बहुपतित्व: ‘बाईने एकाच वेळी अनेक पती केले तर मुलाला कुणाचं नाव देणार?’

फोटो स्रोत, Getty Images
दक्षिण आफ्रिका सरकारच्या एका प्रस्तावासंदर्भात खळबळ उडाली आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकावेळी एकाहून अधिक लग्न करण्याला कायदेशीर परवानगी मिळू शकते.
या प्रस्तावाला दक्षिण आफ्रिकेतील रूढी, परंपरावादी लोकांनी विरोध केला आहे.
या विरोधाबाबत भुवया उंचावण्याचं कारण नाही असं दक्षिण आफ्रिकेतील प्राध्यापक कॉलिन्स मचोको यांना वाटतं. मचोको हे या विषयावरील देशातल्या अग्रगण्य अभ्यासकांपैकी एक आहेत.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "आक्षेप नियंत्रणाबाबत आहे. आफ्रिकेतील समाज खऱ्या समानतेसाठी तयार नाही. जे नियमांच्या चौकटीत बसत नाहीत, त्यांचं काय करायचं हे समाजाला ठाऊक नाही."
दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना जगातील सर्वसमावेशक आणि खुल्या घटनांपैकी एक आहे. समलैंगिक विवाह आणि पुरुषांसाठी बहुपत्नीत्वाची मुभा इथे देण्यात आली आहे.
उद्योगपती आणि टीव्ही मूसा मसेलेकू यांनी महिलांच्या बहुपतित्वाला विरोध केला आहे. त्यांची स्वत:ची चार लग्नं झाली आहेत.

फोटो स्रोत, MUSA MSELEKU
ते सांगतात, "यामुळे आफ्रिकेची संस्कृती नष्ट होईल. या लग्नांच्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या मुलांचं काय? त्यांना कोणाची ओळख मिळणार? दक्षिण आफ्रिकेतल्या एका रिअॅलिटी शो चे मसेलेकू स्टार आहेत. बहुपत्नीत्व असणाऱ्या घरासंदर्भात हा कार्यक्रम आहे."
"महिला पुरुषांची भूमिका घेऊ शकत नाही. असं कधी ऐकलंही नाही. महिला पुरुषांसाठी लोबोला अर्थात (वरासाठी किंमत) देणार का? पुरुषांनी महिलांचं आडनाव लावावं अशी अपेक्षा ठेवणार का?"
प्राध्यापक मचोको यांनी शेजारच्या झिम्बाब्वेत जाऊन संशोधन केलं आहे. मचोको यांचा जन्मही तिथलाच. त्यांनी 20 महिला आणि त्यांच्या 45 पतींशी संवाद साधला.
मचोको सांगतात, "झिमाब्वेत अशा लग्नांना परवानगी नाही आणि सामाजिकदृष्ट्याही मान्यता नाही. समाजाने महिलांच्या बहुविवाह पद्धतीला स्वीकारलेलं नाही. यामुळे अशी लग्नं गुपचूप केली जातात. त्यांना गुलदस्त्यातच ठेवलं जातं. एखाद्या विश्वासार्ह माणसाला विचारलं तर तो होकारार्थी उत्तर देत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
मचोको यांच्या संशोधनात सहभागी व्यक्ती वेगवेगळ्या राहत होत्या. मात्र ते लोक महिलांच्या बहुपतित्व मुद्यासाठी आग्रही होते.
मचोको सांगतात, "एका महिलेनी सांगितलं की एकावेळी अनेक पुरुषांशी लग्न करण्याची तिची इच्छा सहाव्या इयत्तेत शिकत असल्यापासून म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून आहे. राणी मधमाशी अनेक नर मधमाशांबरोबर राहते हे कळल्यानंतर आपणही असंच करावं असं वाटलं."
जेव्हा ती सज्ञान झाली, तिने पुरुष सहकाऱ्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवायला सुरुवात केली. ते सगळे एकमेकांना ओळखत होते. त्या महिलेच्या नऊ पतींपैकी चार आधीचे बॉयफ्रेंड्स होते, असं मचोके सांगतात.
संशोधन
महिलांच्या बहुपतित्वामध्ये महिलाच नातेसंबंधांची सुरुवात करतात. महिला पतींना आयुष्यात जोडीदार होण्यासाठी आमंत्रण देतात. काहीजणी वर प्राप्त करण्यासाठी किंमतही देतात. काहीजणी उपजीविका करण्याचं आश्वासन देतात. एखाद्या महिलेला असं वाटलं की पती नातेसंबंधात अस्थिर आहे तर त्या पतीला सोडूनही देतात.
प्राध्यापक मचोको सांगतात की त्यांनी संशोधनासाठी पुरुषांशीही संवाद साधला. प्रेमासाठी आपण लग्नाला तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं पण त्यांना बायकोला सोडायचं नव्हतं.

