चिनी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्षं पूर्ण, अजूनही तरुणांना भुरळ घालण्याचा प्रयत्न का करतोय पक्ष?

फोटो स्रोत, BARCROFT MEDIA/GETTY IMAGES
- Author, पद्मजा वेंकटरमण
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
1 जुलै रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानपेला शंभर पूर्ण होत आहेत. गेल्या काही दिवसांत सीसीपीनं तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवान प्रयत्न केले आहेत.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तरुणांना पक्षाची गोष्ट सांगण्यापासून ते पक्षासंबंधित इतर महत्त्वाची माहिती देण्यावर जोर दिला आहे.
सोशल मीडियावर प्रचार कार्यक्रम सुरू करण्यापासून ते प्रमुख विद्यालयांमध्ये सीसीपीविषयीच्या अभ्यासासाठी रिसर्च सेंटर स्थापना करेपर्यंत, सरकारनं हाती घेतलेले कार्यक्रम पाहून असं वाटतंय की चिनी सरकार सध्या देशातल्या तरुणांना भुरळ घालायचा प्रयत्न करत आहे.
माध्यमांनीही शी जिनपिंग यांच्या विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या चर्चेला प्रमुख बातम्यांमध्ये स्थान दिलं आहे. हे तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण आहे, असं पक्षाचं म्हणणं आहे.
'आदर्शतरुण'
18 जून रोजी 'रायटिंग द यूथफूल चॅप्टर ऑन द मदरलँड' ही संकल्पना सुरू करण्यात आली. ज्याला चीनचं शिक्षण मंत्रालय, सेंट्रल सायबरस्पेस अडमिनिस्ट्रेशन, कम्युनिस्ट यूथ लीगची केंद्रीय समिती आणि बीजिंग यूनिव्हर्सिटीनं संयुक्तपणे प्रसिद्ध केलं आहे.
प्रसिद्ध पोर्टल Sohu.comच्या 21 जूनच्या रिपोर्टनुसार, 'रायटिंग द यूथफूल चॅप्टर ऑन द मदरलँड' ही संकल्पना नवीन मीडिया उत्पादनांना लॉँच करेल. वैचारिक आणि राजकीय शिक्षणासाठी एक ऑनलाईन प्रचारचंत्र तयार करेल आणि सायबरस्पेसमध्ये आदर्श तरुणांवर केंद्रित सेमिनारचं आयोजन करेल.

फोटो स्रोत, Getty Images
पक्षाला 100 वर्षं पूर्ण होत असताना मे महिन्यात 'ऐतिहासिक शून्यवाद' याविषयी लिहिलेल्या 20 लाखांहून अधिक पोस्ट हटवण्याचा चीनचा निर्णय पाहिल्यास पक्षाच्या या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण नजरेनं पाहिलं जात आहे.
गेल्या वर्षी भारतीय लष्करासोबत झालेल्या हिंसक झटापटीदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या चिनी सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी यंदाच्या फेब्रुवारीमध्ये चीन सरकारनं 3 ब्लॉगर्सला अटक केली होती.
यापैकी एका ब्लॉगरनं या झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांच्या सरकारी आकडेवारीविशषयी प्रश्न उपस्थित केले होते.
संस्कृतीच्या आडून प्रपोगंडा
सरकारी मीडिया 'रेड टुरिझम' वाढवण्याविषयी बोलत असतं, यात सरकार आपल्या क्रांतिकारी भूतकाळाला घट्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या स्थळांमधील पर्यटनाला प्रोत्साहन देत असतं.
ग्लोबल टाइम्सच्या मते, "4 मे रोजी जेव्हा देशात युवा दिन साजरा केला जातो, तेव्हा देशाच्या क्रांतिकारी वारशाच्या सन्मानार्थ या ऐतिहासिक स्थळांचा दौरा करण्यासाठी पोहोचलेले युवक रेड टुरिझमची ताकद बनले आणि वातावरणात देशभक्तीचं दर्शन पाहायला मिळालं."

