You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
50 फूट खोल विहिरीत पडलेल्या हत्तिणीला क्रेननं असं काढलं बाहेर
तामिळनाडूतील धरमपुरी येथील विहिरीत हत्तिणी पडल्याची घटना घडली. बचावकार्याच्या 14 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर हत्तिणीला बाहेर काढण्यात यश आलं.
धरमपुरी येथील 16.7 मीटर खोल म्हणजे जळपास 50 फुटांपर्यंत खोल विहिरीत ही हत्तीण पडली होती. या हत्तिणीचे वय 25 वर्षे आहे.
ही घटना घडताच बचावकार्यासाठी पथक तिथं पोहोचलं आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. सर्वात आधी विहिरीतील सर्व पाणी पंपाच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर हत्तिणीला बेशुद्ध करण्यात आलं आणि मग तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. भल्या मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हत्तिणीला बाहेर काढलं गेलं. जवळपास 14 तासांची ही बचाव मोहीम होती.
हत्तिणीला बाहेर काढल्यानंतर काही वेळाने तिला शुद्ध आली आणि त्यानंतर तिला जवळच असलेल्या होसूर जंगलात सोडण्यात आले.
हत्तिणीसाठी सुरू असलेलं बचावकार्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. हत्तिणीला बाहेर काढल्यानंतर लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात बचावकार्य करणाऱ्या पथकाचं कौतुक केलं.
वनाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ही हत्तिणी इतर दोन हत्तींसोबत या परिसरात फिरत होती.
हत्तिणीला वाचवणाऱ्या बचावपथकाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरून प्राणीप्रेमी त्यांचे आभारही मानत आहेत.
सोशल मीडियावर वन्यजीवांबद्दल माहिती शेअर करणारे वनाधिकारी परवीन कासवान यांनी हत्तिणीच्या जगण्याच्या प्रबळ इच्छेचंही कौतुक केलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)