हत्तींच्या कळपाचा धुडगूस घालत 500 किमी प्रवास, शास्त्रज्ञ पडले कोड्यात

हत्ती हा नैसर्गिकदृष्ट्याच अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. हत्तींवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांकडे या गोष्टीला दुजोरा देणारे अनेक पुरावेही आहेत.

पण चीनमधल्या हत्तींच्या एका कळपानं जगभरातील शास्त्रज्ञांच्या अनेक समजुतींना धक्का दिला आहे.

हत्ती नेहमीच छोट्या छोट्या अंतरांचे प्रवास करतच असतात. पण चीनमधल्या या हत्तींच्या कळपाने जवळपास वर्षभरापासून अधिक काळ प्रवास करत 500 किलोमीटरपेक्षाही अधिक प्रवास केला आहे. या लांब पल्ल्याच्या प्रवासात हे हत्ती त्यांच्या मूळ अधिवासापासून पुष्कळ दूर आले आहेत.

त्यांनी गेल्यावर्षी वसंत ऋतूत चीनच्या नैऋत्य भागात असलेल्या शियुंगबना राष्ट्रीय अभयारण्यातून प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. म्यानमार आणि लाओसच्या सीमांना लागून असलेला हा प्रदेश आहे.

या हत्तींनी आधी उत्तरेकडे जायला सुरूवात केली. अनेक गावांमधून आणि शहरांमधूनही या हत्तींनी प्रवास केला. तो करत असताना त्यांनी लोकांचे दरवाजे तोडले, दुकानांमध्ये घुसले, खाणं उचलून नेलं, चिखलात धुडगूस घातला, कालव्यांमध्ये आंघोळ केली आणि जंगलामधल्या खड्ड्यांत झोपही काढली. त्यांनी पीकांचीही नासधूस केली.

त्यानंतर त्यांनी पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करायला सुरुवात केली. हा कळप यक्सी शहराजवळच्या शिजे भागात शेवटचा दिसला होता.

ते आता परत चालले आहेत का किंवा मुळात त्यांनी हा इतका लांब पल्ल्याचा (आतापर्यंत हत्तींच्या कळपानं केलेला सर्वांत मोठा) प्रवास केलाच का या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. त्यांची पुढची हालचाल काय असेल याचाही अजून अंदाज बांधता येत नाहीये.

शास्त्रज्ञांचा गोंधळ

"खरं काय आहे, हे कोणालाच माहीत नाहीये. पण याचा संबंध नक्कीच अन्न, पाणी आणि निवारा या मुलभूत संसाधनांशी आहे. आशियाई हत्तींचं वास्तव्य ज्या ज्या जंगलांमध्ये होतं, तिथे आता मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे ही वस्तुस्थिती पण यातून दिसते.

मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट होणं किंवा ते विभागले जाणं तसंच संसाधनांची कमतरता निर्माण होण्यासारख्या समस्या वाढत आहेत, "न्यूयॉर्कमधील सिटी विद्यापीठातील हंटर कॉलेजमध्ये हत्तींच्या मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेले जोशुआ प्लोटनिक यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

प्लोटनिक यांनी सांगितलं की, त्या हत्तींच्या गटातील बदलत्या सामाजिक पद्धतींशीही त्याचा संबंध असावा.

हत्तींच्या कळपात मातृसत्ताक पद्धत असते. कळपातील वयस्कर आणि शहाण्या मादीकडे कळपाचं नेतृत्व असतं. आजी, आया, काकी-मावश्या आणि त्यांचे मुलगे आणि मुली अशा कुटुंबाप्रमाणे हा कळप असतो.

वयात आल्यानंतर हत्तीच्या कळपातले नर बाहेर पडतात आणि एकट्याने किंवा इतर काही नरांसोबत प्रवास करतात. मादीशी समागम करण्यापुरते ते काहीकाळ एकत्र येतात आणि नंतर पुन्हा बाहेर पडतात.

मात्र, चीनमधल्या या हत्तींच्या कळपामध्ये एकूण 16 की 17 हत्ती होते, ज्यामध्ये तीन नर होते.

एका महिन्यानंतर दोन नर कळपापासून दूर गेले. त्यानंतर मागे राहिलेला एक नरही या महिन्याच्या सुरूवातीला कळपातून बाहेर पडला.

"नरानं कळपातून बाहेर पडण्यात काही वेगळं नाहीये, पण तो इतका काळ या कळपासोबत राहिला याचंच मला विशेष वाटतंय. जेव्हा मी त्यांना शहरांमधून किंवा गावांमधून प्रवास करताना पाहिलं, तेव्हा ते सगळे एकमेकांना अगदी चिकटून चिकटून चालले होते. हा काळजीचा विषय," शियुंगबना ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डनमध्ये प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक असलेल्या अहिंसा कम्पोज-अर्सेइज सांगतात.

इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत हत्तींचं वर्तन हे मनुष्याच्या वागण्याशी जास्त मिळतजुळतं असतं. जन्माचा आनंद, मृत्यूचं दुःख, अनोळखी प्रदेशात गेल्यावर निर्माण होणारी बैचेनी हे सगळं माणसांसारखंच असतं.

