You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तामिळनाडू हत्ती : अंगावर पेटता टायर फेकल्यामुळे हत्तीचा मृत्यू, दोघांना अटक
अंगावर पेटता टायर फेकल्यामुळे तामिळनाडूतल्या निलगिरी जिल्ह्यात एका हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हत्तीच्या मृत्यूनंतर तामिळनाडू पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मासनगुडी इथं पार्क केलेल्या एका कारची मोडतोड केल्यामुळे या हत्तीवर 8 जानेवारीला हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती हत्तीच्या दिशेनं पेटता टायर फेकताना दिसत आहे. हा टायर हत्तीच्या डोकं आणि कानावर पडल्यामुळे हत्तीच्या डोक्याला आग लागलेली दिसते. त्यानंतर वेदनेनं हत्ती मोठमोठ्यानं ओरडतो आणि शेजारच्या जंगलात पळताना दिसत आहे.
या हत्तीची आधीपासूनच पाठ दुखत होती आणि वनविभाग त्याच्यावर उपचार करत होता, असं वन विभागातल्या अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे.
याप्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी एका व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं, मदुमलाई टायगर रिझर्व्ह झोनचे उपसंचालक एलसीएस श्रीकांत यांनी सांगितलं आहे.
घटना कशी उघडकीस आली?
हा हत्ती गेल्या तीन महिन्यांपासून मासनगुडीच्या जंगलात फिरत होता. तो वेळोवेळी लोकांच्या नजरेस पडत होता. वनविभाग त्याला पकडून जंगलात सोडत होतं.
पण काही दिवसांपूर्वी तो एका ठिकाणी निपचित अवस्थेत आढळला. वनअधिकारी त्याच्याजवळ पोहोचले, तेव्हा त्याच्या अंगावर आगीमुळे जखमा झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विशेष करून हत्तीचे कान आणि पाठीला जखम झाली होती.
तेव्हापासून वनविभागानं हत्तीवर उपचार सुरू केले. पण, जखमा भरत नसल्यामुळे हत्तीचा एक कान पूर्णपणे जळून गेला. त्यानंतर हत्तीच्या अंगातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव व्हायला लागला.
त्यानंतर हत्तीला इतर ठिकाणी उपचारासाठी हलवण्याच्या उद्देशानं वनअधिकाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अधिकारी हत्तीला गाडीत बसवत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रेमंड आणि प्रशांत या दोघांना पोलिसांनी अटक कली आहे. तसंच रायन या तिसऱ्या जणाचा पोलीस शोध घेत आहेत. प्राणी सुरक्षा कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)