फोटो स्रोत, Barbara Singer
काही पुरुषांनी वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. ते आपल्या पत्नीला शरीरसुखाचा आनंद देऊ शकत नव्हते. घटस्फोट किंवा प्रेमप्रकरण टाळण्यासाठी त्यांनी पत्नीला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली.
एक दुसरं कारण म्हणजे वंध्यत्व. काही पुरुषांनी या कारणावरुन आपल्या पत्नीला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दिली.
जेणेकरून त्यांना मुलं होऊ शकतील. अशा पद्धतीने समाजापासून आपल्याला लपवू शकतात आणि नामर्द या सामाजिक शिक्क्यापासून दूर राहू शकतात.
प्राध्यापक मचोको सांगतात की, "दक्षिण आफ्रिकेत एक महिला एकाचवेळी अनेक पती करते की नाही त्यांना ठाऊक नाही. महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सरकारला सांगितलं की अशा लग्नांना समानता आणि पसंतीच्या हिताने कायदेशीर स्वरूप द्या. सध्याच्या कायद्यानुसार पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नींचा अधिकार आहे."
महिलांना एकापेक्षा जास्त पती करण्याचा अधिकार कागदोपत्री सादर करण्यात आला त्याला ग्रीन पेपर असं म्हटलं जातं.
लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सरकारने ग्रीन पेपर लोकांसमोर सादर केला.
वुमन लीगल सेंटरमधील वकील चार्लिन सांगतात की, "मानवाधिकार कायम राहावेत यासाठी ग्रीनपेपर आहे. याकडे जराही दुर्लक्ष व्हायला नको. ही संघटना महिलांच्या अधिकारांसाठी काम करते."

फोटो स्रोत, RAJESH JANTILAL
त्या सांगतात, "पितृसत्ताक विचारसरणीला छेद देणारा विचार म्हणून कायदेशीर बदलाला नाकारू शकत नाही".
कागदपत्रांमध्ये मुस्लीम, हिंदू, ख्रिश्चन, रस्ताफेरियन (जमैकात 1930 च्या दशकात तयार झालेला धर्म) धर्मातील लग्नांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्तावही आहे.
या प्रस्तावाचं संबंधित धर्मांनी व्यापक स्वरूपात स्वागत केलं आहे. मात्र महिलांनी एकापेक्षा अधिक पती करण्याच्या प्रस्तावाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात धर्मगुरूंनी टीका केली आहे. संसदेत धर्मगुरूंसाठी जागा असतात.
विरोधी पक्षनेते आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते रेव्हरंड केनेथ मॅथ्यू यांनी सांगितलं की असा कायदा समाजाला नष्ट करेल.
ते म्हणाले, "अशी वेळ येईल की एक पुरुष म्हणेल- तू अन्य पुरुषासोबत जास्त वेळ असतेस. मला वेळ देत नाहीस. मग दोन पुरुषांमध्ये यावरून भांडणं होतील."
इस्लामिक अल जमा पक्षाचे नेते गेनिफ हेन्ड्रिक्स यांनी सांगितलं की, "तुम्ही कल्पना करा की मूल जन्माला आल्यानंतर ते कुणापासून झालं आहे यासाठी डीएनए टेस्ट कराव्या लागतील."
आवाहन
दुसरीकडे सेलेकू यांनी 'समानतेच्या सिद्धांताला इतक्या दूर नेऊ नका,' असं आवाहन दक्षिण आफ्रिकेच्या जनतेला केलं आहे.
'काही गोष्टी संविधानात लिहिल्या आहेत म्हणजे त्या आपल्यासाठी चांगल्या असतीलच असं नाही,' असं ते म्हणाले.
महिलांसाठी वेगळा न्याय का, तुमच्याही चार पत्नी आहेत. यावर ते म्हणाले, "मला चार विवाहांमुळे पाखंडी म्हटलं गेलं. आता गप्प राहण्याऐवजी मी बोलेन. मी हे म्हणेन की हे बिगरआफ्रिकी आहेत. आम्ही जे आहोत ते आहोत, त्यात बदल होऊ शकत नाही."
प्राध्यापक मचोको यांच्या मते महिलांमध्ये बहुविवाह केनिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि नायजेरियात होतात. गॅबनमध्येही याला कायदेशीर मान्यता आहे.
ते सांगतात, "ख्रिश्चन धर्माच्या आगमनानंतर महिलांची भूमिका कमी झाली आहे. उत्तराधिकाराचं एक साधन म्हणून लग्नाकडे पाहिलं जातं."
या लग्नांमधून होणाऱ्या मुलांचं काय हा प्रश्न पितृसत्ताक पद्धतीतही आहे. ते सांगतात, "मुलांच्या संदर्भातला प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. अशा लग्नाच्या माध्यमातून होणारी मुलं ही कुटुंबाची असतात."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








