सात दशकं लोटून गेल्यानंतरही जम्मू आणि काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहे. किंबहुना वादाचा हा मुख्य मुद्दा आहे. हा भाग सध्या नियंत्रण रेषेने विभागला गेला आहे. त्याचा एक भाग भारताकडे आहे तर दुसरा पाकिस्तानकडे.

1947-48 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू आणि काश्मीरवरून पहिलं युद्ध झालं. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली युद्धबंदी करार झाला. या कराराअंतर्गत एक युद्धबंदी सीमारेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार जम्मू-काश्मीरचा जवळपास एक तृतियांश भूभाग पाकिस्तानकडे गेला. पाकिस्तान याला 'स्वतंत्र काश्मीर' म्हणतो.

जवळपास दोन तृतियांश भूभाग भारताकडे आहे. यात जम्मू, काश्मीर खोरं आणि लडाख यांचा समावेश आहे. 1972 च्या युद्धानंतर शिमला करार झाला. या कराराअंतर्गत युद्धबंदी सीमारेषेला नियंत्रण रेषा घोषित करण्यात आलं. ही नियंत्रण रेषा 740 किमी लांब आहे.

या रेषेवर अनके ठिकाणी डोंगर आहेत. बराच भाग वस्ती करून राहण्यासाठी अनुकूल नाही. ही रेषा काही ठिकाणी गावांची विभागणी करते. तर काही ठिकाणी डोंगरांची. या रेषेवर तैनात भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या जवानांमध्ये काही ठिकाणी अंतर केवळ 100 मीटर एवढं कमी आहे. तर काही ठिकाणी हे अंतर पाच किमीसुद्धा आहे. या सीमारेषेवरून दोन्ही देशांमध्ये गेल्या पाच दशकांपासून वाद आहेत.

सीमा

फोटो स्रोत, Reuters

1947 च्या युद्धावेळी भारत-पाकिस्तान यांच्यात जी नियंत्रण रेषा मानली गेली अजूनही जवळपास तीच आहे. त्यावेळी काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी युद्ध लढलं गेलं होतं.

उत्तर भागात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला कारगिल शहराच्या मागे आणि श्रीनगर ते लेह राजमार्गापर्यंत मागे ढकललं होतं. 1965 ला पुन्हा युद्ध पेटलं. त्यानंतरची परिस्थिती 1971 पर्यंत कायम होती. 1971 ला पुन्हा युद्ध झालं.

1971 च्या युद्धात पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशची स्थापना झाली. त्यावेळी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी युद्ध झालं. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांच्या चेकपोस्ट ताब्यात घेतल्या. भारताला जवळपास 300 चौरस मीटर भूभाग मिळाला. हा भूभाग नियंत्रण रेषेच्या उत्तर भागात लडाख प्रदेशात होता.

1972 चा शिमला करार आणि शांतता चर्चेनंतर नियंत्रण रेषा पुन्हा प्रस्थापित करण्यात आली. दोन्ही पक्षांचं यावर एकमत झालं की परस्पर सहमतीने तोडगा निघत नाही तोवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवली जावी. ही प्रक्रिया लांबली. फिल्ड कमांडर्सने 5 महिन्यात जवळपास 20 नकाशे एकमेकांना दिले. अखेर करार झाला.

याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुजरात, राजस्थान आणि जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

सीमा

फोटो स्रोत, Getty Images

सियाचीन ग्लेशिअर : अॅक्च्युअल ग्राउंड पोशिझन लाईन

सियाचीन ग्लेशिअरच्या प्रदेशात भारत आणि पाकिस्तान यांच्यातली सीमा 'अॅक्च्युअल ग्राउंड पोझिशन लाईन'ने निश्चित होते. 126.2 किमी लांब 'अॅक्च्युअल ग्राउंड पोझिशन लाईन'वर भारताचा पहारा आहे.

80 च्या दशकापासून सर्वात भयंकर संघर्ष सियाचीन ग्लेशिअरवर सुरू आहे. शिमला करारावेळी भारत किंवा पाकिस्तान यापैकी कुणीच ग्लेशिअरवर सीमा निश्चितीचा आग्रह केला नव्हता.

कदाचित दोन्ही देशांनी या भयंकर भागाला आपल्या ताब्यात घेणं गरजेचं मानलं नसावं, असं काही विश्लेषकांना वाटतं. काहींच्या मते याचा अर्थ असा झाला असता की काश्मीरच्या एका भागात सीमारेषा आखणं जो चीन प्रशासित आहे आणि भारत त्यावर दावा करतोय.

भारत-भूटान सीमारेषा

भारत आणि भूटान यांच्यात 699 किमी लांबीची सीमा आहे. सशस्त्र सीमा दल या सीमेवर पहारा देतो. भारताच्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा भूटानला लागून आहे.

सीमावाद

फोटो स्रोत, Pib

भारत-नेपाळ सीमारेषा

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल और सिक्कीमच्या सीमा नेपाळला लागून आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातली आंतरराष्ट्रीय सीमारेषा 1751 किमी लांबीची आहे. या सीमेच्या रक्षणाची जबाबदारीही सशस्त्र सीमा दलावर आहे. दोन्ही देशांची सीमा बहुतेक ठिकाणी खुली आणि वेडीवाकडी आहे.

मात्र, सध्या सीमेवर सुरक्षेसाठी सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. या दोन्ही देशांची सीमाही अजून पूर्णपणे निश्चित नाही, ही मोठी अडचण आहे. महाकाली (शारदा) और गंडक (नारायणी) या नद्या ज्या भागांमध्ये सीमा निश्चिती करतात. तिथे पावसाळ्यात येणाऱ्या पुराने परिस्थिती पूर्णपणे बदलेली असते.

नद्यांचा प्रवाहदेखील काळानुरूप बदलत असतो. सीमा निश्चिती करणारे जुने खांब अनेक भागात अजूनही आहेत. मात्र, स्थानिकच त्यांना फारसं महत्त्व देत नाही.

भारत-म्यानमार सीमारेषा

भारत आणि म्यानमार यांच्यात 1643 किमी लांब सीमारेषा आहे. यापैकी 171 किमी लांबीची सीमा अजूनही सील नाही. आसम रायफल्सचे जवान या सीमेचं रक्षण करतात.

भारत-बांगलादेश सीमारेषा

4096.7 किमी लांब भारत-बांगलादेश सीमारेषा डोंगर, पठारी भाग, जंगल आणि नद्यांमधून जाते. या सीमेजवळ दाट लोकवस्ती आहे. या सीमेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या आत केवळ 1 किमीपर्यंतच्या भागात बीएसएफ कारवाई करू शकतं. यानंतर स्थानिक पोलिसांचं अधिकार क्षेत्र सुरू होतं.

कोरोना
लाईन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)