महिलांवरील वाईट टिप्पणीनंतरही राजकारण्यांना माफी का मिळते? - दृष्टिकोन

रमा देवी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रमा देवी
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

खूप खूप अभिनंदन. देशातल्या सगळ्या महिला खासदार, महिला संघटना, सामान्य महिला, तुमचं आणि माझंसुद्धा खूप खूप अभिनंदन. कारण समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी माफी मागितली आहे.

संसदेत डेप्युटी स्पीकरच्या पदावरील रमादेवी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टिप्पणी केल्यानंतर आझम खान लोकसभेतून बाहेर पडले होते.

महिला खासदारांनी या प्रकारावर भयंकर नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे आझम खान यांनी 10 सेकंदांची का होईना पण माफी मागितली.

नाहीतर पुन्हा एकदा एका महिला राजकारण्याला एका पुरुषाच्या वाईट टिप्पणीला विनोद समजून दूर सारावं लागलं असतं.

तो पुरुष जो महिलांना त्यांच्या पदामुळे नाही तर चेहरा, सौंदर्यामुळे आदर देण्याची भाषा बोलतो आणि तिच्यावर हसत सुटतो.

जसं की महिलांच्या घटनात्मक पदावर असण्याला काहीच महत्त्व नाही. शेवटी सगळं काही ती एक महिला आहे इथवरच येऊन थांबतं. किती कष्ट करून ती या पदावर पोहोचली आहे, याला काही अर्थ उरत नाही.

माफ करा, पण हा विनोद नाहीये. याला चुकीचं वर्तन करणं म्हणतात.

अशी वर्तणूक पुरुष महिलांसोबत करतात ते महिलांना कमी लेखण्यासाठीच. महिला असल्यामुळे तिच्या प्रगतीमागे सौंदर्याचा हात असेल, असं या पुरुषांना यातून सांगायचं असतं. महिला असल्यामुळे त्यांना विशेष भाव देण्यात येतो, एक वरिष्ठ असल्यामुळे नव्हे तर शारीरिक सौंदर्यामुळे त्यांची मतं टाळता येत नाहीत, असं या पुरुषांना वाटतं.

सामाजिक स्वीकृती

एखाद्या पुरुष राजकारण्यावर कुणी अशी टिपण्णी करताना तुम्ही कुणाला पाहिलं आहे?

आपण असा विचार तरी करू शकतो का की, एखादा पुरुष पंतप्रधान, गृहमंत्री अथवा सभापती या पदावर आहे आणि एखादा खासदार त्यांना म्हणेल की, तुमचं सौंदर्य मला इतकं आवडतं की, कायमस्वरूपी मला तुमच्याकडे बघायला आवडेल.

किती वाईट आहे हे. पण आपल्याकडे हे चालतं, त्यामुळे हे प्रकार सर्रास होतात.

आझम खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आझम खान

कधी संसदेत, तर कधी बाहेर. मग मोठ्याप्रमाणात चर्चा होते, टीका होते, टाव्हीवर चर्चा होते, लेख लिहले जातात.

वेळेसोबत ही चर्चा मागे पडते. नशिबात असेल तर 10 सेकंदांची माफी मिळते.

अशी माफी, ज्यात म्हटलं जातं, "कुणी खासदार अशा नजरेतून स्पीकरकडे बघू शकत नाही. पण तसं वाटत असल्यास मी माफी मागतो."

याचा अर्थ चुकी महिलेचीच आहे. तिला विनोद समजून घेता आला नाही. विनाकारणच तिला वाईट वाटलं.

आझम खान यांच्या माफीवर रमा देवी म्हणतात, "मला माफी नकोय. तुमच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, यासाठी पावलं उचलायला हवीत."

पण, संसदेत सर्वांच्या संमतीनं माफीनामा मंजूर करत पुढच्या विधेयकावर चर्चा सुरू होते.

संसद

फोटो स्रोत, Getty Images

शिस्तीच्या कारवाईची रमादेवी यांची मागणी कुठेतरी विरून जाते. महिलांच्या समान अधिकाराच्या मागणीला संसद मात्र खोटं ठरवते, असं इथं दिसून येतं.

कारण हे सगळ्यांना मंजूर आहे. ही वागणूक एखादा पक्ष अथवा व्यक्तीची नव्हे, तर सामान्य वागणुकीचा भाग आहे.

महिला खासदारांच्या शरीरावर टिप्पणी करणं, मुलं मुलींचं लैंगिक शोषण करत असेल तर त्याला फक्त एक चूक म्हणणं, महिलांच्या कामाला दिखावा संबोधणं, महिलांच्या कामगिरीला सौंदर्यामुळे मिळालेलं यश सांगणं, हे सगळं वेळोवेळी समोर येतं.

याप्रकारच्या वागणुकीबाबत पुरुष राजकारण्यांमध्ये एक प्रकारची सहमती आहे.

याप्रकाराबाबत सामान्य जनतेमध्येही सहमती आहे.

महिलांसंबंधीची कोणती वागणूक योग्य आहे, महिलांच्या कामगिरीत त्यांच्या सौंदर्याचा किती हात आहे, त्यांनी कोणत्या पातळीपर्यंत सहन करायला हवं. त्यांनी किती बोलायला हवं आणि त्यांच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्यांचं काय व्हायला हवं.

आझम खान

फोटो स्रोत, Getty Images

हे विरोधाचा आवाज आणि सहमतीच्या शांततेचं राजकारण आहे. जे महिला सहन करत आल्या आहेत, तसंच विरोधही करत आल्या आहेत.

हा आवाज कधीतरी ही शांतता भंग करेल, अशी अपेक्षा ठेवून विरोध करत आल्या आहेत. 10 सेकंदाची माफी का असेना, पण आवाजानंतरचं हे पहिलं पाऊल आहे.

सार्वजनिक स्तरावरील लाजेचा यात थोडा भाव आहे. मत देण्यापूर्वी आपण त्या नेत्याच्या वर्तणुकीबाबत विचार करावा, या दिशेनं पडलेलं हे पहिलं पाऊल आहे.

किंवा अशी घटना पुन्हा घडल्यास इतका आवाज करावा की, तो संसदेच्या आत पोहोचेल आणि माफीपेक्षा जास्त काहीतरी पदरात पडेल.

कुणी कारवाईची मागणी करत असेल, तर ती हवेत विरून जाणार नाही, इतका विश्वास महिला खासदारांमध्ये निर्माण व्हावा.

त्यांना सर्वांची साथ मिळेल. संसदेच्या आत त्यांच्या तक्रारीला ते महत्त्व मिळावं, ज्यानं एक सकारात्मक उदाहरण सगळ्यांसमोर निर्माण होईल.

ज्यामुळे रस्त्यावर महिलांवर वाईट टिप्पणी करणारे, ऑफिसमध्ये महिलांच्या कामगिरीला दुर्लक्षणारे आणि आपापसात महिलांच्या शरीरावर टिप्पणी करणाऱ्यांना लाज वाटेल.

सत्तेच्या वर्तुळात जी ही गोष्ट घडली आहे, तिच्याकडे आपण दुर्लक्ष केलं असतं, तर या वाईट वागणुकीचा आपणही एक भाग बनलो असतो.

आणि हाच आवाज न थकता कायम ठेवल्यास बदलाची सुरुवात नक्कीच होऊ शकते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)