फोटो स्रोत, Getty Images
शांघायची एक वेबसाईट सिक्स्थ टोनच्या मते, "शताब्दी वर्षाच्या निमित्तानं रॅप आर्टिस्टनी '100%' असं शीर्षक असलेलं गाणं गायलं होतं. ज्यात चीन आतापर्यंत काय कमावलं, याचं गुणगाण करण्यात आलं होतं. यात 5 जी तंत्रज्ञान आणि देशाच्या सध्याच्या अतंराळ कार्यक्रमाची प्रशंसा करण्यात आली आहे."
हॉँगकाँगस्थित प्रमुख वर्तमानपत्र साऊन चाईना मॉर्निंग पोस्टनुसार, "या गाण्यामध्ये 100 रॅपर्सपैकी मर्सा या रॅपरनं अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीसहित जी-7 देशांवर टीका केली आहे. या देशांवर त्यांनी चीनविरोधी असल्याचा आरोप केला आहे."
विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लक्ष
शताब्दी वर्षाच्या आयोजनापूर्वी 22 जूनला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पेकिंग यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या 32 विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींच्या पत्रांना उत्तर दिलं. यात त्यांनी आपली जागतिक पोहोच अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या प्रतिक्रियांमध्ये शी यांनी विद्यार्थ्यांना सगळ्या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला आहे.
सरकारी मीडिया चायना ग्लोबल टेलीव्हिजन नेटवर्क नुसार, यंदा सीसीपीच्या स्थापनेला 100 वर्षं होत आहे. शी यांनी असंही म्हटलं की, 2021 हे वर्षं समाजवादाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेनं चीनच्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीचं वर्षं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मे महिन्यात चीनच्या पेकिंग यूनिव्हर्सिटीत सीसीपीवरील इतिहासाच्या अभ्यासासाठी एक नवीन शैक्षणिक संशोधन संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं.
दुसरीकडे ग्लोबल टाईम्सनं 5 मे रोजीच्या रिपोर्टमध्ये बीजिंगस्थित समीक्षकांच्या हवाल्यानं लिहिलंय, "सीसीपीच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त या नवीन संस्थेच्या स्थापनेवरून हे संकेत मिळत आहेत की, पक्ष आपल्या इतिहासावरील शिक्षण मजबूत करत आहे."
तरुणांमध्ये अंसतोष
तरुण पीढीला डोळ्यासमोर ठेवत सीसीपीनं ज्या संकल्पना आणल्या आहेत, त्या आश्चर्यजनक आहेत.
तरुण विशेषत: विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सीसीपीच्या इतिहासाला आकार देण्याकरता महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यांतले अनेक सदस्य 1919च्या मे फोर्थ आंदोलनातून बाहेर पडले होते.
पक्षाची युवा शाखा कम्युनिस्ट यूथ लीग सध्या गटतटांमुळे त्रस्त आहे. असं असतानाही पक्ष तरुणांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.

फोटो स्रोत, XINHUA
राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट यूथ लीगच्या प्रमुख पदापर्यंत पोहोचलेल्या लोकांचे पंख कापले होते. 2017मध्ये त्यांनी सीसीपी यूथ लीगचे प्रमुख किन यिझी यांचे अधिकार कमी केले होते.
चीनमधील तरुणांमध्ये तेथील वर्क कल्चर आणि इतर काही मुद्द्यांमुळे असंतोष आहे. मे महिन्यात तरुणांनी देशातील कंत्राटी नोकरी पद्धत आणि खालावणाऱ्या रोजगाराच्या संख्येवर नाराजी व्यक्त केली होती.
सिक्स्थ टोननं 27 मे रोजी लिहिलं की, दुसरा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डोबनवर लाईंग डाऊन ग्रूपमध्ये जवळपास 6 हजार सदस्य आहेत.
यातल्या एका प्रसिद्ध अशा पोस्टमध्ये एक विशेष लाईफस्टाईल (टॅग पिंग) स्वीकार करण्यासाठी 7 स्टेप्स सांगितल्या आहेत. कार्यक्षेत्रात कामाच्या वाढत्या दबावामुळे तरुणांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारी मीडिया यापद्धतीच्या पावलांची निंदा करतं. ग्वांगझूमधील वर्तमानपत्र नानफैंग डेलीनं हे कृत्य लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.
अधिकृत अशा चायना डेलीनं 1 जूनला तरुणांच्या तक्रारींना आपण जागा देत आहोत, असं दाखवायचा प्रयत्न केला, पण निराशावादाला खतपाणी घालू नका, अशी सूचनाही केली.
यात म्हटलंय, "सरकार याप्रश्नी मार्ग काढत हे, हे चांगलं आहे. यातून तरुणांच्या समस्या दूर केल्या जातील. गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती कमी करणं आणि तरुणांसाठी भाड्याच्या घरांची सार्वजनिकरित्या उपलब्धता करून देण्याच्या दिशेनं चीननं आपले प्रयत्न वाढवले आहेत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