याच प्रवासात कळपातल्या दोन माद्यांनी पिलांना जन्मही दिला. याचंही संशोधकांना आश्चर्य वाटत आहे.

"हत्ती हे सवयींचे पक्के आणि त्यांच्या रुटिनला चिकटून राहणारे असतात. त्यामुळेच गर्भारपणात असा प्रवास करणं ही हत्तींचा स्वभाव पाहता अनैसर्गिक वाटणारी गोष्ट आहे. कारण या काळात ते सर्वांत सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करत असतात," झांबियामधील वन्यजीव संवर्धन संस्था गेम रेंजर्स इंटरनॅशनलच्या लिसा ऑलिव्हिए सांगतात.

मोठ्या खड्ड्यात झोपलेल्या या हत्तींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोतलं असं एकत्र झोपण्याचं हत्तींचं वागणंही नेहमीचं नाहीये.

"हत्तींच्या कळपात पिलं सहसा जमिनीवर झोपतात आणि मोठे हत्ती झाडांचा किंवा वाळवीच्या वारूळाचा आधार घेऊन कलंडतात. कारण हत्तीचा देह इतका अवजड असतो, की जमिनीवर आडवं झोपल्यानंतर एखादं संकट आलं तर त्यांना पटकन उठताही येत नाही. शिवाय पूर्णपणे आडवं होऊन झोपल्यानं त्यांच्या हृदयावर तसंच फुफ्फुसावर ताण येतो," असं त्या सांगतात.

"त्यांच्या तशा झोपण्यातून ते प्रचंड थकले असल्याचं, त्यांच्या अंगातील त्राण निघून गेल्याचं जाणवत होतं. त्यांच्यासाठी हा सगळा प्रवास नवीनच असणार. हत्ती जेव्हा प्रवास करतात, तेव्हा चालताना त्यांच्या वजनामुळे जी कंपनं निर्माण होतात, त्यातून मागच्या हत्तींना दिशा कळत राहते. हा एकप्रकारे त्यांचा संवाद असतो. पण शहरांत-गावांमध्ये या हत्तींनी इतक्या प्रकारचे आवाज ऐकले, ते त्यांच्यासाठी दमवणारे असू शकतात."

अधिवास नष्ट होणं

हे नेहमीप्रमाणे हत्तींकडून केलं जाणारं स्थलांतर नव्हतं, यावर शास्त्रज्ञांचं एकमत आहे. कारण हत्तींनी एका ठराविक मार्गाचा अवलंब केला नाही.

चीन हा जगातील मोजक्या देशांपैकी आहे, जिथे हत्तींची संख्या वाढली आहे. संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यामुळे हे शक्य झालं.

चीननं तस्करी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आणि त्याचा परिणाम म्हणून हत्तींची संख्या वाढली. युनान प्रांतात 1990 मध्ये हत्तींची संख्या 193 होती. आज इथे 300 च्या आसपास हत्ती आहेत.

मात्र शहरीकरणं आणि जंगलं नष्ट झाल्यामुळे हत्तींचे अधिवास नष्ट झाले आहेत आणि याच कारणासाठी ते मुबलक अन्न असलेल्या नवीन अधिवासाचा शोध घेत आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं.

हत्तींना प्रचंड प्रमाणात खायला लागतं. त्यांच्या शरीराची ती गरजच असते. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ हा दिवसाला 150 ते 200 किलो अन्न शोधण्यातच जातो.

हवाई निरीक्षण

हत्तींच्या या प्रवासात त्यांचा मनुष्यांसोबत कोठेही धोकादायक पद्धतीने संघर्ष झाला नसल्यानं तज्ज्ञांनी दिलासा व्यक्त केला आहे. यामध्ये इतरही काही सकारात्मक बाबी आढळून आल्या आहेत.

या हत्तींच्या प्रवासावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे संशोधकांना हत्तींच्या मार्गात कोणतीही बाधा न आणताही बरीच माहिती मिळाली. शिवाय लोकांना कायम आठवणीत राहतील असे फोटोग्राफ पाहता आले.

या कळपाचं रक्षण करण्यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन आणि वन्यजीव संवर्धकांनी केलेल्या प्रयत्नांचाही ऑलिव्हिए उल्लेख करतात.

गेल्या काही महिन्यांत प्रशासनानं हत्तींसाठी अन्न उपलब्ध करून दिलं. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ट्रक उभे करून दिले. वाहतुकीसाठी रस्ते बंद केले.

चीनमधील माध्यमंही हत्तींच्या प्रवासाची माहिती रोजच्या रोज घेत होती. सोशल मीडियावर तर हा कळप प्रचंड व्हायरल झाला होता.

अशापद्धतीनं दखल घेतली गेल्यामुळे लोकांमध्ये जागरुकता आणि संवेदनशीलता वाढली. त्यामुळे जगभरातही वन्यजीव संवर्धनाला मदत होईल, असा विश्वास ऑलिव्हिए व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)