'गुलामांची रसद पुरवण्यासाठी गुलामांवर मुलं जन्माला घालण्याची सक्ती'

गुलाम

फोटो स्रोत, Reuters

सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान आफ्रिकेतून अमेरिकेत लाखो लोकांना गुलाम म्हणून आणण्यात आलं. गुलामांची रसद कमी पडू नये यासाठी त्यांच्यावर मुलं जन्माला घालण्याची सक्ती करण्यात आल्याचं एका महत्त्वपूर्ण डीएनए संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

या संशोधनात पन्नास हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. गुलाम म्हणून खरेदी-विक्री प्रक्रियेतून अमेरिकेत आलेल्या आफ्रिकन माणसांचा सध्याच्या लोकसंख्येवर काही जनुकीय परिणाम झाला का? हे या संशोधनाद्वारे अभ्यासण्याचा प्रयत्न झाला.

या संशोधनातून बलात्कार, अत्याचार, आजारपणं, वांशिक भेदभावाचे प्रसंगही समोर आले आहेत.

1515 ते 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेतून 1.25 कोटींहून अधिक माणसांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्यात आली.

कोरोना
लाईन

या प्रक्रियेदरम्यान आफ्रिकेहून अमेरिकेला जात असताना वाटेतच 20 लाख जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुरुष, महिला तसंच लहान मुलं यांचा समावेश होता.

गुणसूत्रांच्या अभ्यासाकरता जेनेटिक्स क्षेत्रात कार्यरत कंपनी '23 एंडमी'ने हे संशोधन हाती घेतलं. मूळ आफ्रिका वंशाच्या 30,000 लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं.

या संशोधनाचे निष्कर्ष 'अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन जेनेटिक्स'मध्ये प्रकाशित करण्यात आले.

जहाज

फोटो स्रोत, Getty Images

अंगोला आणि काँगोत सापडलं मूळ

'23 एंडमी'चे जनुकीय शास्त्रज्ञ स्टीव्हन मिशेलेटी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की जनुकीय परिणाम आणि गुलामांना आणण्यात आलं त्या जहाजांची संख्या यांची तुलना करण्यात आली. आकड्यांमध्ये किती साधर्म्य आहे आणि किती फरक आहे हे पडताळलं गेलं.

गुलामांना आफ्रिकेतील कोणत्या देशातून पकडण्यात आलं आणि अमेरिकेतील कोणत्या देशात सोडण्यात आलं यासंदर्भातील कागदपत्रांमधील माहिती मिळतीजुळती आहे. परंतु काही बाबतीत तफावत प्रचंड आहे.

संशोधनातून हे स्पष्ट झालं की आफ्रिकन वंशाच्या बहुतांश अमेरिकन नागरिकांचं मूळ अंगोला आणि काँगो या देशांमध्ये आहे.

अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत नायजेरियन वंशाचे लोक अधिक असल्याची गोष्ट चक्रावून टाकते. या भागातील गुलाम बनवण्यात आलेल्या लोकांच्या संख्येचा आणि संशोधनातून समोर आलेल्या आकड्यांची तुलना करण्यात आली. त्यातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

1619 ते 1807 दरम्यान वसाहती व्यापाराच्या माध्यमातून या गोष्टींचा उलगडा झाला, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.

गुलाम बनवण्यात आलेल्या मूळच्या नायजेरियन वंश असलेल्या लोकांना ब्रिटिश कॅरेबियनमधून दुसऱ्या भागात नेण्यात आलं. गुलामांच्या अर्थव्यवस्थेला कायम सुरू ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. तेव्हा ट्रान्स-अटलांटिक गुलामांची खरेदीविक्री थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता.

सेनेगल आणि गांबियाच्या माणसांचं कमी प्रतिनिधित्व असल्याचं पाहून संशोधनकर्त बुचकळ्यात पडले. याच भागातून सुरुवातीला माणसांना गुलाम करून आणण्यात येऊ लागलं होतं.

गुलाम

फोटो स्रोत, Getty Images

महिलांवर बलात्कार आणि अत्याचार

संशोधनकर्त्यांनी गुलामांच्या खरेदीविक्रीतील दु:खद क्षणांचा दाखला दिला आहे. अनेकांना शेतावर कामासाठी पाठवण्यात आलं. काही ठिकाणी मलेरिया आणि अन्य आजारांचा धोका होता.

दुसरं म्हणजे नंतरच्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांना पाठवण्यात आलं. यापैकी अनेकजणांनी गंतव्य स्थानी पोहोचण्याआधीच जीव गमावला.

गुलाम बनवण्यात आलेल्या महिलांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली त्याचा स्पष्ट परिणाम अमेरिकेतील आताच्या पिढ्यांवर झाला आहे.

गुलामांच्या मालकांनी या महिलांवर बलात्कार आणि अन्य लैंगिक अत्याचार केले. हे यामागचं कारण असू शकतं.

ब्रेंक्टीमेंटो नावाच्या एका धोरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये युरोपियन पुरुषांना पाठवण्यात येई जेणेकरून मुलं जन्माला घालण्याच्या माध्यमातून आफ्रिकन वंश कमी होईल, असं संशोधनकर्त्यांनी म्हटलं आहे.

मुलं जन्माला घालण्याची सक्ती

गुलामांची लोकसंख्या वाढत राहावी, म्हणजेच गुलामांचा पुरवठा कायमस्वरुपी होत राहील यासाठी गुलाम बनवण्यात आलेल्या लोकांना मुलं जन्माला घालण्याची सक्ती करण्यात येई असं संशोधनकर्त्यांच्या निदर्शनास आलं आहे.

अमेरिकेत महिलांना मूल जन्माला घातल्यानंतर स्वातंत्र्य देण्यात येईल असं आश्वासन दिलं जायचं.

ब्लॅक लाईव्स मॅटर प्रकरणाने वसाहतवादी मानसिकता आणि आफ्रो-अमेरिकन वंशाच्या लोकांवर करण्यात आलेली गुलामगिरीची सक्ती या गोष्टी ऐरणीवर आल्या आहेत.

वसाहतवादाच्या काळादरम्यान गुलामांचा व्यवहार करणाऱ्यांचे पुतळे पाडून टाकण्यात येत आहेत. कारण गुलामांच्या खरेदीविक्री व्यवस्थेचं गुणगान करणाऱ्यांची प्रतीकं आंदोलनकर्ते नष्ट करू पाहत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)